उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या शांत का?

फोटो स्रोत, SAI SAWANT
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने उफाळून आला आहे. याबाबत सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या वतीने भूमिका मांडत आहेत. पण उदयनराजे यांची नेमकी भूमिका समोर येताना दिसत नाही.
साताऱ्यात उदनराजे यांनी १८ सप्टेंबरला माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ते का वंचित राहतील असा सवाल करत त्यांनी मराठा आरक्षण मुद्यावर राजीनामा देण्याचंही वक्तव्य केलं होतं.
मात्र त्यानंतर २५ दिवस झाले तरी उदयनराजे यांनी मराठा आरक्षण या मुद्यावर आपलं मत मांडलेलं नाही. किंवा भूमिका जाहीर केली नाही. ते इतके दिवस शांत का बसले आहेत याची चर्चा होताना दिसतेय.
नाशिकमध्ये २६ सप्टेबरला सकल मराठा समाजाने राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहिले. मात्र आमंत्रण असूनही उदयनराजे या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यावेळी त्यांनी वैयक्तिक कारणांनी अनुपस्थित असल्याचं सांगत आरक्षणाला पाठिंबा असल्याचं व्हीडिओच्या माध्यमातून कळवलं होतं.
दरम्यानच्या काळात जोवर मराठा आरक्षण मिळत नाही. तोवर कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी राज्य सरकारकडे संभाजीराजे यांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या.

फोटो स्रोत, SAI SAWANT
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुण्यात ३ ऑक्टोबरला शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे निमंत्रण उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना देण्यात आलं होते. मात्र हे दोघेही या बैठकीला गेले नाहीत.
त्यानंतर नवी मुंबईत ७ ऑक्टोबरला नरेंद्र पाटील यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या बैठकीला देखील उदयनराजे यांनी जाणं टाळलं.
उदयनराजे बैठकांना जाणं का टाळतात?
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना एकीकडे मराठा समाजाच्या बैठका, मेळावे यांचं आयोजन होत आहे मात्र दुसरीकडे उदयनराजे या सगळ्यापासून अलिप्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाबाबत ते स्वतंत्र भूमिका घेणार असल्याची माहिती मिळतेय. त्यानुसार उदयनराजे साताऱ्यात परतल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत स्वंतत्र भूमिका जाहीर करणार आहेत.
पण तरीही मुद्दा हाच आहे की मराठा समाजाला अपेक्षित असलेला सहभाग उदयनराजे का घेत नाहीयेत किंवा आंदोलनात ठाम भूमिका घेत सक्रिय सहभाग घेताना उदयनराजे का दिसत नाहीत.

फोटो स्रोत, TWITTER/@CHH_UDAYANRAJE
याबाबत दैनिक सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर यांनी सांगितलं की, "उदयनराजे यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी एखाद्या प्रश्नावर ठोस भूमिका घेतलेली आहे आणि ती तडीस नेलेली आहे, असं कधीही दिसलं नाही. आता ही मराठा आरक्षणासंदर्भात ते जाहीरपणे मराठा समाजाच्या बाजूने बोलतात; पण मराठा समाजातील लोकांना त्यांच्याकडून जो आक्रमकपणा अपेक्षित आहे, तो दिसत नाही. खरंतर, आजपर्यंतच्या राजकीय जीवनात आक्रमकपणा हीच उदयनराजे यांची ओळख राहिलेली आहे. पण या आक्रमकतेला त्यांच्याकडून योग्य भूमिकेची जोड मिळत नाही."
"2019च्या लोकसभा निवडणुकीत राजीनामा देऊन भाजपमधून पुन्हा निवडणूक लढवण्याचा त्यांचा आक्रमकपणा केवळ योग्य भूमिकेची जोड नसल्यामुळेच त्यांच्या अंगलट आला. राजकारणात टाइमिंगला महत्त्व असतं आणि उदयनराजेंचं ते टायमिंग मात्र चुकतं," असं सोळस्कर यांना वाटतं.
आता देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली तर राज्यभरातील मराठा तरुण त्यांना पुन्हा एकदा डोक्यावर घेईल, अशी शक्यताही ते बोलून दाखवतात.
नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईत मराठा समाजाचा मेळावा आयोजित केला होता. पाटील यांच्या आमंत्रणाला उदयनराजे यांनी प्रतिसाद दिला नाही.
याबाबत दैनिक लोकमतचे सातारा आवृत्तीचे प्रमुख दिपक शिंदे सांगतात, "उदयनराजे यांनी बैठकीला जाण्याचं टाळण्यामागे काही वेगळी कारणं आहेत. राजे यांच्या मतानुसार नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे आहेत. शिवसेना सध्या सत्तेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नासाठी शिवसेनेच्या मेळाव्यात जाणं उदयनराजे यांनी टाळलं इतरांनी आयोजित केलेल्या मेळाव्यावर का जायचं असा सवाल उपस्थित केला. त्यामुळं उदयनराजे स्वतंत्र भूमिका मांडणार आहेत."
शिवसंग्रमाचे विनायक मेटे यांनी देखील उदयनराजे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी उदयनराजे आणि शिंवद्रराजे यांना पुण्यातल्या बैठकीचं आमंत्रण दिलं.

फोटो स्रोत, TWITTER/@YUVRAJSAMBHAJI
मात्र या बैठकीला जाणं देखील दोघांनी टाळलं. त्यामागे आपण राजे आहोत. इतरांनी आयाजित केलेल्या बैठकीला गेल्याने आपलं महत्त्व कमी होईल असं कारण असावं असं शिंदे याना वाटतं.
संभाजीराजेंच्या नेतृत्वामुळे उदयनराजे नाराज?
मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत भाजपकडून संभाजीराजे यांना पुढ करण्यात आलं आहे. त्यामुळं उदयनराजे नाराज आहेत का अशी देखील चर्चा आहे.
त्यावर दिपक शिंदे सांगतात, "उदयनराजे कधीच कोणत्या पक्षाचे झाले नाहीत. त्यांचं स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. ते ज्या पक्षात आहेत. त्या पक्षाच्या विचारसरणी नुसार वागतीलच असं सांगता येणार नाही. राजेंचा आजवरचा इतिहास पाहता त्यांनी कधी नेतृत्व केलं नाही. त्यामुळं समाजाला लागणारी मदत करण्यावर त्यांचा भर असेल."
तसंच संभाजीराजेंच्या नेतृत्वाबाबत त्यांना नाराजी असण्याचं कारण नाही. उलट राजघराणं म्हणून ते एकत्र काम करतील अशी शक्यता नाकारता येत नाही, असंही शिंदे यांना वाटतं.
पण या आंदोलनात सध्या तरी संभाजीराजे छत्रपती यांनी योग्य टायमिंग साधल्याचं विश्लेषण राजेश सोळस्कर करतात.
ते पुढे सांगतात, "वास्तविक पाहता उदयनराजे यांना कोणत्याही प्रकारचा लाभ उठवण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. पक्ष त्यांच्या भोवती फिरतात हे यापूर्वी महाराष्ट्राने पाहिले आहे. उदयनराजे यांच्या सल्लागारांना याचा विसर पडलेला दिसतो. तर कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य टायमिंग साधलं आहे."
पक्षांचं नियंत्रण नाही?
राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनीही उदयनराजे स्वतंत्र व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलंय.
"उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना देखील त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण नव्हतं. त्यामुळं ते भाजपमध्ये गेल्याने वेगळी परिस्थिती आहे असं नाही. उदयनराजे यांच्या दृष्टीने पक्ष म्हणून कधीच कोणाला महत्त्व नसतं. त्यामुळे मराठा आरक्षण मुद्यावर भाजपच्या म्हणण्यानुसार त्यांची भूमिका असेल अशी शक्यता नाही," असं चोरमारे यांना वाटतं.
तर मराठा आरक्षणावर सक्रिय न होण्यामुळे भाजपकडून त्यांना जेवढा लाभ होईल, त्यापेक्षा कितीतरी अधिक फायदा उदयनराजे यांना मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेण्यामुळे होईल, असं राजेश सोळस्कर यांना वाटतं.
याबाबत उदयनराजे भोसले यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा बीबीसीकडून करण्यात आला. पण त्यांच्याकडून अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया येताच तीसुद्धा इथं देण्यात येईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








