रुपाली पाटील ठोंबरे : मनसे आणि राज ठाकरे यांना नेते सोडून जातात कारण...

फोटो स्रोत, facebook@rupali thombre
- Author, निरंजन छानवाल
- Role, बीबीसी मराठी
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आजपर्यंत अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. आता मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
"सदस्य आणि इतर पदांचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे नेहमीच हृदयात राहतील. भूमिका लवकर जाहीर करेन", असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
"मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे, पक्षासाठी तुरुंगवासही भोगला आहे. माझी खदखद मी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवली आहे. बदल घडत नसेल तर मला बदल करावा लागेल. मला विविध पक्षांकडून ऑफर आल्या आहेत परंतु मी निर्णय घेतला नाही", असं त्यांनी स्पष्ट केलं.
2017 साली मनसेच्या मुंबईतल्या सहा नगरसेवकांनी 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेला मोठाच हादरा बसला होता. पण नेत्यांनी मनसे सोडून जाण्याची ही पहिली वेळ नव्हती.
यापूर्वी मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या अनेक आमदार आणि नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी मनसे का सोडली, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर मनसेची प्रतिक्रियाही विचारली होती.
1. मनसेत दाबादाबीचं राजकारण - राम कदम
"मनसेच्या नेतृत्वाचा दृष्टिकोन संकुचित होता. तिथे दाबादाबीचं राजकारण सुरू होतं. राज ठाकरेंभोवती एक जोडगोळी आहे, जे कुणाला पुढे येऊ देत नव्हती. त्यामुळे मला मनसे सोडावी लागली," असं आता भाजपचे आमदार असलेले राम कदम म्हणतात.
2. दुसऱ्या फळीचं नेतृत्व नाही - हाजी अराफत शेख
"राज ठाकरे कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत. ते स्वतःच्या लोकांकडे लक्ष देत नाहीत. पक्षात दुसऱ्या फळीचं नेतृत्वच नाही. त्यामुळे नगरसेवक आणि स्थानिक नेते जातात, तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाहीत," अशी प्रतिक्रिया आता शिवसेना वाहतूक शाखेचे प्रमुख असलेल्या हाजी अराफत शेख यांनी दिली.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
3. राज साहेब चौकडीचंच ऐकतात - वसंत गीते
"आम्ही पक्ष स्थापन होण्याच्या आधीपासून कामं केली. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले. लोकांच्या अपेक्षा फार होत्या. पण ACमध्ये बसून राजकारण करणाऱ्या चौकडीचं राज साहेबांनी ऐकलं. त्यांनी तरुणांना वेळ दिला असता तर कुणी सोडून गेलं नसतं," अशी खंत नाशिकमधले भाजपचे नेते वसंत गीते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.
4. पक्ष एकत्र पाठराखण करत नाही - हर्षवर्धन जाधव
"माझ्या मतदारासंघातली विकास कामं झाली पाहिजेत, असा माझा प्रयत्न असायचा. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी पक्षाकडून कधीच मला साथ मिळाली नाही. सरकारवर जो दबाव आणला पाहिजे, तो पक्षाने कधीच आणला नाही. पक्षाने एकत्रितरित्या कधी पाठराखण केली नाही.
मला मारहाण झाल्यावर राज साहेबांनी सभा घेऊन राग व्यक्त केला, पण त्यानंतर पुढे काहीच केलं नाही. त्यातच माझ्या मतदारसंघात पक्षाचा राजकीय हस्तक्षेप वाढायला लागला होता. या सर्व गोष्टींचा मला वीट आला होता," असं आता शिवसेनेचे कन्नडमधले आमदार हर्षवर्धन जाधव सांगतात.

फोटो स्रोत, STRDEL/GETTY IMAGES
5. 'त्यांच्या'वर माझी नाराजी आहे - हेमंत गोडसे
आता शिवसेनेचे नाशिकमधले खासदार हेमंत गोडसे सांगतात, "तुझं भवितव्य माझ्या हातात आहे, असं राजसाहेबांनी मला सांगितलं होतं. महापौर करतो असंही म्हटले होते. त्याबद्दल मला काही वाटत नाही. ज्या लोकांवर त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या होत्या, ते सोयीचं राजकारण करत होते. राजसाहेबही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. माझी राज ठाकरे यांच्यावर बिल्कुल नाराजी नाही. ज्यांनी त्यांना नको ते भरवलं, त्यांच्यावर नाराजी आहे."
6. पक्षात सुसूत्रता नव्हती - सोनवणे
"मला चार वेळा कार्यक्षम नगरसेवकाचा पुरस्कार मिळाला, पण पक्षाला त्याची साधी दखल घ्यावीशी वाटली नाही. अडीच वर्षांत मला पक्षाची पद्धत समजली. कामात सुसूत्रता नव्हती. मी पोलीस खात्याचा माणूस असल्यानं मला शिस्त आवडते. या ठिकाणी ती दिसत नव्हती. इथं भवितव्य नाही हे कळून चुकलं होतं," अशी प्रतिक्रिया आता नाशिकमध्ये भाजप नगरसेवक असलेले सतीश सोनवणे सांगतात.
7. 'कृष्णकुंज'पर्यंत माझं म्हणणं पोहोचलं नाही - शिंदे
"राज ठाकरे यांच्याविषयी माझं कधीच वाईट मत नव्हतं. त्यांनी खूप दिलं. पण त्यांच्यानंतरची जी यंत्रणा पक्षात कार्यरत आहे, त्यांच्याविषयी चुकीचे अनुभव येत गेले. मी जिल्हाध्यक्ष असताना मला विश्वासात न घेता परस्पर वरूनच पदाधिकारी नेमले जायचे. पक्षानं वेगळ्या पद्धतीने काम करायला पाहिजे, असं आम्ही सांगत होते. पण राजसाहेबांपर्यंत हे पोहचू दिलं गेलं नाही," अशी खंत आता औरंगाबाद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे व्यक्त करतात.
फिनिक्ससारखी भरारी घेऊ - मनसे
या सर्वांच्या आरोपांवर आम्ही मनसेची बाजू जाणून घेतली. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले, "जाणारा माणूस कारणं शोधत असतो. ते तशी कारणं देतात. माणूस वैयक्तिक स्वार्थासाठी काहीही करू शकतो. जे झालं ते दुःखद आणि दुर्दैवी आहे, पण आम्ही फिनिक्स पक्षासारखी पुन्हा भरारी घेऊ."
मनसे नेते बाळा नांदगावकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "राजसाहेब त्यांना भेटत नसतील असं आपण धरून चालू, पण मी उपलब्ध होतो ना. ते माझ्याकडे कैफियत मांडू शकत होते."
"मी साहेबांना भेटून सांगणार की यावर विचार करायला हवा. पण ही परिस्थिती गंभीर नाही. लोकांचे डोळे उघडे आहेत. ते फोडाफोडी पाहत आहेत. जे सोडून गेले त्यांना नक्कीच पश्चाताप होईल," असंही नांदगावकर म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








