नरेंद्र मोदींना 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये कोण आव्हान देणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांचा निवडणुका या पुढच्या लोकसभा निवडणुकांसाठी सेमीफायनल होत्या आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे अंतिम सामना असं म्हटलं जातंय.
मग भारतीय जनता पक्षानं पाचपैकी चार राज्ये जिंकून अंतिम फेरीत आपला विजय निश्चित केला आहे का?
10 मार्च 2022 रोजी या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, "2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर काही राजकीय तज्ज्ञ म्हणाले होते की, 2019 च्या विजयात काय आहे? हे तर 2017 मध्येच ठरलं होतं. कारण 2017 मध्ये यूपीचा निकाल आला होता. मला विश्वास आहे की यावेळीही हे बुद्धिजीवी म्हणण्याचे धाडस नक्कीच करतील की 2022 च्या निकालानं 2024 चा निकाल ठरवला गेलाय."
प्रसारभारतीचे माजी अध्यक्ष आणि मोदींचे समर्थक सूर्यप्रकाश यांच्या दृष्टीनं या ताज्या निवडणूक निकालांचा परिणाम 2024 मध्ये दिसून येईल. त्यांच्या मते भाजपच्या विजयाची पूर्ण शक्यता आहे.
ते म्हणतात, "आजपर्यंत मला 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी कोणतीही अडचण दिसत नाहीये. देशभरात मोदी समर्थकांच्या भावना खूप मजबूत आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि विचारांच्या प्रसाराच्या बाबतीत त्यांचा विक्रम आहे. खूपच उल्लेखनीय आहे. जर याच गोष्टी स्थिर राहिल्या तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी भाजपसमोर कोणतीही अडचण दिसत नाही."
ते म्हणाले की लोक अजूनही मोदींच्या नावावर मतदान करतात आणि हे सध्या तरी थांबवणे कठीण वाटतं.
बीबीबीशी बोलताना त्यांनी सांगितलं की,"उत्तर प्रदेश सारखं राज्य जिंकणं हा काही विनोद नाही यात शंका नाही. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हे सकारात्मक संकेत असले तरी इतर राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींसाठी देखील हे एक व्यापक स्वरूपाचे सकारात्मक संकेत आहे."
राजकीय विश्लेषक सीमा चिश्ती यांच्या मते, "ताज्या निवडणूक निकालांवरून सध्या वातावरण हिंदूत्वाच्या बाजूनं असल्याचं दिसून येतं. त्यांच्या मते यातून विरोधकांच्या पराभवापेक्षा मतदारांची मानसिकता अधिक दिसून येते. त्या म्हणतात, "मतदार स्वतःच्या हितासाठी मतदान करत नाही, त्यांना काहीतरी वेगळं हवंय." अशीच परिस्थिती राहिली तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदूत्वालाच मतदान होईल, असं त्यांना वाटतं.
" समजा मी जर भाजप आहे, तर मला समजेल की हिंदूत्वाला पूर्णपणे मतं मिळाली आहेत. केवळ हिंदी पट्ट्याबद्दलच नाही. या निवडणुका वेगवेगळ्या राज्यात झाल्या आहेत."
मोदींना रोखणं कठीण
नरेंद्र मोदींना रोखणं सध्या विरोधकांच्या हाताबाहेरचं आहे, हे जवळपास सर्वच विश्लेषक आता मान्य करतात. पंतप्रधान 70 वर्षांचे असून त्यांची तब्येत चांगली आहे. ते रजा घेत नाहीत, फक्त काम करत असतात, असं त्यांचे समर्थक सांगतात. 2024 च्या अंतिम सामन्यात मोदी हेच भाजपचे कर्णधार असतील हे उघड आहे आणि विश्लेषकांचं मत आहे की विरोधी पक्ष एकवटले तरी त्यांचा पराभव करणं कठीण आहे.
गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेस जवळपास संपल्याची चर्चा विश्लेषक करतायत. नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ही बाब पुन्हा एकदा समोर येतेय.
पण गेल्या आठ वर्षांत काँग्रेसचा अनेक राज्यांत पराभव झाला, तर इतर अनेक राज्यांतही काँग्रेसचा विजय झाला आहे. 2018 मध्ये जेव्हा पक्षाने छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विजय मिळवला तेव्हा पक्षाचं पुनरुज्जीवन होत असल्याचं दिसत होतं. पण, पक्षाला राष्ट्रीय स्तरावर दोनदा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.
सीमा चिश्ती म्हणतात, "काँग्रेसचा पराभव झाला आहे. पंजाबमध्येही पराभव झालाय. त्यामुळे देश एकपक्षीय व्यवस्था बनला आहे".
2024 ची निवडणूक कशी असेल
मग 2024 ची लोकसभा निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होणार नाही का? की मग ही निवडणूक भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्षांची असेल?
हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी गुरुवारी सांगितलं की, देशात अजूनही भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष आहेत. ते म्हणतात, "आजही भाजप आणि काँग्रेस देशाच्या बहुतांश भागात आहेत. पण काँग्रेसच्या विचारसरणीबद्दल लोकांची आस्था कमी होतेय."

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना 2024 च्या निवडणुकीत आपला पक्ष मजबूत राहील अशी आशा आहे. ते म्हणतात, "काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व अजूनही मजबूत आहे, जे आम्हाला 2024 च्या निवडणुकीत कठीण लढा देण्यासाठी मदत करेल."
सीमा चिश्ती यांच्या मते, 2024 मध्ये काँग्रेस भाजपच्या विरोधात आपली ताकद दाखवू शकेल की नाही हे आगामी होऊ घातलेल्या राज्य निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी असेल यावर अवलंबून असेल.
त्या म्हणतात, "येत्या राज्याच्या निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारचे निकाल येतात यावर ते अवलंबून असेल. आमचे आकलन बदलत राहते. आता बंगालच्या निवडणुकांनंतर बघा, वेग वेगळा होता. त्यामुळे जर काँग्रेस खरोखरच एकत्र येत असेल तर राज्यात जोरदार कामगिरी होईल. (कर्नाटक आणि गुजरात निवडणुकीत) लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे काँग्रेसने काढले तर आशा आहे. तिला परतीचा मार्ग निवडावा लागेल."

फोटो स्रोत, Getty Images
2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत अंतिम सामना भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्षांमध्ये होणार असल्याचं सूर्यप्रकाश सांगतात.
ते म्हणाले, "आम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गेल्या काही वर्षांपासून भाजप हा भारतातील क्रमांक एकचा पक्ष राहिला आहे. तो अनेक प्रादेशिक पक्षांशी स्पर्धेत असतो , आज भारताचा राजकिय नकाशा बघितला तर लक्षात येतं की, अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे हे कळेल. राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाणे जिथं जिथं काँग्रेसची सत्ता आहे तिथं भाजप हा प्रमुख विरोधक आहे आणि ते आळीपाळीने सत्तेत येत असतात.
दुसरी परिस्थिती ओडिशासारख्या राज्यात आहे, जिथं एका प्रादेशिक पक्षानं (बीजेडी) काँग्रेसला संपवलं आहे. बिजू जनता दलाने काँग्रेसचा पराभव केलाय. आता भाजप हा बीजेडीचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. काँग्रेसचं राज्य असलेल्या तेलंगणामध्ये सत्ताधारी पक्षानं निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकलं आणि भाजप आता प्रादेशिक पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनला आहे. पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशातही असेच काहीसे घडलंय.
ते म्हणतात, "आता आम आदमी पक्षानं काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये क्लीन स्वीप केलाय. आता काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणं अवघड होणार आहे. तुम्ही दिल्लीकडं पहा, जिथं आम आदमी पक्षानं सलग दोन वेळा विधानसभेत काँग्रेसचा पराभव केलाय.
राष्ट्रीय पातळीवर आम आदमी पार्टीचा नवा पर्याय?
पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचा उत्साह वाढला आहे. गोव्यातही दोन जागांसह खातं उघडलं आहे. आता हा पक्ष दिल्लीपुरता मर्यादित नाही हे स्पष्ट झालंय. त्यामुळे आता तो राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून उदयास येईल का आणि भाजपसाठी आव्हान ठरेल का? हे बघणं औत्सुक्याचे असणार आहे.
सूर्यप्रकाश म्हणतात, "हे सुरुवातीचे दिवस आहेत. हे सध्या एका वनस्पतीसारखं आहे जी पुढे वाढताना दिसेल". आम आदमी पक्ष सध्या फक्त दिल्ली आणि पंजाबमध्ये भाजपसाठी आव्हान आहे, राष्ट्रीय पातळीवर नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सीमा चिस्ती यांच्या मते, आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवरील पक्ष बनू शकतो. त्या म्हणतात, "आरएसएसलाही यात काही अडचण नसेल. आम आदमी पार्टी तसं बघितलं तर भाजपला जास्त विरोध करत नाही. मला वाटतं आपने सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलेलं दिसतंय."
कदाचित 2024 मध्ये आम आदमी पक्ष भाजपला राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकणार नाही. अनेक राज्यांत ज्यांचे पक्ष सत्तेत आहेत, अशा अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केलीय, तर अंतिम लढत रंजक ठरू शकते, असे विश्लेषकांचे म्हणणं आहे.
ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, शरद पवार यांसारखे उच्च प्रतिष्ठेचे विरोधी पक्षनेते अशा आघाडीबद्दल बोलताना दिसतात, परंतु सध्या तरी अशी आघाडी बनलेली नाही.
दोन वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका आहेत. राजकारणात दोन वर्षे हा मोठा काळ असतो. दोन वर्षांत परिस्थिती बदलू शकते. पण सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान मोदींना पराभूत करणं जवळपास अशक्य दिसतंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








