काश्मिरी पंडित 3 दशकांनंतर काश्मीर खोऱ्यात परतला तेव्हा...

फोटो स्रोत, Majid Jahangir
- Author, माजिद जहांगीर
- Role, बीबीसीसाठी श्रीनगरहून
नव्वदच्या कट्टरवादाच्या काळात लाखो काश्मिरी पंडितांनी काश्मीरमधून पलायन केलं होतं. त्यानंतर तब्बल 29 वर्षांनंतर त्यांच्यापैकी एक काश्मीरमध्ये परतले आहेत.
श्रीनगरमधल्या जियाना कदाल भागातल्या निमुळत्या गल्ल्यांमध्ये रोशन लाल मावा यांनी आपलं दुकान बुधवारी उघडलं. 1990 सालापासून बंद असलेलं हे दुकान उघडल्यामुळे मावा यांच्यासाठी कहाणीचा नवा अंक सुरू झाला आहे.
हे दुकान पुन्हा उघडणं, ही सामान्य बाब नाही. त्यांनी सुक्या मेव्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला, त्यावेळी स्थानिक दुकानदारांनी त्यांचं फक्त स्वागतच केलं नाही तर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला. रोशन लाल मावा यांचे वडीलही याच भागात सुका मेवा विकायचे.
70 वर्षांच्या रोशन लाल मावा यांनी 1990मध्ये काश्मीर खोरं सोडलं होतं. त्यावेळी अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्यानेच मावा यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडलं होतं.
2019 च्या मेमध्ये मावा यांच्या दुकानात स्थानिक मुस्लिमांची मोठी गर्दी झाली होती. यात त्यांचे मित्रही होते आणि जुनी ओळखीची माणसंही होती. सर्व त्यांची गळाभेट घेत होते.

फोटो स्रोत, Majid Jahangir
काश्मीर सोडल्यावर मावा दिल्लीत स्थायिक झाले होते. तिथेच त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. ते सांगतात, दिल्लीत असतानाही त्यांना एका क्षणासाठीही त्यांच्या काश्मीरचा विसर पडला नव्हता.
ते म्हणतात, "दिल्लीत माझा व्यवसाय चांगला सुरू आहे. मात्र मला काश्मीरची खूप आठवण यायची. काश्मीरशिवाय सर्वच खूप वेदनादायी होतं. मग मात्र मी माझ्या काश्मीरमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. काश्मीर सारखं दुसरं कोणतंच ठिकाण नाही."
मावा सांगतात, काश्मीरमध्ये परतण्यामध्ये त्यांच्या धाकट्या मुलाची भूमिका सर्वांत महत्त्वाची होती. "तो मला फक्त प्रेरणाच देत नव्हता तर मी काश्मीरमध्ये परतावं, यासाठी त्यानेच आग्रह धरला होता. माझा मुलगा डॉ. संदीपचं योगदान मी कधीच विसरणार नाही. मी दिल्लीत होतो आणि माझं मन काश्मिरात अडकलं होतं. मला माझ्या मुळापाशी परत जाण्यासाठी त्यानेच प्रेरित केलं."
मावा म्हणतात, "गेली 29 वर्षं त्यांना काश्मीरची जी कमतरता जाणवली ती शब्दांत व्यक्त करता येत नाही. इतक्या वर्षात कधीच माझ्या मनातून काश्मीरचा विचार गेला नाही. मी काश्मीर बाहेर वसलो. मात्र माझं मन तिथे रमलं नाही.
"मी 29 वर्षं ज्या लोकांमध्ये राहिलो त्यांच्याशी तसा एकरूप होऊ शकलो नाही, जसा इथे झालो होतो. दिल्लीत माझं आर्थिक आयुष्य तसं चांगलंच सुरू होतं, मात्र सांस्कृतिक नाही. दिल्लीत माझ्या शेजाऱ्यांना मी कोण आहे, हे माहिती नव्हतं आणि ते कोण, हे मला माहिती नसायचं. मी जेव्हा इथे आलो तेव्हा सगळ्यांनी माझ्या भोवती गराडा घातला. हार घातले, तोंड गोड केलं. त्यांनी मला पगडी घातली आणि प्रथेप्रमाणे माझं स्वागत केलं."
जुन्या आठवणी आणि लोकांच्या प्रेमाने गहिवरलेले रोशन लाल मावा म्हणतात, सर्वच काश्मिरी पंडितांना आपल्या मातृभूमीत परत यायला हवं. त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
ते म्हणतात, "सर्व काश्मिरी पंडितांना मला काश्मीरमध्ये परतलेलं बघायचं आहे. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि भरकटू नये. काश्मीरच्या बाहेर वसलेले काश्मिरी पंडीत तिथल्या वातावरणाशी समरूप होऊ शकलेले नाही, हे मी अनुभवलं आहे."

फोटो स्रोत, Majid Jahangir
नव्याने दुकान उघडून कसं वाटतंय, असं विचारल्यावर ते सांगतात, "माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी हे विसरणार नाही. मी खूप आनंदी होतो आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होत असल्याचं मला जाणवत होतं. मी सकाळी लवकरच आलो आणि दुकान उघडलं. दिल्लीत मी साधारण दुपारी बारापर्यंत दुकान उघडायचो."
काश्मीरमध्ये परतल्याची त्यांना भीती वाटत नाहीय. जन्म-मृत्यू तर देवाच्या हातात असल्याचं ते म्हणतात.
काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचं सांगत मावा म्हणतात की बाहेर लोक मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेतात. पण, इथे काश्मीरमध्ये तर आम्ही त्या मिनरल वॉटरपेक्षा स्वच्छ पाण्याने तोंड धुतो.
काश्मीरमधली परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा त्यांना वाटते. ते म्हणतात, "काश्मीरमधल्या परिस्थितीचा हिंदू-मुस्लीम दोघांनाही फटका बसला आहे. जे पंडीत इथून गेले त्यांनाही त्रासच झाला. अनिश्चिततेचा काळ लवकरच संपेल, अशी मी आशा करतो."
काश्मिरी पंडीत खोरं सोडून गेले तेव्हा त्यातल्या बरेच जणांनी आपली जमीन-मालमत्ता विकली. मात्र रोशन लाल मावा आपली मालमत्ता विकू शकले नाही. ते म्हणतात, "इथली मालमत्ता विकणं, आपल्या आईला विकण्यासारखंच आहे."
ते म्हणतात, "आम्ही खोऱ्यातून जात होतो तेव्हा माझा मुलगा म्हणाला होता की आपण आपली मालमत्ता विकून टाकूया. मात्र मी नकार दिला. त्यावेळी आम्हाला चांगली किंमत मिळत होती. मी माझ्या मुलाला सांगितलं की वडिलोपार्जित मालमत्ता विकणं आईला विकण्यासारखं आहे. त्यावेळी मी माझ्या मनातलं बोलत होतो. त्यावेळी मी माझ्या मुलाला हेदेखील सांगितलं होतं की मी माझ्या मातृभूमीपासून फार काळ वेगळं राहू शकणार नाही."
रोशन लाल मावा सांगतात नव्वदच्या दशकापूर्वी काश्मीर खोऱ्यात पंडित आणि मुसलमान एका कुटुंबासारखे राहत. ते सांगतात, "मुसलमान आणि पंडित सुख-दुःख वाटायचे. लग्न समारंभ असो की दुःखाचा प्रसंग, आम्ही सोबत असायचो. आम्ही दुःखातही सहभागी व्हायचो आणि सुखातही."

फोटो स्रोत, Majid Jahangir
मावा परतल्यामुळे त्यांच्या शेजारचे दुकानदार रियाज बजाज यांनाही खूप आनंद झाला आहे. ते सांगतात, "आमच्या पंडित भावाला बघून खूप आनंद झालाय. तब्बल तीन दशकांनंतर त्यांनी या गल्लीतलं त्यांचं दुकान उघडलं आहे. यामुळे आमचा बाजार पुन्हा तेजाळणार. इतक्या वर्षांनंतर आमच्या बाजारात काहीतरी चांगलं घडतंय. सर्वच पंडितांना आपल्या मातृभूमीत परतलं पाहिजे. ही त्यांचीही मातृभूमी आहे. आमच्यात बंधुभाव आहे. ज्या सोयी-सुविधा आम्हाला मिळतात, त्या त्यांनाही मिळायला हव्या. "
रोशन लाल मावा यांचे बालपणीचे मित्र अब्दुल सलाम त्यांना बघून खूपच आनंदात आहेत. ते म्हणतात, "आम्ही एक आहोत. मावांवर झालेला गोळीबार आम्हा सर्वांसाठीच मोठं संकट होतं. आमचं दुर्दैव म्हणून अशी घटना घडली. आम्ही हिंदू-मुसलमान मिळून रस्त्यावर झोपायचो. आम्हाला कधीच भीती वाटली नाही."
रोशन लाल मावा यांचे पुत्र डॉ. संदीप यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की ते जेव्हा-जेव्हा वडिलांशी गप्पा मारायचे तेव्हा ते फक्त काश्मीरविषयीच बोलायचे.

फोटो स्रोत, Majid Jahangir
ते सांगतात, "13 ऑक्टोबर 1990 रोजी माझ्या वडिलांवर गोळीबार झाला होता. त्या घटनेनंतर आम्ही दिल्लीत आलो. गेल्या तीन दशकात जेव्हाजेव्हा आम्ही बोललो माझ्या वडिलांनी त्यांना काश्मीरची आठवण येत असल्याचंच सांगितलं. मला वाटायचं की मुलाच्या नात्याने वडिलांना काश्मीरला पाठवणं, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यांना काश्मिरात परत पाठवण्याचे सर्व पर्याय मी तपासत होतो. आपले शेवटचे दिवस आपल्या काश्मीरमध्ये घालवण्याची माझ्या वडिलांची अंतिम इच्छा होती."
ते सांगतात, "गेल्या काही वर्षांपासून मी वडिलांच्या दुकानाची डागडुजी करण्याचा विचार करत होतो. मी वडिलांना सांगितलं की तुम्ही 15 दिवस काश्मीरमध्ये रहा आणि 15 दिवस दिल्लीत. ते काश्मीरमध्ये परतले आहे. मात्र, पूर्णपणे नाही. ते इथे आले तेव्हा हजारो माणसं त्यांना भेटायला आली. हीच खरी काश्मिरीयत आहे. जे झालं ते विसरून आपण पुढे गेलो पाहिजे. केवळ माझं कुटुंबच नाही तर सर्वच काश्मिरी पंडितांनी परतावं, अशी माझी इच्छा आहे. काश्मीरमधली परिस्थिती चांगली नाही तर ती सुधारण्याची जबाबदारी केवळ काश्मिरी मुसलमान, शीख आणि पंडितांचीच आहे. तरच काश्मीरमधली परिस्थिती सुधारेल."
संदीप 'जम्मू-काश्मीर सुलह फ्रंट'चे अध्यक्षही आहेत. सर्व समाजांमध्ये धार्मिक सौहार्द स्थापन करण्याचं काम ते करतात.
1990च्या दशकात जेव्हा काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला होता, तेव्हा काश्मिरी पंडितांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले होते. त्यानंतर त्यांनी खोऱ्यातून पलायन केलं. ते काश्मीर सोडून देशातल्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले.
2008 साली भारत सरकारने काश्मीरमध्ये 6,000 पदं काश्मिरी पंडितांसाठी राखीव केले. या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने अनेक ठिकाणी ट्रांझिट कॅम्पही उभारले.
काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र कॉलोनी उभारण्याचा प्रस्तावही सरकारने सादर केला आहे. मात्र, काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी सरकारच्या मंशेवर शंका व्यक्त केली होती. काश्मीरच्या लोकसंख्येचं चरित्र बदलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप फुटीरतावाद्यांनी केला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








