मुलांच्या जन्मानंतर पती-पत्नीच्या नात्यावर खरंच परिणाम होतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रवि प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी
कोणत्याही कुटुंबात एखाद्या बाळाचा जन्म झाला की, सगळं कुटुंब कसं आनंदात असतं.
पण दुसऱ्या बाजूला अशी ही काही जोडपी असतात ज्यांचा मुलं जन्माला घालण्यावरच विश्वास नसतो. आता त्यांनी असा निर्णय घेण्यामगे वेगवेगळी कारणं असू शकतात.
कारण ही वैयक्तिक निवडीची बाब आहे.
बिहारच्या गया जिल्ह्यातील मीनू सिंह यांना लहान मुलं आवडतात.
व्यवसायाने शिक्षिका असलेल्या मीनू सांगतात की, 2018 मध्ये माझं लग्न झालं आणि दोन वर्षांनी मुलीचा जन्म झाला.
मुलीच्या जन्माचा आनंद तर होताच पण दुसऱ्या बाजूला सगळं आयुष्य बदलून गेलं.
त्या सांगतात, "मी आणि माझे पती, आम्ही दोघेही नोकरी करतो. आमच्या मुलीच्या जन्मानंतर आम्ही दोघेही तिच्या संगोपनात गुंतून गेलो, त्यामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता आला नाही.
पूर्वी त्यांचं सगळं लक्ष माझ्याकडे असायचं, आता हे सगळं मुलीसाठी असतं. घरचे इतर लोकही मुलीकडे जास्त लक्ष देतात."
"मुलीला सर्वांचं प्रेम मिळतंय ही खरं तर चांगली गोष्ट आहे. माझे पती तिची खूप काळजी घेतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण ते माझ्याकडे आता लक्ष देत नसल्यामुळे आमच्यात पूर्वीसारखं नातं राहिलं नाही."
"आमच्यात प्रेम नाहीये अशी गोष्ट नाही, पण आम्ही जो वेळ एकमेकांना द्यायचो तो आता विभागला गेलाय."
पूर्वी मुंबईत आणि आता पाटण्यात राहणाऱ्या शैलजा ओझा यांच्या घरची परिस्थितीही अशीच काहीशी आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
त्यांचे पती विवेक रंजन त्यांच्या एक वर्षाचा मुलासोबत खूश असतात. पण शैलजा यांना वाटतं की, मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यामध्ये बदल झाला आहे.
बीबीसी हिंदीशी बोलताना शैलजा ओझा म्हणाल्या, "लग्नाआधी आणि लग्नानंतर आमचं आयुष्य खूप छान होतं. आमच्या नात्यात प्रेम होतं. 2021 मध्ये आमचं लग्न झालं."
"मी गरोदर असताना देखील नवऱ्याने माझी खूप काळजी घेतली. पण 2022 मध्ये जेव्हा आमचा मुलगा जन्माला आला, तेव्हा परिस्थिती बदलू लागली.
लहानसहान गोष्टींवरून माझी चिडचिड होऊ लागली, मला राग येऊ लागला. आमच्यात भांडणं सुरू झाली. नवऱ्याने लक्ष दिलं नाही आणखीन राग येऊ लागला. पुढे आम्ही हळूहळू आमचं नातं सांभाळलं पण आता आमचं आयुष्य बदललंय."
संशोधन काय सांगतं?
एका संशोधनानुसार, मुलाच्या जन्मामुळे पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो.
2021 साली युनिव्हर्सिटी ऑफ बॉर्नने केलेल्या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, मुलाच्या जन्मानंतर चारपैकी एक आई आणि 10 पैकी एक वडिलांना मानसिक आजाराचा सामना करावा लागतो.

शिवाय अपत्य नसलेली जोडपी मुलं असलेल्या जोडप्यांपेक्षा अधिक समाधानी असल्याचंही या संशोधनातून दिसून आलंय.
संशोधनात असं देखील म्हटलंय को, ज्या जोडप्यांना मुलं आहेत त्यांच्यातील प्रेम, मुलाच्या जन्मानंतर 10 वर्षांमध्ये सतत कमी होत जातं.
तसेच अपत्य नसलेल्या 62 टक्के स्त्रिया जास्त आनंदी होत्या.
पण नवजात बालकं असलेल्या 38 टक्के माताच खूश असल्याचं आढळलं. यात एक कारण सांगितलं गेलंय ते म्हणजे त्यांच्या शारीरिक संबंधांमध्ये कमतरता असणं.
मानसिक आजार आणि ताण तणाव
मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीच्या नातेसंबंधावर परिणाम होतो आणि त्यांना डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी जावं लागतं.
झारखंडच्या रांची येथील कानके हॉस्पिटल सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ सायकियाट्री (सीआयपी) मधील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय मुंडा सांगतात की,
"काही जागरूक जोडपी गर्भधारणेनंतर लगेच समुपदेशनासाठी येतात, जेणेकरून मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या नातेसंबंधावर वाईट परिणाम होऊ नये."

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
डॉ. संजय मुंडा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "मुलांच्या जन्माने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर पूर्णपणे परिणाम होतो. हा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो.
आधुनिक काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जोडप्याला सल्ला देणारं कुटुंबात दुसरं कोणी नसतं. मग तणाव वाढतो कारण पहिल्यांदाच पालक बनलेल्या जोडप्याला पूर्वानुभव नसतो."
ते सांगतात, "मुलांच्या जन्मानंतर त्यांना मुलांच्या पद्धतीनुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतात, त्यातून त्यांना अडचणी निर्माण होतात. अशात मग तणावाखाली असलेल्या जोडप्यांना समुपदेशनासोबत औषधही द्यावी लागतात."
"एक त्रिकोण आहे असं समजा. त्याच्या तीन टोकांवर आई, वडील आणि मूल आहे. समुपदेशनानंतर, आम्ही अशा जोडप्याच्या बॉडी क्लॉक आणि मानसिक स्थितीचे विश्लेषण करून परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करतो."
यासाठी सोशल मीडियाही जबाबदार
रांची येथील डॉ. अनुज कुमार सांगतात, "केवळ विभक्त कुटुंब पद्धतीमुळेच नाही तर सोशल मीडियावरील सक्रियता आणि नोकरी यामुळे पती-पत्नीच्या नातेसंबंधावर वाईट परिणाम होतो."
डॉ. अनुज कुमार सांगतात की, पूर्वी आपण एकत्र कुटुंबात राहायचो. मुलाची काळजी घेण्यासाठी आजी-आजोबा, काका-काकू असायचे. आता बहुतेक लोक विभक्त राहतात. यात नवरा बायको आणि मुलं इतकंच कुटुंब असतं.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
"त्यामुळे तुम्हाला मुलांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतात. त्यासोबतच तुम्हाला तुमची नोकरी करावी लागते. जर आई वडील दोघेही नोकरी करत असतील तर अडचणी आणखीन वाढतात. अशा परिस्थिती मध्ये पती-पत्नीचं नातं खूपच वाईटरित्या प्रभावित होतं."
"पतीला वाटतं, पत्नीने मुलांची काळजी घ्यावी. तर पत्नीलाही आपल्या पतीकडून हीच अपेक्षा असते. यात मग एकामागून एक सर्व समस्या वाढत जातात आणि शेवटी त्याचं रुपांतर भांडणात होतं. त्यामुळे मुलांना जन्म देण्यापूर्वी नीट नियोजन करणं खूप महत्वाचं आहे."
बाळंतपणाचा प्रत्येक जोडप्यावर परिणाम होतो का?
मुलांच्या जन्माचा सर्व जोडप्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो असंही नाही. अशी काही जोडपी आहेत ज्यांची मुलं त्यांना जवळ आणण्याचं कारण ठरतात.

फोटो स्रोत, Getty Images
या जोडप्यात बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांची आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मुलाच्या जन्मानंतर त्यांचं नातं आणखीन घट्ट झालं.
करीना कपूरने या विषयावर 'प्रेग्नन्सी बायबल' नावाचं पुस्तक लिहिलंय.
यात सैफ अली खानचा संदर्भ देत लिहिलंय की, 'तैमूरच्या जन्मानंतर त्यांचं नातं आणखीन घट्ट झालं. त्यांच्यात प्रेम वाढलं.'
याशिवाय करीना कपूरने या पुस्तकात गरोदरपणात येणाऱ्या समस्या आणि तणावाचाही उल्लेख केलाय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








