गर्भनिरोधक : 'आम्हाला इतक्यात मूल नकोय, पण घरच्यांनी गर्भनिरोधक वापरायला विरोध केलाय'

गर्भनिरोधक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
    • Role, स्त्रीरोगतज्ज्ञ, वंध्यत्वनिवारणतज्ज्ञ

प्रसंग पहिला : "अगं, हा तिसरा गर्भपात करायला आली आहेस तू. मी गेल्यावेळीच तुला बजावलं होतं कॉपर टी साठी पाळीच्या पाचव्या दिवशी ये म्हणून. का आली नाहीस?"

"मॅडम मला खूप भीती वाटते कॉपर टीची."

"आणि वारंवार गर्भपाताची भीती वाटत नाही?" मी थक्क होऊन विचारले.

बीबीसी

प्रसंग दुसरा : “डॉक्टर, आमचं आत्ताच लग्न झालंय. खरंतर आम्हाला कमीत कमी एक वर्ष मूल नकोय पण घरच्यांनी आम्हाला गर्भनिरोधक वापरायचं नाही असं निक्षून सांगितलंय. काय करावं काही कळत नाही.”

क्लिनिकमध्ये माझ्या कानावर येणारी ही नेहमीची कैफियत. विशेष म्हणजे ही समस्या समाजातील सर्व तरुणतरुणींसमोर आहे. लग्न झाल्या झाल्या.

“बघ हं, गोळ्या बिळ्या घेऊ नकोस! त्या अमकीने मोठ्यांचं न ऐकता गोळ्या घेतल्या आणि आता तीन वर्ष झाली दिवस रहात नाहीयेत.” हाही एक हमखास संवाद.

नवीन लग्न झालेल्या आधीच कावऱ्या बावऱ्या झालेल्या मुलीला जवळजवळ दहशतच घातली जाते.

बीबीसी

प्रसंग तिसरा : "मिस्टर ××××, काय हे? सहा महिन्यात दुसऱ्यांदा गर्भपात करण्याची वेळ आलीय. आधीच हिच्या अंगात रक्त कमी...दोन सिझेरियन झालीयेत..कसं झेपणार तिला?तुम्ही मागच्या वेळी म्हटलं होतं की, ऑपरेशन करून घ्याल म्हणून”

मी खरंच थोडी चिडले होते..

"मॅडम, राहून गेलं ऑपरेशन करायचं. आता त्यापेक्षा हिचंच करून टाका ना ऑपरेशन."

आता मात्र मी पूर्ण खचले. आजपर्यंत अनेक पेशंटच्या नवऱ्यांनी मला अगदी तोंड भरून आश्वासनं दिली की कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन करून घेतो. पण आजवर एकही जण घेतलं करून म्हणून सांगायला आलेला नाही.

बीबीसी

असे संवाद अनेकदा क्लिनिकमध्ये होतात. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी, दोन मुलांमध्ये योग्य ते अंतर राखण्यासाठी, लग्नानंतर जर करिअर-नोकरीच्या दृष्टिने नियोजन करताना दिवस राहू नयेत म्हणून खात्रीशीर आणि योग्य मार्ग म्हणजे गर्भनिरोधकाची योग्य ती साधनं वापरणं. मग ती पुरूषाने वापरली किंवा स्त्रीने...काही फरक पडत नाही.

यामुळे ना लैंगिक संबंधांमध्ये काही अडथळा येतो, ना लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. पण तरीही आपल्याकडे गर्भनिरोधकाच्या साधनांच्या वापराबद्दल अनेक गैरसमज आहेत.

हे समज-गैरसमज केवळ आपल्याच समाजात आहेत असं नाहीत. त्यामुळेच 26 सप्टेंबर हा World Contraception Day म्हणून पाळला जातो. कुटुंबनियोजनाच्या साधनांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एखाद्या जोडप्याला त्यांच्या लैंगिक आरोग्याबाबत सजगपणे निर्णय घेता यावेत यादृष्टिने हा दिवस साजरा केला जातो.

या दिवसाचं औचित्य साधून आपणही कुटुंबनियोजनांच्या साधनांबद्दल सहसा मनात कोणत्या शंका असतात, त्या कितपत योग्य आहेत, त्यातील कोणत्या शंका अनाठायी आहेत याबद्दल जाणून घेऊया.

गर्भनिरोधकाच्या गोळ्या घ्याव्यात की नको? पण खरंच या गोळ्या असुरक्षित असतात का?

या लेखाच्या अगदी सुरूवातीला जे उदाहरण दिलं आहे त्यामध्ये जुन्या पिढीकडून गर्भनिरोधक गोळीची भीती बिंबवली जाते.

पण खरंच या गोळ्या असुरक्षित असतात का?

खरंतर असुरक्षित गर्भधारणेपेक्षा गर्भनिरोधक गोळ्या खूपच सुरक्षित असतात.

प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आम्ही या गोळ्या घेण्याबद्दल सल्ला देतो.

या गोळ्या फक्त कमी वयात झालेला मधुमेह, वाढलेला रक्तदाब,अतिलठ्ठपणा अशा काही केसेसमध्ये देत येत नाहीत. पण या गर्भनिरोधक गोळ्यांबाबत लोकांमध्ये खूपच गैरसमज आहेत आणि कारण नसताना त्याबद्दल नवविवाहित जोडप्यांच्या मनात भीती घातली जाते.

गर्भनिरोधक

फोटो स्रोत, ThinkStock

फोटो कॅप्शन, गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रीची पाळी अनियमित असेल तर तीही नियमित होते.

गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन असतात त्याला सीओसी म्हणतात, तर दुसऱ्या गोळीत प्रोजेस्ट्रॉन असतं. त्याला पीओपी असं म्हणतात.

महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन आणि आणि प्रोजेस्ट्रॉन दोन्ही हार्मोन्स असतात. गर्भ निरोधनात त्याच हार्मोन्सचा वापर होतो. शरीरावर त्यांचे वेगवेगळे परिणाम होतात.

ज्या औषधांमध्ये इस्ट्रोजन असतं त्याचा महिलांना फायदा होतो. ज्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या असतात, ज्यांना हृदयाशी निगडीत आजार असतात, ज्यांना रक्तदाबाचा त्रास असतो, त्यांना फायदा होतो.

ज्या औषधांमध्ये प्रोजेस्ट्रॉन असतं, त्यांना जीव घाबरणं, डोकेदुखी, अनियमित मासिक पाळी, चक्कर येणं अशासारखे आजार होऊ शकतात.

या गोळ्यांचे फायदे-तोटे काय?

या गोळ्यांमुळे स्त्रीची पाळी अनियमित असेल तर तीही नियमित होते. गोळ्या नियमित घेतल्यास चुकून गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसतेच, त्यामुळे जोडप्याचे लैंगिक आयुष्यही जास्त निकोप राहते. पाळी नियमित झाल्यामुळे गोळ्या थांबवल्यावर गर्भधारणाही लगेच होते.

काही मुलींना चेहऱ्यावर जास्त प्रमाणात मुरूम व फोड येत असतील तर तेही या गोळ्यांमुळे खूप कमी होतात.

ओव्हरींचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

गर्भनिरोधक

फोटो स्रोत, Getty Images

पूर्वीच्या काळात काही स्त्रियांनी माला डी, माला एन या सरकारतर्फे फुकट मिळणाऱ्या गोळ्या कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय, कोणत्याही वयात, कशाही डोसमध्ये घेतल्या.

साहजिकच काही महिलांना त्रास झाला आणि मग त्याचा डांगोरा पिटून या गोळ्या बदनाम करण्यात आल्या.

आता सरकारी गोळ्याही खूप कमी डोसच्या आणि उत्तम दर्जाच्या उपलब्ध आहेत. फक्त सुरू करण्याआधी एकदा स्त्रीरोगतज्ञांना जरूर भेटावे.

भारतीय स्त्रियांची जनुकीयता लक्षात घेता आम्ही खूप जास्त वर्षें या गोळ्या घेण्याचा सल्ला देत नाही.

कॉपर टीबद्दल अनाठायी भीती का?

लग्नानंतर एक मूल होईपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या हा कुटुंबनियोजनाकरता उत्तम पर्याय असतो. हल्ली बहुतेक जोडप्यांना एकच मूल हवे असते. मग गर्भ निरोधक गोळ्या अनिश्चित काळासाठी घेतल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एका अपत्यानंतर कॉपर टी हाच पर्याय योग्य ठरतो.

पण या लेखातील दुसऱ्या उदाहरणातील मुलीला कॉपर टी बसवण्याची भीती वाटली, पण गर्भपाताची नाही. अनेक महिलांच्या मनात कॉपर टीबद्दल असलेल्या अनाठायी भीतीचं ही मुलगी प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येईल.

कॉपर टी शक्यतो एक मूल असलेल्या महिलेच्या गर्भाशयात पाळीच्या पाचव्या दिवशी बसवली जाते. तीन, पाच किंवा दहा वर्षे मुदत असलेल्या कॉपर टी उपलब्ध आहेत. पण त्या मुदतीच्या आधी सुद्धा कधीही काढता येतात.

कॉपर टी गर्भाशयात शुक्राणूसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करते तसेच गर्भ रुजण्याची प्रक्रिया थांबवते. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

कॉपर टी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कॉपर टी बसवल्यानंतर सुरवातीचे दोन तीन महिने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो, पण त्यासाठी औषधे देऊन तो नियमित करता येतो.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्याचा कोणत्याही हार्मोन्सशी काही संबंध नसतो. तसेच कॉपर टीमुळे वजन वाढणे किंवा कमी होणे अजिबात शक्य नसते. कॉपर टीमुळे माझं वजन वाढलं किंवा कमी झालं हा स्त्रियांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज आहे.

कॉपर टीचे काही फायदे तोटे बघूया.

1. एका अपत्यानंतर सुरक्षित आणि खात्रीशीर कुटुंब नियोजनाचा पर्याय.

2. जेव्हा परत प्रेगनन्सी हवी आहे असं वाटेल तेव्हा कॉपर टी लगेच काढून टाकता येते. पुढच्या महिन्यापासून कधीही गर्भ धारणा होऊ शकते.

3. नको असलेल्या गर्भधारणेची भीती नसल्यामुळे जोडप्याचे लैंगिक जीवन निकोप राहते.

4. कॉपर टीमुळे कोणत्याही हार्मोन्सवर काही परिणाम नसल्यामुळे चाळिशीपर्यंत सुद्धा ती बसवता येऊ शकते.

कॉपर बसवल्यावर काय काळजी घ्यावी?

1. कॉपर टी बसवल्यानंतर सुरवातीचे दोन तीन महिने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो, पण त्यासाठी औषधे देऊन तो नियमित करता येतो.

2. मधुमेह, काही प्रकारचे हृदयरोग, संसर्ग होण्याची शक्यता जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये कॉपर टी बसवता येत नाही.

3. कॉपर टीची नियमित तपासणी (दर सहा महिन्यांनी) आवश्यक असते.

4. योनीमार्ग आणि गर्भाशयाच्या मुखावर संसर्ग किंवा जखम असल्यास त्याकडे लक्ष ठेवून वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक ठरते.

कुटुंब नियोजनाचं ओझं बाईवरच का?

तिसऱ्या उदाहरणात नवरा कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यास फारसा राजी नव्हता, टाळाटाळ करत होता.

पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेविषयी उगाचच खूप गैरसमज आहेत.

सरकारतर्फे सुद्धा पुरुषांसाठी खूप वेळा मोफत शिबिरे असतात. ऑपरेशन केल्याबद्दल पैसे सुद्धा मिळतात, पण पुरुष जाम तिकडे फिरकत नाहीत.

पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेविषयी उगाचच खूप गैरसमज आहेत. खरंतर ही शस्त्रक्रिया अतिशय सोपी असते.पुरुषांना जेमतेम अर्धा दिवस हॉस्पिटलमध्ये यावं लागतं.फार विश्रांतीची गरज नसते.

सर्वात महत्वाचा मुद्दा पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. पण या एकाच गैरसमजापायी खूप पुरुष ही शस्त्रक्रिया करून घ्यायला घाबरतात.

या शस्त्रक्रियेनंतर त्याचा पूर्ण परिणाम होण्यासाठी 3 महिने लागतात. म्हणजे आधीच तयार झालेले शुक्राणू निघून जाण्यासाठी 3 महिने लागतात. त्यानंतर गर्भधारणा होऊ शकत नाही. हे माहीत नसल्याने सुद्धा अनेक गैरसमज होतात आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही, असे प्रवाद पसरवले जातात.

सरकारच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाअंतर्गत गोळ्यांबरोबर कंडोमही दिले जातात. मात्र आकडेवारी पाहता त्याचा वापर कमी प्रमाणात होतो.

कंडोम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंडोममुळे लैंगिक सुख मिळत नाही हा एक गैरसमज पुरुषांमध्ये आहे.

कंडोममुळे लैंगिक सुख मिळत नाही हा एक गैरसमज पुरुषांमध्ये आहे.

स्त्री ही पाळी सुरू झाल्यापासूनच पोटात दुखणे, रक्तस्राव या गोष्टींना सामोरी जाते. मग गरोदरपणात वेगवेगळ्या प्रकारे तिला दुखण्याचा सामना करावाच लागतो आणि प्रसूती हा तर दुसरा जन्मच. अशा इतक्या स्थित्यंतरातून पार पडलेल्या आपल्या बायकोला आता काहीही त्रास नको, कुटुंबनियोजनाची जबाबदारी माझी आहे असं वाटणारे किती पुरुष आहेत?

बरं वाटलं तरी पुढे होऊन ऑपरेशन करून घेणारे अगदीच थोडे आहेत.

"त्यांचं काही नको, माझंच करा अजून एक ऑपरेशन" असं म्हणणाऱ्या बायकाही कमी नाहीत.

यामागे अर्थात मनात घट्ट रुजलेली पुरुषप्रधान विचारसरणी आहे.

पूर्वी स्त्रिया घरीच असायच्या त्यामुळे घरचा कमावता पुरुषच एकमेव होता. मग त्याची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा स्त्रीचीच करा अशी मानसिकता होती. पण आता बायका पुरुषांच्या जोडीने बाहेर पडून कमवत आहेत. तरीही कुटुंबनियोजन ही जबाबदारी आपलीच असं बायकांनी का मानावं?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)