उत्तर प्रदेशात काँग्रेस उमेदवारांनी 'भाजपकडून पैसे घेतले'?- ब्लॉग

सोनिया गांधी आणि राहुल गांधी

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTYIMAGES

फोटो कॅप्शन, सोनिया गांधी आणि राहुल गांधी
    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपली आणि नेमकं काय ठरलं हे जाणून घेण्यासाठी सर्वच पत्रकारांची घाई झाली. बैठक संपवून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना पत्रकारांच्या गराड्यातूनच जावं लागत होतं. पण कुणीच काहीच सांगण्यास तयार नव्हतं. नेहमीचीच गोल गोल उत्तर नेत्यांकडून दिली जात होती.

जी-23 मधल्या आंनद शर्मा आणि गुलामनबी आझादांनी तर 'सुरजेवाला सर्व सांगतील' असं सांगून सर्वांना टोलवलं. तेवढ्यात महाराष्ट्रातून काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये सदस्य असलेल्या रजनी पाटील बाहेर आल्या. मराठी पत्रकारांनी त्यांना गाठलं. पण माझा घसा खराब आहे, असं सांगून त्यांनी बोलणं टाळलं.

काँग्रेस मुख्यलयाच्या दारातच मुकुल वासनिक यांचं केबिन आहे. वासनिक काही बोलतात का हे पाहाण्यासाठी मी तिथं गेलो तर त्यांच्या केबिनमध्ये काही कार्यकर्तेच बसले होते.

आता याच वासनिकांना काँग्रेसचं अध्यक्ष करा अशी मागणी काँग्रेसच्या जी-23 गटाकडून करण्यात आली आहे. पण या वासनिकांना त्यांच्या गृह राज्य महाराष्ट्रात किती जनाधार आहे? किती सामान्य लोकांना ते माहिती आहेत? त्यांचा चेहरा किती लोकांना माहिती आहे? सामान्य लोक सोडा किती पत्रकारांना त्यांचा चेहरा माहिती आहे? (पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येईपर्यंत अनेकांना त्यांचा चेहरासुद्धा माहिती नव्हता.)

पण, ज्या दिग्विजय सिंग यांचा चेहरा सर्वांना माहिती आहे, जे मीडियाशी सहज बोलण्यासाठी ओळखले जातात. त्या दिग्विजय सिंग यांना मात्र रविवारीच्या रात्री पत्रकारांनी गराडा घातला नाही. बैठक सुरू होण्याआधीसुद्धा ते एकटेच काँग्रेस मुख्यालयात चालत आले आणि बैठक संपल्यावरसुद्धा एकटेच बाहेर पडले.

रविवारी दुपारी 4 वाजता बैठक सुरू झाली. साडेआठ वाजताच्या सुमारास ती संपली. साधारण साडेचार तास काँग्रेसच्या 57 ज्येष्ठ नेत्यांनी काथ्याकूट केला. (नुकत्यात झालेल्या 5 राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस आमदारापेक्षा CWCची सदस्य संख्या जास्त आहे.) पण त्यातून काहीच ठोस निर्णय पुढे आला नाही.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी

फोटो स्रोत, ATUL LOKE/ GETTY IMAGES)

फोटो कॅप्शन, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी

यूपीए-1 च्या काळात जेव्हा डाव्या पक्षांनी मनमोहन सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता तेव्हा सरकारनं काही एक निर्णय घेतला की त्यावर काथ्याकूट करण्यासाठी डाव्यांच्या पॉलिट ब्युरोची बैठक व्हायची. धीरगंभीर चेहऱ्याने सर्व जेष्ठ डावी मंडळी चर्चा करायची. कुणीही तरूण चेहरा या बैठकीत नसायचा. काँग्रसच्या रविवारच्या बैठकीची स्थिती अशीच होती. राहुल गांधी त्यांचे तरूण नेते आहेत आणि त्यांचं वय 50 च्या पुढे आहे. ( पॉलिट ब्यूरोच्या बैठकांचं वार्तांकन आता इतिहास जमा झाल्याचं चित्र आहे.)

काँग्रेस सोनियांच्याच नेतृत्वाच काम करत राहील. नव्या अध्यक्षांची निवड ठरलेल्या कार्यक्रमानुसार म्हणजेच ऑगस्टमध्येच होईल आणि चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा भेटू, असं नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

आधीच साडेचार तास चाललेली बैठक आणि त्यातून काहीच बातमी समोर येत नाही हे लक्षात

आल्यावर रणदीप सुरजेवाला यांच्या पत्रकार परिषदेत कॅमेरांची गर्दी फार होती. पण प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची संख्या मात्र फारच कमी होती. अर्ध्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. जे कुणी पत्रकार उपस्थित होते त्यातसुद्धा दक्षिणात्य वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची संख्या जास्त होती.

काही पत्रकार वर्षानुवर्ष काँग्रेस कव्हर करत आहेत. काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा व्हावी असं तिथं अनेकांना वाटत होतं. त्याचं कारण त्यांच्या करिअरशीसुद्धा जोडलेलं आहे.

अनेक वर्षं काँग्रेस कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारानं बोलता बोलता मला सांगितलं, "काँग्रेसची स्थिती अशीच राहिली तर मला नवं बीट शोधावं लागेल. डाव्या पक्षांना कव्हर करणाऱ्या काही पत्रकारांवर काही वर्षांपूर्वी अशीच स्थिती आली होती."

पण काँग्रेस टिकावी असं फक्त काँग्रेस बीट कव्हर करणाऱ्या पत्रकारांनाच नाही तर या बैठकीच्या ठिकाणाबाहेर आलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनासुद्धा वाटत होतं.

काँग्रेस बैठक

त्यातल्याच एक होत्या सुषमा. "काँग्रेस की सरकार आनी चाहिये," असं त्या मला सांगू लागल्या. पण तुम्हाला काँग्रेसचं सरकार का पाहिजे असं विचारल्यावर त्याचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही.

मग तुम्ही कायम काँग्रेसला मतदान करता का, असं विचारल्यावर गेल्या 2 निवडणुका भाजप आणि 'आप'ला मतदान केल्याचं त्या सांगू लागल्या.

माझ्या बातमीसाठी तुमचा फोटो घेऊ का असं विचारल्यावर मात्र लगेच नको म्हणाल्या. "मी इथं आल्याचं माझ्या घरच्यांना माहिती नाही," असं सांगू लागल्या. सुषमा दिल्लीतल्या लाजपतनगर भागातून आल्या होत्या. 2 घरी स्वयंपाकाचं काम करतात. "पोट माणसाला काही कारायला भाग पाडतं," हे त्याचं वाक्य फार बोलकं होतं.

तोपर्यंत काँग्रेसची बैठक सुरू होऊन 2 तास होत आले होते. संध्याकाळ होत आली होती. माझ्याशी बोलता बोलताच सुषमा आणि त्यांच्या बरोबर आल्या इतर महिला निघून जायला लागल्या. लाजपतनगरमधल्या तिकीटासाठी इच्छुक असलेल्या एका महिलेनं या सर्वांना इथं आणलं होतं.

तिथंच मला सोनिपतवरून आलेले यूथ काँग्रेसचे चार जण भेटले. बी. जी. श्रीनिवास सरांनी इथं यायला सांगितल्याचं सांगू लागले. त्यातल्या एकानं पंजाब निवडणुकीत 4 मतदारसंघांसाठी काम केलं होतं. तिथं चारही ठिकाणी काँग्रेस हारत असल्याचा रिपोर्ट त्यांन वरिष्ठांना दिला होता. पण वरिष्ठांनी तो वरपर्यंत जाऊच दिला नसल्याचं त्याचं म्हणणं होतं. मुख्यमंत्री चन्नी हारत असल्यचा रिपोर्टसुद्धा आधीच देण्यात आला होता. पण त्यावरसुद्धा काहीच करण्यात आलं नसल्याचं त्याचं म्हणणं होतं.

हरियाणातूनच आलेल्या एका वयस्क माणसानं दिपिंदर हुड्डांना काँग्रेसचं अध्यक्ष करा, अशी मागणी केली. दिपिंदर यांना मतदारसंघात भेटणं अवघड आहे म्हणून दिल्लीत भेटता येईल का, हे पाहाण्यासाठी आल्याचं सागंत होते.

पोलीस जास्त कार्यकर्ते कमी

दिल्लीतल्या ल्यूटियन्स झोनमध्ये तशी कायमच बरी सुरक्षा व्यवस्था असते. पण रविवारी अकबर रोड दोन्ही बाजूंनी अडवण्यात आला होता. मोठा फौजफाटा होता. दोन्ही बाजूंना 50-100 कार्यकर्ते 4 वाजताच्या सुमारास गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. पण तिथं काँग्रेस कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांचीच गर्दी जास्त होती. फरक फक्त एवढाच की पोलीस बैठक संपेपर्यंत सुरक्षा देत होते आणि सूर्य मावळल्यावर कार्यकर्ते मात्र पांगले होते.

काँग्रेस बैठक

पण काँग्रेस सेवा दालाचे सफेद कपडे घातलेले 4-5 जण मिटिंग संपेपर्यंत मुख्यालयात त्यांची ड्युटी करत होते. मध्येच त्यांचं फोटोसेशनसुद्धा सुरू होतं. उत्तर प्रदेशात कसे काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपकडून पैसे घेतले यावर त्यांची चर्चा रंगली होती.

"काँग्रेसने उमेदवारांना 40-40 लाख रुपये निवडणूक खर्चासाठी दिले. पण उमेदवारांनी 5-10 लाख खर्च केले आणि उरलेले खिशात ठेवले. शिवाय भाजपकडूनसुद्धा पैसे घेतले," दबक्या आवाजात ते बोलत होते.

पण आसपासचे पत्रकार ऐकत आहेत असं लक्षात येताच त्यांनी टॉपिक बदलला.

बैठक काही संपत नाही म्हणून नेमकं काय सुरू आहे याचा मागोवा घेण्यासाठी काही पत्रकारांनी मध्येच काँग्रेसच्या मीडिया सेलच्या संजीव सिंग यांना गराडा घातला. तिथंच काही पत्रकारांनी त्यांना काँग्रेसच्या मीडिया सेलच्या व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये ऍड करण्याची विनंती केली. तेव्हा "हे फार मोठं काम आहे, मला रात्री साडेनऊ वाजता फोन करा," असं सांगून ते निघून गेले.

त्यांची पाठ फिरताच हेच जर भाजपच्या मीडिया सेलच्या सदस्याला सांगितलं असतं तर किती फास्ट त्यानं काम केलं असतं याचीच चर्चा पत्रकारांमध्ये रंगली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)