पायलट म्हणून राजीव गांधी जेव्हा आपलं पहिलं नाव सांगूनच प्रवाशांचं स्वागत करायचे

राजीव गांधी. सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ही मे 1981 ची घटना आहे. राजीव गांधी अमेठीमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढणार होते. ते आपल्या मतदारसंघात फिरत होते.

काही तासात त्यांना लखनऊहून दिल्लीची फ्लाईट पकडायची होती. तेवढ्यात 20 किमी दूर असलेल्या तिलोई गावात 30-40 झोपड्यांना आग लागल्याची बातमी आली.

राजीव गांधी लखनऊऐवजी तिलोईला रवाना झाले.

ज्यांच्या झोपड्या जळाल्या त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान त्यांच्या मागे उभे असलेले संजय सिंह त्यांच्या कानात काहीतरी सांगत होते. ते म्हणत होते, "सर तुमची फ्लाईट मिस होईल."

मात्र, राजीव गांधी लोकांशी बोलत होते. जेव्हा ते सर्व पीडितांना भेटले, तेव्हा त्यांनी संजय सिंह यांना विचारलं, इथून लखनऊला जायला किती वेळ लागेल?

'द लोटस इअर - पॉलिटिकल लाईफ इन इंडिया इन द टाईम ऑफ राजीव गांधी' हे पुस्तक लिहिणारे लेखक अश्विनी भटनागर सांगतात, "संजय सिंह म्हणाले, कमीत कमी दोन तास. मात्र, तुम्ही स्टेअरिंग सांभाळलं तर आपण 1 तास 40 मिनिटात पोहोचू. राजीव गांधी गाडीत बसत म्हणाले त्यांना निरोप पोचवा आम्ही 1 तास 15 मिनिटांत अमौसी विमानतळावर पोचतोय. राजीव गांधी यांनी गाडी स्पेस शटलच्या वेगाने चालवली. सांगितलेल्या वेळेच्या आधीच ते विमानतळावर पोचले."

फ्लाईटमध्ये पूर्ण नाव सांगण्यास मनाई

वेगात कार चालवण्याची हौस असणारे राजीव गांधी विमान मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालवायचे. सुरुवातीला ते डाकोटा विमान उडवायचे. नंतर मात्र बोईंग उडवू लागले. ते जेव्हा-जेव्हा पायलट सीटवर असायचे आपलं पहिलं नाव सांगून प्रवाशांचं स्वागत करायचे.

राजीव गांधी. सोनिया गांधी

फोटो स्रोत, HACHETTE INDIA

त्यांच्या कॅप्टन्सनादेखील त्यांचं पूर्ण नाव सांगू नये, अशा सूचना होत्या.

त्याकाळी त्यांना पायलट म्हणून 5000 रुपये पगार होता. त्या काळात हे चांगलं वेतन होतं.

सोनियांजवळ बसण्यासाठी दिली 'लाच'

राजीव गांधी इंजीनिअरिंगचा ट्रायपोस कोर्स करण्यासाठी केम्ब्रिजला गेले तेव्हा 1965 साली त्यांची भेट इटलीमध्ये जन्मलेल्या सोनिया गांधी यांच्याशी झाली आणि पहिल्या नजरेत ते त्यांच्या प्रेमात पडले.

ते दोघंही एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये जायचे.

अश्विनी भटनागर सांगतात, "सोनिया यांच्या शेजारच्या टेबलावर बसू द्यावं, यासाठी राजीव यांनी रेस्टॉरंटचे मालक चार्ल्स अॅन्टोनी यांना गळ घातली. ग्रीक व्यापाऱ्याला शोभेल त्याच पद्धतीने चार्ल्स यांनी या कामासाठी त्यांच्याकडून दुप्पट पैसे घेतले."

सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

"यानंतर त्यांनी राजीव गांधी यांच्यावर तयार केलेल्या सिनेमामध्ये सिमी गिरेवाल यांना सांगितलं की 'मी त्याआधी कधीच कुणाला इतक्या प्रेमात बघितलं नव्हतं.' केम्ब्रिजमध्ये शिकताना स्वतःचा खर्च चालवण्यासाठी राजीव गांधी आईसक्रीम विकायचे आणि सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी सायकलवर जायचे. खरंतर त्यावेळी त्यांच्याकडे एक जुनी फोक्सवॅगन होती. तिच्या पेट्रोलचा खर्च सर्व मित्र शेअर करायचे."

नॅपकिनवर सोनियांसाठी लिहिली कविता

राजीव आणि सोनिया यांच्या केम्ब्रिजमधल्या भेटीचा उल्लेख प्रसिद्ध पत्रकार राशीद किदवई यांनी सोनिया गांधींवर लिहिलेल्या पुस्तकातही केला आहे.

राशीद किदवई लिहितात, "वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये रोज केम्ब्रिज विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची गर्दी असायची. ते सगळे बिअर प्यायचे. त्यात एकमेव राजीव गांधी असे होते जे बिअरला हातही लावत नव्हते. तेव्हाच सोनिया गांधी यांचं लक्ष या उंच, काळ्या डोळ्यांच्या आणि मोहक स्मित असणाऱ्या तरुणाकडे गेलं."

"आकर्षण दोन्ही बाजूंनी होतं. राजीव गांधी यांनी पहिल्यांदा एका पेपर नॅपकीनवर सोनियांच्या सौंदर्यावर कविता करत तो पेपर एका वेटरकडून सोनियांना पाठवला. सोनियांना ते फारसं रुचलं नाही. मात्र, राजीव आणि सोनिया यांच्या एका कॉमन मित्राने मध्यस्थाची भूमिका बजावली."

राशीद किडवई पुढे सांगतात, "विशेष म्हणजे राजीव गांधी यांनी सोनिया गांधी यांना शेवटपर्यंत सांगितलं नाही की ते भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव आहेत. खूप वेळानंतर एकदा एका वर्तमानपत्रात इंदिरा गांधी यांचा फोटो छापून आला होता. तेव्हा राजीव गांधी यांनी सोनिया गांधींना सांगितलं की हा त्यांच्या आईचा फोटो आहे."

मेहमूद आणि राजीव गांधी यांची भेट

राजीव गांधी चार वर्षांचे असल्यापासून त्यांची अमिताभ बच्चन यांच्याशी मैत्री होती. अमिताभ बच्चन मुंबईत स्ट्रगल करत होते तेव्हा एकदा त्यांना भेटायला राजीव गांधी मुंबईत गेले होते. अमिताभ त्यांना हास्यकलाकार मेहमूद यांची भेट घेण्यासाठी घेऊन गेले.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

राशीद किडवई सांगतात, "त्याकाळी मेहमूद यांना कॉम्पोज गोळ्या घेण्याची सवय होती. अमिताभ यांनी त्यांना राजीव गांधींची ओळख करून दिली. मात्र, ते नशेत असल्याने आपण कुणाला भेटतो आहोत हे त्यांना कळलंच नाही."

"त्यांनी 5000 रुपये काढले आणि त्यांचे भाऊ अन्वर यांना सांगितलं की हे पैसे राजीवला दे. अन्वर यांनी विचारलं की तुम्ही पैसे का देत आहात? मेहमूद म्हणाले अमिताभसोबत जे आले आहे ते त्यांच्यापेक्षा जास्त गोरे आणि स्मार्ट आहेत. एक दिवस ते नक्कीच इंटरनॅशनल स्टार होतील. हे 5000 रुपये माझ्या पुढच्या सिनेमाची सायनिंग अमाऊंट आहे."

"अन्वर मोठ्याने हसले आणि पुन्हा एकदा त्यांची ओळख करुन दिली. ते म्हणाले हे स्टार वगैरे नाहीत इंदिरा गांधी यांचे चिरंजीव आहेत. मेहमूद यांनी आपले 5000 रुपये लगेच परत घेतले आणि माफी मागितली. भविष्यात राजीव गांधी स्टार झाले. मात्र, सिनेमातले नाही तर राजकीय क्षेत्रातले."

विमानात मिळाली इंदिरा गांधीच्या हत्येची बातमी

संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर राजीव इंदिरा गांधींच्या मदतीसाठी राजकारणात उतरले. मात्र, काही काळातच इंदिरा गांधींच्या सुरक्षारक्षकानेच इंदिरा गांधींची हत्या केली. त्यावेळी राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये होते. हवाई दलाच्या ज्या विमानाने राजीव गांधी दिल्लीला परतले त्या विमानात त्यांच्यासोबत पुढे दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या शीला दीक्षित यादेखील होत्या.

राजीव गांधी इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

शीला दीक्षित यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "विमान उडाल्यानंतर राजीव गांधी लगेच कॉकपीटमध्ये पायलटकडे गेले. तिथून आल्यावर त्यांनी आम्हाला विमानाच्या मागच्या बाजूला बोलावून सांगितलं की इंदिरा गांधींनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी आम्हाला विचारलं की अशा परिस्थितीत काय करतात?"

"प्रणव मुखर्जींनी सांगितलं की पूर्वीपासून ही परंपरा आहे की सर्वात वरिष्ठ मंत्र्याला पंतप्रधानपदाची शपथ दिली जाते आणि त्यानंतर पंतप्रधानाची निवड होते. मात्र, माझे सासरे उमाशंकर दीक्षित म्हणाले की ते पंतप्रधान होण्याची जोखीम उचलणार नाही. राजीव गांधी यांनाच पंतप्रधानपदी बसवण्यात येईल."

प्रणव मुखर्जींचा सल्ला त्यांच्याविरोधात गेला

मी शीला दीक्षित यांना विचारलं की , सर्वात वरिष्ठ मंत्र्याला पंतप्रधान बनवण्याचा त्यांचा सल्ला प्रणव मुखर्जींच्या विरोधात गेला का?

प्रणव मुखर्जी

फोटो स्रोत, Getty Images

शीला दीक्षित यांचं उत्तर होतं, "हो. थोड्याफार प्रमाणात विरोधात गेलं. कारण राजीव निवडून आल्यावर इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री असलेले प्रणव मुखर्जी यांना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं नाही. काही दिवसांनंतर प्रणव मुखर्जी यांनी पक्षही सोडला. ते सर्वात ज्येष्ठ मंत्री होते."

"मात्र, आपली उमेदवारी भक्कम करण्यासाठी ते तसं बोलले असावे, असं मला वाटत नाही. ते केवळ जुनी उदाहरणं सांगत होते. मात्र, त्यांच्या विरोधकांनी ते वक्तव्य अगदी वेगळ्या संदर्भात राजीव गांधींसमोर सादर केलं."

मालदिवच्या राष्ट्राध्यक्षांना वाचवलं

पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात बरंच काम केलं. पक्षांतर कायदा, 18 वर्षांचे झाल्यावर मताधिकार आणि भारताला प्रादेशिक शक्ती म्हणून उभं करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

अश्विनी भटनागर सांगतात, "शपथ घेताच त्यांनी निर्णयांचा धडाका लावला. मग ते शिक्षण क्षेत्रात असो, प्रदूषणाच्या संदर्भात असो, राजकीय व्यवस्थेला स्वच्छ करण्यासंदर्भात असो किंवा मग काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्यात त्यांनी केलेलं भाषण. या सर्वांमुळे जनतेला एक सुखद धक्का बसला."

"आज लोक सर्जिकल स्ट्राईकविषयी बोलतात. राजीव गांधी यांनी 1988 साली 4000 किमी दूर मालदीववर स्ट्राईक केलं होतं. त्यावेळी 10 तासांच्या नोटिशीवर आग्र्याहून 3000 जवानांना एअरलिफ्ट करण्यात आलं होतं. तिथल्या राष्ट्राध्यक्षांविरोधात बंडखोरी झाली होती. ते लपून-छपून फिरत होते. राजीव गांधींमुळे ते सत्तेत तर परतलेच. शिवाय त्यांचा विरोध करणाऱ्यांना अटकही झाली."

सॅम पित्रोदा यांच्या मदतीने संवाद क्रांती

सॅम पित्रोदा यांच्या मदतीने भारतात जी दूरसंचार क्रांती आली त्याचं बरंचसं श्रेय राजीव गांधी यांना देतात.

सॅम पित्रोडा

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीशी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले होते, "वुई क्लिक्ड. मला ते फार आवडायचे. त्यांना आमचं म्हणणं कळायचं. आमची त्यांच्याशी मैत्री झाली होती. त्यांनी आमच्या मोहिमेला राजकीय इच्छाशक्तीची जोड दिली. सी डॉटचा विचार आमचा आणि राजीव गांधी यांचा होता. त्यासाठी आम्हाला 400 इंजिनिअर आणि जागा हवी होती."

"आम्ही बंगळुरुमध्ये हार्डवेअर डिझाईन आणि दिल्लीत सॉफ्टवेअर तयार करायला सुरुवात केली. इथे जागा मिळाली नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला एशियाड विलेजमध्ये पाठवलं. ती जागा चांगली होती. मात्र, तिथे एसी नव्हता. एसीशिवाय सॉफ्टवेअरचं काम होऊच शकत नव्हतं. अकबर हॉटेलमध्ये जागा होती. आम्ही तिथे दोन मजले घेतले."

"तिथे फर्निचर नव्हतं. त्यामुळे आम्ही सहा महिने खाटेवर बसून काम केलं. आम्ही तरुणांचं सहकार्य घेतलं. त्यांना प्रशिक्षण दिलं. आमच्या लक्षात आलं की महिला कमी आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची भर्ती केली."

उत्तम फाईल वर्क

राजीव गांधी यांच्यासोबत काम करणारे माजी कॅबिनेट आणि संरक्षण सचिव नरेश चंद्रा त्यांना उत्तम प्रशासक मानायचे.

राजीव गांधी. सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

नरेश चंद्रा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, "राजीव गांधी तरुण होते आणि आश्चर्यकारकरित्या खूप मेहनती होते. ते फाइल्स खूप लक्ष देऊन वाचायचे. त्यांचं ड्राफ्टिंगही प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा उत्तम असायचं. ते दुसऱ्यांदा सत्तेत आले असते तर उत्तम काम केलं असतं, असं मला वाटतं."

रात्री उशिरापर्यंत जागायचे राजीव गांधी

राजीव गांधी सकाळी लवकर उठायचे आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचे. एकदा ते एका बैठकीसाठी हैदराबादला गेले होते. त्यावेळी एन. टी. रामाराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

राजीव गांधी

फोटो स्रोत, Getty Images

राजीव गांधी यांना जवळून ओळखणारे आणि पुढे मुख्य माहिती आयुक्त आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष झालेले वजाहत हबीबुल्लाह सांगतात, "एन. टी. रामाराव यांच्यासोबत तेलुगू गंगावर बैठक होती. रामाराव खूप लवकर म्हणजे आठ वाजेच्या जवळपास झोपायचे. ते पहाटे तीन वाजता उठायचे. ही बैठक रात्री जवळपास 10 वाजता ठेवण्यात आली होती."

"त्यावेळी एका योजनेवरुन एन. टी. रामाराव आणि केंद्र सरकारमध्ये तीव्र मतभेद झाले होते. बैठकीच्यावेळी एन. टी. रामाराव यांना खूप झोप येत होती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं राजीव गांधी यांनी विचारताच ते प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचे. 'मला हे मान्य नाही.' एवढं बोलून ते डुलकी घ्यायचे."

राजीव गांधी

फोटो स्रोत, Getty Images

"ही बैठक रात्री जवळपास 11 वाजता संपली. त्यावेळी रावसाहेब अत्यंत नम्रपणे राजीव गांधींना म्हणाले, 'या बैठकीसाठी इतक्या तुम्ही रात्री इतक्या उशिरापर्यंत जागे राहिलात. त्याबद्दल तुमचे आभार.' त्यावर राजीव गांधी म्हणाले, अरे अजून फार उशीर झालेला नाही. मला अजून खूप कामं करायची आहेत. यानंतर ते पटकन पायऱ्या चढून राज भवनातल्या आपल्या बेडरूममध्ये गेले."

गृह सचिवांना घरी सोडण्याचा हट्ट

अशीच एक घटना 1985 साली घडली. राजीव गांधी यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांना फोन केला. त्यावेळी ते गाढ झोपेत होते. त्यांच्या पत्नीने फोन उचलला. राजीव गांधींनी विचारलं, 'प्रधानजी झोपले आहेत का? मी राजीव गांधी बोलतोय.' प्रधानांच्या पत्नीने त्यांना लगेच उठवलं. राजीव गांधी म्हणाले, 'तुम्ही माझ्या घरापासून किती लांब राहता. '

प्रधान यांनी सांगितलं की ते 2AB, पंडारा रोडवर राहातात. त्यावर राजीव गांधी म्हणाले, 'मी माझी गाडी पाठवतो आहे. तुम्ही शक्य तेवढ्या लवकर माझ्या घरी या.' त्यावेळी राजीव गांधींकडे पंजाबचे राज्यपाल सिद्धार्थ शंकर रे काही प्रस्ताव घेऊन गेले होते.

राजीव गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शंकर दयाळ शर्मा, व्ही. पी. सिंह, राजीव गांधी

रे यांना त्याच रात्री चंडिगढला परत जायचं होतं. म्हणूनच राजीव गांधी यांनी गृह सचिवांना इतक्या रात्री बोलावलं होतं. दोन तास चर्चा झाली. रात्री दोन वाजता सगळे बाहेर पडले तेव्हा राजीव गांधी राम प्रधान यांना म्हणाले की तुम्ही माझ्या गाडीत बसा. प्रधान यांना वाटलं की पंतप्रधान त्यांना गेटपर्यंत सोडतील.

मात्र, राजीव गांधींनी गेटबाहेर गाडी काढत डावीकडे वळवली आणि प्रधानांना विचारलं, "मी तुम्हाला विचारायला विसरलो की पंडारा रोड कुठल्या बाजूने आहे." एव्हाना राजीव गांधींच्या मनात काय आहे, हे प्रधान यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी राजीव गांधी यांचं स्टेअरिंग धरलं आणि म्हणाले, "सर तुम्ही गाडी मागे घेतली नाही तर मी चालत्या गाडीतून उडी घेईल."

आपण कधीही अशाप्रकारे जोखीम उचलणार नाही, याचं वचन दिल्याची आठवण प्रधान यांनी करुन दिली. तेव्हा कुठे राजीव गांधी यांनी गाडी थांबवली. प्रधान दुसऱ्या गाडीत बसेपर्यंत राजीव गांधी तिथेच उभे होते.

लक्षद्वीपमध्ये जखमी देवमाशाला जीवदान

राजीव गांधी एका बैठकीसाठी लक्षद्वीपला गेले होते. वजाहत हबिबुल्लाह तिथले प्रशासक होते.

हबिबुल्लाह सांगतात, "राजीव गांधी हेलिपॅडकडे जात होते. आम्ही त्यांच्यासोबत जीपमध्ये बसलो होतो. तेव्हा कुणीतरी दाखवलं की त्या बाजूला देवमासा उथळ पाण्यात अडकला आहे. तिथे माकडं होती. एक देवमासा तिथपर्यंत आला होता. मात्र, तिथे पाणी कमी असल्यामुळे त्याला परत जाता येत नव्हतं."

"राजीव गांधींनी जीप थांबवली आणि जोडे तसेच ठेवून ते पाण्यात गेले. मी सूट घातला होती. मीसुद्धा कसाबसा त्यांच्यापर्यंत पोचलो. राजीव गांधींसोबत इतरही बरेच जण तिथे गेले. राजीव गांधींनी सर्वांच्या मदतीने देवमाशाला उचलून जास्त पाणी असलेल्या ठिकाणी सोडलं."

बोफोर्समध्ये नाव आल्याने झालं सर्वाधिक नुकसान

शहाबानो यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संसदेत नवीन कायदा करणं, हा राजीव गांधी यांचा कदाचित सर्वात चुकीचा निर्णय होता. बोफोर्स प्रकरणात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांची प्रतिमा इतकी डागाळली की ते 1989ची निवडणूक हरले.

अश्विनी भटनागर सांगतात, "असत्याचं राजकारण बोफोर्सपासून सुरू झालं. त्याच निवडणुकीत विश्वनाथ प्रताप सिंह बरंच खोटं बोलले. एका प्रचारसभेत त्यांनी अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने स्टेजवर भाषण करताना आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक चिठ्ठी काढली आणि हात उंचावून ती दाखवत म्हणाले, 'यात राजीव गांधी यांच्या स्वीस बँक खात्याचा नंबर आहे. या खात्यात बोफोर्समधून मिळालेल्या दलालीचे पैसे जमा करण्यात आले आहेत.' त्यांनी असं भासवलं की ते आता तो नंबर वाचणार आहेत. मात्र, ते थांबले."

"त्यावेळी व्ही. पी. सिंह यांच्यावर लोकांचा इतका विश्वास होता की लोकांना वाटलं ते जे बोलत आहेत ते खरं आहे. परिणाम असा झाला की बोफोर्सचं प्रकरण राहिलं बाजूला, 'राजीव गांधी चोर है'च्या घोषणा गल्लीबोळात घुमू लागल्या. बोफोर्स प्रकरणातलं वास्तव काय होतं, हे आजवर कुणाला कळलेलं नाही."

"न्यायालयाने सर्वांना मुक्त केलं. आजवर हे सिद्ध होऊ शकलं नाही की किती पैसे देण्यात आले. कुणाला दिले आणि मुळात पैसे दिले की नाही. व्ही. पी. सिंह यांनी खराब तोफ आणण्याचा आरोप केला होता. तो आरोपही कारगिल युद्धात सपशेल खोटा ठरला. कारण कारगिल युद्ध जिंकण्यात याच बोफोर्स तोफांनी मोठी भूमिका बजावली होती."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)