पाकिस्तानचे आंबेडकर जोगिंदरनाथ मंडल, तिथं 'देशद्रोही' तर भारतात 'अस्पृश्य'

जोगिंदरनाथ मंडल

फोटो स्रोत, JAGDISH CHANDRA MANDAL

फोटो कॅप्शन, जोगिंदरनाथ मंडल
    • Author, सकलेन इमाम
    • Role, बीबीसी उर्दू

पाकिस्तानातील एक महत्त्वपूर्ण नेते म्हणून जोगिंदरनाथ मंडल यांचा उल्लेख केला जातो. पाकिस्तानमधील दलितांसाठी त्यांनी कार्य केलं. मंडल यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना लोक पाकिस्तानचे आंबेडकर असं म्हणत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे भारताचे पहिले कायदेमंत्री झाले त्याचप्रमाणे मंडल देखील पाकिस्तानचे पहिले कायदेमंत्री बनले होते.

पाकिस्तानात धार्मिक कट्टरतावादाचा उदय आणि प्रसारासाठी माजी लष्करी हुकूमशहा जनरल जिया उल हक यांचं सरकार आणि त्यानंतर वाढलेल्या कट्टरतावाद्यांच्या शक्तीला जबाबदार ठरवलं जातं.

पाकिस्तानात कट्टरतावाद वाढत चालला आहे असा इशारा मंडल यांनी तत्कालीन पंतप्रधानांना दिला होता. याची किंमत त्यांना पुढे मोजावी लागली. त्यांना यासाठी

पाकिस्तानी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोगिंदरनाथ मंडल यांनी तत्कालीन पंतप्रधानांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रातून धार्मिक कट्टरतावाद वाढत असल्याबाबत उल्लेख केला होता.

त्यांनी यासाठी पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी धर्माचा वापर शस्त्रासारखा करणं आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकणं या गोष्टींना जबाबदार धरलं होतं.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी जोगिंदरनाथ मंडल यांना पाकिस्तानच्या संविधान सभेच्या पहिल्या सत्राचं अध्यक्षपद सोपवलं होतं. ते पाकिस्तानचे पहिले कायदेमंत्रीही होते.

जोगिंदरनाथ मंडल हे बंगालच्या दलित समाजातून होते. भारताच्या फाळणीआधी बंगालच्या राजकारणात ब्रिटिश वसाहतवादापासून स्वातंत्र्य मुद्दा नव्हता, तर जमीनदारी व्यवस्थेत शोषण होत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रमुख मुद्दा होता.

त्यामध्ये बहुतांश मुस्लीम आणि दलित होते. दलितांना आधी शूद्र संबोधलं जात होतं. पण इंग्रजांच्या काळात त्यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला.

जमीनदारांमध्ये अधिकांश हिंदू ब्राह्मण आणि कायस्थ होते. त्यांना स्थानिक भाषेत भद्रलोक म्हटलं जायचं.

अविभाजित बंगालची लोकसंख्या पाच कोटी दहा लाख इतकी होती. यामध्ये सुमारे 80 लाख दलितांसह हिंदुंची लोकसंख्या सुमारे दोन कोटी 20 लाख होती. मुस्लिमांची लोकसंख्या 2 कोटी 80 लाख होती. उच्च जातीच्या हिंदुंची म्हणजेच भद्रलोकांची लोकसंख्या 30 लाख होती.

याप्रमाणे बंगालमध्ये मुसलमानांची लोकसंख्या 54 टक्के, त्यानंतर दलित आणि मग हिंदू ब्राह्मण होते. ख्रिश्चन आणि इतर धर्मीयांची संख्या अत्यंत कमी होती.

पाकिस्तान मंत्रिमंडळ

फोटो स्रोत, vintagepakistan

दलितांमध्ये सर्वांत मोठा जातीसमूह महेशी हा होता. त्यांची संख्या 35 लाख होती. यानंतर नामशूद्र लोकांची संख्या होती. याच जातीतून जोगिंदरनाथ मंडल होते. ते मुस्लीम लीगचे समर्थक होते. त्यांच्या नेतृत्वात अनेक दलित मुस्लीम लीगमध्ये आले होते.

1930 पासूनचे नामशूद्र बंगालमध्ये मुस्लीम लीगचे समर्थक मानले जात.

पाकिस्तानच्या संविधान सभेची पहिली बैठक 11 ऑगस्ट 1947 ला झाली. तोपर्यंत मुस्लीम लीगने दलितांसोबतच्या संबंधांना एक स्वरूप दिलं होतं.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे पहिले कायदेमंत्री दलि

भारतात संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी बिगर-काँग्रेसी दलित नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रिमंडळात जागा देऊन देशाचे पहिले कायदेमंत्री बनवलं. त्यांच्यावर देशाच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

पाकिस्तानचे संस्थापक जिन्ना यांचं भाषण फक्त त्यांची एक कल्पना नव्हती. तर ती एक राजकीय रणनितीसुद्धा होती.

मोहम्मद अली जिन्ना

फोटो स्रोत, Getty Images

त्याच रणनितीअंतर्गत त्यांनी आपल्या भाषणापूर्वी बंगालचे हिंदू दलित नेते जोगिंदरनाथ मंडल यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं होतं.

परंतु, आता पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या वेबसाईटवर पहिले अध्यक्ष म्हणून मंडल याचं नाव लिहिलेलं नाही.

जोगिंदरनाथ मंडल कोण होते?

मंडल यांचा जन्म बंगालच्या बाकरगंज गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. घरात काही असो किंवा नाही, मुलाचं शिक्षण पूर्ण व्हावं, असं त्यांच्या वडिलांना वाटायचं.

मंडल यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या काकांनी उचलला. एका स्थानिक शाळेत सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर ते बारिसालमध्ये बृजमोहन संस्थानमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले. बारिसाल हे पूर्व बंगालमधील होतं, फाळणीनंतर ते पूर्व पाकिस्तानमध्ये गेलं.

आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंडल यांनी बारिसाल नगरपालिकेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी वंचित लोकांची परिस्थिती सुधारवण्यासाठी संघर्ष सुरू केला.

जोगिंदरनाथ मंडल भारताची फाळणी करण्याच्या बाजूने नव्हते पण उच्च जातींसोबत राहिल्याने शूद्रांचा विकास होऊ शकत नाही, त्यामुळे पाकिस्तानात दलितांसाठी चांगली संधी आहे, असं त्यांचं मत होतं.

त्यांनी जिन्ना यांच्यासोबत पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे सहकारी आणि भारतातील सर्वांत मोठे दलित नेते डॉ. आंबेडकर यांनी इशारा दिला होता.

पुढे आंबेडकर भारताचे तर जोगिंदरनाथ हे पाकिस्तानचे कायदेमंत्री बनले. काही वर्षांनी दोघांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मंडल यांनी 8 ऑक्टोबर 1950 ला राजीनामा दिला तर आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1951 ला राजीनामा दिला होता. मंडल यांनी निराशेतून राजीमाना दिला होता तर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलावरून राजीनामा दिला होता.

मंडल पाकिस्तानचं संविधान बनताना पाहू शकले नाहीत. तर आंबेडकर यांनी 1950 ला भारताचं संविधान पूर्ण करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली.

संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर आंबेडकर यांनी हिंदू वारसा कायद्यानुसार मुलांसोबतच मुलींनाही संपत्तीत बरोबरीचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

जिन्ना यांचं 11 ऑगस्टचं भाषण आणि अल्पसंख्याक

इतिहासकारांच्या मते, 11 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानचे संस्थापक आणि गव्हर्नर जनरल मोहम्मद अली निन्ना यांनी संविधान सभेतील पहिल्या भाषणात धर्म आणि सत्ता वेगवेगळ्या राहतील, अशी घोषणा केली होती.

नेहरू जिन्ना

फोटो स्रोत, Getty Images

हिंदू आता हिंदू असणार नाहीत, मुस्लीम मुस्लीम नसतील, धर्म हा एक खासगी बाब असेल, आपण अशा युगाकडे जात आहोत, जिथं कोणत्याही भेदभावाला जागा नसेल, कुणालाही जात किंवा धर्माच्या नावाने प्राधान्य दिले जाणार नाही, प्रत्येक जण देशाचा समान नागरिक असेल, असं जिन्ना यांनी म्हटलं होतं.

जिन्ना यांच्या भाषणापूर्वी एक दिवस आधी संविधान सभेचे कार्यकारी अध्यक्ष जोगिंदरनाथ मंडल यांनी पाकिस्तान निवडण्याचं कारण सांगितलं होतं. मुस्लीम समाजाने भारतात अल्पसंख्याक म्हणून संघर्ष केला आहे. या देशात ते अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देताना त्यांच्या प्रति उदारता दाखवतील, असं ते म्हणाले होते.

अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या गजल आसिफ यांनी जोगिंदरनाथ मंडल अँड पॉलिटिक्स ऑफ दलित रिकग्निशन इन पाकिस्तान या विषयावर संशोधन केलं आहे.

ते म्हणतात, "मंडल यांनी पाकिस्तानच्या निर्मितीदरम्यान दलित स्वतंत्रतेचं स्वप्न साकार होताना पाहिलं होतं. पण नव्या देशात हिंदू अल्पसंख्याकाची स्थिती कशी असेल यातला फरक ओळखू शकले नाहीत."

पाकिस्तानकडून मंडल यांच्यावर अत्याचार?

प्राध्यापक अनिर्बन बंदोपाध्याय म्हणतात, "पाकिस्तानात मंडल यांच्यावर अत्याचार करण्यात आला किंवा नाही, याचा तपास करणं अवघड काम आहे.

बंदोपाध्याय हे गांधीनगरमध्ये कनावती कॉलेजमध्ये इतिहास विषय शिकवतात.

"मंडल यांच्या राजीनाम्यावरून त्यांची तीव्र नाराजी कळू शकते ते निराश होते हे नक्की. त्यांना धोका दिला गेला. पण पाकिस्तानच्या संग्रहालयात ठेवलेले दस्तऐवज तपासल्यानंतरच याबाबत जास्त माहिती मिळू शकेल," असं ते सांगतात.

जिन्ना यांचं व्हीजन

लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संशोधक आणि इतिहासकार डॉ. अली उस्मान यांच्यानुसार, "देशातील पहिल्या संविधान सभेचे प्रमुख म्हणून एका दलिताला नियुक्त करून कायद-ए-आझम यांनी पाकिस्तानचा दृष्टीकोन स्पष्ट केला होता. फक्त प्रतीकात्मक प्रतिनिधीत्व द्यायचं असतं तर कोणतंही मंत्रालय देऊ शकले असते."

जोगिंदरनाथ मंडल यांना एका दिवसासाठी संविधान सभेचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. पुढच्या दिवशी जिन्ना यांना अध्यक्षपदी निवडण्यात आलं. पण पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंडल यांना कायदेमंत्री बनवण्यात आलं. जिन्ना जीवंत होते, तोपर्यंत त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही.

जिन्ना यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांमुळे मंडल निराश झाले. या देशात अल्पसंख्याकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणारं कुणीच नाही, अशी त्यांची भावना होती.

मंडल यांचा राजीनामा आणि भारतात प्रवेश

जोगिंदरनाथ मंडल 1950 पर्यंत लियाकत अली खान यांच्या मंत्रिमंडळात होते. त्या काळात त्यांनी वारंवार पूर्व पाकिस्तानात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तक्रार केली.

मंडल

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर ऑक्टोबर 1950 ला त्यांनी राजीनामा दिला. अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त करत राजीनाम्याची कारणेही दिली. लष्कर, पोलीस आणि मुस्लीम लीगच्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये शेकडो दलितांच्या हत्या होत असल्याबाबत उल्लेख त्यांनी केला.

मंडल यांनी वारंवार केलेल्या तक्रारीनंतर लियाकत अली खान यांनी त्यांना दलितांवरील अत्याचाराबाबत अहवाल मागितला. पण वेळ निघून गेली होती. त्यांनी आपल्या राजीनाम्यात याबाबत सविस्तर माहिती दिली होती.

भारताच्या फाळणीबाबत मंडल यांचे विचार

आपल्या राजीनाम्यात भारताच्या फाळणीबाबत बोलताना मंडल म्हणाले, "उच्च जातींच्या हिंदुंच्या वागणुकीमुळे मुस्लीम लोक भारताची फाळणी करू इच्छितात, असं मला वाटायचं. पण पाकिस्तानच्या निर्मितीमुळे या जातीयवादाच्या समस्येवर तोडगा निघणार नाही, याची मला खात्री होती."

"पाकिस्तानच्या निर्मितीमुळे मुसलमानांची स्थिती सुधारणार नाही. उलट पाकिस्तान दक्षिण-पूर्व आशियातील सर्वांत मागास देश बनेल, अशी मला भीती वाटते," असं मंडल म्हणाले होते.

पाकिस्तानने म्हटलं देशद्रोही

जोगिंदरनाथ मंडल यांचा राजीनामा पाकिस्तानसाठी एक मोठा राजकीय संकट बनला होता. विशेषतः ते कोलकात्याला गेले त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर अनेक गंभीर आरोप लावले.

"पाकिस्तानच्या संग्रहीत फाईल्समध्ये याबाबत उल्लेख आहे. त्यामध्ये पाकिस्तानने मंडल यांची वक्तव्य म्हणजे धोका असल्याचं सांगितलं. तसंच मंडल खोटारडे, फितूर आणि पळपुटे आहेत, असंही म्हटलेलं आहे," ही माहिती गजल आसिफ यांनी दिली.

जोगिंदरनाथ यांचे पुत्र जगदीश चंद्र मंडल प्राध्यापक अनिर्बान बंदोपाध्याय यांच्याशी बोलताना म्हणाले होते, "माझे वडील कराचीमध्ये राहायचे तेव्हा ते मंत्री असूनसुद्धा त्यांना एकटं पाडलं होतं. त्यांनी जिन्ना यांच्यावर विश्वास ठेवला. दलितांच्या उज्ज्वल भविष्याच्या आशेने भारतातलं सगळं काही त्यागलं. पण जिन्ना यांच्यानंतर त्याच पाकिस्तानात त्यांना राजकीयदृष्ट्या अस्पृश्य बनवण्यात आलं."

भारतातही राजकीयदृष्ट्या अस्पृश्य

मंडल यांनी राजीनामा दिला आणि 1950ला पाकिस्तान सोडून ते भारतात बंगाल राज्यात स्थायिक झाले. यावेळी त्यांच्याच जातीतील लोक त्यांच्याकडे संशयास्पद नरजेने पाहू लागले. पाकिस्तानला जाण्यापूर्वी ते भारतात आंबेडकर यांचे सहकारी होते. पण आता मंडल यांना पाठिंबा दर्शवणारा कुणीच नव्हता.

फाळणीपूर्वी 1946 मध्ये मंडल यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून डॉ. आंबेडकर यांना सदस्य म्हणून निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

पण 1950 ला पुन्हा भारतात परतल्यानंतर ते स्वतःच राजकीयदृष्ट्या अस्पृश्य बनले.

दलित झोपडीपट्टीत वास्तव्य

1950 ला पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर 1968 पर्यंत त्यांनी आपले दिवस कोलकात्यातील एका अत्यंत मागास भागात घालवले. हा परिसर रवींद्र सरोवरचा दलदली भाग होता. इथं दलित झोपडपट्टी होती. मंडल याठिकाणीच राहायचे. आता ही जमीन कोरडी बनल्यानंतर याठिकाणी श्रीमंत लोकांच्या कॉलनी उभ्या राहिल्या आहेत.

या परिसरात लोक अत्यंत बिकट परिस्थितीत राहायचे. मंडल यांनीही अत्यंत गरीबीमध्ये दिवस घालवले. त्यांच्या झोपडीसमोर समस्या घेऊन आलेल्या दलितांची गर्दी असायची.

त्यांची बहुतांश मागणी नोकरीविषयक असायची. पूर्व पाकिस्तानात ज्या दलितांवर अत्याचार करण्यात आले, त्यांना पश्चिम बंगालमध्ये पलायन करण्यास भाग पाडण्यात आलं, त्यांच्या राहण्याची समस्याही होती. सर्वस्व गमावून हे लोक कलकत्त्याला आले होते. पंजाबमधून भारतात आलेल्या लोकांच्या तुलनेत या लोकांना इतक्या सुविधा मिळालेल्या नव्हत्या.

भारतात परतल्यानंतरचं राजकारण

प्राध्यापक बंदोपाध्याय सांगतात, "1950 ला ते 46 वर्षांचे होते तर मृत्यूसमयी 64 वर्षांचे होते. दरम्यानच्या काळात कशीबशी जमवाजमव करून ते निवडणूक लढवायचे. त्यांनी एक वर्तमान पत्र सुरू करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यांचे अनेक समर्थक त्यांची साथ सोडून इतर पक्षांचे सदस्य बनले होते."

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्यास त्याच्यातील चांगुलपणाबाबत कुणी बोलत नाहीत.

1943 ला बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यादरम्यान अनेकांचा भूकबळी गेला. त्यावेळी मंडल हे ख्वाजा नाझिमुद्दीन सरकारमध्ये पुरवठा मंत्री होते. त्यामुळे दुष्काळाबाबत त्यांना दोष देण्यात येऊ लागला.

नंतर 1946 च्या हिंदू-मुस्लीम दंगलीसाठीही त्यांना दोषी मानलं गेलं.

संशयास्पद मृत्यू की हत्या?

एहमर्स्ट कॉलेजमध्ये साऊथ एशियन स्टडीजचे प्राध्यापक द्वापायन सेन यांनी आपल्या 'द डिक्लाईन ऑफ द कास्ट क्वेश्चन : जोगिंदरनाथ मंडल अँड डिफीट ऑफ दलित पॉलिटिक्स इन बंगाल' या पुस्तकात त्यांनी मंडल यांच्याबाबत लिहिलं आहे. मंडल भारतात परतल्यानंतरसुद्धा त्यांचं राजकारण उच्च जातींच्या हिंदूंसाठी धोका होता, असं ते म्हणतात.

मंडल यांनी 1952 आणि 1957 मध्ये कोलकात्यातून निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आलं नाही.

जीना आणि गांधी

याबाबत सेन लिहितात, "आजही उच्च जातींचे हिंदू दलितांना आपली प्रजा मानतात. त्यामुळे दलितांमधून नेता निर्माण व्हावा, असं त्यांना वाटत नाही.

मंडल हे प्रतिक्रियावादी असल्याचा आरोप यांच्या विरोधकांनी लावला होता. त्यांनी संपूर्ण समाजात न्याय प्रस्थापित करण्याऐवजी फक्त दलितांच्या कल्याणाबाबत मुद्दे मांडले, अशी टीका त्यांचे विरोधक करायचे.

याला उत्तर देताना मंडल उपहासात्मकरीत्या म्हणायचे, "गांधी दलितांसाठी काम करतात तेव्हा त्यांना महात्मा म्हणून संबोधलं जातं. पण दलिताने दलितांच्या कल्याणासाठी काम केलं तर त्याला प्रतिक्रियावादी म्हटलं जातं."

सेन पुस्तकात लिहितात, "मंडल भारतात परतल्यानंतर राजकीय कारकिर्दीत अनेक धक्के बसले. पण 1968 साली त्यांच्या विजयाची शक्यता निर्माण झाली होती, तेव्हा त्यांचा मृत्यू झाला.

जोगिंदरनाथ मंडल नदी पार करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी नाविकाशिवाय कुणीही साक्षीदार नव्हता. त्यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं नाही. त्यांचे पुत्र जगदीश चंद्र मंडल यांनी याबाबत आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

त्या दिवशी मंडल एका सभेत प्रचारासाठी चालले होते. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. पण मृत्यूचं कारण समजू शकलं नाही, असं बंदोपाध्याय सांगतात.

सेन यांच्या मते, मंडल यांचा मृत्यू गूढ होता. त्यांना विष देण्यात आलं होतं, असं त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)