लाभ सिंग पंजाब: चरणजीत सिंग चन्नींचा पराभव करणारे लाभ सिंग कोण आहेत?

लाभ सिंह उगोके

फोटो स्रोत, facebook

हे इंटरॲक्टिव्ह पाहायला जावास्क्रिप्ट असलेलं आधुनिक वेब ब्राऊझर आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन लागेल.

पंजाब विधानसभा निवडणुकीत जुन्या आणि बड्या राजकीय पक्षांची धोबीपछाड करत आम आदमी पार्टी सत्तेत आली आहे.

पंजाबच्या निकालाची त्सुनामी लाटेशी तुलना केली जातेय. चरणजीत सिंग चन्नी, प्रकाश सिंग बादल, कॅप्टन अमरिंदर सिंग, आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे.

पण निवडणुकीच्या निकालांमध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पंजाबमधल्या बड्या नेत्यांचा पराभव करणारे आम आदमी पार्टीचे उमेदवार अगदी नवखे चेहरे आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी भदौर मतदारसंघातून उभे होते. त्यांचा पराभव आम आदमी पार्टीच्या लाभ सिंग उगोके यांनी केलाय. त्यामुळे लाभ सिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा होतेय. त्यांनी 2013मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

35 वर्षांचे लाभ सिंग भदौरच्या उगोके गावात राहणारे आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते मोबाईल फोनचं दुकान चालवायचे. लाभ सिंग यांचे वडील ड्रायव्हर आहेत, तर त्यांची आई एका शाळेत सफाई कर्मचारी आहे.

2017 च्या निवडणुकीत भदौरमधून उभे असलेले आप उमेदवार पीरमल सिंग खालसा यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता.

पीरमल सिंग खालसा आधी खैरा गटासोबत होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले.

यावेळी आम आदमी पार्टीने भदौरच्या जागेसाठी उगोके यांना तिकिट दिलं. त्यांनी चरणजीत सिंग चन्नी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

चरणजीत सिंग चन्नी दोन्ही मतदारसंघात पराभूत

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर दोन मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की ओढवली. चमकौर साहिब आणि भदौर अशा दोन मतदारसंघांमधून चन्नी यांनी निवडणूक लढवली होती.

"पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना हरवणारा एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. लाभ सिंह त्यांचं नाव. तो मोबाईल रिपेअरिंगचं काम करतो. आम आदमी काय करू शकतो याचं हे उदाहरण. आता आपल्याला देशात क्रांती आणायची आहे," असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला होता. काँग्रेस पक्षातील अंतर्गत सुंदोपसुंदीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला.

अमरिंदर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी पंजाब पीपल्स काँग्रेस नावाच्या पक्षाची स्थापना केली. काँग्रेस हायकमांडने चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले होते.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही चन्नी आणि सिद्धू यांच्यात बेबनाव होता. दरम्यान सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. सिद्धू यांचा अमृतसर ईस्ट मतदारसंघातून पराभव झाला.

योगायोग म्हणजे याआधीही पंजाबचे मुख्यमंत्री राहिलले नेते या निवडणुकीत जिंकू शकलेले नाहीत. चन्नी यांच्या आधीचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

58 वर्षीय चन्नी दलित शीख समाजातले नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते तंत्रशिक्षण मंत्री होते.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षानंही बहुमताचा आकडा ओलांडला आहे. या क्रांतीसाठी पंजाबच्या जनतेचे आभारी आहोत, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)