रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना काय म्हटलं?

फोटो स्रोत, facebook
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
पक्ष प्रवेशावेळी त्यांनी म्हटलं, माझ्या आधीच्या पक्षातील काही लोकांना मला राष्ट्रवादीत पाठवायचं होतं.
त्या पुढे म्हणाल्या, "आतापर्यंत मी मनसेची पदाधिकारी म्हणून जेव्हा जेव्हा अजित पवारांकडे गेले, तेव्हा तेव्हा त्यांन ती कामं करुन दिलेली आहेत. त्या गोष्टी मला भावत होत्या. पण माझ्या आधीच्या पक्षातील काही लोकांना मला या पक्षात पाठवायचं होतं."
आज सकाळीच रुपाली पाटील यांनी याबाबतचं मौन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आपल्या ट्विटमध्ये रुपाली पाटील यांनी म्हटलं, "आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय' दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार."
त्यानुसार, दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्षांतर्गत वादाला कंटाळून दिला होता राजीनामा
रुपाली पाटील या पुण्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जात होत्या. पण पक्षांतर्गत कलहाला कंटाळून त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज होत्या.
त्यामुळेच त्या पक्षाला जय महाराष्ट्र करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अखेर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या एक दिवस आधीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
"सदस्य आणि इतर पदांचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे नेहमीच हृदयात राहतील. भूमिका लवकर जाहीर करेन", असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, facebook
"मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे, पक्षासाठी तुरुंगवासही भोगला आहे. माझी खदखद मी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवली आहे. बदल घडत नसेल तर मला बदल करावा लागेल. मला विविध पक्षांकडून ऑफर आल्या आहेत परंतु मी निर्णय घेतला नाही", असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रुपाली पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. सध्या राजकीय विश्वात याची एकच चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील नेमक्या कोण आहेत, त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे, याचा आढावा आपण या बातमीतून घेऊ.
'राज ठाकरे हे नाव कायम हृदयात कोरलेलं राहील'
रुपाली पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर थेट राज ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहून त्यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात रुपाली पाटील म्हणतात, "मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि 'राज ठाकरे' हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहील. जय महाराष्ट्र. आपली कार्यकर्ती, सौ.रुपाली पाटील ठोंबरे."
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही
पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका असलेल्या रुपाली पाटील या मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून प्रकाशझोतात आल्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपली एक वेगळी ओळख पुण्याच्या राजकारणात तयार केली आहे.
रुपाली पाटील या उच्चशिक्षित असून त्यांचं शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.

फोटो स्रोत, facebook
झाशीची राणी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत त्यांनी सामाजिक कार्य सुरू केलं. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. दरम्यान काही प्रकरणांमध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.
आपल्या जनसंपर्काच्या बळावर तसंच मनसेच्या लाटेदरम्यान त्या 2012 च्या महानगरपालिका निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पण 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सोशल मीडियावर लोकप्रिय
रुपाली पाटील या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय ठरल्या आहेत.
फेसबुकवर त्यांचे 3 लाख 25 हजारपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या सर्व उपक्रमांची माहिती त्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सर्वांना देत असतात.

फोटो स्रोत, facebook
त्या मनसेमध्ये असताना पक्षाला साजेसा असा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख तयार झाली होती. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोव्हिड काळात देखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत
विधानसभेच्या 2019 निवडणुकीत रुपाली पाटील या पुण्यातील कसबा मतदारसंघातून मनसेकडून इच्छुक होत्या. पण त्यांच्याऐवजी मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासूनच रुपाली पाटील या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, मनसेने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यावर महिला आघाडी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्या काळात त्यांनी अतिशय आक्रमकपणे आपलं काम पार पाडलं.
तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही रुपाली पाटील उभ्या होत्या. पण त्यांना त्याठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आपल्याला पक्षातील नेत्यांकडूनच साथ मिळाली नाही, काही लोकांनी ठरवून आपला काटा काढला, असा आरोप रुपाली पाटील यांनी केल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात की शिवसेनेत प्रवेश करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








