दलित राजकारण सध्या उजव्या आणि डाव्यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात अडकलं आहे: सूरज येंगडे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिजीत कांबळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मूळचा नांदेडचा सूरज येंगडे आज अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करतोय. पण सध्या तो चर्चेत आहे त्याच्या 'Caste Matters' या पुस्तकामुळे. या पुस्तकाचं जसं कौतुक होतंय तसंच त्यातील मुद्द्यांबाबत आक्षेपही घेतले जात आहेत. पुस्तकात काय मुद्दे आहेत, आक्षेपांबद्दल सूरजचं काय म्हणणं आहे?
नांदेडच्या दलित वस्तीत लहानाचा मोठा झालेला सूरज येंगडे युरोप, आफ्रिका या खंडात शिक्षण घेऊन सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे.
नेहमी सुटाबुटात आत्मविश्वासानं वावरणारा, लक्ष वेधून घेणारी आफ्रिकन हेअरस्टाईल मिरवणारा सूरज नांदेडच्या भीमनगरमध्ये हलाखीतच वाढला. दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना सूरजने अगदी शाळकरी वयापासून शेतमजूर, ट्रकवरती हेल्पर अशी कामं करत शिक्षण पूर्ण केले.
सूरजचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्यानंतर काही दिवस मुंबईमध्ये शिक्षण घेऊन तो शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाला. त्यानं आफ्रिका, युरोप आणि अमेरिका या खंडांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे.

फोटो स्रोत, Suraj Yengde
आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारा तो पहिला दलित स्कॉलर आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यानं पीएचडी मिळवली आहे. 'द रॅडिकल इन आंबेडकर' हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत संपादित केलं आहे. दलित, ब्लॅक, रोमा, इराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
इंग्लंडमध्ये शिकत असताना इतर भारतीय विद्यार्थ्यांकडून त्याला दलित म्हणून जातिभेदाचा अनुभव आला आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर बीबीसी मराठीसोबत त्यानं परदेशातही जात पाठ कशी सोडत नाही हा अनुभव मांडला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
'कास्ट मॅटर्स'विषयी
भारतातील जातवास्तव, स्वत:ला मिळालेले जातीचे चटके, दलितांची सध्यस्थिती, जातीअंताच्या चळवळीसमोरची आव्हानं याचा उहापोह सूरजनं त्याच्या 'कास्ट मॅटर्स' या पुस्तकातून केला आहे.

फोटो स्रोत, Twitter/Suraj Yengde
या पुस्तकामागची भूमिका सांगतान सूरज म्हणतो, "जगभरातील राजकीय-सामाजिक चळवळींचे मी जेव्हा विश्लेषण करत होतो, तिथून जेव्हा मी भारताकडे पाहायचो, तेव्हा मी एक तुलनात्मक अभ्यास मांडण्याचा प्रयत्न करायचो. भारतातील दलित चळवळ असेल, भारतातील आदिवासी चळवळ असेल किंवा ओबीसी चळवळ असेल, जो प्रभुत्वशाली वर्ग आहे, त्याची परिस्थिती काय आहे? माध्यमातील अभिजन, साहित्यातील अभिजन, उद्योगातील अभिजन यांची काय परिस्थिती आहे, याच्याकडे जेव्हा मी तुलनात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा वेळोवेळी हीच गोष्ट पुढे यायची की भारताच्या परिस्थितीमध्ये जात हीच केंद्रस्थानी असलेली बाब आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कोणत्याही प्रदेशातील असा, कोणत्याही विचारधारेचे असा जात हा सार्वत्रिक बाईंडिंग फॅक्टर आहे, कारण तुम्ही एका जातीत जन्माला येता आणि त्या जातीसोबतच जगता. तुम्हाला जातीपासून दूर जायचे असेल तरी जात तुमचा पिच्छा सोडत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
दलितांची वर्गवारी
सूरज येंगडेनं त्याच्या पुस्तकात दलितांचे वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. 'The Many Shades of Dalits' असं प्रकरण सूरजच्या पुस्तकात आहे.
गेल्या काही दशकांत आर्थिकदृष्ट्या प्रस्थापित झालेले अभिजन दलित, प्रतिकांमध्ये अडकलेले दलित, स्वत:मध्ये मश्गूल असलेले स्वकेंद्री दलित आणि मूलगामी परिवर्तनाची आशा बाळगणारे रॅडिकल दलित, अशा चार प्रकारे सूरजने दलितांचे वर्गीकरण केलेलं आहे.
हे वर्गीकरण करत असताना सूरजनं म्हटलंय की प्रस्थापित दलित हे दलितांमधील आर्थिक-सामाजिक-राजकीयदृष्ट्या अधिक मागासलेल्या दलित समूहांवर आपल्याला हवे ते जातीविषयक संकेत लादतात. त्यामुळे दलितांची एकत्रित ताकद तयार न होता, दलितांमध्येच फूट निर्माण होते.
दलितांच्या या वर्गीकरणावर विविध पातळ्यांवर तीव्र आक्षेप घेतले गेले आहेत.
'ड्रॉइंगरूमधली बडबड'
आंबेडकरवादी IAS अधिकारी आणि लेखक राजशेखर वुंद्रु यांनी The Tribune वृत्तपत्रात सूरजच्या पुस्तकाची समीक्षा करताना म्हटलंय की हे पुस्तक म्हणजे केवळ ड्रॉईंग रूममध्ये केलेली बडबड आहे. जातवास्तवावर बोलण्याच्या नावाखाली दलित चळवळ आणि दलित मध्यमवर्गावर हल्ला चढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दलित ही एकसंध ओळख आहे, असं सांगत अशा वर्गीकरणाला JNUतील अभ्यासक जदुमनी महानंद यांनीही आक्षेप घेतला आहे. "Faking radicalism in a global context" या शीर्षकानं लिहिलेल्या लेखात त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या आक्षेपांबद्दल विचारलं असता सूरजचं म्हणणं आहे की दलित हे एक सरधोपट किंवा येथून तिथून एकसारखा असा वर्ग नाही. सर्व दलितांना एकाच दृष्टिकोनातून पाहण्याला त्याचा आक्षेप आहे. दलितांमध्ये वेगवेगळे वर्ग आहेत आणि त्या वर्गाच्या आशाआकांक्षा वेगवेगळ्या आहेत असं सूरजचं म्हणणं आहे.
यावर विस्ताराने सूरज सांगतो, "मुळात दलितांच्याकडे पाहण्याचा एक सरधोपट दृष्टिकोन तयार झालेला आहे. उदाहरणार्थ, आपण उच्च शिक्षणातील परिस्थिती पाहिली तर तीन टक्के दलित सुद्धा पदवीपर्यंत शिकू शकलेले नाहीत. पण त्या मूठभरांकडे बोट दाखवून म्हटलं जातं की दलितांची परिस्थिती बदललेली आहे. या समजुतीला मला छेद द्यायचा होता.
"मला हे सांगायचं होतं की दलितांमध्ये अनेक वेगवेगळे वर्ग आहेत, निरनिराळ्या आशाआकांक्षा आहेत. वर्गीकरणाचा भाग आशाआकांक्षाशी निगडित आहे. तो सांगणं गरजेचं आहे. माझं आर्ग्युमेंट असं आहे की एवढे वर्ग का निर्माण झाले, कारण जातीयवादी व्यवस्थेनं हे वर्ग निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं. वर्गीकरणबद्दल जे मी मांडलंय ते ब्राह्मणवादी संस्कृतीची टीका म्हणून मांडलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ब्राह्मणवादाविरोधातील ब्राह्मण
सूरजच्या 'कास्ट मॅटर्स'मध्ये एक प्रकरण ब्राह्मणवादाविरोधातील ब्राह्मण (Brahmins against Brahminism) असं आहे. या प्रकरणावरूनही गदारोळ झाला आहे. सूरजने ब्राह्मणांचे अकारण गौरवीकरण केल्याचा आक्षेप सोशल मीडियावर काही जणांकडून घेण्यात आला आहे.
सूरजचं म्हणणं आहे की ब्राह्मणांबद्दल लिहिण्याचा त्याचा हेतू आहे की त्यांनी ऐतिहासिक जबाबदारी म्हणून जातीअंताच्या चळवळीत अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. तो सांगतो, "जात ही दलितांनी बनवलेली नाही, ती त्यांच्यावर लादली गेलेली आहे. जी गोष्ट आम्ही बनवलेली नाही ती संपवण्याचा मागे आम्ही लागलेलो आहोत. माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी बनवली त्यांनी ती संपवण्यासाठी आपलं योगदान खरं तर दिलं पाहिजे, कारण तुमच्याकडे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विशेषाधिकार आहेत. तुम्ही त्याप्रकारे तो आवाज मोठा करू शकता. मग जातीची लढाई केवळ दलितांनीच का लढावी? जातीअंत हा सर्वांचा मुद्दा असला पाहिजे."
"मी जेव्हा ब्राह्मण म्हणतो तेव्हा ते ब्राह्मण जातीबद्दल नाही तर ब्राह्मण्यवादी मानसिकता म्हणजे स्वत:ला श्रेष्ठ समजणारी जी मानसिकता आहे, त्याबद्दल बोलत आहे. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत ब्राह्मण किंवा दलितेतर मंडळी सक्रिय होती. पण आज मला अशी सक्रिय मंडळी दिसत नाहीत.
"माझं म्हणणं आहे, तुम्ही कुठे आहात? माझं म्हणणं आहे की तुम्ही जातीअंताची लढाई तुमच्या जातीत करा. हे मी ब्राह्मणांना आणि दलितेतरांना सांगत आहे. हे मी काही नवीन सांगत नाही. हे अगदी गौतम बुद्धाच्या काळापासून आहे की ब्राह्मणांकडे जो विशेषाधिकार आहे तो वापरून त्यांनी समाजात नवीन काही आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यातून प्रेरणा घेऊन जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते की वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला जातीअंताची चळवळ दिसेल."

फोटो स्रोत, AFP
"जगभरातल्या काही चळवळींमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. जर आपण अमेरिकेत पाहिलं तर तेथील कृष्णवर्णीयांनी वंशभेदविरोधी चळवळ श्वेतवर्णीयांमध्ये चालवलेली आहे," तो सांगतो.
दलित भांडवलशाही
दलित कॅपिटलिझ्म अर्थात दलित भांडवलशाहीबाबत गेल्या काही वर्षांपासून देशात बरंच बोललं जातं. 'डिक्की' या दलित उद्योगपतींच्या संघटनेबाबतही बरीच चर्चा होत असते. दलितांच्या मुक्तीचा एक मार्ग म्हणून या दलित भांडवलशाहीबाबत बोललं जातं. सूरजनं एक अख्खं प्रकरण दलित भांडवलशाहीवर लिहिलं असून त्यानं सध्याच्या दलित भांडवलशाहीच्या स्वरूपाबाबत आपले आक्षेप खुलेपणानं मांडले आहेत.
त्यावर सूरज सांगतो, "दलित भांडवलशाहीची कल्पना चांगली आहे. पण यांचा जो पाया आहे तो भुसभुशीत आहे. सध्याची भारतातील दलित भांडवलशाहीची जी कल्पना आहे, ते सांगतात ब्लॅक कॅपिटालिझमने जसं काम केलं त्याच्या जोरावर आम्ही काम करू. पण जेव्हा तुम्ही ब्लॅक कॅपिटालिझमचा उगम पाहता, प्रवास पाहता तेव्हा लक्षात येतं की दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे."
"भांडवल असून देखील तुमच्याबाबत जातीयवाद होतो. दलित भांडवलदार पूर्वीपासून होते. 19व्या शतकात महार लोक भांडवलदार असल्याचं एलिनॉर झेलियट यांनी मांडलेलं आहे. त्याचे ब्रिटिशकालीन कागदपत्रात पुरावे आहेत. उत्तर भारतात चमार भांडवलदार होते. पण तरीही जात नष्ट झाली का? त्यानं काही फरक पडला का? उलट भांडवलशाहीच तुम्हाला त्यांच्या कवेत घेण्याचा प्रयत्न करते," सूरज सांगतो.

फोटो स्रोत, Getty Images
"जगभरात भांडवलशाहीला विरोध होताना दिसतोय. भांडवलशाहीला माहीत आहे की त्यांना सर्वात धोकादायक वर्ग आहे तो म्हणजे सर्वात पिचलेला आणि दबलेला वर्ग. भारतामध्ये मोठा दबलेला वर्ग हा दलित आहे. या वर्गाला आपण जर आपल्या कवेत घेऊ शकलो, तर ते करावं असा तो प्रयत्न आहे. त्यासाठी भांडवलशाही सरकारचा उपयोग करून घेत आहे तुम्हाला कवेत घेण्यासाठी."
दलित चळवळीचं भवितव्य काय?
भारतातील सध्याची दलित चळवळ आणि दलित राजकारण याबद्दल सूरजचं म्हणणं आहे की, भारताची दलित चळवळ सध्या एका बंदिस्त वातावरणात काम करत आहे. दलितांच्या शिष्यवृत्ती संपवल्या जात आहेत, जो संविधानवादी दलित वर्ग आहे, त्याच्यासमोर संविधानातील कलम बदलत आहेत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की या चळवळीचं सध्याचं व्हीजन मर्यादित राहिलेलं आहे.
बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणाऱ्या ज्या चळवळी आहेत, त्यांना भारतातील उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारसरणी आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे परिस्थिती अशी झाली की सर्व जण आंबेडकरांना स्वीकारत आहेत, पण आंबेडकरांच्या व्यापक दृष्टिकोनाला कोणी स्वीकारताना दिसत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतील जो लढवय्या बाणा आहे त्यालाच कवेत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता दलित राजकारणही डाव्या आणि उजव्या राजकारणाच्या ध्रुवीकरणात अडकले आहे. अर्थात दलित राजकारण हे उजव्यांच्या विरोधातच असलं पाहिजे. पण या उजव्याविरोधी राजकारणात सहयोगी पक्ष बरोबर नसल्यामुळे भविष्याचे चित्र धूसर दिसत आहे."
"मला तरी काळजी आहे ती सध्याच्या तरुणांविषयी. हा तरुण वर्ग फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर लाईक आणि कमेंट करण्यात अडकलेला दिसत असून त्या वर्गाला एक मजबूत रचनातत्मक कार्यक्रम कोणी देताना दिसत नाहीये. तुरळक अपवाद आहेत, पण व्यापक पातळीवर तरी मोठी पोकळी दिसते."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








