लोकसभा निवडणूक 2019 : राजीव गांधींना भ्रष्टाचारी म्हणणं नरेंद्र मोदींची हतबलता दर्शवते?

फोटो स्रोत, AFP
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी हिंदी
लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. निवडणुकीच्या निकालासाठी अवघे 18 दिवस उरले आहेत.
2019 ची निवडणूक कोण जिंकणार, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार का, या प्रश्नांची उत्तरं शोधणारे वेगवेगळे सर्व्हे माध्यमांनी केले आहेत. या सर्वेक्षणांमधून मोदींसमोर विरोधकांचा फारसा निभाव लागणार नसल्याचं चित्र उभं राहत आहे. निकालांची प्रतीक्षाही न करता भाजपकडून 'आएगा तो मोदी ही' सारख्या घोषणाही दिल्या जात आहेत.
या परिस्थितीत निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या एका भाषणामुळं विवाद निर्माण झाला आहे.
आपल्या भाषणामध्ये मोदींनी म्हटलं, "तुमच्या वडिलांना पक्षातील स्तुतीपाठकांनी 'मिस्टर क्लीन'ची उपमा दिली होती. 'मिस्टर क्लीन' प्रतिमेचा गाजावाजा केला होता. मात्र त्यांचं आयुष्य 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हणूनच संपलं."
प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं, असं म्हणतात. भारतात होणाऱ्या निवडणुकाही आता युद्धापेक्षाही कमी नाहीयेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीनं तरी निवडणुकांचं रूपांतर रणभूमीतच केल्याचं दिसून येतंय. मग या निवडणुकीच्या युद्धात सगळंच क्षम्य ठरतं...मग त्यात अशा एका माणसावरही आरोप केले जातात, जो आता उत्तर देण्यासाठी हयातही नाहीये. त्यामुळेच पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाच्या संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याची अनेक उदाहरणं पहायला मिळाली आहेत. निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदींना एकापाठोपाठ एक सात क्लीन चिट दिल्यानंतर विरोधकांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यानंतर सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, सीव्हीसी, आयबी यांसारख्या संस्थांचा वापर विरोधकांविरुद्ध केल्याचा आरोपही मोदी सरकारवर केला जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेलं वक्तव्यं हे आरोप-प्रत्यारोपांच्या घसरत्या पातळीचंच एक उदाहरण म्हणून पाहता येईल.
नरेंद्र मोदींनी राजीव गांधींना 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हणून संबोधणं हे फारसं वास्तवाला धरून नाहीये. राहता राहिला प्रश्न राजीव गांधींच्या 'मिस्टर क्लीन' या प्रतिमेचा तर नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे गुजरातमध्ये 'विकास पुरूष' म्हणून ओळखले जायचे, तसेच राजीव गांधी 'मिस्टर क्लीन' म्हणून.
ज्या बोफोर्स घोटाळ्याचा आरोप राजीव गांधींवर केला जातो, त्याच्या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न झालंय हे पाहणंही गरजेचं आहे. 64 कोटी रुपयांच्या या कथित लाचखोरी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही राजीव गांधींवर कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नव्हता.
20 मे 1991 ला जेव्हा राजीव गांधींचा मृत्यू झाला होता, तेव्हा त्यांच्यावर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप करणारे लोकच सत्तेमध्ये होते. याचाही विचार व्हायला हवा.
त्यावेळेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. जर राजीव गांधींचा मृत्यू झाला नसता तर ते निःसंशय पुन्हा एकदा पंतप्रधान बनले असते.
बोफोर्स प्रकरणाचा प्रतिमेवर परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
राजीव यांच्या मृत्यूनंतर व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाच्या तीन वर्षांच्या आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या शासन काळात बोफोर्स प्रकरणात काहीही सिद्ध झालं नाही. त्यामुळं बोफोर्सच्या आधारे राजीव गांधींना 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हणता येणार नाही.
विशेष म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळातच राजीव गांधींचं नाव बोफोर्सच्या आरोपपत्रांतून हटवण्यात आलं होतं.
राजकारणात एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात याच दृष्टिकोनाची किंमत मोजावी लागली. जनतेनं त्यांना निवडणुकीत पराभूत केलं. त्यांच्या प्रतिमेवर बराच काळ बोफोर्स प्रकरणाचं सावट पडलेलं होतं.
नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा दुसरा भाग हा अधिक निराशाजनक आहे. राजीव गांधींच्या मृत्यूचा संबंध मोदींनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांशी जोडण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधींची हत्या जगातील सर्वांत भयंकर अशा कट्टरपंथी हल्ल्यामध्ये करण्यात आली होती. पहिल्यांदा इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधींनी कट्टरपंथी हल्ल्यामध्ये प्राण गमावले होते.
श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठविण्याच्या निर्णयानंतर LTTE नं केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये राजीव गांधींचा मृत्यू झाला होता. राजीव गांधींनी जर त्यावेळेस श्रीलंकेत शांती सेना पाठवली नसती, तर पाकिस्तानसोबतच श्रीलंकाही अमेरिकेचं एक सामरिक केंद्र बनला असता, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
आधुनिक भारताचं स्वप्नं पाहणारा नेता
नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे केवळ स्टार प्रचारक असते, तर निवडणुकीच्या रणधुमाळीतलं वक्तव्यं म्हणून त्यांच्या या विधानाकडे पाहिलं गेलं असतं. पण देशाचे पंतप्रधान असताना माजी पंतप्रधानांबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळं राजकीय पक्षांपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच मोदींवर टीका होत आहे.
इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राजीव गांधींना झाला होता. केवळ तीन वर्षांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर ते भारतासारख्या विशाल देशाचे पंतप्रधान झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
1984 साली झालेल्या त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 415 जागा मिळाल्या होत्या. मात्र राजकारणातला तोकडा अनुभव आणि अवती-भवती असणाऱ्या लोकांचा सल्ल्याच्या जोरावर त्यांनी शाहबानो प्रकरण तसंच अयोध्येतील राम मंदिराचा दरवाजा खुला करण्याचा निर्णय घेतला. ज्याचा परिणाम भारताच्या राजकारणावर आजही दिसून येत आहे.
पण त्याचबरोबर राजीव गांधींनी भारतामधील संगणक क्रांतीचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्याच कारकिर्दीत भारतात टेलिफोन आणि दूरसंचार उद्योगातील पायाभूत सुविधांचा विस्तार झाला. या गोष्टीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. राजीव गांधींनी भारताला 21 व्या शतकात घेऊन जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्यासाठी आवश्यक ती पावलंही उचलली होती.
मात्र नरेंद्र मोदी या गोष्टींचा विचार करताना दिसत नाहीत. राजीव गांधींवर टीका करत असताना त्यांना या गोष्टीचाही विसर पडला असावा, की त्यांच्या पक्षाचे तत्कालिन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण लाच घेताना 'ऑन कॅमेरा' पकडले गेले होते.
भाजपचे अजून एक नेते दिलीप सिंह जूदेव यांना 'ऑन कॅमेरा' पकडण्यात आलं होतं. 'पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं,' असं जूदेव यांचं वक्तव्य होतं.
व्यक्तिगत पातळीवरील टीका

फोटो स्रोत, Getty Images
वास्तवाशी फारकत घेतलेली विधानं आणि व्यक्तिगत हल्ले करणारी भाषणं नरेंद्र मोदींनी यापूर्वीही केली आहे. पन्नास कोटींची गर्लफ्रेंड, सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी अशी विधानं नरेंद्र मोदींनी यापूर्वीही केली आहेत.
राजीव गांधीबद्दल त्यांनी केलेल्या विधानांना सत्तेची गुर्मी म्हणायचं की राजकारणाचा बदलता चेहरा? (कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा हव्यास)
काही गोष्टींचा मोदींना विसर पडला असावा. ज्या अटलबिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याच वाजपेयींवरील उपचारांसाठी राजीव गांधींनी मदत केली होती आणि त्याचा कुठेही गवगवाही केला नव्हता.
राजीव गांधींच्या मृत्यूनंतर स्वतः अटल बिहारी वाजपेयींनीच या मदतीबद्दल माहिती दिली होती. आज आपण राजीव गांधींमुळे जिवंत असल्याचं वाजपेयींनी म्हटलं होतं.
राहुल आणि प्रियंकाचं प्रत्युत्तर
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नरेंद्र मोदींनी आपल्या वडिलांवर केलेल्या टीकेला प्रियंका गांधी तसंच राहुल गांधींनीही प्रत्युत्तर दिलं आहे. "शहिदांच्या नावावर मतं मागून त्यांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी काल आपल्या बेताल लहरीमध्ये एका प्रामाणिक आणि सज्जन व्यक्तिच्या बलिदानाचाही अनादर केला. ज्यांच्यासाठी राजीव गांधींनी बलिदान दिलं, ती अमेठीची जनताच आता याचं उत्तर देईल. मोदीजी, हा देश धोका देणाऱ्यांना कधीच माफ करत नाही," असं ट्वीट प्रियंका गांधींनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राहुल गांधींनीही ट्वीट करून नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिलंय. "मोदीजी, युद्ध संपलेलं आहे. तुमची कर्मं वाट पाहत आहेत. स्वतःबद्दलचे विचार माझ्या वडिलांना लागू करून तुम्ही तुमचा बचाव करू शकत नाही." असं राहुल गांधींनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








