'व्लादिमीर पुतिन गोलमाल करून पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी आलेत का?'

पुतिन, धर्म, रशिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन रशियाचे तारणहार असल्याचा प्रचार डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

रशियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने विजय मिळवत व्लादिमीर पुतिन यांचा पुढील सहा वर्षं रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यावर पुतिन यांना 76 टक्के मतं मिळाल्याचं रशियातल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. रशियातले विरोधी पक्षनेते अॅलेक्से नव्हॅलनी यांना ही निवडणूक लढवण्यासाठी यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आलं होतं.

"गेल्या काही वर्षांत केलेल्या संकल्पांची पूर्तता केल्यानं मतदारांनी पुन्हा निवड केली," असं निकाल घोषित झाल्यानंतर पुतिन यांनी मॉस्कोत घेतलेल्या एका सभेत सांगितलं.

सहा वर्षांनंतर तुम्ही पुन्हा निवडणूक लढवणार का, असं पत्रकारांनी विचारलं असता पुतिन म्हणाले, "तुम्ही जे म्हणत आहात ते मजेशीर आहे. तुम्हाला काय वाटतं, मी 100 वर्षांचा होईपर्यंत इथेच राहणार आहे? नाही बाबा!"

पुतिन यांचा यंदाचा विजय मोठा मानला जात आहे. कारण गेल्या वेळी 2012च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांना 64 टक्केच मतं मिळाली होती. पुतिन यांचे या निवडणुकीतील विरोधक अब्जाधीश आणि कम्युनिस्ट नेते पॅवेल ग्रुडीनिन यांना केवळ 12 टक्केच मते मिळाली.

या निवडणुकीत स्येनिया सोब्चाक आणि पूर्वाश्रमीचे टीव्ही सादरकर्ते व्लादिमीर झिर्रिनोफ्स्की यांना अनुक्रमे दोन टक्के आणि सहा टक्के मतं मिळाली.

एक्झिट पोलमध्ये पुतिन यांना 60 टक्के मते मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पुतिन यांच्या प्रचाराचं काम पाहणाऱ्यांना त्यांना यापेक्षा अधिक मतं मिळतील याचा विश्वास होता. त्यामुळे या विजयानंतर पुतिन यांना सर्वांत मोठा विजय मिळाल्याचं त्यांच्या प्रचाराचं काम पाहणाऱ्या टीमचं म्हणणं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

"सध्या पुतिन यांना मिळालेलं मताधिक्य हेच सर्वकाही सांगून जातं. भविष्यातील निर्णय घेण्यासाठी या निकालामुळे पुतिन यांना सहकार्यच होणार आहे," असं त्यांच्या प्रवक्त्यानं इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.

मतदानात अनियमितता?

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळील काही भागांत मोफत अन्न आणि आसपासच्या दुकानांमध्ये सवलत देण्यात आली होती.

संपूर्ण रशियात मतदानच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांजवळ करण्यात आलेल्या चित्रीकरणात अनियमितता दिसून येत होती. अनेक ठिकाणी निवडणूक अधिकारीच मतपेट्यांमध्ये मतपत्रिका भरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले.

पुतिन यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी अॅलेक्से नव्हॅलनी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे या निवडणूकीत अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण क्रेमलिनच्या आदेशांवरूनच आपल्याला अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप नव्हॅलनी यांनी केला आहे.

या निकालानंतर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत आपण आपला राग लपवू शकत नसल्याचे नव्हॅलनी म्हणाले.

निवडणुकांची पाहणी करणाऱ्या गोलोस संस्थेनं मतदानाच्या प्रक्रियेत शेकडो अनियमिततांच्या घटना आढळल्याचं सांगितलं. या अनियमितता पुढीलप्रमाणे;

1.काही मतपेट्यांमध्ये मतदानापूर्वीच मतपत्रिका आढळून आल्या.

2.निरीक्षकांना काही मतदान केंद्रांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

3.काही जणांना सक्तीनं मतदान करण्यासाठी भाग पाडण्यात आलं.

4.मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेरे फुगे किंवा अन्य अडथळ्यांनी झाकण्यात आले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या काही व्हीडिओंमध्ये मतपत्रिकांमध्ये अधिकारीच मतपत्रिका भरत असल्याचे आढळून आलं. डागेस्तान इथे तरुणांच्या एका जमावानं मतपेटी ताब्यात घेतली आणि मला कामापासून रोखलं, असं एका निवडणूक अधिकाऱ्यानं सांगितलं.

मात्र मतदानाच्या दिवशी कोणतेही गंभीर प्रकार नाही घडल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुख एला पॅमिफिलोवा यांनी सांगितलं.

"आम्ही शक्य तितकं निवडणूक प्रक्रियेचं निरीक्षण केलं. पण सुदैवानं आम्हाला विशेष अनियमितता आढळून आली नाही," असं पॅमिफिलोवा यांनी निवडणुकीनंतर या अनियमिततेच्या विषयावर बोलताना सांगितलं.

निवडणूक प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं.

युक्रेनपासून हिसकावल्यानंतर क्रिमियामधलं हे पहिलंच रशियन मतदान होतं. युक्रेनमध्ये राहणाऱ्या रशियन नागरिकांना रविवारी मतदान करता आलं नाही. कारण कीवमधल्या सरकारनं रशियाचे राजनैतिक व्यवहार स्थगित केले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)