इस्रायल-इराण युद्ध झाल्यास भारतीय नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याचा किती धोका आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इराणने एक ऑक्टोबरला रात्री इस्रायलवर अनेक बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला. इराणने इस्रायलवर या वर्षात थेट हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे.
हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नरसल्लाह आणि हमासचे नेते इस्माइल हानिये यांच्या मृत्यूनंतर इराणतर्फे केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार इराणनं 181 बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला. त्यात एक पॅलेस्टिनी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पाच महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर 110 बॅलिस्टिक मिसाईल आणि 30 क्रूज मिसाईलने हल्ला केला होता.
मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्वाचं हे नवीन पर्व लवकर संपेल अशी चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं सांगितलं. “इराणनं आज खूप मोठी चूक केली असून त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल,” असं ते म्हणाले.
नेतन्याहू यांनी हे विधान करण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली होती. “आपल्या जगात आतंकवादाला अजिबात थारा नाही,” असं मोदी म्हणाले.
त्यामुळं आता प्रश्न उपस्थित होतो की, जर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झालं तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल?
भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री?
इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्व भागात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर झालेला पहायला मिळत आहे.
इराण इस्रायलवर मिसाईल हल्ला करणार अशी शंका व्यक्त केली जात होती, तेवढ्या वेळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती तीन पटीने वाढल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड (Brent Crude) हे तेलाच्या किमती सांगणारं एक मानक आहे. ते एक टक्क्याने वाढून 74.40 डॉलर प्रति बॅरल झालं आहे. मंगळवारी तर बाजार सुरू असताना त्यात पाच टक्के उसळी पहायला मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन काऊंसिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स या संस्थेतील सीनिअर फेलो डॉ.फज्जुर्रहमान म्हणतात की, जर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झालं तर भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
त्यांच्या मते, “युद्ध झालं तर त्याचा परिणाम फक्त इराणपर्यंतच राहणार नाही. तर अफगाणिस्तान, इराक, सौदी अरेबिया, कतार आणि यूएईपर्यंत जाणवेल. या देशांमधून भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो.”
“अशा प्रकारे हल्ले होत राहिले तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि मागणी वाढेल. असा परिस्थितीत तेलाचे भाव वाढतील आणि भारतावर त्याचा थेट परिणाम होईल,” असंही ते म्हणाले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील नेल्सन मंडेला सेंटर फॉर पीस अँड कॉनफ्लिक्ट रेझॉल्युशन केंद्रातील प्रा. रेशमी काझी यांनीदेखिल या मुद्द्याला दुजोरा दिला.
“आखाती परिसर आणि तांबडा समुद्र दोन्ही युद्धाच्या क्षेत्रात येतात. युद्ध आणखी तीव्र झालं तर तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
भारतासमोर मुत्सद्देगिरीचं आव्हान
भारताचे इराण आणि इस्रायल दोन्ही देशांबरोबर चांगलं संबंध आहेत. भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांपैकी इराण हा कायमच आघाडीवर राहिलेला आहे.
अणुचाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्बंध असतानाही भारत आणि इराणचे संबंध सुरळीत आहेत.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं तेव्हा भारताने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी एक निवेदन जारी केलं होतं, “संपूर्ण भारतात दुखवट्याच्या दिवशी सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. त्या दिवशी देशात मनोरंजनाचा कोणताही अधिकृत सरकारी कार्यक्रम होणार नाही.”
तर 1948 मध्ये अस्तित्वात आलेल्या इस्रायलने भारताबरोबर राजनैतिक संबंध 1992 मध्ये प्रस्थापित केले होते. मात्र गेल्या दोन दशकांपासून या दोन्ही देशात संबंध आणखी मजबूत झाले आहेत.

फोटो स्रोत, ANI
इस्रायल हा भारताला शस्त्रं आणि तंत्रज्ञानात सहाय्य करणारा आघाडीचा देश आहे.
डॉ.फज्जुर्रहमान यांच्या मते, “दोन्ही देशामध्ये राजनैतिक संतुलन ठेवणं हेही भारतासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. आतापर्यंत हे काम भारतानं अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने केलं आहे. गेल्या दहा वर्षातील भारतीय मुत्सद्देगिरीचा विचार करता, भारतानं कधीच एकाची बाजू उचलून धरली नाही.
प्रा. रेशमी काझी म्हणतात की अशा पद्धतीने दोन्ही देशांमध्ये संतुलन ठेवणं हीच एक प्रकारची मुत्सद्देगिरी आहे, कारण भारत कोणालाच नाराज करू शकत नाही.
“भारत इस्रायलच्या बाजुनं झुकला तर इराणबरोबरचे संबंध बिघडतील. त्याचा थेट परिणाम आखाती देशात राहणाऱ्या लोकांवर होईल,” असं त्या म्हणाल्या.
“इराणनं नुकतंच पोर्तुगालचा झेंडा असलेलं एक मालवाहू जहाज ताब्यात घेतलं होतं. त्यात 17 भारतीय लोक होते. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर भारतीयांना सोडण्यात आलं. अशा प्रकारच्या घटनांना एक संदेश म्हणून पहायला हवं, की इराणबद्दल काही भेदभाव झाला तर भारताची प्रतिक्रिया समोर येऊ शकते.” असंही त्यांनी म्हटलं.
भारतीय प्रकल्पांना फटका बसेल का?
इराणमधील चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. या बंदराच्या मदतीनं भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी पाकिस्तानातून जाणारा मार्ग टाळता येईल.
दोन्ही देश 2015 मध्ये चाबहारमध्ये शाहीद बेहेश्टी बंदराच्या विकासासाठी एकत्र आले होते.
डॉ.फज्जुर्रहमान म्हणतात की, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झालं तर इराणचा प्राधान्यक्रम बदलून त्यांचं चाबहारवरचं लक्ष कमी होईल. ते इस्रायल मुद्द्यावर जास्त लक्ष देतील आणि हे काम थांबेल.
प्रा. रेशमी काझी म्हणतात की, चाबहार प्रकल्पावर मध्य पूर्वेतील भौगोलिक राजकारणाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळं हा प्रकल्प पुन्हा एकदा थांबेल.
तर दुसऱ्या बाजूला डॉ.फज्जुर्रहमान म्हणतात की, मध्य पूर्व भागात भारत अनेक मोठ्या प्रकल्पांचा भाग आहे. अशा परिस्थितीत नवीन युद्ध सुरू झालं तर या प्रकल्पांवरून लक्ष विचलित होईल आणि ते वेळेवर पूर्ण होणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
2023 मध्ये दिल्लीत झालेल्या जी-20 परिषदेदरम्यान भारत-मध्य पूर्व- युरोप आर्थिक कॉरिडॉर योजनेवर सह्या झाल्या होत्या. त्यात भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, यांच्याबरोबर युरोपियन महासंघ, इटली, फ्रान्स, आणि जर्मनीची भागिदारी असेल.
एक मोठं वाहतुकीचं जाळं तयार करणं हा या कॉरिडोरचा मुख्य उद्देश आहे. त्याच्या मदतीने भारतातील माल गुजरातच्या कांडला बंदरातून यूएई, सौदी अरेबिया, इस्रायल आणि ग्रीस मार्गे युरोपात अगदी सुरळीत पोहोचू शकेल.
डॉ.फज्जुर्रहमान म्हणतात की, युद्ध झालं तर सर्वांत जास्त नुकसान भारत-मध्य पूर्व- युरोप आर्थिक कॉरिडॉरचं होईल. कारण त्याचं संपूर्ण वेळापत्रक बिघडेल.
त्याशिवाया I2U2 यांसारख्या व्यापारी गटांना ही अडचणींचा सामना करावा लागेल. या गटात भारत, इस्रायल, अमेरिका आणि यूएई आहे.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' कारणांमुळे काही देशांसाठी पॅलेस्टाईन अजूनही 'स्वतंत्र राष्ट्र' नाहीय
- उपासमार, अन्नदुर्भिक्ष्य म्हणजे काय? फॅमिन केव्हा जाहीर केला जातो?
- जेव्हा फक्त 6 दिवसांच्या युद्धामुळे सुएझ कालवा तब्बल 8 वर्षांसाठी बंद पडला होता
- गाझा: जीव वाचवण्यासाठी ही चिमुकली मृतदेहांत लपून बसली, पण इस्रायली हल्ल्यात झाला मृत्यू

परकीय गंगाजळीवर परिणाम?
कामाच्या शोधात अनेक लोक आखाती देशात जातात. भारतातील परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सौदी अरेबिया, यूएई, ओमान, बहरीन, कतार आणि कुवेतमध्ये जवळपास 90 लाख भारतीय आहेत.
त्यातील सर्वांत जास्त म्हणजे 35 लाखापेक्षा जास्त लोक यूएईत राहतात. तर सौदी अरेबियात 25 लाख, कुवेतमध्ये 9 लाख, कतारमध्ये 8 लाख, ओमानमध्ये 6.5 लाख आणि बहरीनमध्ये जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त लोक राहतात.
इराणबद्दल बोलायचं झालं तर ही संख्या 10 हजार तर इस्रायलमध्ये 20 हजार लोक राहतात. इथे राहणारे लोक ठी रक्कम भारतात पाठवतात.
आखाती देशाचे चलन भारतापेक्षा अधिक मजबूत आहे. त्याचा फायदा कामगारांना होतो. बहरीन येथील एक दिनार 221 रुपयांच्या आसपास आहे. तर ओमानमधील एक रियालची भारतातील किंमत 217 रुपये आहे. याशिवाय कतारी रियाल, सौदी रियाल आणि यूएई मध्ये रियालचं मूल्य 22 ते 23 रुपयाच्या आसपास आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ.फज्जुर्रहमान म्हणतात की, “आखाती देशातील भारतीय लोक लाखो डॉलर्स भारतात पाठवतात. त्यामुळं भारतातील परकीय गंगाजळी अधिक मजबूत होते. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं तर त्याचा परिणाम परकीय चलनावर होईल.”
17व्या लोकसभेत परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या अहवालानुसार डिसेंबर 2023 पर्यंत सौदी अरेबिया, यूएई, ओमान, बहरीन, कतार आणि कुवेतमुळे भारताला 120 अब्ज अमेरिकन डॉलर मिळाले.
डॉ.फज्जुर्रहमान म्हणतात, “युद्धाच्या परिस्थितीत आखाती देशात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढणं आणि त्यांना भारतात पुन्हा स्थिरस्थावर करणं हे एक मोठं आव्हान असेल आणि ते सोपं नाही.”
भारताच्या सुरक्षेला धोका?

फोटो स्रोत, Getty Images
युद्ध झालं तर भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञांना वाटतं.
डॉ.फज्जुर्रहमान यांच्या मते, “सत्तेची पोकळी निर्माण होते तेव्हा इतर लोक त्याचा फायदा घेतात. अरब देशांमध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्याचा सर्वात जास्त फायदा तिथली मिलिशिया घेते” (मिलिशिया हे लोक लष्करी प्रशिक्षण घेतलेले नागरिक असतात. पण ते सैन्यदलात नसतात.)


ते म्हणतात, “जेव्हा अरब स्प्रिंग झालं तेव्हा आयएसआय समोर आलं. मग इस्लामिक स्टेटचा उदय झाला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या दिशेने गेले. पाकिस्तानच्या सुरक्षेला आव्हान दिलं.”
“या सर्व संघटना भारताकडं येऊ शकतात असंही तेव्हा सांगण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत इराण-इस्रायलमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे त्याचा परिणाम भारतावर नक्कीच होणार आहे,” असंही फज्जुर्रहमान म्हणाले.
“सध्या तरी इस्लामिक स्टेट सारखी संघटना दबून आहे. मात्र युद्धाच्या परिस्थितीत त्यांना स्वत:ची शक्ती वाढवण्याची संधी मिळेल,” असं त्यांचं मत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











