दृष्टिकोन : काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे प्रियांका सक्रिय आहेत का?

फोटो स्रोत, SANJAY KANOJIA/AFP/GETTY IMAGES
- Author, अपर्णा द्विवेदी
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
काँग्रेसच्या महाअधिवेशनामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी व्यासपीठावर दिसल्या. पण आई आणि मुलाच्या साथीने पडद्यामागे प्रियांकाही सक्रिय होत्या.
अधिवेशानाच्या दोन तीन दिवस आधीपासूनच त्या इंदिरा गांधी स्टेडियमवर तयारीसाठी लक्ष ठेवून होत्या.
शनिवारी रात्री मैदानांवर डासांची समस्या असल्याची तक्रार केल्यानंतर डासांचं निवारण करण्यासाठीची कीटकनाशकांच्या फवारणी प्रियांका यांनी स्वतःच्या निगराणीखाली करून घेतली.
रविवारीही पडद्यामागे वॉकी-टॉकी घेऊन त्या समन्वयाच्या भूमिकेत दिसत होत्या.
व्यासपीठावर बोलणाऱ्या वक्त्यांच्या यादीला अंतिम रूप त्यांनीच दिलं. या यादीत पहिल्यांदाच तरुण आणि अनुभवी वक्त्यांचा मिलाप पाहाता आला, याचं श्रेय प्रियांकांना द्यायला हवं.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह जवळपास सर्व वक्त्यांच्या भाषणाचं फॅक्ट चेकिंग त्यांनीच केलं.
हे सगळं सुरू असताना त्यांचा फोटो कुठंही येणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती. लोकांचं लक्ष पूर्णपणे काँग्रेस अधिवेशानवर राहिलं पाहिजे यासाठी त्यांनी ही दक्षता घेतली होती.

फोटो स्रोत, SANJAY KANOJIA/AFP/GETTY IMAGES
नवज्योत सिंग सिद्धू यांनी व्यासपीठावर प्रियांका गांधी यांचं कौतुक करत त्यांच्यामुळेच ते काँग्रेसमध्ये येऊ शकले, असं सांगितलं.
भैयाजी नावाने प्रसिद्ध
नेहरू-गांधी परिवारातील सदस्यांपैकी सर्वाधिक कुतूहल असणारी व्यक्ती म्हणजे प्रियांका गांधी आहेत.
असं म्हटलं जात की त्यांच्या कुटुंबातील त्या सर्वांत प्रभावी व्यक्ती आहेत, पण त्या स्वतः सक्रिय राजकारणात येत नाहीत.
त्या निवडणुकांचं नियोजन करतात पण स्वतः निवडणूक लढवत नाहीत. मोठ्या सभा घेण्यापेक्षा लहान सभा घेण्याकडे त्यांचा कल असतो.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
आई आणि भावाला प्रियांका प्रथमच मदत करत आहेत असं नाही. रायबरेली आणि अमेठीमध्ये पक्षाचं सर्व काम प्रियांकाच पाहात असतात.
या मतदार संघात त्या भैयाजी या नावाने प्रसिद्ध आहेत. प्रियांका अगदी सहजपणे लोकांत मिसळतात.
समाजवादी पक्षाशी युती
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली होती. यासाठी प्रियांका गांधी यांनीच प्रयत्न केले होते.
राहुल गांधी यांच्या वतीने प्रियांका गांधी यांनीच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली आणि युतीचं पूर्ण नियोजनही केलं.
उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी या युतीसाठी प्रियांका गांधी यांचे आभार मानल्यानंतर पडद्यामागे त्या सक्रिय होत्या हे पुढं आलं.
त्यावेळी असा अंदाज लावला जात होता की राहुल यांच्यापेक्षा प्रियांका अधिक सक्रिय होतील.
उत्तर प्रदेशातील ही युतीचे सकारात्मक परिणाम झाले असते तर प्रियांकांची भूमिका अधिक मजबूत झाली असती, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
पक्षाशी लोकांना जोडणाऱ्या प्रियांका
लोकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यात प्रियांका यांची भूमिका महत्त्वाची आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी या अधिवेशात प्रियांका यांची स्तुती केली होती. ते म्हणाले की त्यांना भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, देशाचं भवितव्य फक्त काँग्रेसच ठरवू शकते.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करणारे हार्दिक पटेल यांनीही प्रियांका गांधी यांना सक्रिय नेतृत्व म्हणून पाहाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध
प्रियांका गांधी वेळोवेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतात. रस्त्यावर वाहन थांबवून त्या कार्यकर्त्यांना नावाने हाक मारतात.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/GETTYIMAGES
लोकांत मिसळणे, लोकांशी बोलणे या त्यांच्या गुणांचं कौतुक केलं जातं. कार्यकर्त्यांना जेव्हा त्या भेटतात तेव्हा त्यांच्या कुटुंबाची चौकशी करतात. मतदारांशी संपर्क ठेवण्याची त्यांची शैली वेगळी आहे.
राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होण्यापूर्वी आणि प्रत्येक निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावं अशी मागणी काँग्रेसमध्ये होत आली आहे. पण प्रत्येक वेळी प्रियांका यांनी राहुल पक्षाची जबाबदारी सांभाळतील, असं मत व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/AFP/GETTY IMAGES
सोनिया गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, अशी चर्चा झाली पण सोनिया आणि प्रियांका यांनी याला नकार दिला.
इंदिरा गांधी यांची छाप
प्रियांका गांधी यांची तुलना नेहमी त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी केली जाते. प्रियांका यांची हेअरस्टाईल, कपड्यांची निवड या सगळ्यांवर इंदिरा गांधी यांचा प्रभाव दिसून येतो.
म्हणूनच प्रियांका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबद्दल नेहमी चर्चा सुरू असते. प्रियांका यांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिलं सार्वजनिक भाषण केलं होतं.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/GETTY IMAGES
2014ला लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना बनारसमधून निवडणूक लढवायची होती. पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवू नये असा सल्ला त्यांना देण्यात आला.
मग पडद्यामागे का?
पण जर प्रियांका इतक्या प्रमाणावर राजकारणात सक्रिय असतील, तर त्या पडद्यामागे का असतात, असा प्रश्न पडतो.
असं काय कारण आहे की प्रियांका स्वतःला सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवतात? प्रियांका नेत्या आहेत, पण त्या राजकारणापासून दूर का राहतात, असे प्रश्न नेहमी विचारले जातात.
काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी एका न्यूज चॅनलला सांगितलं होतं की, प्रियांका गांधी त्यांच्या मुलांच्या संगोपनात व्यग्र आहेत. अशा स्थितीत त्या राजकारणात कशा येतील?
राजकारणात कधी यायचं हे प्रियांकाच ठरवेल, असं सोनियांनी सांगितलं होतं.
पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, प्रियांका गांधी सध्या राजकारणात येऊ नयेत, असं सोनिया गांधी यांना वाटतं.
सोनिया गांधी यांना चांगलंच माहीत आहे की, ज्यावेळी प्रियांका राजकारणात येतील त्यावेळी भाऊ-बहीण यांच्यात तुलना सुरू होईल आणि पक्षात गटबाजी सुरू होईल. यामुळे पक्षाचं नुकसान होईल. शिवाय राहुल गांधी यांच्या करिअरवरही त्याचा परिणाम होईल.
रॉबर्ट वद्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वद्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. हा प्रियांका यांचा सर्वांत मोठा कमकुवतपणा आहे, असं जाणकारांचं मत आहे. कारण प्रियांका जेव्हा राजकारणात येतील तेव्हा हा मुद्दा उठवला जाईल.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/GETTY IMAGES
प्रियांका जेव्हा राजकारणात पाऊल ठेवतील तेव्हा दुसरे पक्ष रॉबर्ट वद्रा यांच्यावर हल्लाबोल करतील. यातून प्रियांका यांची नैतिक बाजू कमजोर होईल.
पण रॉबर्ट वद्रा वादात येण्यापूर्वीच प्रियांका यांनी स्वतःला अमेठी आणि रायबरेली इतपत मर्यादित केलं होतं.
काँग्रेसमधील एका गटाची भूमिका अशी आहे की प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय मुद्द्यावर कधीच भूमिका घेतलेली नाही. कोणत्या मुद्द्यावर त्या काय विचार करतात, हे त्यांनी कधी खुलेपणाने सांगितलेलं नाही.
फक्त त्या गांधी नेहरू परिवारातील आहेत, म्हणून त्यांना लोक स्वीकार करतील याबद्दल या गटातील लोकांत शंका आहे.
पण राजकीय जाणकारांचं असं मत आहे की, प्रियांका गांधी काँग्रेससाठी 'झाकली मूठ' आहेत आणि पक्षाला ती तशीच ठेवायची आहे.
जो पर्यंत त्या राजकारणात येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वावर कुणीही प्रश्न उभं करणार नाही. हे प्रियांकाच नाही तर राहुल आणि काँग्रेसासाठीही चांगलं आहे.
जेव्हा प्रियांका राजकारणात औपचारिक पदार्पण करतील तेव्हा पहिला संदेश हाच जाणार की काँग्रेसने राहुल यांना नाकारलं आहे.
जर प्रियांका यशस्वी झाल्या तर चांगलंच आहे. पण असं जर झालं नाही तर प्रियांका आणि काँग्रेसचा भविष्यातील राजकारणाचा पर्यायही संपेल.
(या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








