कोर्टाचा निकाल आल्यावर राम मंदिरावरून पुन्हा दंगली होतील : राज ठाकरे

फोटो स्रोत, MNS/Facebook
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर हल्ला चढवला. या मेळाव्यात त्यांनी अनेक विषयांवर टोलेबाजी केली.
राममंदिर प्रश्नावरून देशात निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडवल्या जातील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच, तिसरं स्वातंत्र्य 2019 मिळणार आहे, असं म्हणत 'मोदीमुक्त भारत हवाय', अशी अपेक्षाही व्यक्त केली.
काय म्हणाले राज ठाकरे आपल्या भाषणात -
1. काँग्रेसच्या काळात जे जे जेलमध्ये गेले ते भारतीय जनता पक्षाच्या काळात सत्तेत बाहेर आले. 200 कोटींच्या घोटाळ्याची सीबीआयची केस चालू असताना नीरव मोदी बाहेर कसा? जे काँग्रेसच्या काळात झालं तेच भाजपच्या काळात सुरू आहे.
2. देशात सत्ता बदल झाल्यावर जेव्हा नोटबंदीची चौकशी होईल तेव्हा हा 1947 नंतरचा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून येईल.

फोटो स्रोत, MNS/Facebook
3. नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या फसव्या घोषणा करत आहेत. एक रुपयाची गुंतवणूक येत नाहीये आणि तरीही घोषणा सुरू आहेत.
4. 1947ला भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 ला मिळालं, तिसरं स्वातंत्र्य 2019 मिळणार. मोदी 2014ला म्हणाले काँग्रेसमुक्त भारत हवाय. मोदी गुजरातच्या पलिकडच्या भारताचा दुस्वास करत आहेत, त्यामुळे मोदीमुक्त भारत हवाय.
5. दाऊदला भारतात यायचं आहे आणि त्याला त्याचे शेवटचे दिवस भारतात घालवायचे आहेत, हे मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो. नेमकं तेच माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी आलं. त्याला भारतात आणण्यासाठी दाऊदशी तडजोडी सुरू आहेत.
6. देशात राममंदिराच्या नावाखाली पुन्हा दंगली घडवल्या जातील. कोर्टाचा निकाल आला की दंगली सुरू होतील. राम मंदिर व्हायलाच पाहिजे, मलाही ते हवंय. पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील, तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झाल्या तरी चालतील.

फोटो स्रोत, MNS/Facebook
7. 1 लाख दहा हजार कोटींचं कर्ज घेऊन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट कोणासाठी आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कर्जाचा भार का उचलायचा?
8. बेरोजगारांची नोंदणीच करायची नाही असा फतवा आता केंद्रसरकारने काढला आहे त्यामुळे नक्की किती बेरोजगार आहेत याचा आकडा कधीच कळणार नाही.
9. महाराष्ट्रातील वनजमिनी लाटल्या जात आहेत, तिथे अनिधिकृत बांधकामं सुरू आहेत. ही अनधिकृत बांधकामं करणारे बाहेरच्या राज्यातून येणारे आहेत. वसईत वनजमिनीवर ज्या अनधिकृत चाळी बांधल्या गेल्यात ते बांधणारे परप्रांतातील आहेत, त्यांच्या नावावर गंभीर गुन्हे आहेत.
10. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अश्या घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. शेती परवडत नाही, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकऱ्या हव्यात पण त्या मिळत नाहीयेत. त्या नोकऱ्या बाहेरच्या लोकांना मिळत आहेत.
11. धर्मा पाटीलांची जमीन 204 गुंठे आहे तिथे त्यांना 4 लाख मोबदला दिला गेला, आणि बाजूच्याच जमिनीला जी 74 गुंठे आहे, जिला कोट्यवधी रुपये दिले गेले. धर्मा पाटीलांनी दलालाला जमीन विकायला नकार दिला. समृद्धी महामार्गात हेच सुरू आहे.

फोटो स्रोत, MNS/Facebook
12. जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निःस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदली केली. सुप्रीम कोर्टातील त्या ४ न्यायाधीशांनीच पण तेच सांगितलं की आमच्यावर दबाव आहे
13. आणीबाणीची परिस्थिती सध्या देशात आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी जितकी दाखवली पण जस्टीस लोयांच्या मृत्यूची बातमी का नाही दाखवली गेली. निरव मोदी प्रकरण विसरावं म्हणून श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी इतकी चघळली. श्रीदेवी असतील मोठ्या अभिनेत्री पण प्रश्न पडतो की त्यांनी असं काय महान काम केलं की त्यांचा पार्थिव देह तिरंग्यात गुंडाळला. नंतर बातमी आली की त्या दारू पिऊन गेल्या. अशा माणसाला तुम्ही असा सन्मान देता?
दरम्यान, या भाषणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाषण ऐकलं नसल्याचं सांगितलं. तर, दुसरे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलू, अशी प्रतिक्रिया दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








