इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला, नेतन्याहू म्हणाले, 'इराणनं मोठी चूक केलीय, भरपाई करावी लागेल'

फोटो स्रोत, Reuters
इराणने आपल्यावर मिसाईल हल्ला केला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणने त्यांच्यावर जवळपास 180 मिसाईल्स डागले आहेत. यातील बहुतांश मिसाईल्सना चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहितीही इस्रायलने दिली आहे.
मिसाईल्सच्या या अखंड भडीमारामध्ये वेस्ट बँक येथील एका पॅलेस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे; तर मध्य इस्रायलमधील एका शाळेचं आणि तेल अव्हीव्हमधल्या एका रेस्टॉरंटचं मोठं नुकसान झालं आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, "इराणने आजच्या रात्री फार मोठी चूक केली आहे. त्याला याची भरपाई करावी लागेल."
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यापूर्वी इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलच्या लष्कराने प्रत्यक्ष जमिनीवरुनही लेबनॉनवर आक्रमण केलं. आपलं हिजबुल्लाह विरोधातील हे मैदानी आक्रमण 'लिमीटेड, लोकलाईझ्ड आणि टार्गेटेड' असेल, असेही इस्रायलने स्पष्ट केले होते.
दुसऱ्या बाजूला संयुक्त राष्ट्रांनी तसेच युरोपियन संघाने युद्धविरामसाठीचे आवाहन केलं आहे.
इराणच्या हल्ल्याला इस्रायल कशाप्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतो?
बीबीसीचे संरक्षणविषयक प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांनी याबाबतचं विश्लेषण केलं आहे.
ते म्हणतात की, "इस्रायल या मिसाईल हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता अधिक आहे. एप्रिल महिन्यामध्ये इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर सहकारी आंतरराष्ट्रीय देशांनी आवाहन केल्यामुळे इस्रायलने आपले हात आखडते घेतले होते. मात्र, यावेळी असं घडण्याची शक्यता कमी आहे.
सध्या इस्रायलच्या रणनीतीचे दोन मुख्य मार्ग असल्याचे दिसून येते. पहिला मार्गामध्ये हत्या आणि हवाई हल्ल्यांद्वारे शत्रूंचा नायनाट करणे याचा समावेश आहे; तर दुसरा मार्ग प्रतिबंधावर भर देणारा आहे. इराण वा इतर देशांकडून इस्रायलवर केलेला कोणत्याही हल्ल्याचं प्रत्युत्तर अत्यंत चोखपणे दिले जाईल, हे दाखवून देण्यावर इस्रायलचा भर असतो, असेही फ्रँक गार्डनर सांगतात.
इस्रायलचे माजी इंटेलिजेन्स ऑफिसर अव्ही मेलामेद यांनी म्हटलं आहे की, "इराणच्या या हल्ल्यामुळे इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्यास भाग पाडलं आहे. इराणविरुद्ध इस्त्राईलकडून चोख आणि तत्काळ प्रत्युत्तर दिलं गेल्याचं आपल्याला लवकरच दिसून येईल."

फोटो स्रोत, Getty Images
तर मग इस्रायलचं प्रत्युत्तर कसं असेल?
इराणवर हल्ले करण्याची इस्रायलची योजना फार पूर्वीपासून होती. सध्या इस्रायलचे संरक्षक प्रमुख इराणवर कधी आणि कसा हल्ला करायचा, याचीच रणनिती आखत असतील, असे बीबीसीचे संरक्षणविषयक प्रतिनिधी फ्रँक गार्डनर सांगतात.
"इराणच्या जमिनीवरील तळांवरच हल्ले केले जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याबरोबरच जिथे इराणची 'कमांड-अँड-कंट्रोल'ची केंद्रं आहेत तिथे आणि त्यासोबतच रिफ्यूएलिंग फॅसिलीटी म्हणजेच इंधनाच्या साठ्यांवरही लक्ष्य केलं जाईल.
"क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश देणाऱ्यांचा माग काढण्यासाठी इस्रायल कदाचित इराणमधील आपल्या एजंट्सचे नेटवर्क सक्रिय करण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. याव्यतिरिक्त, इस्रायलने याहून चोख प्रत्युत्तर द्यायचा निर्णय घेतल्यास तो इराणच्या आण्विक केंद्र असलेल्या ठिकाणांनाही लक्ष्य करू शकतो.
त्यानंतर पुन्हा इराणकडूनही प्रतिहल्ला केला जाऊ शकतो. यामुळे दोन्ही देशांमध्ये हल्ला-प्रतिहल्ल्याच्या सत्रास सुरुवात होऊ शकते," असेही बीबीसीचे सिक्योरिटी कॉरोस्पॉडंन्ट गार्डनर फ्रँक गार्डनर यांनी म्हटले.

फोटो स्रोत, Getty Images
रात्री काय घडलं?
इराणने इस्रायलवर शंभरहून अधिक क्षेपणास्त्रं डागली. इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं इराणनेही मान्य केले.
त्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला. संपूर्ण इस्रायलभर सायरन वाजत होते.
इराणच्या सरकारी माध्यमांनी एक निवेदन देऊन सांगितले की, IRGC ( इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) ने इस्रायलवर डझनाहून अधिक क्षेपणास्त्रं डागली आहेत. जर या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तर आणखी हल्ला तीव्र केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
जुलै महिन्यात हमासचे नेते इस्माईल हानिये, हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरात ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे IRGC ने म्हटले आहे.
इराणने इस्रायलच्या महत्त्वाच्या तळांना लक्ष्य केले, याची विस्तृत माहिती नंतर देण्यात येईल असे IRGC ने सांगितले.
इस्रायल संरक्षण दलाने सांगितले आहे की आता हे हल्ले थांबले आहेत. या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झाली असल्याचे अद्याप तरी आम्हाला माहीत नाही. हा हल्ला आम्ही योग्यरीत्या हाताळला असे इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायली सैन्याने नागरिकांना सतर्क राहून होम फ्रंट कमांडच्या आदेशांचे पालन करण्यास सांगितले आहे. यामध्ये सायरनचा आवाज येताच सुरक्षित जागी जाणं आणि पुढील सूचना मिळेपर्यंत तिथेच थांबावे असे सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी तेल अविवमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू आले होते. पोलिसांच्या प्रवक्त्यानुसार या घटनेत अनेक लोक सापडले आहेत. 'ही घटना दहशत पसरवण्यासाठी केली गेली', असं म्हटलं जात आहे.
इस्रायलच्या मदतीला अमेरिका धावली!
इराणच्या हल्ल्यापासून इस्रायलचे संरक्षण करावे असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या लष्कराला दिले आहेत.
इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना पाडण्यात यावे असे आदेश बायडन यांनी लष्कराला दिले आहेत.
व्हाईट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली आहे की राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस हे परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
अमेरिकेनं आधीच वर्तवलेला हल्ल्याचा अंदाज
त्याआधी इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो असा अंदाज अमेरिकेने व्यक्त केला होता.
उत्तर इस्रायलमध्ये कार्यरत असणारे बीबीसीचे वार्ताहर निक बिक यांनी अधिक माहिती दिली आहे.
ते सांगतात, "गेल्या अर्ध्या तासापासून आम्हाला उत्तर इस्रायलमध्ये आकाशात अनेक क्षेपणास्त्रं दिसत आहेत. काल रात्री इस्रायली लष्करानं लेबनॉनवर जिथून आक्रमण केलं तिथं आम्ही आहोत. इस्रायली कुटुंबं आश्रयासाठी निवाऱ्यात पळत आहेत. हे चित्र सर्व देशात दिसत आहे.
ही क्षेपणास्त्र लेबनॉनमधून आली की इराणमधून डागली गेली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. निवारागृहामध्ये लोक रॉकेटचे अलर्ट आणि मॉनिटरिंग अँप्सवर लक्ष ठेवून आहेत."

फोटो स्रोत, Israel Defense Forces
भारताच्या इस्रायलमधील दुतावासाने तेथे राहाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. यानुसार इस्रायलमध्ये राहाणाऱ्या भारतीयांना सतर्क राहाणाऱ्याचे आणि संरक्षण नियमावलीचे पालन करण्यास सुचवले आहे.
भारतीयांनी कोणताही अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित आश्रयस्थानी थांबावे असे यात म्हटले आहे. तेथिल स्थितीवर आपलं सतत लक्ष असून भारतीय दुतावास इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असं यात नमूद केलं आहे.
भारतीय नागरिकांनी दुतावासाशी तात्काळ संपर्क साधावा आणि स्वतःची नोंद करावी असं सांगितलं आहे. दुतावासाने +972-547520711, 543278392 या हेल्पलाईनही सुरू केल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच
इस्रायलने 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये अनेक पेजर्स आणि वॉकी-टॉकींमध्ये स्फोट घडवून आणले होते. या स्फोटांमध्ये जवळपास 39 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये हिजबुल्लाहच्या सशस्त्र सदस्यांबरोबरच सामान्य नागरिकांचाही समावेश होता.
या घटनेनंतर लेबनॉनमध्ये इस्रायची कारवाई सातत्याने सुरुच आहे.
हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतरही इस्रायल लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहे. अमेरिकेसहित इतर पाश्चिमात्त्य देशांकडून युद्धविरामाचे आवाहन केलं जात असूनही इस्रायल मात्र आपल्या कारवाईवर ठाम आहे.
या पार्श्वभूमीवर आता इस्रायलकडून प्रत्यक्ष जमिनीवरुन कारवाईचे संकेत दिले गेलेले असताना प्रत्यक्षात तसं खरंच घडू शकतं का?
बीबीसीचे डिप्लोमॅटीक कॉरस्पॉडन्ट पॉल ऍडम्स यांच्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याचे रणगाडे लेबनॉनच्या सीमेवर मोठ्या संख्येने जमा होत आहेत. इस्रायलच्या सैन्यप्रमुखांनी हिजबुल्लाहच्या बालेकिल्ल्यावर कारवाई करण्यासाठी आपल्या सैनिकांना सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
सैन्याकडूनही दक्षिण लेबनॉनच्या आत बफर झोन तयार करण्याचेही संकेत प्राप्त झाले आहेत. मात्र, अद्यापतरी इस्रायली सैन्य जमिनीवरुन लेबनॉनमध्ये घुसल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.
दरम्यान इस्रायलने लेबनॉनवरील आपले हवाई हल्ले सुरुच ठेवले आहेत. याच हल्ल्यांदरम्यान 27 सप्टेंबर रोजी हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचाही मृत्यू झाला.
इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये हमासचे नेतेही मारले गेले आहेत.
लेबनॉनमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन आठवड्यांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे; तर 10 लाखहून अधिक लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे.
संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जवळपास एक लाख लोकांना लेबनॉन सोडून सीरियामध्ये स्थलांतरित व्हावं लागलं आहे.
ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या सशस्त्र सदस्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 1200 हून अधिक इस्रायली लोक मारले गेले, तर 200 हून अधिक जणांना बंदी करण्यात आल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
या बंदींची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी इस्रायलमध्ये नेतन्याहूंच्या विरोधात आंदोलन देखील झाले.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा आणि वेस्ट बँकमध्ये लष्करी कारवाईस सुरुवात केली.
हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, इस्रायलच्या या लष्करी कारवाईमध्ये आतापर्यंत 40 हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. या मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
इस्रायलने गाझावर केलेल्या या हल्ल्यानंतर हिजबुल्लाह ही सशस्त्र संघटना हमासच्या समर्थनार्थ पुढे आली होती.
हिजबुल्लाहने लेबनॉनच्या सीमेवरुन इस्रायलवर सातत्याने रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यामुळे लेबनॉनच्या सीमेवर राहणाऱ्या हजारो इस्रायली नागरिकांना स्थलांतर करावं लागलं आहे.
इस्रायलचं म्हणणं आहे की, ते आपल्या नागरिकांच्या सुरक्षित घरवापसी करता हिजबुल्लाहवर हल्ले करत आहेत.
दुसऱ्या बाजूला, जोपर्यंत गाझामध्ये इस्रायलचे हल्ले थांबवले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हल्ले सुरुच ठेवू, असे हिजबुल्लाहचे म्हणणे आहे.
सध्या तरी हिजबुल्लाह स्वत:च इस्रायलच्या हल्ल्यांना बळी पडत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











