डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकची आजही गरज का आहे?

फोटो स्रोत, Government of maharashtra
- Author, सूरज येंगडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल", हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. हे आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन असावं.
31 जानेवारी 1920 रोजी हा अंक प्रकाशित झाला होता. तेव्हापासून कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत, पण तरीही म्हणावा इतका बदल झालेला नाही.
आंबेडकरांचं माध्यमांशी असलेलं नातं व्यामिश्र होतं. त्यांनी स्वतः वर्तमानपत्रं सुरू केली, चालवली, संपादित केली आणि सल्लागार म्हणूनही काम केलं. इतर वेळी माध्यमांमध्ये त्यांच्याविषयीचं वार्तांकन होत राहिलं. पोहोच आणि जवळपास एकहाती चालवलेल्या सामाजिक चळवळी यांचा विचार केला, तर आंबेडकर हे त्या काळी सर्वाधिक प्रवास केलेले राजकीय नेते असावेत.
सामाजिक पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ यांच्या अभावी आंबेडकरांची चळवळ ही गरीब लोकांची चळवळ होती. काँग्रेस पक्षासारखी त्यांची स्थिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकवर्गातील लोक कूळ वा वेठबिगार म्हणून काम करणारे वंचित होते. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सर्वांत कमी संसाधनं बाळगून होता. तर, बाहेरून फारसा पाठिंबा नसताना आंबेडकरांना हा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर पेलावा लागला. माध्यमांच्या दृष्टीने हे दखलपात्र होतं.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय माध्यमविश्वात आंबेडकरांचं कार्य सुपरिचित होतं. देशांतर्गत माध्यमांमधील आंबेडकरांची उपस्थिती आणि त्यांचं संपादकीय कार्य यांबद्दल आपल्याला माहिती असते, पण आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्यांच्याविषयी झालेलं विस्तृत वार्तांकन बऱ्याच प्रमाणात अज्ञात राहिलं आहे.
लंडनमधील द टाइम्स, ऑस्ट्रेलियातील डेली मर्क्युरी, न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्क अॅमस्टरडॅम न्यूज, बाल्टिमोर आफ्रो अमेरिकन, द नॉरफोक जर्नल, यांसारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसह काळ्या लोकांनी चालवलेल्या वर्तमानपत्रांनी आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीमध्ये आणि गांधी-आंबेडकर संघर्षामध्ये बराच रस घेतला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
राज्यघटना निर्मितीमधील आंबेडकरांची भूमिका, संसदेतील त्यांचे युक्तिवाद व सादरीकरणं, आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा त्यांनी दिलेला राजीनामा, या घडामोडींकडेही जगाचं लक्ष होतं. 'आंबेडकर इन ब्लॅक अमेरिका' या माझ्या आगामी पुस्तकासाठी काम करत असताना माझ्या निदर्शनास आलं की, आंबेडकरांच्या महान वारशाविषयी माहितीचा प्रचंड साठा जुन्या आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांच्या प्रतींमध्ये जतन केलेला आहे.

फोटो स्रोत, Government of Maharashtra
देशांतर्गत पातळीवर आंबेडकरांनी त्यांची सामाजिक चळवळ चालवण्यासाठी माध्यमांचा आधार घेतला. उत्कट प्रादेशिक प्रेमादरापोटी त्यांनी 'मूकनायक' या त्यांच्या पहिल्या मराठी नियतकालिकाचा आरंभ केला. 'मूकनायक'चा उद्देश स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तुराकामाचा एक अभंग अंकाच्या शीर्षस्थानी वापरला होता, तर पुढे 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाची बिरुदावली म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या ओळी वापरल्या. 'मूकनायक'मध्ये वापरल्या जाणारा तुकारामांचा अभंग असा:
काय करूं आतां धरूनिया भीड
निःशंक हें तोंड वाजविले
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण
सार्थक लाजून नव्हे हित
भारतातील अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी आंबेडकरांनी या नियतकालिकाचा वापर केला. 'मूकनायक'च्या पहिल्या 12 अंकांचं संपादन त्यांनी स्वतः केलं आणि नंतर ही जबाबदारी पांडुरंग भाटकर यांच्यावर सोपवली, त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर धृवनाथ घोलप यांनी संपादकीय कामाची जबाबदारी वाहिली.
कालांतराने, उच्चशिक्षणासाठी आंबेडकर परदेशात गेले- परिणामी, त्यांची देशातील अनुपस्थिती, जाहिरातींचा अभाव आणि वर्गणीच्या रूपातही फारसा आधार न मिळणं, या कारणांमुळे 1923 साली हे नियतकालिक बंद पडलं.
आरंभीच्या वर्षांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी या नियतकालिकाला पाठिंबा दिला होता. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक गंगाधर पानतावणे नोंदवतात त्यानुसार, "मूकनायक'ने अस्पृश्यांसाठी नवे विचारयुग निर्माण केले...अस्पृश्याना त्यांच्या अस्तित्वाची व भवितव्याची जाणीव करून देण्याचे साधन म्हणून काम केले." (गंगाधर पानतावणे, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पान 72).

फोटो स्रोत, Government of Maharahstra
'मूकनायक'चं कार्य संपुष्टात आल्यावर काही वर्षांनी, महाड चळवळीला गती प्राप्त झालेली असताना, 3 एप्रिल 1927 रोजी आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाच्या रूपाने पुन्हा पत्रकारितेत मुसंडी मारली.
त्रेचाळीस अंक प्रकाशित झाल्यावर 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक 15 नोव्हेंबर 1929 रोजी बंद पडलं. यावेळीही आर्थिक अडचणींमुळेच नियतकालिक बंद करावं लागलं होतं. 'मूकनायक' व 'बहिष्कृत भारत' यांच्या प्रत्येक अंकाची किंमत फक्त दीड आणे इतकीच होती, आणि वार्षिक वर्गणी, टपालखर्चासह तीन रुपये होती (पानतावणे, पान 76). याच दरम्यान, 1928 साली 'समता'चा उदय झाला आणि 'बहिष्कृत भारत'ला नवसंजीवनी मिळून 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' या नावाने ते प्रकाशित होऊ लागलं. 'जनता' हे दलितांचं सर्वाधिक काळ चाललेलं दैनिक ठरलं.
पंचवीस वर्षं सुरू राहिलेल्या 'जनता'चं नामकरण 1956 साली 'प्रबुद्ध भारत' असं करण्यात आलं. आंबेडकरांच्या चळवळीला प्राप्त झालेल्या गतीशी सुसंगत हा बदल होता. 1961 सालपर्यंत हे प्रकाशन सुरू राहिलं. तर, एकंदरित मूळचं 'बहिष्कृत भारत' हे नियतकालिक नामबदलासह 33 वर्षं सुरू राहिलं, असं म्हणता येईल. या अर्थाने ते दलितांचं सर्वाधिक काळ सुरू राहिलेलं स्वतंत्र प्रसारमाध्यम होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व काळात आंबेडकरांनी चातुर्य दाखवत पुरोगामी सवर्ण पत्रकार व संपादकांचा वापर या कार्यामध्ये करून घेतला. त्यांनी सुरू केलेल्या अनेक नियतकालिकांचं संपादन वेळोवेळी ब्राह्मण संपादकांच्या हातात होतं.
देवराव विष्णू नाईक ('समता' आणि 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' यांचे संपादक), भास्कर रघुनाथ काद्रेकर ('जनता') आणि गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे ('बहिष्कृत भारत' व 'जनता') ही त्यातील काही ठळक संपादकांची नावं. बापू चंद्रसेन (बी. सी.) कांबळे आणि यशवंत आंबेडकर यांच्यासारखे दलित नेते 'जनता'च्या संपादकीय भूमिकेला दिशा देत असत.
परंतु, 'बहिष्कृत भारत'ला पुरेसे लेखक मिळत नव्हते, त्यामुळे 24-24 रकाने भरण्याची जबाबदारी एकट्या संपादकावर पडायची. 'प्रबुद्ध भारत' सुरू होतं तोवर त्याचं संपादन यशवंत आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरात आणि भास्करराव काद्रेकर यांनी केलं.
दलित पत्रकारिता
आंबेडकरांआधी काही मोजकी नियतकालिकं अस्पृश्यांच्या जगण्याबाबत वार्तांकन करत असत. उदाहरणार्थ, महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून प्रेरणा घेऊन काही पत्रकारी प्रकल्प सुरू झाले. 'दीनबंधू' हे भारतातील पहिलं बहुजन वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलं.
सत्यशोधक विचारांचा प्रसार करणं, हे या प्रकाशनाचं उद्दिष्ट होतं. दलितांना आणि त्यांच्या मतांना या वर्तमानपत्रात जागा दिली जात असे. काही लहानसहान अडथळे वगळता या वर्तमानपत्राने 100 वर्षांचा प्रदीर्घ व खडतर प्रवास केला.
महारांचे एक ज्येष्ठ नेते गोपाळ बाबा वलंगकर यांना पहिला दलित पत्रकार मानलं जातं. 'दीनमित्र', 'दीनबंधू' आणि 'सुधारक' या नियतकालिकांमध्ये त्यांनी जात व अस्पृश्यतेबद्दल केलेलं लेखन पथदर्शी ठरलं (संदर्भ- पानतावणे). वलंगकर अतुलनीय विद्वान होते. हिंदू धार्मिकव्यवस्थेची त्यांनी केलेली चिकित्सा 'विटाळ विध्वंसक' या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाली (1988). शंकराचार्य आणि इतर हिंदू नेत्यांसमोर वलंगकर यांनी सदर पुस्तकामध्ये 26 प्रश्न उपस्थित केले होते (E Zelliot, Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement, p. 49; A Teltumbde, Past, Present and Future, p. 48).

फोटो स्रोत, Government of maharashtra
शिवराम जानबा कांबळे यांच्यासारख्या इतर प्रमुख महार नेत्यांनीही अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला. 'सोमवंशीय मित्र' (1 जुलै 1908) हे पहिलं दलित वर्तमानपत्र सुरू करण्याचं व संपादनाचं श्रेय कांबळे यांना जातं [चित्र पाहा].
दलित चळवळीतील आणखी एक मोठे नेते व नागपूरस्थित इम्प्रेस मिलमध्ये कामगारांचं नेतृत्व केलेले किसन फागोजी बनसोडे यांनीही एक छापखाना सुरू केला होता, त्यामुळे त्यांना स्वतःची स्वतंत्र प्रकाशनं चालवता आली. त्यांनी 'निराश्रित हिंदू नागरिक' (1910) 'मजूर पत्रिका' (1918-22) आणि 'चोखामेळा' (1916) ही प्रकाशनं स्वतःच्या छापखान्यातून प्रकाशित केली. बनसोडे यांनी 1913 ला कालिचरण नंदागवळी यांच्यासोबत विटाळ विध्वंसक सुरू केलं होतं.
1941 साली त्यांनी चोखामेळ्याचं चरित्रही लिहिलं. 'सोमवंशीय मित्र' अस्तित्वात येण्यापूर्वी किसन फागोजी बनसोडे यांनी 'मराठा दीनबंधू' (1901), 'अत्यंज विलाप' (1906) आणि 'महारांचा सुधारक' (1907) ही तीन वर्तमानपत्रं सुरू केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
दस्तावेजीय संग्रहाअभावी या नोंदींची ठोस शहानिशा अजून झालेली नाही. पण तत्कालीन विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि संशोधकीय साधनांमध्ये बनसोडे यांच्या नावावर तीन वर्तमानपत्रं नमूद केलेली आहेत, असं पानतावणे लिहितात. (पृष्ठ क्रमांक 35)
दडपलेल्या अस्पृश्य जातींना एकत्र आणणं आणि हिंदू समाजाला सुधारणेचं आवाहन करण्यासोबतच त्याची कठोर चिकित्सा करणं, यांवर सदर वर्तमानपत्रांनी लक्ष केंद्रित केलं होतं. आंबेडकरांच्या चळवळीला इतरही काही वर्तमानपत्रांनी पाठिंबा दिला होता. त्यातील काही अशी: दादासाहेब शिर्के यांनी सुरू केलेलं 'गरुड' (1926), पी. एन. राजभोज यांनी 1928 साली सुरू केलेलं 'दलित बंधू', पतितपावनदास यांनी सुरू केलेलं 'पतितपावन' (1932), एल. एन. हरदास यांनी सुरू केलेलं 'महारठ्ठा' (1933), 'दलित निनाद' (1947). विनायक नरहर बर्वे यांनी जातिव्यवस्थेविषयीच्या गांधींच्या मतांचा प्रसार करण्यासाठी 'दलित सेवक' या नियतकालिकाची सुरुवात केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
आंबेडकरांच्या पत्रकारितेसंबंधी आरंभिक अभ्यासकार्य अप्पासाहेब रणपिसे यांनी केलं. 'दलितांची वृत्तपत्रे' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक 1962 साली प्रकाशित झालं. गंगाधर पानतावणे यांनी त्यांच्या पीएच.डी. प्रबंधासाठी या विषयावर संशोधन केलं. आंबेडकरांच्या पत्रकारितेसंबंधीचा हा पहिला अकादमिक अभ्यास 1987 साली प्रकाशित झाला. तेव्हापासून आंबेडकरांच्या पत्रकारी कार्याबद्दल लक्षणीय काम होत आलेलं आहे.
आंबेडकरांचं पत्रकारी लेखन काव्यात्म आहे, त्यात बरीच वितंडंही आहे आणि विरोधकांना विचारपूर्वक तोडीसतोड प्रत्युत्तरं दिलेली आहेत. अस्पृश्यांवरील अत्याचार व कल्याणकारी धोरणं यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तिवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो.

फोटो स्रोत, AFP
सामाजिक व राजकीय सुधारणांसंबंधीची सरकारी धोरणं आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेलं आहे. आंबेडकरांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून आपल्याला पाहायला मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार आणि तात्त्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणांवर दलितांच्या स्वातंत्र्याची व त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्रं छापलेली असत.
'बहिष्कृत भारत'च्या 15 जुलै 1927 रोजीच्या अंकात आंबेडकरांनी ब्राह्मणांवर टीका करताना त्यांचं शैक्षणिक प्रतिनिधित्व सर्वाधिक असल्याकडे निर्देश केला होता. उदाहरणार्थ, मुंबई प्रांताच्या उच्चशिक्षण सर्वेक्षणानुसार, प्रति दोन लाख उच्चशिक्षितांमध्ये अस्पृश्य शून्य होते, तर ब्राह्मण हजार होते. शैक्षणिकदृष्ट्या मागास जातींचं प्रतिनिधित्व कमीच राहावं, अशी तजवीज करणारी सरकारी धोरणं विध्वंसक होती (प्रदीप गायकवाड संपादित अग्रलेख: बहिष्कृत भारत व मूकनायक, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर).
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
पत्रकारिता हा कायमच दलित चळवळींचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. दलितांच्या नेतृत्वाखालील सामाजिक व राजकीय उपक्रमांना समांतरपणे त्यांची पत्रकारिताही सुरू राहिली. आंबेडकरांच्या काळाप्रमाणे आजही दलितांना छापील माध्यमांमधील पत्रकारिता असाध्य आहे.
दलित वा जातीय प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून उर्वरित भारताशी संवाद साधू शकतील अशी मुख्यप्रवाही इंग्रजी वर्तमानपत्रं नाहीत. दलितांच्या दृष्टिकोनातून जागतिक परिप्रेक्ष्य मांडणारी माध्यमं नाहीत.
दलितांविषयीचे दृष्टिकोन आणि साचे यांच्या विरोधात दलितांची माध्यमं लढा देऊ शकतात. आंबेडकरोत्तर काळात काही पत्रकारी उपक्रमांमधून हे परिणामकारक साधण्यात आलं आहे. दलित समुदायाविषयी आणि या समुदायासाठी वैचारिक मांडणी करण्यासंदर्भात कांशीराम यांनी केलेलं अग्रगण्य काम दुर्लक्षिता येणार नाही.
आंबेडकरांचं पत्रकारी लेखन मराठीत आहे, त्याचं इंग्रजीत व इतर प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करवून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. इंग्रजी आवृत्ती कोल्हापूर येथून निघाली असली, तरी ती बाजारपेठेत सहज उपलब्ध नाही. आंबेडकरांचं लेखन हा राष्ट्रीय ठेवा आहे, त्यामुळे त्यांचे पत्रकारी प्रहार अनेक भाषांमध्ये जनतेसाठी मुक्तपणे उपलब्ध करून द्यायला हवेत.
एकविसाव्या शतकातील दलित पत्रकारिता
सध्याच्या काळात अभिव्यक्तीची नवनवीन माध्यमं उदयाला आली आहेत, त्यामुळे दलितांनी तंत्रज्ञानीय अभिनवता दाखवत स्वतंत्र माध्यमांचा वापर केल्याचं दिसतं. दलितांनी तयार केलेली समाजमाध्यमांवरील अनेक पानं, ट्विटर व फेसबुकवरील ग्रुप, यू-ट्युब चॅनल, व्लॉग व ब्लॉग यांमधून आंबेडकरांच्या वाङ्मयीन व सर्जनशील वारशाला मानवंदना दिली जाते आहे आणि हा वारसा पुढेही नेला जातो आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 4
परंतु, तंत्रज्ञानाची वाढ आणि सनसनाटी क्लिककेंद्री पत्रकारिता यांमुळे काही मर्यादाही आल्या आहेत. इंटरनेटवर आधारित संशोधन आणि दुय्यम माहिती-स्त्रोतांचा सुळसुळाट यांमुळे काही निराधार गोष्टी तथ्यं किंवा इतिहास असल्यासारखं भासवून पसरवल्या जातात. ह्यात काही प्रमाणात स्वतः दलित मिलेनियल्स आणि NGOने प्रभावित असलेला वर्ग आहे.
विद्यमान परिस्थितीत दलित पत्रकारांना टिकून राहाता येईल, असं पूरक पर्यावरण मिळणं अवघड आहे. ऑक्सफॅम आणि न्यूजलाँड्री यांनी केलेल्या माध्यम वैविध्य सर्वेक्षणातून निराशाजनक निष्कर्ष निघाले आहेत. विविध माध्यमांच्या नेतृत्वफळीतील 121 पदांवर एकही दलित वा आदिवासी नाही, तर 106 जागांवर 'उच्च जातीय' आहेत; पाच जागांवर मागास वर्गीय आहेत, तर सहा जागांवर अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती आहेत.
उर्वरित जगासमोर दलितांचे प्रश्न मांडणारा इंग्रजी भाषक किंवा बहुभाषक अवकाश निर्माण होण्यासाठी अधिक गुंतवणूक गरजेची आहे. तरुण दलितांनी पत्रकारितेमध्ये कारकीर्द घडवायला हवी.
कुशल कथाकार असलेल्या दलितांच्या वसाहतींमध्ये जाऊन दलित पत्रकार घडवण्यासाठी प्रस्थापित माध्यमसंस्थांनी गुंतवणूक करायला हवी. अननुभवी दलितेतर दृष्टीला सर्वसाधारणतः दिसणार नाहीत अशा सूक्ष्म गोष्टी पृष्ठभूमीवर आणणारी दलित संवादमाध्यमं या संस्थांनी शिकून घ्यायला हवीत. दलितांच्या खाजगी अवकाशातील घरं व खोपट्यांमध्ये मानवी संवेदनांचा पट पसरलेला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 5
लिहिण्याचं व अभिव्यक्तीचं कसब लोकांच्या जीवनानुभवाशी अनन्यरित्या जोडलेलं असतं. त्यामुळे दलितांची भाषा, अर्थपूर्ण किस्से आणि वाक्यशैली यांची सांगड अभिजन प्रमाणीकरणाशी, ब्राह्मणी लेखनप्रकारांशी बसत नाही. अनेकदा या परिस्थितीचा वापर करून दलित लेखकाकडे 'पुरेशी गुणवत्ता नसल्या'चा युक्तिवाद केला जातो.
त्यांच्या लेखनाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि विचारांची केवळ कृत्रिम मुद्रित मांडणी करण्यावर भर दिला जातो. परंतु, दलितांच्या प्रतिपादनांमधील नाविन्य आणि संकल्पनांमधील ताजेपणा ब्राह्मणी भांडवली वर्गाच्या भाषिक परिकथांमध्ये फारसा बसत नाही. या परिकथांना आव्हान देतील अशी भाषिक साधनं विकसित करण्यासाठी आवश्यक अनुभव अथवा क्षमता या वर्गाकडे नसते.
वाचकांच्या धाडसाचा विचारही न करता लेखकाला प्रभुत्वशाली स्थान दिलं जातं. अनेक अकादमिक अभ्यासक व बढाईखोर वितंडवादी लेखक स्वतःची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी शब्दकोशांमधून गुंतागुंतीचे शब्द सोडून वापरतात, किंबहुना अशा शब्दवापराच्या विळख्यातच ते अडकून पडतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 6
अनेकदा दुर्बोध शब्दांच्या भेंडोळ्यामधून केवळ त्या लेखकाचा साचा दिसून येतो. परंतु, ही भाषा गरीबांशी, कष्टकरी वर्गातील लोकांशी जोडलेली नसते. या पार्श्वभूमीवर, दलित लेखकांनी व अवकाशांनी मांडलेल्या संकल्पनांची खोली समजून घेण्यासाठी ब्राह्मण संपादकांनी स्वतःची व स्वतःच्या सहकाऱ्यांची वांशिक समज वाढवायला हवी.
व्याकरण आणि विरामचिन्हं यांच्या चौकटीवर आधारित वगळणूक दलितांसाठी वा दलितेतर अवकाशासाठी नवीन नाही. ब्राह्मण वर्गाशी लढा देणारे जोतिराव फुले आणि त्यांच्या समकालीनांनाही याच आव्हानाला सामोरं जावं लागलं होतं. बहुतेकदा ब्राह्मण संपादक फुलेंच्या लेखनातील आशयापेक्षा व्याकरणावर लक्ष केंद्रित करत असत (पानतावणे, पान 27). सामाजिक बदलाचा कैवार घेऊन लिहिणाऱ्या दलित आणि ब्राह्मणविरोधी कनिष्ठ जातीय योद्ध्यांविरोधात भाषिक वर्चस्वाचं अस्त्र वापरलं जात असे.
माध्यमविषयक उपक्रम सुरू करण्याच्या संदर्भात विचार केला तर, दलित पत्रकारितेचा उगम 1 जुलै 1908 रोजी झाला. परंतु, आंबेडकरांचा संघर्ष आणि लेखनकौशल्य यांवरील प्रेमापोटी 'मूकनायक स्थापनादिन' मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. '
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 7
दलित दस्तक'चे अशोक दास या दिवशी उत्तर भारतात एक मोठा समारंभ करत आहेत. अमन कांबळे, 'आवाज इंडिया' टीव्ही मार्फत हा दिवस नागपूर येथे साजरा करित आहेत. या दिवसाच्या स्मरणार्थ हार्वर्ड विद्यापीठातील प्रतिष्ठित 'इंडिया कॉन्फरन्स'मध्ये मी 15 फेब्रुवारी 2020 रोजी एका परिसंवादाचं आयोजन केलं असून त्यासाठी दिलीप मंडल, धुरा ज्योती, याशिका दत्त व अशोक दास यांसारख्या दलित व ओबीसी पत्रकारांना निमंत्रित केलं आहे. या परिसंवादाविषयी विद्यमान माध्यमस्थितीविषयी चर्चा केली जाईल.
(सूरज येंगडे यांनी 'कास्ट मॅटर्स' हे पुस्तक लिहिलं आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये 'दलितॅलिटी' या स्तंभाचे ते क्यूरेटर आहेत व ते स्वतःसुद्धा स्तंभलेखन करतात. 'हार्वर्ड केनेडी स्कूल'मध्ये 'शोरेनस्टेन सेन्टर ऑन मिडिया, पॉलिटिक्स अँड पब्लिक पॉलिसी' इथे ते फेलो म्हणून कार्यरत आहेत.)

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 8
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








