राजीव गांधी: काँग्रेस त्यांच्या पूर्वजांचा बचाव का करू शकत नाही? - विश्लेषण

राजीव आणि इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी लखनौहून

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मृत्यूचा भ्रष्टाचाराशी संबंध जोडणाऱ्या नरेंद्र मोदींच्या टिप्पणीवर काँग्रेस पक्षात संतापाची लहर आली आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावरही एक प्रकारचं युद्ध सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत नेहरू गांधी घराण्यावर अनेकदा टिप्पणी केली आहे. मात्र काँग्रेस नेत्यांच्या मते या वक्तव्याने सर्व सीमा ओलांडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी प्रयागराजच्या कुंभच्या संदर्भात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. त्याआधी नेहरू आणि इंदिरा गांधीच्या कामांबरोबर त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली होती.

राजीव गांधी यांच्यावरच्या टीकेमुळे मात्र काँग्रेस पक्षाचे लोक जास्त आक्रमक झाले आहेत. हा सगळा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. याआधी कधीही असं झालेलं नाही.

दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाने केलेल्या कोणत्याही टीकेला राजकीय हत्यार बनवण्यात भाजपने कोणतीही कसूर सोडलेली नाही. या टीकेचा त्यांनी अनेकदा राजकीय फायदा घेतला आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यापासून आता चौकीदार संबंधी केलेल्या आरोपांचा भाजपने राजकीय हत्यार म्हणूनच वापर केला आहे आणि अजूनही करत आहे.

प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या नेत्यांवर केलेल्या टिप्पणीचं सडेतोड उत्तर का देत नाही? काँग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या प्रश्नाचं चिडून उत्तर देतात. "राजीवजींवर जी टीका केली आहे, तिचा निषेध संपूर्ण देश करतोय. सत्तेच्या उन्मादामुळे एखादी व्यक्ती आपली मर्यादा सोडत असेल तर आम्हीसुद्धा तसंच व्हायचं का?"

IT सेलचा महत्त्वाचा वाटा

राजीव गांधीचा जिथपर्यंत प्रश्न आहे तिथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे एक मोठे नेते सांगतात, "आम्ही यावर आक्षेप नोंदवला आहे. विरोध केला, निवेदन जारी केलं. जागोजागी निदर्शनं होत आहेत. याबाबत मीडिया काहीच बोलत नाही. ते जरी सांगत नसेल तरी देश पाहतो आहेच की."

राजीव गांधी, इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जेव्हा एखादी टिप्पणी होते, तेव्हा भाजपच्या आक्रमकतेत प्रवक्ते आणि IT सेलचा सिंहाचा वाटा असतो.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुमार सिंह म्हणतात, "काँग्रेस देशातला सगळ्यांत जुना पक्ष आहे. त्यांच्या प्रवक्त्यांची एक समृद्ध परंपरा आहे. त्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित केलं जातं. मात्र जेव्हापासून एक नवीन नेतृत्व आलं आहे, त्यांनी एक नवीन परंपरा विकसित केली आहे. ते अत्यंत आक्रमकपणे नेत्यांचा बचाव करतातच, मात्र ते विरोधकांवरही हल्ला करतात."

जाणकारांच्या मते काँग्रेसचं सुरुवातीपासूनच एक तंत्र आहे. त्याच तंत्राने काँग्रेसचा कारभार सुरू आहे. मात्र काळानुरूप भाजपने त्यांची पद्धत बदलली आहे.

मणिशंकर अय्यर यांनी मोदींबद्दल जे वक्तव्य केलं होतं, त्याचा पंतप्रधान मोदींनी राजकीय अस्त्र म्हणून फायदा घेतला. त्याचं श्रेय मीडिया सेलऐवजी मोदी आणि अमित शहा यांनी विकसित केलेल्या सोशल मीडिया तंत्राला जातं.

नुकतंच स्वतःला मागासवर्गीय सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. 'चौकीदार चोर है' या शब्दात जेव्हा विरोधी पक्षांनी हल्ला केला तेव्हा आपल्या सगळ्या नेतयांना, मंत्र्यांना आणि समर्थकांना 'चौकीदार' बनवून त्याचा राजकीय फायदा घेतला.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

अरविंद सिंह सांगतात, "या नव्या तंत्रात आपलं खोटं पण झाकलं जात आहे आणि विरोधी पक्षांची सत्य बाजूही झाकली जात आहे. मात्र त्यात प्लॅटफॉर्म सोशल मीडियाला बनवलं जात आहे. त्यावाटे इतकं खोटं पसरवलं जातं की लोक त्यालाच खरं मानायला सुरुवात करतात.

"काँग्रेस सध्या सोशल मीडिया प्रचारात फार मागे आहेच. पण तुलनात्मकरीत्या राजकीय आणि भाषेच्या मर्यादेतही भाजपची तुलनेत बराच आब राखून आहे. मात्र सोशल मीडियावर सांगितलेलं हे सत्य अनेकदा पंतप्रधानांच्या भाषणात तथ्य म्हणून समोर येतं, ही जास्त गंभीर बाब आहे."

पंतप्रधान जी वक्तव्यं करतात त्यावर भाजपचे नेते प्रतिक्रिया देणं टाळतात, मात्र फिरून फिरून "सत्तर वर्षं देश लुटणाऱ्या लोकांना आता ही वक्तव्यं बोचतीलच," अशा प्रकारचा आशय त्यात असतो.

मोदी घाबरले आहेत

मात्र उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या या वक्तव्याबाबत प्रचंड नाराजी आहे. आमदार आराधना मिश्रा सांगतात, "राजकारणाचा स्तर घसरतो आहे. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने अशा प्रकारची टिप्पणी केलेली नाही. राजीवजींवर टीका करणाऱ्याला हिंदू संस्कृतीची जाणीव नाही. ते आता या जगात नाहीत आणि मोदींच्याच पक्षाच्या सरकारने त्यांना क्लीन चीट दिली आहे."

पंतप्रधान घाबरले आहेत, असा याचा सरळ अर्थ मिश्रा काढतात.

"राहुलजी ज्या प्रकारचे प्रश्न विचारत आहे किंवा प्रियंका ज्या प्रकारची आव्हानं देत आहेत, त्यावरून मोदी घाबरले आहेत हे अगदी स्पष्ट दिसत आहे. मोदींच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण देशात नाराजी आहे. याचं प्रायश्चित्त त्यांनी करावं लागेल."

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी

लखनौतील ज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र सांगतात की काँग्रेस अशा वक्तव्याचं उत्तर देणं टाळतं, कारण त्यांना भाजपची बी टीम व्हायचं नाहीये. "राहुल गांधी स्वत: या वक्तव्यांना कशी उत्तरं देत आहेत बघा. काँग्रेसला माहिती आहे की त्यांनी आक्रमकपणे उत्तरं दिली तर भाजपपेक्षा वेगळे आहोत, हे दाखवण्याची संधी त्यांना मिळणार नाही. यापूर्वीही काँग्रेसने अशा प्रकारची टिप्पणी करणाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. भाजपने अशा प्रकारची कोणतीही कारवाई केल्याचं सध्या तरी ध्यानात नाही."

यात आणखी एक गंमतीशीर गोष्ट अशी आहे की ही आक्रमकता तेव्हाच दिसते जेव्हा कुठालाही आरोप पक्षाध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होतो. भाजपच्या इतर कुठल्या नेत्यावर आरोप असतील तर त्यांचं उत्तर अशा शैलीत दिलं जात नाही.

अरविंद कुमार याचं कारण सांगतात, "खरं तर अमित शहा एखाद्या प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व केल्यासारखं भाजपचं नेतृत्व करतात. तिथे त्यांच्या वक्तव्याचा प्रसार होतो आणि त्यांच्याविरोधातल्या आरोपांचा बचावही होतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)