इराणने इस्रायलवर डागलेलं 'फतह' हायपरसॉनिक क्षेपणास्त्र किती शक्तिशाली आहे?

- Author, फरजाद सैफी कारान
- Role, बीबीसी न्यूज
बुधवारी 18 जून रोजी इस्रायलवर हायपरसॉनिक फतह क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा इराणने दावा केला आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने फतह -1 ही क्षेपणास्त्रे तेल अवीवच्या दिशेने डागल्याचं सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी सुरू झालेल्या संघर्षात, एकीकडे इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रांना आणि लष्करी तळांना लक्ष्य केले आहे, तर दुसरीकडे इराणने तेल अवीव आणि हैफा बंदरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.
इराणने केलेल्या त्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याने इस्त्रायलच्या आयर्न डोम या प्रसिद्ध सुरक्षा प्रणालीचीही नजर चुकविली.
इराणने डागलेली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इस्त्रायली हवाई हद्दीसह देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडले.
याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये इराणने मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रे डागली आणि पहिल्यापेक्षा अधिक इस्त्रायली ठिकाणांना लक्ष्य केलं होतं
याआधी बीबीसीशी बोलताना ‘स्टिम्सन इंस्टीट्यूट’चे संशोधक आणि नाटोचे ‘आर्म्स कंट्रोल प्रोग्राम’चे माजी संचालक विल्यम अल्बर्क म्हणाले, की इराणच्या फतह -1च्या हल्ल्याने मध्य पूर्व देशातील परिस्थिती आता कायमची बदलून टाकली आहे.
फतह क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलच्या 'आयर्न डोम' या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा अंत होईल, असा दावा इराणची सरकारी वृत्तसंस्था प्रेस टीव्हीने केला आहे.
गेल्या काही दशकांपासून इराणचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम अत्यंत वेगाने सुरू आहे. त्यातूनच इराणने अचूक लक्ष्यभेद करणारी, ‘पॉईंटर’ नावाने संबोधली जाणारी ही क्षेपणास्त्रे तयार केली आहेत.
इराणची ही क्षेपणास्त्र भरारी पश्चिमेकडील जग आणि इस्त्रायलच्या सोबतच मध्य पूर्वेतील काही अरब देशांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे.
इराणचा हा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम काय आहे, इराणजवळ कोणत्या प्रकारची आणि किती दूरवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत, तसेच सर्व प्रकारचे निर्बंध घातल्यानंतरही इराण इतकी आधुनिक क्षेपणास्त्रे कशी बनवू शकला हे जाणून घेऊया.
निर्बंधांनंतरही इराणकडून क्षेपणास्त्र विकास
‘पीस इन्स्टिट्यूट’ या अमेरिकन संस्थेने स्पष्ट केल्यानुसार मध्य पूर्वेतील देशांपैकी इराणकडे सगळ्यात मोठा आणि विविध बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे.
या भूभागावरील इराण एकमेव देश असा आहे, की ज्याच्याकडे अण्वस्त्रे नाहीत, पण त्यांची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तब्बल 2000 किलोमीटरवर पोहोचू शकतात.
बॅलेस्टिक तंत्रज्ञान दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी तयार झाले होते. जगातील काही मोजकेच देश या तंत्रज्ञानाच्या आधारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवू शकतात.
कडक आंतरराष्ट्रीय निर्बंधांनंतरही इराणने हे तंत्रज्ञान आत्मसात केले आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मितीही केली. इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी यांनी नुकतेच म्हटले होते, की आमच्या ज्या सैन्यबळामुळे आणि क्षेपणास्त्रांमुळे पाश्चिमात्य त्रस्त आहेत, ते सर्व आम्ही आमच्यावरील निर्बंधांच्या दरम्यानच सज्ज केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2006मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या एका ठरावानुसार कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे इराणला विक्री करण्यास बंदी घातली गेली.
यात काही अशा गोष्टींचाही समावेश होता, ज्या इतर कारणांसाठी तसेच लष्करासाठी उपयोगात आणल्या जात होत्या. त्यानंतर तीन महिन्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आणखी एका ठरावानुसार इराणसोबत इतरही पारंपरिक शस्त्रास्त्र देवाणघेवाणीवर संपूर्ण बंदी घातली.
ज्यामध्ये लष्करी तंत्रज्ञानाचाही समावेश होता. या ठरावानुसार घातलेल्या निर्बंधांमध्ये इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमासोबतच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. यामुळे चीनसारख्या देशांकडून शस्त्र खरेदी करणेही इराणसाठी अवघड झाले. इराक युद्धाच्या वेळी इराम चीनकडूनच शस्त्रास्त्रांची खरेदी करत होता.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असते. पाश्चिमात्य देशांच्या म्हणण्यानुसार इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हस्तगत केलेले आहे.
आता तो आण्विक उर्जा आणि अण्वस्त्रे तयार करण्यासाठी आवश्यक असणारे युरेनियम मिळविण्याचाही प्रयत्न सोडणार नाही.
जुलै 2015 मध्ये इराण आणि जगातील सहा शक्तिशाली देशांमध्ये झालेल्या ‘प्लान ऑफ अॅक्शन’ करारानुसार आणि ‘प्रस्ताव 2231’च्या मंजुरीनंतर इराणविरुद्धचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेले सर्व निर्बंध हटविले गेले.
परंतु ‘ट्रिगर/स्नॅप बॅक मेकॅनिझम’ नावाच्या कलमानुसार इराणच्या शस्त्रास्त्रांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले. शिवाय पाच वर्षांपर्यंत इराणच्या अण्वस्त्र निर्मितीवर देखरेख ठेवण्यात आली.
इराणवर दबाव काय ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या अण्वस्त्र विकासावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उपाय होता.
मात्र, तरीही इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम एवढा पुढे नेला, की मार्च 2016 मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ़्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्राच्या सेक्रेटरी जनरल यांना एक पत्र लिहिले. त्यात इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा आरोप केला गेला आणि इराणने ‘जेसीपीओए’ करारानंतरही सुरक्षा परिषदेच्या ‘प्रस्ताव 2231’ चे उल्लंघन केल्याचे नमूद केले गेले.
शेवटी 2020मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली. इराणच्या शस्त्रास्त्र सज्जतेवर योग्य ती नजर ठेवली गेली नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
तथापि अद्यापही आपण ‘प्लान ऑफ़ एक्शन’मध्ये सहभागी आहोत असे इराणचे म्हणणे आहे. ‘प्रस्ताव 2231’ची मुदत संपल्यानंतर इराण सरकारने ऑक्टोबर 2021 मध्ये रशिया आणि चीनकडून शस्त्रास्त्र खरेदीसाठी जाहिरात दिली. मात्र त्यावर अजूनही निर्बंध कायम असून शस्त्रास्त्र खरेदीची इराणची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.
तेव्हापासून इराण 50 हून अधिक प्रकारचे रॉकेट, बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसोबतच लष्करी उपयोगाचे ड्रोन तयार करत आहे. त्यापैकी काही रशिया आणि युक्रेनच्या युद्धातही वापरले गेले आहेत.
झिरो पॉइंट : रिव्हर्स इंजीनियरिंग
इराण-इराक युद्धाच्या वेळी इराणच्या तोफखान्याची मारक क्षमता 35 किलोमीटर एवढीच होती. त्याच वेळी इराक लष्कराजवळ 300 किलोमीटरवर मारा करू शकणाऱी ‘स्कड बी’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे होती. त्या क्षेपणास्त्रांनी इराणमधील अनेक शहरांना लक्ष्य केले होते.
इराकी लष्कराने क्षेपणास्त्रांच्या जोरावर मुसंडी मारली होती, हे लक्षात घेऊन इराणने क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे ठरविले. त्यावेळी इराणचे सर्वोच्च नेते रूहुल्लाह ख़ुमैनी यांनी इराकच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा मुकाबला करण्यास परवानगी दिली होती.
या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 1984मध्ये हसन तेहरानी मुक़द्दम यांच्या नेतृत्वात इराणच्या ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स मिसाइल कमांड’ची सुरुवात झाली.

फोटो स्रोत, TASNIM
इराणने 1985 मध्ये पहिल्यांदा लिबियाकडून रशियन बनावटीची ‘स्कड बी’ ही क्षेपणास्त्रे खरेदी केली. त्या 30 क्षेपणास्त्रांसोबत लिबियामधून क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञही इराणमध्ये दाखल झाले. स्वत:ची क्षेपणास्त्रे बनविण्यात इराणला त्या तंत्रज्ञांची मोठी मदत झाली.
त्यावेळी ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’च्या ‘एरो स्पेस फ़ोर्स’चे कमांडर अमीर अली हाजीज़ादा क्षेपणास्त्र निर्मिती युनिटचे प्रमुख बनले. इराणच्या पश्चिमेतील शहर किरमानमध्ये ही क्षेपणास्त्र निर्मिती सुरू झाली.
इराणने इराकवर पहिला क्षेपणास्त्र हल्ला 21 मार्च 1985 रोजी केला. त्यात किरकूक शहराला लक्ष्य करण्यात आले. दोन दिवसांनंतर बगदादमधील ‘इराकी आर्मी ऑफ़िसर्स क्लब’वर करण्यात आला. त्यात सुमारे 200 इराकी कमांडर मारले गेले.
या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अरब देशांच्या वतीने लिबियाने विरोध दर्शविला. त्यानंतर लिबियाच्या सल्लागारांनी इराण सोडले. पण जाण्यापूर्वी त्यांनी क्षेपणास्त्रे आणि त्यांच्या प्रक्षेपण यंत्रणेला निष्क्रिय केले.
अशा परिस्थितीत इराणी वायू सेनेच्या एका ग्रुपने स्वत:च क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली. ‘आयआरजीसी’च्या छोट्या गटांनी रॉकेट आणि लॉन्चर्स खोलून त्यांचे ‘रिव्हर्स इंजीनियरिंग’ सुरू केले.
ज्यांना इराणी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते, त्या हसन तेहरानी मुक़द्दम यांनी ‘झिरो टू वन हंड्रेड मिसाइल प्रोग्राम’ नावाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितल्यानुसार, इराणमधून लिबियाचे सल्लागार गेल्यानंतर रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या 13 सदस्यांना स्कड बॅलेस्टिक क्षेपणास्त्रवरच्या प्रशिक्षणासाठी सीरियाला पाठवविले गेले.
अगदी कमी वेळेत त्यांनी स्कड क्षेपणास्त्रांची निर्मिती प्रक्रिया समजावून घेतली.
1986मध्ये मुक़द्दम यांना इराणी वायू सेनेचे क्षेपणास्त्र कमांडर बनविले गेले. 1988 नंतर इराणी ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’ने गांभीर्याने क्षेपणास्त्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले.

फोटो स्रोत, TASNIM
स्टिम्सन इन्स्टिट्यूटमधील वैश्विक सुरक्षा, संबंधित तंत्रज्ञान संशोधक आणि ‘नाटो’चे शस्त्रास्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे माजी संचालक विल्यम अल्बर्क यांनी बीबीसी फ़ारसीला सांगितले, की गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि उत्तर कोरियानेही इराणला व्यापक प्रमाणात क्षेपणास्त्रांसाठी सहकार्य केले. त्यानंतर इराणला स्वत:ची क्षेपणास्त्रे बनविण्यासाठी रशियाची मदत मिळाली.
“इराण तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूपच विकसित देश बनला आहे. याकडे आत दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांनी क्षेपणास्त्रांचे ‘रिव्हर्स इंजीनियरिंग’ केले. म्हणजेच त्यांचे सुटे भाग खोलून ते पुन्हा जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले,” असेही विल्यम अल्बर्क यांनी नमूद केले.
1990च्या दशकात सुरुवातीला उत्तर कोरिया आणि नंतर चीनने इराणच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला मदत केली. परिणामी जगातील काही महाशक्तींनी चीनला ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण कार्यक्रमा’चे सदस्य करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याअंतर्गत क्षेपणास्त्र उत्पादन, विकास आणि तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्यात येते. जगातील 35 सदस्य देशांचे सदस्य या उपक्रमात सहभागी आहेत. चीन या करारात सहभागी होण्यास तयार झाला नाही. मात्र कराराच्या अटींचे पालन करण्याची तयारी चीनने दर्शविली.
‘नाजेआत’ आणि ‘मुज्तमा’ हे इराणमध्ये बनविले गेलेले पहिले रॉकेटस्. त्यानंतर लगेचच ‘थंडर 69’ क्षेपणास्त्र समोर आले. खरे तर ते कमी पल्ल्याचे चिनी बी 610 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रच आहे. इराणी सेनेने त्याचेच नवीन डिझाईन बनवून ते वापरात आणले.
इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’च्या ‘एरोस्पेस मिसाइल युनिट’मध्ये हसन तेहरानी मुक़द्दमच्या यांच्या निगराणीखाली सुरू होता. त्यावेळी हा कार्यक्रम ‘आयआरजीसी एअर फ़ोर्स’चे कमांडर अहमद काज़मी यांच्या मदतीने 2000 च्या दशकात तयार झाला होता. बॅलेस्टिक आणि सॅटेलाईट इंजिनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानात इराणची प्रगती व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता.

फोटो स्रोत, TASNIM
इराणच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा दुसरा टप्पा ‘फतह 110’ या क्षेपणास्त्राने सुरू झाला.
इराणच्या या क्षेपणास्त्र विकासात हसन मुक़द्दम यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. 2009 मध्ये त्यांनी एका कार्यक्रमात पहिल्यांदा ‘एक्स्ट्रा हेवी सॅटेलाइट इंजिन’ मालिकेची चाचणी केली.
इराणी सूत्रांनी सांगितल्यानुसारस हसन मुकद्दम 12 नोव्हेंबर 2011 या दिवशी एका स्फोटात 16 लोकांसोबत मारले गेले. अनेकांच्या म्हणण्यानुसार तो स्फोट एका कटाचा भाग होता. त्यानुसार मुकद्दम यांची हत्या करण्यात आली.
हसन मुकद्दम एका नव्या क्षेपणास्त्राच्या चाचणीची तयारी करत होते, तेव्हा दोन स्फोट झाले. दुसऱ्या स्फोटात ते मारले गेले. या स्फोटांमागचे खरे कारण कधीच समोर आले नाही. मात्र "इस्त्रायलला उद्धवस्त करू इच्छिणाऱ्या मनुष्याची ही कबर आहे" असे हसन मुकद्दम यांच्या कबरीवर लिहिले गेले.
सध्या इराणमध्ये अमीर अली हाजीजादा यांच्या नेतृत्वाखाली क्षेपणास्त्र आणि ड्रोन बनविणारी ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’ची ‘एरोस्पेस फ़ोर्स’ ही सर्वात मोठी संस्था कार्यरत आहे. इराणच्या विदेशामधील कारवाया याच संस्थेतर्फे पार पाडल्या जातात.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' कारणांमुळे काही देशांसाठी पॅलेस्टाईन अजूनही 'स्वतंत्र राष्ट्र' नाहीय
- उपासमार, अन्नदुर्भिक्ष्य म्हणजे काय? फॅमिन केव्हा जाहीर केला जातो?
- जेव्हा फक्त 6 दिवसांच्या युद्धामुळे सुएझ कालवा तब्बल 8 वर्षांसाठी बंद पडला होता
- गाझा: जीव वाचवण्यासाठी ही चिमुकली मृतदेहांत लपून बसली, पण इस्रायली हल्ल्यात झाला मृत्यू

क्षेपणास्त्रांची भुयारी शहरे
इराण नेहमी आपल्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करतो. ‘लष्करी शस्त्र निर्मितीमधील यश’ असे त्याचे वर्णन करतो. मात्र त्यांची क्षेपणास्त्र निर्मिती आणि क्षेपणास्त्र तळांबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली आहे.
रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या दाव्यानुसार देशातील डोंगरामध्ये विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भुयारे खोदण्यात आली आहेत. तेथेच त्यांचे क्षेपणास्त्रांचे तळ आहेत.
2014 मध्ये पहिल्यांदा वायुसेनेचे कमांडर अमीर अली हाजीज़ादा यांनी इराणच्या क्षेपणास्त्र तळांबाबत माहिती दिली. त्यानुसार हे तळ विविध प्रांतांमध्ये जमिनीच्या खाली 500 मीटरहून अधिक खोलीवर तयार केले गेले आहेत.
हे अंडरग्राउंड क्षेपणास्त्र तळ कधी बनवले गेले, याविषयी काही खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. इराणी वृत्तसंस्थेच्या सैनिक विभागाचे प्रवक्ता मेहदी बख़्तियारी यांनी ‘अल जजीरा’च्या मुलाखतीत म्हटले होते, पश्चिम इराणमध्ये पहिला अंडरग्राउंड क्षेपणास्त्र तळ 1984 मध्ये बनविला गेला होता. त्याच वेळी इराणचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरू झाला होता.
इराणी प्रसारमाध्यमे आणि रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स यांनी आत्तापर्यंत अनेक अंडरग्राऊंड क्षेपणास्त्र तळांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ज्यांना ते ‘मिसाईल सिटी’ अर्थात क्षेपणास्त्राची शहरे असे संबोधतात. तथापि या तळांची नेमकी जागा सांगितली जात नाही. सरकारी पातळीवरही या गुप्त जागांबाबत नेहमीच मौन पाळले गेले आहे.

फोटो स्रोत, IMA
या गुप्त क्षेपणास्त्र तळांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये एका मोठ्या तळामध्ये महत्त्वाची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन ठेवण्यात आल्याचे दिसते.
तसेच त्याबाबात प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये क्षेपणास्त्रे आणि त्यांच्या लॉन्चरने भरलेला एक कॉरिडॉर दिसत आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणाहून क्षेपणास्त्रे डागली जातात, ती जागाही दाखविण्यात आली आहे.
मार्च 2019 मध्ये ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’ने फ़ारस खाड़ीच्या समुद्र किनाऱ्यावरील एक ‘समुद्री क्षेपणास्त्र शहर’ प्रसिद्धी माध्यमांतून दाखवले. हरमुज़गान प्रांतातील स्थानिक प्रसार माध्यमांनी त्याबाबतच्या बातम्या दिल्या.
इऱाणी रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर इन चीफ हुसैन सलामी यांनी फ़ारस खाड़ीच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या ‘सागरी क्षेपणास्त्र शहरा’बद्दल म्हटले होते, की आमच्या नौसेनेचा हा सर्वात महत्त्वाचा क्षेपणास्त्र तळ आहे.
इराणच्या या अंडरग्राऊंड क्षेपणास्त्र तळांची नेमकी संख्या सांगणे कठीण आहे. परंतु इराण लष्कराचे कमांडर अहमद रजा पोर्दिस्तान यांनी जानेवारी 2014 मध्ये घोषित केले होते, की या अंडरग्राऊंड क्षेपणास्त्र शहरांचा ताबा केवळ रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सकडेच नाही, तर अशी कित्येक शहरे इराणी सेनेच्या ताब्यात आहेत.
अमीर अली हाजीजादा यांनी ‘आयआरजीसी’च्या वतीने इराणमधील क्षेपणास्त्र बनविणाऱ्या तीन अंडरग्राउंड क्षेपणास्त्र कारखान्यांचीही माहिती दिली.
विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांची इराणमध्ये निर्मिती
इराणच्या सशस्त्र फौजांतर्फे रॉकेट, क्रूज़ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनविली जातात.
इराणमध्ये तयार होणारे सर्वात महत्त्वाचे क्षेपणास्त्र म्हणजे, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे खूप उंचावरून आणि एका विशिष्ट कोनात उड्डाण करतात. हे क्षेपणास्त्र तीन टप्प्यात डागले जाते. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेपणास्त्र सुमारे 24 हजार किलोमीटर प्रतितास एवढा प्रचंड वेग पकडते.
क्रूझ क्षेपणास्त्र पूर्णपणे नियंत्रित असते. कमी उंचावरून उडण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे ते रडारवर दिसत नाही. 800 किलोमीटर प्रतितास वेगाने ते उड्डाण करते.
चार प्रकारची इराणी क्षेपणास्त्रे आहेत :
- रॉकेट
- क्रूझ क्षेपणास्त्र
- बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
- हायपरसॉनिक क्षेपणास्त्र
यामध्ये जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून समुद्रात डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अर्थात याव्यतिरिक्त इराणकडे रशियन आणि चिनी बनावटीचीही क्षेपणास्त्रे आहेत.
एप्रिल 2024 मध्ये इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यामध्ये इराणने त्यांच्याकडील ‘इमाद थ्री’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, ‘पावह’ क्रूज क्षेपणास्त्र आणि ‘शाहिद 136’ ड्रोनचा वापर केला होता.
याशिवाय इराणच्या सरकारी बातमीपत्रात ‘ख़ैबर शिकन’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागल्याचा दावा करण्यात आला होता.
इमाद बॅलेस्टिक एक मध्यम अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 1700 किलोमीटर असल्याचा दावा केला जातो. त्याची लांबी 15 मीटर आहे. त्याचे वॉरहेड अर्थात स्फोटकाग्राचे वज़न 750 किलोग्राम आहे. या क्षेपणास्त्राला 2015 मध्ये जगापुढे आणले गेले.
इमाद क्षेपणास्त्र हे ‘अल कद्र’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे सुधारित रूप आहे.
‘पावह’ ही मध्यम अंतरावर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांची शृंखला आहे. ज्यांची रेंज 1650 किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्राबद्दल असे सांगितले जाते, की वेगवेगळ्या मार्गांनी ही क्षेपणास्रे बरोब्बर लक्ष्यावर जाऊन आदळतात.
‘पावह’ क्षेपणास्त्रांमध्ये हल्ला करताना एकमेकांशी संपर्क साधण्याची यंत्रणा आहे. त्यामुळेच इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी या क्षेपणास्त्रांची निवड करण्यात आली.
‘पावह’ क्षेपणास्त्राला फेब्रुवारी 2023 मध्ये जगापुढे आणले गेले. त्याच वेळी इराणने दावा केला होता, की या क्षेपणास्त्रामध्ये इस्त्रायलवर हल्ला करण्याची क्षमता आहे. 13 एप्रिलच्या हल्ल्याने इराणचा हा दावा सिद्ध झाला.
इराणजवळ सध्या दोन ते अडीच हजार किलोमीटरवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत. अर्थात सध्या तरी या क्षेपणास्त्रांमध्ये युरोपीय देशांवर हल्ला करण्याची क्षमता नाही.
इराणच्या सशस्त्र सेनांनी दावा केला, की त्यांचे सर्वोच्च नेते अली ख़ामेनेई यांच्या सूचनेप्रमाणे सध्या केवळ दोन हज़ार किलोमीटरपर्यंतच मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे बनविण्यात आली आहेत. आयातुल्ला अली खामेनी यांच्या म्हणण्यानुसार त्याचे एक विशिष्ट कारण आहे, मात्र त्यांनी ते कारण स्पष्ट केलेले नाही.
‘जुल्फिकार’ नावाचे कमी अंतरावर म्हणजे 700 किलोमीटरवर मारा करू शकणारे एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ज्याचा उपयोग 2017 आणि 2018 मध्ये दाएश (आयएसआयएस) च्या ठाण्यांवर हल्ला करण्यासाठी केला गेला होता. या क्षेपणास्त्राची लांबी 10 मीटर आहे. त्यामध्ये एक मोबाईल लॉन्च प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे ते रडारवर दिसत नाही, असा दावा केला जातो.
‘जुल्फिकार’ हे फतेह 110 या क्षेपणास्त्राचे सुधारित रूप आहे. त्याच्या वॉरहेड अर्थात स्फोटक टोकाचे वज़न 450 किलो आहे.
आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे विशेषज्ञ विल्यम अल्बर्क यांनी बीबीसीला सांगितले, की “इराणजवळ मोठ्या क्षमतेची क्षेपणास्त्रे आहेत. दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या क्षेपणास्त्रांची त्यांनी थेट नक्कल केली आहे. इराणची क्षेपणास्त्रे आता द्रव इंधनाकडून घन इंधनामध्ये रुपांतरीत होत आहेत. ती अधिकाधिक अचूकतेकडे जात आहेत. या बाबतीत इराणने खूपच विकास केला आहे.”
‘अल फतह’चा वेग : 5 किलोमीटर प्रति सेकंद
विल्यम अल्बर्क यांनी गेल्या काही वर्षांमध्ये इराण आणि रशियामधील सैनिकी सहकार्याचा उल्लेख करत सांगितले, की यातून इराणच्या सैनिकांना रशियाकडून खूप काही शिकायला मिळेल आणि त्यांना क्षेपणास्त्रांमधील आधुनिक तंत्रज्ञान, डिझाईन आणि क्षमता याबाबतचे ज्ञान मिळेल.
दुसरीकडे इराणने दावा केला आहे, की त्यांच्या क्षेपणास्त्रांची नवीन पिढी हायपरसॉनिक शस्त्रांची आहे. हायपरसॉनिक म्हणजे त्यांचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 5 ते 25 टक्के अधिक असतो.
इराणने पहिल्यांदा फ़तह क्षेपणास्त्राला बॅलेस्टिक आणि क्रूझ या दोन्ही प्रकारांमध्ये हायपरसॉनिक म्हणून विकसित केले आहे.
‘अल-फतह’ हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची रेंज 1400 किलोमीटर आहे. आणि आयआरजीसीने दावा केला आहे, की क्षेपणास्त्र नष्ट करणाऱ्या सर्व सुरक्षा प्रणालींना चकवा देऊन लक्ष्य गाठण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.
‘अल-फतह’ ही घन इंधन क्षेपणास्त्रांची एक साखळी आहे. लक्ष्यावर जाऊन आदळण्यापूर्वी त्यांचा वेग 13 ते 15 ‘मॅक’ अर्थात 15 म्हणजे 5 किलोमीटर प्रति सेकंद एवढा आहे.
रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स एरोस्पेस आर्गनायझेशनचे कमांडर अमीर अली हाजीज़ादा ने अल-फ़तह क्षेपणास्त्राच्या अनावरण समारंभात म्हटले होते, वातावरण भेदून जाण्याचीही या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राला दुसरे क्षेपणास्त्र नष्ट करू शकत नाही, असा दावाही हाजीदादा यांनी केला.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अल-फतह बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या अनावरणानंतर तेहरानच्या ‘पॅलेस्टाईन स्क्वेअर’वर एक जाहिरात लावण्यात आली. ज्यात इस्त्रायलला धमकी देणारा मजकूर लिहिला होता, ‘400 सेकंदात तेल अवीव!’
या धमकीवर इस्त्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंटने यांनी उत्तर देताना म्हटले होते, “आमचा दुश्मन आपल्या शस्त्रास्त्रांबद्दल फारच बढाई मारतो आहे. पण लष्करी दृष्ट्या विकसित केलेल्या कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाला आमच्याकडे उत्तर आहे. मग ते जमिनीवरचे असो, हवेतील असो किंवा समुद्रावरील.”
‘अल-फतह 1’च्या अनावरणानंतर चार महिन्यांनी रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स ने अल-फतह 2’ ते अनावरण केले. ज्याची मारक क्षमता 1500 किलोमीटरपर्यंत आहे.
इराणी माध्यमांनी म्हटल्यानुसार ‘अल-फतह 2’ खूप कमी उंचीवरून उड्डाण करू शकते. शिवाय या उड्डाणादरम्यान ते आपला रस्ताही बदलू शकते.
इराणचे सर्वोच्च नेता अली ख़ामेनेई यांनी आयआरजीसी सोबत संलग्न असलेल्या एरोस्पेस सायन्सेस अँड टेक्नोलॉजीच्या आशूरा विद्यापीठाचा दौरा केला. त्याच वेळी त्यांनी ‘अल-फ़तह 2’ या क्रूझ क्षेपणास्त्राचे अनावरण केले. अद्याप या क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
इस्त्रायलला तोंड देण्यासाठी इराणने फतह क्षेपणास्त्र बनविले असले, तरी त्यांनी 13 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यांमध्ये त्याचा वापर केला नाही.
इराणचे सीमेवर ‘मिसाईल ऑपरेशन’
गेल्या दशकभरात इराण विविध कारणांमुळे प्रादेशिक वादात अडकला आहे. त्याने देशाशी शत्रुत्व असलेल्या काही गटांविरुद्ध आणि देशांविरुद्ध सीमापार जाऊन कारवाया केल्या आहेत.
या सर्व कारवाया इराणी सेनेऐवजी रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या एअर फोर्सने केल्या आहेत.
एक लक्षणीय बाब अशी, की रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सची विदेशात कार्यरत असलेली शाखा म्हणजेच ‘कुद्स फोर्स’ इराण-इराक युद्धानंतर अफ़ग़ानिस्तानापासून ते बोस्निया आणि हर्ज़ेगोविना, इराक, सीरिया, लेबनॉन आदी देशांमध्ये कार्यरत होती. पण त्यांना इराणने अधिकृत सैन्य म्हणून घोषित केले नाही.
इराण-इराक युद्धाच्या समाप्तीनंतर इराणच्या धरतीवरून दुसऱ्या देशावरील हल्ला सीरियातील दीर अल-जोर शहरातील ‘दाएश’च्या विरुद्ध झाला होता. या लष्करी कारवाईला ‘लैलतुल कद्र’ असे नाव दिले गेले होते. इस्लामी कौन्सिलवर ‘दाएश’ने केलेल्या हल्ल्याला हे प्रत्युत्तर होते. यामध्ये 'जुल्फिकार' आणि 'कयाम' ही सहा मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे किरमान शाह आणि कुर्दिस्तानमधून 'दाएश'च्या मुख्यालयावर डागण्यात आली.
त्यानंतर इराकच्या कुर्दिस्तान भागात असलेल्या क्वेसांजाक येथील कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराणच्या मुख्यालयाला सात 'अल-फतह 110' क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्यात आले. त्याबाबत एका निवेदनात, रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने जाहीर केले, की हा जुलै 2017 मरीवानमधील सय्यद अल-शोहादा हमजा तळावर झालेल्या हल्ल्याचा बदला होता.

फोटो स्रोत, KHABAR ONLINE
9 ऑक्टोबर 2017 रोजी इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने 'मोहर्रम हल्ला' नावाच्या कारवाईत 'कयाम' आणि 'जुल्फिकार' क्षेपणास्त्रांसह सात सैनिक ड्रोन्सच्या सहाय्याने सीरियातील सहा सशस्त्र दलांच्या परेडवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यात त्यांनी फरात नदीच्या काठावरील ‘दाएश’चा तळ उद्धवस्त केला.
18 जानेवारी 2018 रोजी इराकमध्ये अमेरिकेच्या हातून झालेल्या कुदस् फोर्सचा कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूला इराणने प्रत्युत्तर दिले. रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स एअर फोर्सने इराकमधील अमेरिकेचा सर्वात मोठा तळ असलेल्या ऐनुल असद येथे 13 'फतह-313' आणि 'कायम 2' ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी अर्बिल येथील तळावरही हल्ला करण्यात आला.
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर शेजारील देशांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले वाढले.
मार्च 2022 मध्ये रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने बझकरीम बरझांजी यांच्या घरावर बार फताह-110 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. ज्यांच्याबद्दल इराणने दावा केला होता, की कुर्दिस्तान प्रदेशातील इस्रायलच्या रणनीती केंद्रांपैकी ते एक होते.
पुढच्या वर्षी रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स एअर फोर्सने 'रबी 1' आणि 'रबी 2' नावाच्या ऑपरेशनमध्ये इराकच्या कुर्दिस्तानमध्ये कुर्द पार्टीच्या मुख्यालयावर 'फतह 360' क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
जानेवारी 2024 मध्ये आयआरजीसीने पुन्हा एकदा एका इराकी कुर्दिश व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला केला, ज्याला त्यांनी मोसादचे मुख्यालय असे म्हटले. त्यासोबतच अदलिबमधील 'दाएश' आणि हिज़्ब अल-तुर्किस्तानीच्या तळांवर देखील हल्ला केला.
26 जानेवारी 2024 रोजी रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील जैश अल-अदल गटाच्या केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केला. दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला एखाद्या देशाने थेट प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच वेळ होती.
इराणी जनरल मोहम्मद रजा जाहिदी आणि इतर सहा आआरजीसी अधिकारी दमास्कसमधील इराणी कौन्सिल हाऊसच्या इमारतीवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाले. त्यानंतर इराणने 'वहदतुल सादिक' नावाच्या कारवाई दरम्यान शेकडो ड्रोन, क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला. गोलान पर्वतांमधील हवाई हद्दीत हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला.
इराणी क्षेपणास्त्रांनी नवातीम हवाई तळावर किमान दोनदा हल्ला करून त्याचे नुकसान केले.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा संशोधक विल्यम अल्बर्क यांनी बीबीसीला सांगितले की, इराणने इस्त्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये काही वेळा नेमकेपणाचा अभाव दिसला, मात्र या हल्ल्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.
ते केवळ इस्रायलच्या संरक्षण क्षमतेबद्दलची अवगत झाले नाहीत, तर इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी इस्त्रायलला मदत करणाऱ्या देशांबाबतही त्यांनी खूप काही माहिती मिळाली.
इराणने क्षेपणास्त्रांची मारक क्षमता का वाढवली?
इराणी क्रांतीपूर्वी इराणचा सर्वात मोठा मित्र देश होता, अमेरिका. इराणने लढाऊ विमानांसह बहुतेक लष्करी शस्त्रे अमेरिकेकडून खरेदी केली होती.
इराणने त्यांच्याकडून 160 'एफ-5' विमाने खरेदी केली, जी तुलनेत परवडणारी होती. इराणसाठी मोठ्या प्रमाणात मॅक्डोनेल डग्लस एफ-4 ही लढाऊ विमाने देखील खरेदी करण्यात आली होती. जी अजूनही हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट आहेत.
इराणच्या शाहने लढाऊ विमाने बदलण्याचा निर्णय घेतला. आणि 60 ‘एफ 16’ टॉम कॅटची ख़रेदी केली गेली. त्यावेळी इराण मध्य पूर्वेतील सर्वाधिक लढाऊ विमाने बाळगणाऱ्या देशांमधील एक देश होता.
इस्लामिक क्रांतीनंतर तेहरानमधील दूतावासावर हल्ला करून कब्जा मिळवल्यामुळे इराण आणि अमेरिकेचे संबंध कायमचे संपले. शस्त्रांच्या निर्बंधांसह इतर अनेक प्रकारच्या निर्बंधांमधून अमेरिकेने इराणला लक्ष्य केले.

फोटो स्रोत, ANI
आधुनिक शस्त्रे आणि लढाऊ विमाने खरेदी करण्याची इराणची ऐपत नव्हती. शिवाय युद्धादरम्यान इराकच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इराणच्या आतील भागांना लक्ष्य केले. त्यामुळे पुढील काळात क्षेपणास्त्र विकास हाच इराणसमोरचा पर्याय होता. त्यातून स्वत:चे संरक्षण आणि शत्रूच्या प्रदेशात मुसंडी मारणे शक्य होते.
विल्यम अल्बर्क म्हणतात, की क्षेपणास्त्र हे लढाऊ विमानांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. त्यासाठी फारसे प्रशिक्षण आणि वैमानिकांची आवश्यकता लागत नाही. नागरिकांनाही त्यापासून कमी धोका आहे. कारण क्षेपणास्त्र डागणे तुलनेने सोपे आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “इराण आता स्वतःची क्षेपणास्त्रे तयार करू शकतो, जी लढाऊ विमानांपेक्षा खूपच स्वस्त आहेत. त्यामुळे इराण अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या शोधात आहे.
या माजी नाटो शस्त्रास्त्र नियंत्रण तज्ज्ञाचे म्हणणे आहे, की क्षेपणास्त्रासाठी अवलंबून असणाऱ्या देशांसोबतच्या लष्करी आणि राजकीय संबंधांसाठी क्षेपणास्त्र विकास उपक्रम इराणसाठी फायदेशीर ठरणारा आहे.
मात्र इराणच्या वाढत्या क्षेपणास्त्र सज्जतेमुळे प्रदेशातील वाद आणि तणावही वाढत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की इराण पश्चिम आणि मध्यपूर्वेतील देशांवर होणारे क्षेपणास्त्र हल्ले टाळण्यात यशस्वी झाला आहे. मात्र ही परिस्थिती किती दिवस राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसरीकडे, इराणला आपल्या क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढविण्यास भाग पाडले जाईल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











