महात्मा फुलेंचा 'सत्यशोधक समाज' नेमका काय आहे?

महात्मा फुले

फोटो स्रोत, Government Of Maharashtra

फोटो कॅप्शन, महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा मुलगा यशवंत
    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एखाद्या जोडप्यानं 'सत्याशोधक' पद्धतीनं लग्न केल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, हे 'सत्यशोधक' म्हणजे नेमकं काय आहे.

तरीही या 'सत्यशोधक' शब्दाचा संबंध महात्मा जोतिराव फुले यांच्याशी संबंधित असल्याचं अनेकांना माहीतही असतं. मात्र, फुल्यांचा सत्यशोधक समाज नेमका होता काय, त्यांना त्यातून काय अपेक्षित होतं? याबद्दल विस्तृत माहिती नसते.

फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा नेमका पाया काय होता, उद्देश काय होता, जेणेकरून आज दीड शतकांनंतरही त्याची चर्चा होते? याबाबत आपण अनभिज्ञच असतो.

भारताच्या सामाजिक इतिहासात महत्त्वाची घटना मानल्या गेलेल्या 'सत्याशोधक समाजा'बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

आजच का, तर आजच्या दिवशी सुमारे 150 वर्षांपूर्वी म्हणजे 24 सप्टेंबर 1873 रोजी फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हेच निमित्त साधत फुल्यांच्या या क्रांतिकारी पावलाचे काही ठसे शोधण्याचा प्रयत्न करुया.

फुल्यांचा जन्म 1827 चा. वयाच्या विशी-पंचविशीतच त्यांनी समाजसेवेचा मार्ग पकडला.

लोकांना शक्य ती आर्थिक मदत करण्यापासून समाज सुधारणेसाठी प्रशासकीय, तसंच लोकांमध्ये जाऊन सक्रीय राहून, बदल घडवणारे समाजसेवक म्हणून फुले काम करू लागले होते.

समाजसेवेत जवळपास 25 वर्षं घालवल्यानंतर वयाच्या पन्नीशाच्या आसपास असलेल्या फुल्यांना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणींचा आणि खाचखळग्यांचा पुरता अनुभव आला होता.

पं. सि. पाटील त्यांच्या 'महात्मा ज्योतिराव फुले' या पुस्तकात सांगतात की, "भिक्षुकशाहीची रग कमी झाल्याशिवाय आपण पेरलेल्या सुधारणा वाढीस लागणं शक्य नाही, हे फुल्यांना लक्षात आलं आणि सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक स्वरूपाची संस्था स्थापन करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं त्यांना अगत्याचं वाटू लागलं."

हा काळ होता 1872-73 चा. याच काळात पुण्यात ब्राह्मणेतर समाजातील काही तरूण मंडळी शाळेतून बाहेर पडली होती. त्यांनाच आपल्या चळवळीसाठी उपयोगात आणयाचं फुल्यांनी ठरवलं.

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची बिजं फुल्यांच्या या विचारात होती, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

महात्मा फुले

फोटो स्रोत, Maharashtra Government

एखादा विचार डोक्यात आला आणि पटला की, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या फुल्यांनी मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणच्या सुशिक्षत मंडळींना उद्देशून एक विनंतीपत्र जारी करत पुण्यात एक सभा बोलावली.

50 ते 60 जण फुल्यांच्या आमंत्रणाला मान देत पुण्यात दाखल झाले. हा बैठकीचा दिवस होता 24 सप्टेंबर 1873 चा. याच दिवशी फुल्यांनी 'सत्यशोधक समाज' नावाची ज्योत पेटवली. आज दीड शतकानंतरही फुल्यांनी लावलेली ही ज्योत अंधारलेल्या दिशांना उजेडाची मशाल बनून उभी आहे.

'सत्यशोधक समाज' हेच नाव का?

या बैठकीत संस्थेच्या नावाविषयी सविस्तर चर्चा झाली आणि 'सत्यशोधक समाज' हे नाव निश्चित झालं. या नावाविषयी श्रीराम गुंदेकर यांनी 'सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले' या पुस्तकात माहिती दिलीय.

"सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणं, सत्याच्या अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था म्हणून 'सत्यसोधक समाज' हे अन्वयार्थक नाव सर्वांनी संमत केलं. सत्याचा शोध विवेकनिष्ठ, नैतिक भूमिकेने सामुदायिक पातळीवरून घ्यावयाचा म्हणून 'समाज' हे पद त्या नावात समर्पक आहे."

'सत्यशोधक' हा शब्दच फुल्यांनी का वापरला किंवा तो कुठून आला, असाही प्रश्न अनेकांना पडतो. तर याबाबत महेश जोशी यांनी 'सत्यशोधक समाजाचा इतिहास'मध्ये म्हटलंय की, महात्मा फुले यांच्या तोंडी 'सत्यशोधक समाज' आणि 'मानवधर्म' असे दोन शब्द वारंवार आढळतात. यापैकी 'सत्यशोधक' हा शब्द बाबा पद्मनजी यांच्याकडून आणि 'मानवधर्म' हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून आलेला दिसतो.

'बाबा पद्मनजींनी तो शब्द कुठून उचलला, ते सांगता येत नाही. पण भारतीय लोक सत्याची फारशी तमा बाळगीत नाहीत, असा युरोपियन लोकांनी आपला समाज करून घेतला होता, हे लक्षात घ्यावयास हवं,' असंही जोशी लिहितात.

'या' तीन तत्वांवर सत्यशोधक समाजाची स्थापन

सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, तेव्हा तीन मुख्य तत्त्व ठरवण्यात आली.

1) ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे आणि सर्व मानव प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत.

2) ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकारी आहे. आईस संतुष्ट करण्यास अगर बापास विनवण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरूर नसते, त्याप्रमाणे सर्वसाक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास भट दलालाची आवश्यकता नाही.

3) कोणीही जातीने श्रेष्ठ ठरत नसून, फक्त गुणाने श्रेष्ठ ठरतो.

सभासद बनण्यासाठीचा 'तळी' उचलण्याचा प्रकार काय होता?

सत्यशोधक समाजाचे सभासद होण्यासाठी समाजातील कुठल्याही जातीतील, तसंच धर्मातील व्यक्तींना मुभा होती. सत्यशोधक समाजाचे सभासद होताना प्रत्येक सभासदाला शपथ घ्यावी लागत असे. त्यानंतरच तो सत्यशोधक समाजाचा सभासद होत असे.

महात्मा फुले

फोटो स्रोत, Maharashtra Government

खंडोबा हे सत्यशोधक समाजाचे दैवत होते. महेश जोशी लिहिताता की, 'बळीराजा हाच महाराष्ट्राचा राजा. बळी राजाने महाराष्ट्राची नऊ खंड केली होती आणि प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा. हा खंडोबाच सर्व मराठ्यांचा देव. त्यामध्येच जेजुरीचा एक सर्व मराठ्यांनी बहिरोबास, जोतिबास व खंडोबास देववत मानले व त्यांची नावे सामील करून तळी उचलू लागते.'

प्रत्येक सभासदाला खंडोबा या दैवतापुढे बेलपत्र उचलून शपथ घ्यावी लागत असे आणि तळी उचलून तो सभासद होत असे. तळी उचलण्याचा विधी लोकधर्मिय परंपरेला धरून होता. म्हणूनच सत्यशोधक समाजाने खंडोबा आपले दैवत मानले होते.

तळीचे सामान एका पिशवीत भंडार, गुलाल, गुळाचा खडा, खोबऱ्याच्या वाट्या, धने, विड्याची पानं, सुपारी इत्यादी जिन्नस ठेवत होते.

तळी उचलताना 'बहिरीचा चांगभले', 'येळकोट..' वगैरे तोंडाने बोलून त्या वीरास (देवास) पाचारीत असत.

'ही' प्रतिज्ञा घेऊन सभासद होता यायचं

सत्यशोधक समाजाचा सभासद होण्यासाठी प्रत्येक सभासदाला प्रतिज्ञा घ्यावी लागत असे.

"सर्व मनुष्य एकाच ईश्वराची लेकरे आहेत. त्यांचे व माझे बंधुत्वाचे नाते आहे. हे जाणून वागण्याचा मी नित्य प्रयत्न करीन. देवाची भक्ती, पूजा, उपासना वगैरे करितांना तसेच धर्मविधी करितांना मी कोणाही मध्यस्थाची जरुर ठेवणार नाही व असे वागण्याविषयी मी इतराचे मन वळविण्यास झटेन. मी स्वत: शिकून मुलामुलीस विद्या शिकविल्याशिवाय राहणार नाही. राज्यकर्त्यांशी एकनिष्ठेने वागेल, अशी सर्वसाक्षी सत्यस्वरुप परमात्म्याला मी प्रतिज्ञा करतो. हा माझा पवित्र उद्देश सिद्धीस नेऊन जन्माचे सार्थक करण्यास परमेश्वर मला सामर्थ्य देवो."

भट, सावकार, इंग्रज सरकारचे काळेगोरे अधिकारी यांच्याकडून होणाऱ्या शोषणाला आणि अन्यायाला विरोध, मानवी हक्कांची शिकवण आणि मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीतून बहुजनांची मुक्तता हा सत्यशोधक समाजाचा त्रिसूत्री कार्यक्रम होता.

महात्मा जोतिबा फुलेच पहिले अध्यक्ष

सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि खजिनदार महात्मा जोतिबा फुले हेच होते. नारायण गोविंदराव कडलक यांची पहिले कार्यवाह म्हणून निवड झाली.

सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या समाज जीवनावर कायम स्वरूपी राहिल्याचं ते लिहितात.

सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर महात्मा जोतिराव फुल्यांना अनेक नवे कार्यकर्ते जोडले गेले. कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्या नावाची नोंद प्रामुख्यानं सापडते.

भालेकर हे पुयातील डिस्ट्रिक्ट जज कोर्टात कारकून म्हणून कार्यरत होते. सत्यशोधक समाजाचे आजन्म कार्य करण्यासाठी त्यांनी 1874 साली आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी ठिकठिकाणी सभा भरवणे, पोवाडे, कविता म्हणणे, उपदेश करणे इत्यादी करू लागले.

सत्यशोधक समाजाची एक नोंदवही फुल्यांनी ठेवली होती. सत्यशोधक समाजाच्या नोंदी त्यात फुले ठेवत असत. फुल्यांनंतर ती नोदंवही यशवंतराव फुल्यांकडे गेली. मात्र, यशवंतराव फुल्यांच्या निधनानंतर कुणाकडे गेली, याचा अद्याप तपास लागलेला नाही.

संदर्भ :-

  • सत्यशोधक समाजाचा इतिहास - महेश जोशी
  • महात्मा ज्योतिराव फुले - पं. सि. पाटील
  • महात्मा फुले समग्र वाड्मय - संपा. धनंजय कीर, डॉ. स. गं. मालशे आणि डॉ. य. दि. फडके
  • महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले - श्रीराम गुंदेकर
  • सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदर पाटील समग्र वाड्मय

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)