डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनं देशाच्या पहिल्या निवडणुकीत ठरवून हरवलं होतं का?

बाबासाहेब आंबेडकर
    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधत आरोप केला की, काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला. ते भोपाळमध्ये बोलत होते.

भारताच्या राजकारणात काही ना काही निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकांचा विषय चर्चेला येतो.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन लोकसभा निवडणुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले आणि दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यातील पहिला पराभव मुंबईत काँग्रेसचे उमेदवार नारायणराव काजरोळकर यांनी केला.

मुंबईतल्या या पराभवाचा दाखल देत, काँग्रेसचे विरोधक कायम काँग्रेसवर टीका करत असतात की, आंबेडकरांचा पराभव त्यांनी केला.

खरंतर निवडणूक म्हटल्यावर जय-पराजय आलाच. मात्र, स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची रुखरुख कोट्यवधी भारतीयांना तेव्हाही लागली होती आणि आज इतक्या वर्षांनीही लागतेय.

मात्र, तत्कालीन राजकीय स्थिती काय होती आणि कुठल्या राजकीय स्थितीत डॉ. आंबेडकरांचा पराभव झाल होता, यासंदर्भात बीबीसी मराठीनं संदर्भांसहित आढावा घेतला आहे.

भारताची पहिली निवडणूक

भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. अगदी नेमकी तारीख सांगायची तर 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली.

या पहिल्या निवडणुकीत लोकसभेच्या 489 जागांसाठी 50 हून अधिक पक्षांचे दीड हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात होते.

यातले जवळपास 100 मतदारसंघ हे द्विसदस्यीय होते. म्हणजे, एकाच मतदारसंघातून सर्वसाधरण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत. पुढे 1960 च्या दरम्यान ही पद्धत रद्द करून, एका मतदारसंघातून एकच खासदार, म्हणजे जसं आता आहे, तसं करण्यात आलं. असो.

तर देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई. आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात

या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे 27 सप्टेंबर 1951 ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले.

आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा जीव तसा लहानच होता. याची त्यांनाही पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची रणनिती सुरू केली.

केवळ 35 जागा त्यांनी लढवल्या. त्यातले एक उमेदवार स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

आंबेडकरांसमोर कुणाचं आव्हान होतं, कोण कोण उमेदवार रिंगणात होते आणि ही लढत कशी झाली, हे जाणून घेण्यापूर्वी, आपण या निवडणुकीच्या दरम्यानच्या काही गोष्टी जाणून घेऊ.

बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Government of Maharashtra

देशाच्या या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस, कम्युनस्ट पार्टी, जनसंघ, सोशालिस्ट पार्टी हे मुख्य पक्ष होते.

स्वातंत्र्य चळवळीतून उगम पावलेल्या काँग्रेसचं तेव्हा देशभरात वारं होतं. त्यामुळे काँग्रेससमोर टिकाव धरून राहणं इतर सर्वच पक्षांना आव्हानात्मक होतं. म्हणूनच आंबेडकरांनी एक राजकीय पाऊल उचललं, ते म्हणजे, समाजवाद्यांच्या सोशालिस्ट पार्टीसोबत युती करण्याचं.

आंबेडकर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पहिल्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आठवड्याभरातच आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन आणि सोशालिस्ट पार्टीची युती झाली.

आचार्य अत्रेंनी 'कऱ्हेचे पाणी'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, "या करारानुसार असे ठरले की, पार्लमेंट अगर राज्य असेंब्ली यासाठी शेड्युल कास्ट करिता असलेल्या राखीव जागा सोशालिस्ट पार्टी लढविणार नाही. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यात शेड्युल कास्ट फेडरेशन सर्वसाधारण जागांसाठी आपले उमेदवार उभे करील. त्यांना सोशालिस्ट पार्टीने पाठिंबा द्यावा आणि जेथे सोशालिस्ट पार्टी सर्वसाधारण जागेसाठी आपले उमेदवार उभे करील, त्यांना शे. का. फेडरेशनने पाठिंबा द्यावा."

1 नोव्हेंबर 1951 रोजी दिल्लीत या युतीचा करार झाला. सोशालिस्ट पार्टीचे एस. एम. जोशी आणि मोहिनुद्दिन हॅरिस, तर आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे दादासाहेब गायकवाड यांनी या करारावर सह्या केल्या.

उत्तर मुंबई या द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण जागेवर सोशालिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं, तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर स्वत: आंबेडकर उभे राहिले.

श्रीपाद अमृत डांगे

फोटो स्रोत, EPARLIB.NIC.IN

फोटो कॅप्शन, श्रीपाद अमृत डांगे

आणि विरोधात काँग्रेस, कम्युनिस्टांसह एकूण 8 उमेदवार होते.

काँग्रेसकडून सर्वसाधारण जागेवर व्ही. बी. गांधी, तर राखीव जागेवरून म्हणजे आंबेडकरांविरोधात नारायणराव काजरोळकर यांना तिकीट देण्यात आलं. कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीपाद अमृत डांगे, पुढे जाऊन जनसंघात विलीन झालेल्या राम राज्य पार्टीकडून केशव जोशी, तसंच हिंदुत्त्ववादी नेते गोपाळराव देशमुख असे एकूण 8 उमेदवार या मतदारसंघातल्या दोन जागांसाठी उभे होते.

यातली चर्चेतली लढत होती ती बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध काँग्रेस उमेदवार नारायणराव काजरोळकर.

शिवाजी पार्कातली लाखोंची सभा

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत सोशालिस्ट पार्टी आणि शेड्युल कास्ट फेडरेशनच्या विराट सभा झाल्या.

मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानात अडीच ते तीन लाख लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत डॉ. आंबेडकर म्हणाले,

“समाजवादी पक्ष आणि शेकाफे यांची आज युती झाली आहे. परस्परांच्या सहकार्याने आपण चार पावले पुढे टाकू, असा मला विश्वास वाटतो. आमच्या युतीमुळे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल, अशी आशा वाटते. ह्या निवडणुकीत संपूर्ण राज्ययंत्र जरी हस्तगत करता आले नाही, तरी निदान आम्ही काँग्रेस पक्षाविरुद्ध एक प्रबळ अशी विरोधी आघाडी उभी करू अन् काँग्रेस पक्षाची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणू.”

बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, MEA

आचार्य अत्रेंनी लिहिलंय की, 'शिवाजी पार्कातील सभेत लाखो लोकांनी जो डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा विराट जयजयकार केला नि समाजवादी-शेकाफे यांच्या एकजुटीचे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वागत केले, ते अद्याप माझ्या कानात निनादते आहे.'

काँग्रेसनं आंबेडकरांविरोधात क उमेदवार दिला?

निवडणूक झाली, आणि निकाल संबंध देशाला धक्का देणारा ठरला. कारण

नारायणराव काजरोळकरांना 1 लाख 38 हजार 137 मतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 23 हजार 576 मतं मिळलाी. काँग्रेसच्या काजरोळकरांनी आंबेडकरांचा पराभव केला. तोही तब्बल 14 हजार 561 मतांनी.

बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केलं, हा आरोप तेव्हापासून आजवर कायम होत आलाय.

काँग्रेसनं बाबासाहेबांचा खरंच ठरवून पराभव केला होता का, हे जाणून घेण्यासाठी आपण त्यावेळच्या काही घडामोडी समजून घ्यायला हव्यात.

स. का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. बॉम्बे काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघात त्यांच्याशिवाय कुणाचा शब्द चालत नसे. बॉम्बे काँग्रेसवर त्यांचं एकहाती वर्चस्व होतं. मुंबईतील उमेदवार ते ठरवत किंवा दिल्लीतून उमेदवार ठरवला गेला तरी स. का. पाटलांच्या होकाराशिवाय त्यावर अंतिम निर्णय होत नसे.

मुंबईत आपला दबदबा राखून असलेल्या स. का. पाटलांनी खरंतर निवडणुकीआधीच्या काही महिने आधीच जाहीर म्हटलं होतं की, "आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही."

स. का. पाटील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स. का. पाटील

मग काँग्रेसनं नारायणराव काजरोळकरांच्या रुपात उमेदवार का दिला? असा सहाजिक प्रश्न निर्माण होतो.

तर आचार्य अत्रेंनी स. का. पाटलांवर केलेल्या एका टीकेतूनच त्याचं उत्तर मिळतं.

अत्रे 'कऱ्हेचे पाणी'मध्ये लिहितात की, "बाबासाहेब जर मुंबईतील राखीव जागा लढवणार असतील तर काँग्रेस त्यांना विरोध करणार नाही, असे सदोबांनी (स. का. पाटील) पूर्वी जाहीर केले होते. पण शेकाफे आणि समाजवादी पक्ष यांचा करार होताच सदोबांचे डोके भडकले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे नारायणराव काजरोळकर यांचे नाव जाहीर केले."

आपण इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की, स. का. पाटील हे समाजवाद्यांना कडाडून विरोध करत असत. समाजवादी आणि कम्युनिस्टांबद्दलचा त्यांचा राग जगजाहीर होता.

स. का. पाटलांना आंबेडकरांबद्दल आदर होता, मात्र समाजवाद्यांबद्दल तशी भावना नव्हती. त्यात ऐन निवडणुकीच्या काळात आंबेडकरांनी समाजवाद्यांशी युती केल्यानं स. का. पाटलांनी आणि पर्यायानं काँग्रेसनं त्यांच्यासमोर उमेदवार दिला.

आंबेडकर

फोटो स्रोत, Vijay Surwade

शिवाय, स. का. पाटलांनी आंबेडकरांसमोर उमेदवारच न देण्याची केलेली घोषणा तेव्हा केली होती, जेव्हा आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडत समाजवाद्यांशी युती केल्यानं, या पाठिंब्याचं आश्वासनं स. का. पाटलांनी पाळलं नाही.

कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं स. का. पाटलांनी आश्वासन पाळलं नाही, या गृहितकाला आधार देणारी नोंद बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकर यांनी त्यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मरचित्रातही केलीय.

माईसाहेबांनी लिहिलंय की, "मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स. का. पाटील यांनी साहेबांना राजकीय सहकार्याची बोलणी करण्यासंबंधी पत्र लिहिले होते. अर्थात, त्यावेळी साहेब कायदेमंत्री होते आणि म्हणूनच साहेबांशी बोलणी करून शेकाफेशी सहकार्य करावे, असे मुंबई प्रांतातील काँग्रेस पक्षाचे धुरीण सदोबा पाटील व इतरांना वाटत होते. परंतु, साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यात पुढे प्रगती झाली नाही."

आचार्य अत्रे

काँग्रेसमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणारा एक वर्ग आहे, तसाच कम्युनिस्टांमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणाराही एक वर्ग आहे.

कम्युनिस्टांनी आंबेडकरांविरोधातली मतं कुजवल्याचा आरोप तर दस्तुरखुद्द आचार्य अत्रेंनीही केला होता.

आंबेडकर उभे असलेल्या राखीव जागेवर कुणालाच मत न देण्याचा प्रचार कम्युनिस्टांनी केला आणि त्याचा फायदा काजरोळकरांना झाला, असं अत्रेंच म्हणणं होतं.

बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकरांनीही त्यांच्या आत्मचरित्रात कम्युनिस्टांवर हाच आरोप केलाय.

काजरोळकरांना मोठ्या मनानं केलं माफ

भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्यानं अनेकांना दु:ख झालं.

आंबेडकरांनी त्यांना पराभूत करणाऱ्या काजरोळकरांना मोठ्या मनानं माफ केलं.

किंबहुना, विजयानंतर काजरोळकर जेव्हा त्यांच्यासमोरच पराभूत झालेल्या आंबेडकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले, तेव्हा आंबेडकरांनी आशीर्वाद देताना म्हटलं, कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारं तुमच्यासाठी उघडी असतील.

माईसाहेब आंबेडकर
फोटो कॅप्शन, माईसाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र

माईसाहेब आंबेडकर आत्मचरित्रात लिहितात, 'लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी आम्ही दिल्लीला होतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबईला आलो होतो. त्या दरम्यान आमचा मुक्काम सिद्धार्थ महाविद्यालयात किंवा कुलाब्याच्या जयराज हाऊस इथे असायचा. मुंबईला बहुधा पिपल्स एज्युकेशन सोसायचीची मिटिंग असावी आणि त्यासाठीच आम्ही आलो होतो, असे मला वाटते. आमचा 3-4 दिवस मुक्काम होता.

"एके दिवशी नारायणराव काजरोळकर सांहेबांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये भेटायला आले. कदाचित त्यांना समोर येण्यात अपराधीपणा म्हणा किंवा संकोच वाटत असावा, असे मला वाटते. कारण ते संकोचाने सामोरे आले. त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलकीने जवळ बोलावले. काजरोळकर आले व त्यांनी क्षणार्धात साहेबांच्या पायावर डोकं ठेवले. साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठवलं आणि शेजारी बसवून घेतलं व निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले.'

पोटनिवडणुकीतही पराभव

मात्र, आंबेडकरांना या पराभवानं मोठा धक्का बसला होता. इतका की आधीपासूनच विविध आजारांशी लढत असलेल्या आंबेडकरांची या काळात तब्येतही खालावली.

या पराभवावर बरीच चर्चा झाली. आंबेडकरांनी कुणालाही दोष देण्याऐवजी एका सभेत म्हटलं की, निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते. पराभूत टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही, पुढच्या सामन्यासाठी तयारी करते.

या पराभवानंतर आंबेडकर मुंबई प्रांतातून राज्यसभेत गेले, मात्र त्यांना लोकसभेत जायचं होतं.

म्हणून दोनच वर्षांनी भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक लागली, तेव्हा तिथे आंबेडकर उभे राहिले. मात्र, तिथेही काँग्रेसच्या उमेदवारानंच त्यांचा पराभव केला.

ही आंबेडकरांची शेवटची निवडणूक ठरली. कारण पुढे दोन वर्षांनी म्हणजे 1956 साली त्यांचं निधन झालं.

आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत जरी पराभूत झाले असले, तरी त्यांच्या कार्यबद्दल विरोधकांनीही कधीच शंका उपस्थित केली नाही. कारण त्यांचं कार्य निर्विवाद होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)