‘देशाचे दुश्मन’ : डॉ. आंबेडकर जेव्हा जेधे-जवळकरांसाठी कोर्टात लढले होते

फोटो स्रोत, Digvijay Jedhe/BBC
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्यातल्या कोर्टात असा एक खटला लढला गेला, ज्यात ब्राह्मणेतर चळवळीतले आघाडीचे नेते केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते आणि त्यांच्यावर खटला भरला होता विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या पुतण्याने.
या खटल्यात चिपळूणकरांच्या बाजूनं तत्कालीन वकील लक्ष्मण बळवंत भोपटकर होते, तर जेधे-जवळकरांच्या बाजूनं वकील म्हणून होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
हा खटला ज्या प्रकरणावरून लढला गेला, ते प्रकरण सुरू झालं एका पुस्तकावरून. ते पुस्तक म्हणजे – ‘देशाचे दुश्मन’
काय होतं हे प्रकरण? जेधे-जवळकरांना आधी शिक्षा झाली, मग ते निर्दोष कसे सुटले? निष्णात वकील म्हणून तेव्हा प्रसिद्ध असलेल्या भोपटकरांना आंबेडकरांनी कसं नमवलं?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निष्णात वकील म्हणून सर्वदूर पोहोचवणाऱ्या, जेधे-जवळकरांना ब्राह्मणेतर चळवळीचे आक्रमक पुढारी म्हणून ओळख देणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळाला नवं वळण देणाऱ्या या खटल्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
‘देशाचे दुश्मन’ची बिजं फुल्यांच्या पुतळ्यात?
महात्मा फुलेंच्या निधनानंतर, फुल्यांबद्दलचा टिळकपक्षीयांचा राग वारंवार कुठल्या ना कुठल्या मार्गानं दिसून येत होता. कधी फुल्यांना ख्रिस्तसेवक म्हणण्यानं, तर कधी फुल्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करून. या सगळ्याबद्दल ब्राह्मणेतर चळवळीत नाराजीचा आणि संतापाचा सूर उमटत होता.
याच संतापाला 1925 च्या जुलै महिन्यात दिनककराव जवळकरांनी वाट मोकळी करून दिली. जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतले नेते होते. त्यांचं ‘देशाचे दुश्मन’ पुस्तक टिळकपक्षीयांना तिखट उत्तर होतंच, मात्र पुढच्या अनेक वर्षांच्या वादाला तोंड फोडणारंही होतं.
कारण या पुस्तकातून त्यांनी लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळणूकर यांच्यावर अत्यंत कठोर आणि तिखट शब्दात टीका केली होती.
पण ज्या संतापातून हे पुस्तक लिहिलं गेलं, त्या संतापाला आगीचं रूप देण्याची घटना तीन-चार महिने आधी पुणे नगरपालिकेत घडली होती.
डॉ. सदानंद मोरे यांच्या मते, ‘देशाचे दुष्मन’मध्ये लोकमान्य टिळकांना लक्ष्य करण्याचं कारण पुणे नगरपालिकेतील महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्याच्या वादात आहे.
1925 साली केशवराव जेधे पुणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. तेव्हा त्यांनी फुल्यांचा पुतळा उभारण्याचा ठराव मांडला. या ठरावाला टिळकपक्षीयांनी कडाडून विरोध केला आणि विरोधांच्या भाषणात बरीच मुक्ताफळे उधळली.
एवढंच नव्हे तर, टिळकपक्षीयांनी आपल्या गोटातील ब्राह्मणेतरांनाही (फुल्यांच्या पुतण्यालाही) काहीबाही बोलायला सांगितलं. याचा राग ‘देशाचे दुश्मन’ पुस्तकातून काढण्यात आल्याचं डॉ. मोरे म्हणतात.

फोटो स्रोत, Digvijay Jedhe
फुल्यांबद्दल वापरण्यात आलेले शब्द आणि त्यांच्या पुतळ्याला केलेला विरोध केशवराव जेध्यांच्या जिव्हारी लागला. या कळात पुण्यातल्या जेधे मॅन्शनमध्ये ब्राह्मणेतर चळवळीते नेते जमत असत. तिथं दिनकरराव जवळकर हे वयानं तरूण, मात्र लेखनी आणि वाणीने अत्यंत आक्रमक असलेले नेते उपस्थित असत.
जेधे मॅन्शनमधील या चर्चांचं फलित म्हणजे - देशाचे दुश्मन - पुस्तक.
या पुस्तकात अत्यंत तिखट भाषेत टिळक आणि चिपळूणकरांवर टीका केली गेली.
पुण्यात राहून थेट टिळक-चिपळूणकरांनाच ‘देशाचे दुश्मन’ ठरवण्याचं धाडस जेधे-जवळकरांनी केलं होतं.
पुढे या पुस्तकाच्या वादानं अखेर कोर्टाची पायरी चढली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
जवळकरांनी लिहायचं, जेध्यांनी टाळी द्यायची!
लेखक य. दि. फडकेंनी ‘केशवराव जेधे’ या चरित्रात्मक पुस्तकात ‘देशाचे दुश्मन’च्या लिहिण्याच्या काळातला किस्सा सांगितलाय.
‘देशाचे दुश्मन’ पुस्तकाचे प्रकाशक केशवराव जेधे होते. एवढेच नव्हे, तर जवळकर जसजसे लिहीत तसतसा मजकूर केशवरावांना व इतर मित्रांना ते वाचून दाखवीत. केशवरावांनी त्यावर पसंतीची टाळी दिली की, मगच तो पुस्तकात समाविष्ट केला जात असे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
या बैठकींना हजर असलेले दिनकरराव माने त्याबद्दलच्या आठवणी सांगताना लिहितात,
‘त्यावेळी जवळकर गवंडी वाड्यात राहावयास आले, त्यामुळे तेथे आमच्या सगळ्या तरुण मित्रांचा चांगलाच संच जमत असे. यावेळी रामबाण उपाय म्हणून जवळकरांनी ‘देशाचे दुश्मन’ हे एक छोटेखानी पुस्तक लिहिलं. गवंडी वाड्यात जमायचे, जवळकरांनी सिगारेट शिलगावयाची आणि केशवराव मान डोलावतील तशी ती मुक्ताफले लेखांकित करावयाची. अधूनमधून चहा, भजी व भेळ. कसे मजेदार लेखन चालावयाचे. पुस्तक प्रसिद्ध झाले आणि कोणते मथळे ओरडावयाचे याची विकणाऱ्या पोरांना केशवरावांनी संथा दिली. होईल ती विक्री हॉटेल खाती खर्च, पण मूर्ती लहान अन् किर्ती मोठी. अशी या पुस्तकाची कहाणी झाली.’
प्रबोधनकारांचा खुलासा
य. दि. फडके म्हणतात, दिनकरराव जवळकरांची शब्दकळा केशव सीताराम ठाकरेंच्या शब्दकळेसारखी तिखटजाळ आणि वाचताना प्रतिपक्षीयांना ठसका लागावा अशी होती.
केशव सीताराम ठाकरे तेव्हा पुण्यात राहत आणि तिथूनच ‘प्रबोधन’ नावाचं साप्ताहिक चालवत. या साप्ताहिकामुळेच पुढे केशव ठाकरे महाराष्ट्रासाठी ‘प्रबोधनकार’ बनले. ‘कोदंडाचा टणत्कार’ हे पुस्तक तेव्हा प्रकाशित झालं होतं आणि त्यातून प्रबोधनकारांना बरीच प्रसिद्धीही मिळाली होती.
‘देशाचे दुश्मन’ पुस्तकात जवळकरांनी टिळक-चिपळूणकरांचा उल्लेख ‘ब्रह्मवान्त्युत्पन्न’ असा केला होता. हा शब्द प्रबोधनकारांची आठवण करून देणारा होता. कारण ‘ब्रह्ममुखोत्पन्न’ या शब्दाऐवजी प्रबोधनकारांनीच ‘ब्रह्मवान्त्युत्पन्न’ शब्दाची भर मराठी भाषेत घातली.

फोटो स्रोत, PRABODHANKAR.ORG
जवळकर आणि ठाकरे या दोघांमध्येही अनेक साम्यस्थळं होती. म्हणजे, प्रबोधनकारांप्रमाणे जवळकरही कोकणस्थ पेशव्यांवर तुफान टीका करत आणि कायस्थ प्रभूंचं कौतुक करत. दोघेही राम गणेश गडकरींच्या भाषेचे प्रसंशक होते.
त्यामुळेच की काय, ‘देशाचे दुश्मन’ प्रकाशित झाल्यानंतर जरी पुस्तकावर लेखक म्हणून दिनकर शंकर जवळकर यांचं नाव असलं, तरी अनेकांना वाटलं की, हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलंय. स्वत: ‘भाला’कार भोपटकर आणि टिळकांच्या वारसांनाही तसंच वाटलं होतं.
अखेरीस प्रबोधनकार ठाकरेंनी स्वत: ‘ज्ञानप्रकाश’मध्ये पत्र लिहून ‘देशाचे दुश्मन’ पुस्तक आपण लिहिलं नसल्याचा खुलासा केला होता.
कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध
प्रबोधनकार ठाकरेंनी जेधे-जवळकरांचं जाहीर कौतुक करत पाठ थोपटली, तर ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदेंनीही जेधे-जवळकरांचे आभार मानले होते.
त्याचवेळी, ‘दीनमित्रकर्ते’ मुकुंदराव पाटील यांनी नेहमीच जेधे-जवळकरांच्या टीकेतल्या भाषेबद्दल नापसंती व्यक्त केली होती, तर ‘जागृतीकर्ते’ पाळेकरांनाही टीका रुचणारी नव्हती.
सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव यांनी तर जेधे-जवळकर यांच्या प्रचाराची पद्धत आपल्याला आवडत नसल्याचं टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत देऊन स्पष्ट केलं होतं. य. दि. फडकेंनी केशवराव जेधेंच्या चरित्रात हा उल्लेख केलाय.
एकूणच ‘देशाचे दुश्मन’ पुस्तकावरून ब्राह्मणेतर आणि बहुजन चळवळीतल्या पुढाऱ्यांमध्येही मतमतांतरं होती, असं दिसून येत.
हे पुस्तक इतक्या तिखट शब्दात होतं की, या पुस्तकाचा वाद कोर्टात गेला.
‘देशाचे दुश्मन’ने कोर्टाची पायरी चढली
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे चुलत पुतणे कृष्णराव चिपळणूकर यांनी ‘देशाचे दुश्मन’ पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर, प्रकाशक केशवराव जेधे, प्रस्तावना लेखक केशवराव बागडे आणि मुद्रक रामचंद्र लाड यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.
या पुस्तकातील काही वाक्यांनी चिपळूणकरांची बेअब्रू झाली म्हणून नातलग कृ. म. चिपळूणकर यांनी सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्या कोर्टात चौघांवर अब्रुनुकसानीची फिर्याद केली.
सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली.
चिपळणूकरांच्या बाजूनं वकील म्हणून उभे होते लक्ष्मण बळवंत भोपटकर. भोपटकर हे त्यावेळी निष्णात वकील मानले जायचे. ‘भाला’कार भोपटकरांचे हे भाऊ.
टिळक-चिपळूणकरांसाठी या पुस्तकात वापरण्यात आलेले शब्द म्हणजे गिधाडे, नीच, गाढवाचं पोर, कुत्रा, जंत – असे अनेक शब्द आक्षेपार्ह असल्याचे भोपटकरांनी कोर्टात सांगून, टिळक-चिपळूणकरांची बदनामी झाल्याचं सिद्ध केलं.
त्यानुसार मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांनी बदनामीकारक लेखनाचा ठपका ठेवत शिक्षा सुनावली.
शिक्षा आणि येरवाड्यात रवानगी
‘देशाचे दुश्मन’ पुस्तकाच्या खटल्यात न्या. फ्लेमिंग यांनी 15 सप्टेंबर 1926 रोजी निकाल दिला. सुमारे 9 महिने हा खटला चालला. बदनामीकारक आणि ज्ञातिवैमनस्यकारक लेखनाचा ठपका ठेवत पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर, प्रस्तावना लिहिणारे केशवराव जेधे आणि बागडे, तसंच मुद्रक लाड यांना दोषी ठरवण्यात आलं.
यातील दिनकरराव जवळकर आणि लाड यांना इंडियन पिनल कोड कलम 500 अन्वये, तर बागडे आणि जेधे यांना कलम 500 व 109 अन्वये शिक्षा देण्यात आली.
जवळकर आणि लाड यांना प्रत्येकी एक वर्ष साधी कैद आणि 250 रुपये दंड (दंड न दिल्यास तीन महिने कैद), तर बागडे आणि जेधे यांना प्रत्येक सहा महिने कैद आणि 100 रुपये दंड (दंड न दिल्यास दोन महिने कैद) अशी शिक्षा देण्यात आली.

या सुनावणीनंतर चौघांनाही तुरुंगात नेण्यात आले. “आम्ही शिक्षेवर अपील करणार असल्यानं जामिनावर सोडावं,” असा अर्ज जवळकर, जेधे आणि बागडेंनी केला. मात्र, त्यांचा जामिनाचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
आता शिक्षा कमी करण्यासाठी किंवा निर्दोष बाहेर येण्यासाठी अपिलात जाणं आवश्यक होतं आणि भोपटकरांसारख्या निष्णात वकिलासमोर कुणी दुसरा वकील उभं राहण्याचं धाडस करत नव्हता. आणि इथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे येतात.
आंबेडकरांची एन्ट्री आणि निर्दोष सुटका
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टरीची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर तीन वर्षांच्या आत त्यांचा दोन महत्त्वाच्या खटल्यांशी संबंध आला. त्यातील पहिला खटला ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकावरचा.
हा खटला आता तुम्ही चालवा, म्हणून जेधे, जवळकर, बागडे आणि लाड यांनी आंबेडकरांनी विनंती केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी आणि चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांच्या म्हणण्यानुसार, बाबासाहेबांनी हे पुस्तक अगोदर वाचलेले होते.
‘It is a good book written in a bad taste’ (हे पुस्तक चांगले आहे, पण ते हीन अभिरुचीने लिहिलेले आहे.), असे उद्गार काढले होते.
जेव्हा जेधे-जवळकर आणि इतर मंडळी आंबेडकरांना भेटायला आले, तेव्हा आंबेडकरांनी त्यांना सल्ला दिला की, “कायद्याच्या काटेरी कुंपणात राहून आपणाला आपली चळवळ चालविली पाहिजे. कायद्याच्या गांधील माशा उठवून त्यांच्याशी झुंज देण्यात आपण आपली शक्ती खर्चू नये.”

मात्र, ब्राह्मणेतर चळवळीतल्या या तरुण नेत्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, असा विचार करून 1926 च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकर पुण्यात दाखल झाले.
त्यांनी पुणे सेशन्स कोर्टात न्या. लॉरेन्स यांच्यासमोर ‘देशाचे दुश्मन’ पुस्तकाच्या लेखकासह चौघांच्याही शिक्षेला आव्हान दिलं.
यापूर्वी बदनामीकारक लेखनाच्याच एका खटल्यात न्या. फ्लेमिंग यांनी विसंगत निकाल दिला होता. फिर्याद नोंदवणारी व्यक्ती दूरचा नातेवाईक असल्यानं फिर्याद नोंदवता येत नाही, असा तो निर्णय होता. या निर्णयाचा नीट अभ्यास करून आंबेडकरांनी त्याआधारे युक्तिवाद केला.
आंबेडकरांचा हा युक्तिवाद सेशन्स कोर्टाला अमान्य करता आला नाही. भोपटकरांसारखे निष्णात वकीलही तिथं काही करू शकले नाहीत.
परिणामी जेधे, जवळकर, बागडे आणि लाड या चौघांचीही निर्दोष सुटका करण्यात आली.
आंबेडकरांच्या वकिलीच्या सुरुवातीच्या काळातलं हे प्रकरण होतं. आजही त्यांच्या वकिलीची चर्चा होताना, देशाचे दुश्मन खटल्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.
शिवाय, आंबेडकरांना पुढे विविध प्रसंगी ब्राह्मणेतर चळवळीतल्या नेत्यांनी ठामपणे पाठिंबा दिल्याचंही दिसून येतं.
यशवंतराव चव्हाण आणि ‘देशाचे दुश्मन’
पारतंत्र्यातील भारत आणि स्वतंत्र भारत या संध्यावरच्या दशकांमध्ये यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकारणी होत. पुढे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीही बनले. ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून त्यांना गौरवले जाते.
‘देशाचे दुश्मन’ पुस्तकाबाबत यशवंतरावांनी ‘कृष्णकांठ’ या त्यांच्या आत्मचरित्रात लहानपणीचा एक किस्सा सुद्धा सांगितलाय.
1927 च्या काळातच केव्हातरी कराडला जेधे-जवळकरांची ‘तुफान सभा’ झाली. मी तुफान शब्द यासाठी वापरतो आहे की, माणसे फार तुफान गर्दीने जमली होती, या अर्थाने नव्हे, पण त्या सभेमध्ये दिनकरराव जवळकरांनी केलेलं भाषण अगदी तुफान आणि खळबळ मजवणारे होते. त्यांनी व्याख्यानाचा विषय ठेवला होता ‘ब्राह्मणांचे भवितव्य’. ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत कठोर अशी टीका त्यांनी त्या भाषणात केली होती.
या सभेत ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तकही वाटले होते, अशी नोंद यशवंतरावांनी आत्मचरित्रात केलीय. यातलंच एक पुस्तक यशवंतरावांच्या हाती लागलं आणि त्यांनी ते वाचून काढलं.
यशवंतराव लिहितात, “जवळकरांनी टिळकांवर केलेली टीका बरोबर नव्हती, असे माझ्या मनाने घेतले. कारण तोपर्यंत मी थोडेफार वाचू लागलो होतो. लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरुद्ध लढणारे एक सेनापती आहेत, अशी माझी भावना होती. त्यामुळे अशा थोर माणसावर टीका करणारी माणसे ही इंग्रजांची मित्र तर नाहीत ना? अशा तऱ्हेची शंका माझ्या मनात येऊन गेली.”

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर यशवंतराव आणि ब्राह्मणेतर चळवळ यांचा संबंध त्यांच्या घरातच होता.
यशवंतरावांचे थोरले बंधू गणपतराव चव्हाण हे ब्राह्मणेतर चळवळीत सक्रीय होते. मात्र, यशवंतरावांना ब्राह्मणेतर चळवळ ‘संकुचित’ वाटू लागली. मग त्यांनी या चळवळीपासून अंतर राखत मुख्य प्रवाहातील राजकारणात रस दाखवला.
यशवंतरावांची जवळकरांवरील पुस्तक प्रकाशनाला गैरहजेरी
ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे त्यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक ग्रंथात म्हणतात की, ‘देशाचे दुश्मन’ या जवळकरांच्या पुस्तकावरील राग ते अखेरपर्यंत विसरू शकले नाहीत.
‘ब्राह्मणेतर विचारांची जवळीक व्यापक राजकारणाला बाधक ठरते, याचा अनुभव त्यांनी घेतलेला असल्याने ते या बाबतीत अखेरपर्यंत अखंड सावधान राहिले’ असंही सदानंद मोरे लिहितात.
‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडातच सदानंद मोरे दिनकरराव जवळकरांवर य. दि. फडकेंनी लिहिलेल्या पुस्तकाचा किस्सा सांगतात.

जेव्हा दिनकरराव जवळकरांचं समग्र साहित्य प्रसिद्ध करायचे ठरवले. बाबा आढाव मदतीला धावले. प्रकाशन समारंभ पुणे मुक्कामी होता.
दोन दिवस आधी यशवंतराव प्रवरानगरमध्ये पद्मश्री विखे पाटी पाटील स्मृती व्याख्यान द्यायला आले होते.
तेव्हा त्यांच्य़ाकडे सत्ता नसल्याने नेहमी त्यांच्या अवतीभोवती मिरवणारी मंडळी आता गायब होती. अण्णासाहेब शिंदे आणि अरुण शेवते बरोबर होते.
कुणीतरी त्यांना सहज विचारलं, “परवा आपण पुण्यात आहात, असे समजते. जवळकरांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला जाणार असालच.”
यशवंतराव चक्क ‘नाही’ म्हणाले. उपस्थितांना धक्काच बसला. त्यांची अर्थातच कारण विचारले, यशवंतरावांनी सांगितलं की,
“जवळकर साहित्य प्रकाशित करताना त्यात ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकाचा समावेश करू नये, असे माझे मत होते. पण ते संपादक-प्रकाशकांना पटले नाही. त्यांनी त्याचा समावेश केला आहे. थोडक्यात अनुपस्थिती हा नापसंती दाखवण्याचा मार्ग.”
दिनकरराव जवळकर म्हणजे ‘ट्रॅजिक हिरो’
सदानंद मोरे म्हणतात की, ‘ब्राह्मणेतरी विचारांचा धुरळा उडवण्यात अग्रेसर असलेले दिनकरराव जवळकर हे समकालीन ब्राह्मणांना खलनायक, तर ब्राह्मणेतरांना नायक वाटणे स्वाभाविक असले, तरी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या पलीकडे जाऊन पाहिले असता ते शोकात्म नायक ठरतातत.'
'जवळकरांना लाभलेले अल्पायुष्य, त्यांची व्यसनाधीनता, तारुण्यसुलभ उतावीळपणा व भावनाप्रधानता या गोष्टी विचारात घेऊनही त्यांच्या चरित्राचा समग्रपणे विचार केला, तर त्यांना ‘ट्रॅजिक हिरो’ का म्हणायचे, हे लक्षात येते,' असं सदानंद मोरे लिहितात.

फोटो स्रोत, Digvijay Jedhe
चोराची आळंदी येथे जन्मलेले दिनकरराव जवळकर पुण्यात आले, तेव्हा ‘जेधे मॅन्शन’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते टिळकपक्षीय ब्राह्मणेतर नेते नारायणराव गुंजाळ यांच्या गटात काही काळ वावरले.
तेथील मंडळी सनातनी असल्याचा साक्षात्कार झाल्यावर बहुधा ते जेध्यांच्या गोटात सामील झाले असावेत, असा निष्कर्ष सदानंद मोरे काढतात.
एकूणच देशाचे दुश्मन पुस्तकाचा वाद हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. ब्राह्मणेतर चळवळीला या पुस्तकाच्या वादानं प्रोत्साहन दिलंच, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही या चळवळीतल्या नेत्यांशी स्वत:ला कायमचं जोडून दिलं.
संदर्भ :
1. देशाचे दुश्मन - दिनकरराव जवळकर
2. देशभक्त केशवराव जेधे (चरित्र) - य. दि. फडके
3. दिनकरराव जवळकर समग्र वाङ्मय - संपादक, य. दि. फडके
4. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (चरित्र) - चांगदेव खैरमोडे
5. लाईफ आणि करिअर ऑफ केशवराव जेधे (पीएचडी थिसिस, 1989) - विजय नालावडे
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर
7. लोकमान्य ते महात्मा - डॉ. सदानंद मोरे
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








