अभिनेता विजयच्या पहिल्या राजकीय सभेला प्रचंड गर्दी, बॅनरवर आंबेडकर-पेरियार; काय आहे पक्षाची विचारधारा?

फोटो स्रोत, ANI
- Author, नंदिनी
- Role, बीबीसी तामिळ
डावीकडे आंबेडकर आणि उजवीकडे पेरियार. या दोन महापुरुषांच्या शेजारी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या अंजलाई अम्मल, तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री सी. एन. अन्नादुराई आणि ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीविरोधात लढणारी राणी वेळू नाचियार आणि मध्ये अभिनेता विजय.
तामिळ चित्रपटसृष्टीतल्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या राजकीय पक्षाच्या रविवारी झालेल्या पहिल्या सभेसाठी बांधलेल्या मोठ्या कमानीवर लावलेले हे कट आऊट्स. त्याकडे पहात, वेगवेगळे अंदाज बांधत जवळपास लाखो लोक सभेसाठी विलुपुरम जिल्ह्यातल्या विक्रवंडी शहरात आले होते.
फेब्रुवारी महिन्यात विजय यांनी त्यांचा ‘तामिळनाडू वेट्री कळगम’ म्हणजे टीवीके हा पक्ष स्थापन केल्यापासूनच पक्षाची धोरणं काय असतील, त्यांचं राजकारण कोणत्या मुद्द्यांवर असेल याबद्दल अंदाज बांधले जात होते.
ऑगस्ट महिन्यात विजय यांनी पक्षाच्या झेंड्याचं आणि गाण्याचं अनावरण केलं. लाल रंगाच्या दोन पट्ट्यांमध्ये पिवळ्या रंगाचा एक पट्टा, त्यावर दोन पायांवर उभे असलेले दोन हत्ती आणि त्याच्यामध्ये शिरीष झाडाचं गुलाबी फुल असा अशा या झेंड्याचा अर्थ लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण पक्षाचं नेमकं धोरण, विचार याबद्दल विजय तेव्हा काहीच बोलले नव्हते.
पण पक्षाच्या पहिल्या सभेत दारावरच लावलेले हे कटआऊट्स पाहून सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखं झालं. याशिवाय सभेच्या आवारात तामिळनाडूवर राज्य करणाऱ्या चोळ आणि पांड्य राज्याचे राजे आणि तामिळनाडूतले महत्त्वाचे मुख्यमंत्री के. कामराज यांचेही कट आऊट्स पहायला मिळाले.

फोटो स्रोत, TVK IT WING/X
या सभेतच अनावरण झालेल्या पक्षाच्या गाण्याने तर सगळंच स्पष्ट केलं. ‘सगळे जन्मतःच समान आहेत’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या गाण्यात विजय पेरियार, आंबेडकर आणि बाकी महापुरुषांच्या शिकवणुकीवर पक्षाची विचारधारा बनली आहे असं सांगत आहेत. त्यातूनच एक जात, धर्म आणि लिंग यांवर भेदभाव न करणारा समतापूर्ण समाज निर्माण करणं हे पक्षाचं ध्येय असणार असल्याचं सांगितलं आहे.
पक्षावर यांचाच प्रभाव
सभेत बोलताना पक्षाची विचारधारा ही तर्कवादावर पेरियारांच्या शिकवणुकीवर आधारलेली असेल, असं विजय म्हणाले.
महिला शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय ही पेरियारांची तत्त्व पक्षाने घेतली आहे. “पण पेरियारांचा नास्तिक विचार आम्हाला मान्य नाही. याउलट, अण्णादुराई म्हणाले होते तसा ‘एक कूळ, एक देव’ ही आमची भूमिका असेल,” विजय म्हणाले.
प्रत्येक माणसाला कोणत्या देवाची प्रार्थना करायची किंवा नाही हा त्याचा खासगी विषय असेल. पक्ष त्यात हस्तक्षेप करणार आहे, असंही ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
“तसंच, के. कामराज यांचीही विचारधारा आम्ही उचलून धरली आहे. यासोबतच, सामाजिक समतेच्या विरोधात असणाऱ्यांना कापरं भरवणारं नाव, बाबासाहेब आंबेडकर हेही आम्हाला मार्गदर्शनपर असतील,” असं विजय यांनी सांगितलं.
महिला नेत्यांच्या प्रतिमांना महत्त्व देणारी टीवीके ही पहिली पार्टी असल्याचंही विजयने पुढे सांगितलं. वेळू नाचियार आणि अंजलाई अम्मल यांचाही पक्षावर प्रभाव आहे, असं त्यांनी मान्य केलं.
राजकारणही बदललं पाहिजे
“आम्हाला राजकारणातलं बाळ म्हटलं जातं," असं विजय म्हणाले.
“पण आम्ही हसत पण गंभीरपणे साप पकडणारं आणि त्याच्याशी खेळणारं बाळ आहोत,” सभेची सुरुवातच अभिनेता असलेल्या विजयने अशा डायलॉगने केली. पण राजकारण म्हणजे सिनेमा नाही, युद्धक्षेत्र आहे, असंही ते म्हणाले.
भावनात्मक होऊन भाषण द्यायची राजकारणातली नेहमीची पद्धत ते अवलंबणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. थेट मुद्द्याचंच ते बोलतील.


“फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानालाच बदलण्याची गरज आहे का? सगळं बदलत असताना राजकारणही बदललं पाहिजे. मी बाकीच्या राजकीय नेत्यांबद्दल बोलून वेळ घालवणार नाही. पण त्यांच्याकडे कानाडोळाही करणार नाही.
"आजच्या पिढीला समजून घेतलं तर राजकारणात सहज पुढे जाता येऊ शकतं. तुम्ही लोकांना प्रश्न काय आहे आणि त्यावर उत्तर काय असू शकतं हे सांगितलं तरी पुरेसं आहे,” असं बरंच काही विजय म्हणाले.
भीती नाही तर सभ्य राजनिती
“राजकारणात महत्त्वाचं असतं भूमिका घेणं. आपण भूमिका घेतो तेव्हाच आपले शत्रू कोण हे आपोआप ठरतं,” विजय म्हणाले. त्यांच्या पक्षानं ‘सगळे जन्मतःच समान आहेत’ असं म्हटलं तेव्हाच त्यांचे शत्रू त्यांनी ठरवले.
पण त्यांचा पक्ष हा फक्त फूट पाडणाऱ्या राजकारणाविरोधात नाहीत तर भ्रष्टाचार करणाऱ्या राजकारण्यांच्याही विरोधात असल्याचं सांगितलं.
फूट पाडणारे ओळखणं सोपं आहे. पण भ्रष्टाचार करणारे तत्त्व आणि विचारधारेच्या मुखवट्याखाली लपल्याने ओळखायला अवघड जातात.

फोटो स्रोत, ANI
“द्रविडियन मॉडेलचं सरकार असल्याच्या नावाखाली हे कुटुंब पेरियारांचं नाव घेत राज्याचं शोषण करत आहे. ते आमचे राजकीय शत्रू आहेत. ते भाजपला फॅसिस्ट म्हणतात. ते फॅसिस्ट असतील तर तुम्ही कोण आहात?” असं विजय म्हणाले.
अशा प्रकारे कोणत्याही पक्षाचं, नेत्याचं नाव न घेता विजयने द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे डीएमके आणि भाजपवर ताशेरे ओढले. नाव न घेण्याचं कारण भीती नाही, तर सभ्य राजनिती असल्याचं ते म्हणाले.
पक्षाची ध्येयं
द्रविड आणि तामिळ राष्ट्रवाद हे एकाच मातेचे दोन डोळे. या दोघांना वेगवेगळं करण्याची गरज नसल्याचं विजय यांनी सांगितलं. त्यामुळेच तामिळसोबतच इंग्रजीही आपलीशी केली जावी यासाठी त्याचा पक्ष काम करेल. तामिळ ही प्राथमिक भाषा ठेवून इंग्रजीचे महत्त्व पटवून देण्यासाठी काम केले जाईल.
शिवाय, पक्षाच्या कारकीर्दीत पधनीर हे राज्याचं पेय म्हणून घोषित केलं जाईल आणि अंमली पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी एक खास कायदा तयार केला जाईल असं पक्षानं सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
तसंच विणकर समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा कॉटनचे कपडे घालण्याची सक्ती केली जाईल आणि त्यांनी बनवलेले गणवेश विद्यार्थी, आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना थेट देण्याची पद्धत रुजू केली जाईल.
शेतमालाची विक्री करतानाची किंमत आणि ग्राहक विकत घेतानाची किंमत यातला त्रुटी भरून काढण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जाईल, असंही या सभेत सांगितलं गेलं.
तामिळनाडूची निवडणूक रंजक असणार
येती 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही विजय यांनी सभेत पुन्हा एकदा सांगितलं. लोक मोठ्या संख्येने मत देऊन त्यांना विजय मिळवून देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळेच तामिळनाडू मधली पुढची विधानसभेची निवडणूक फार रंजक होणार असल्याचं म्हटलं जातंय. तामिळनाडू मध्ये सध्या डीएमके आणि ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच एआयएडीएमके अशा दोन पक्षांचं वर्चस्व आहे.

फोटो स्रोत, ANI
अण्णामलाई यांच्या नेतृत्वात भाजपाही तिथे जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमधून एकही जागा भाजपला जिंकता आली नव्हती.
विजय यांची लोकप्रियता
याउलट, रविवारी झालेल्या टीवीकेच्या पहिल्याच जनसभेसाठी लोक शनिवार संध्याकाळपासूनच जमा होत होते. त्यामुळे आसपासच्या भागात ट्रॅफिक जाम व्हायला सुरूवात झाली होती.
स्थानिक वृत्तसंस्थांनी सांगितल्याप्रमाणे सभा स्थळी येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहून प्रशाससनां काही टोल नाके बंद करून टाकले.

फोटो स्रोत, ANI
सभेसाठी जवळपास 2 लाख लोकांची व्यवस्था केली होती. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त खुर्चा भरलेल्या होत्या. जवळपास 6,000 पोलीस होते.
उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचं आवाहन विजय यांनी केलं होतं. तरीही उन्हाच्या झळा लोकांना बसत असल्याचं दिसत होतं. शेवटी, काही लोक उभे राहिले आणि ऊन लागू नये म्हणून चक्क खुर्ची डोक्यावर घेतली.
सभेत बोलताना विजयने लोकांची सेवा करण्यासाठी आता अभिनय आणि पैसेही मागे सोडणार असल्याचं सांगितलं. येणारी 'थलापती 69' हा त्यांचा शेवटचा सिनेमा असणार आहे.
जेव्हा विजय यांनी वडिलांवर केली होती केस
मागे विजय यांचे वडील दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांनीही ‘ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम’ या नावाने राजकीय पक्ष उघडला होता. पक्षाच्या नावात विजय यांचं नाव आल्याने त्यावरून बराच वाद झाला होता. त्यांचा नावाचा उपयोग निवडणुकीसाठी आणि गर्दी जमवण्यासाठी केला जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं होतं.
तेव्हा विजय यांनी आपल्या आई वडिलांसोबत 11 लोकांविरोधात केसही केली होती.
“माझ्या वडिलांच्या राजकीय पक्षात आणि माझ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही हे मी माझ्या चाहत्यांना आणि लोकांना सांगू इच्छितो,” असं तेव्हा विजय म्हणाले होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











