हसन नसरल्लाह यांचा ठावठिकाणा इस्रायलनं कसा शोधला, संपूर्ण ऑपरेशन 'असं' पार पडलं

फोटो स्रोत, Getty Images
लेबनॉनमधील हिजबुल्लाह या कट्टरतावादी संघटनेला गेल्या 15 दिवसांपासून एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत.
सर्वांत आधी 17-18 सप्टेंबरला पेजर आणि नंतर वॉकी-टॉकीमध्ये झालेल्या स्फोटांमुळे हिजबुल्लाहच्या जवळपास 1,500 सदस्यांना लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या काही सदस्यांचा मृत्यूदेखील झाला.
तर शुक्रवारी (27 सप्टेंबर) लेबनॉनची राजधानी, बैरूतमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह मारले गेले.
नसरल्लाह अनेक वर्षांपासून इस्रायलला चकवण्यात यशस्वी होत होते.
इस्रायलच्या सैन्यानं नसरल्लाह यांचा ठावठिकाणा कसा शोधला आणि नसरल्लाह यांना मारण्यात इस्रायली सैन्याला यश कसं मिळालं, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


हिजबुल्लाहच्या संरक्षण यंत्रणेचं अपयश
बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांनी याबाबत निरीक्षण केले आहे. त्यांच्या मते, हसन नसरल्लाह यांच्यावर हल्ला करणं इस्रायलचा महत्त्वपूर्ण व्यूहरचनात्मक निर्णय होता.
हसन नसरल्लाह कित्येक वर्षांपासून भूमिगत होते. त्यांचं वास्तव्य गुप्त ठिकाणी होतं. इस्रायलला बऱ्याच काळापासून त्यांचा शोध होता.
गार्डनर म्हणतात की, "अलीकडेच हिजबुल्लाहच्या हजारो पेजर आणि वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले होते. त्यानंतर असा अंदाज बांधण्यात आला होता की, यामागे इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणेचा हात आहे."
"मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेनं पेजर आणि वॉकी-टॉकींची जी सप्लाय चेन होती, थेट त्यावरच नियंत्रण मिळवलं असल्याची शक्यता आहे."

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock
"त्यानंतर त्यांनी पेजर आणि वॉकी-टॉकी मध्ये स्फोटकं बसवली. त्यातूनच हे स्फोट घडवले गेले होते. ही गोष्ट जवळपास 15 दिवसांपूर्वी घडली होती."
"तेव्हापासून आतापर्यंत जे घडलं, त्यावरून असं दिसतं की, हिजबुल्लाहच्या वरिष्ठ पातळीपर्यंत खोलवर शिरकाव करण्यात इस्रायल यशस्वी झालं आहे."
"इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की, त्यांनी हिजबुल्लाहच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारलं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, इस्रायलनं हे यश मिळवण्यासाठी, हिजबुल्लाहच्या संरक्षण यंत्रणेला कशा रीतीनं भगदाड पाडलं?"
नसरल्लाह यांचा ठिकाणा कसा शोधला?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं एका विशेष वृत्तात म्हटलं आहे की, नसरल्लाह मारले जाण्यापूर्वी लेबनॉन, इस्रायल, इराण आणि सीरियामधील एक डझनहून अधिक सूत्रांशी रॉयटर्सने संपर्क साधून ही माहिती घेतली.
हिजबुल्लाहला साधन सामुग्री पुरवणारी सप्लाय चेन आणि नेतृत्वाच्या फळीला इस्रायलनं कसं संपवलं हे या संवादातून समोर आलं.
एका सूत्रानं रॉयटर्सला सांगितलं की, "नसरल्लाह आणि हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हल्ला करण्यापूर्वी इस्रायलनं हिजबुल्लाहवर 20 वर्षं हेरगिरी केली. या कालावधीत त्यांनी हिजबुल्लाहची सर्व बारीक-सारीक माहिती मिळवली."
हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली, त्यांची लपण्याची ठिकाणं, मुख्यालय या सर्व गोष्टींची बित्तंबातमी मिळवण्यात इस्रायलला यश आलं होतं.
या कालावधीत त्यांनी हिजबुल्लाहच्या सर्व योजना, हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं होतं. या सूत्रानं ही एक 'अप्रतिम' स्वरूपाची हेरगिरी असल्याचं म्हटलं आहे.
इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनी बुधवारी नसरल्लाह यांच्यावर हल्ला करण्यास परवानगी दिली होती.
या हल्ल्याचं वैशिष्ट्यं म्हणजे नेतन्याहू जेव्हा हजारो मैल दूर न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करत होते तेव्हाच हा हल्ला करण्यात आला होता.
मॅथ्यू सेविल, रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इस्टिट्यूटमध्ये डायरेक्टर ऑफ मिलिटरी सर्व्हिसेस आहेत. ते म्हणतात की, नसरल्लाह यांच्यावरील हल्ल्याची तयारी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली होती, असं दिसतं.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock
अनेक स्तरांवर या हल्ल्याचं नियोजन करून त्याची आखणी करून अतिशय गुप्तपणे आणि अतिशय चोखपणे ही मोहीम आखली असेल.
"या हल्ल्यातून दिसतं की, हिजबुल्लाहची अत्यंत गोपनीय माहिती किंवा वरिष्ठ स्तरावरील संभाषणांमध्ये शिरकाव करण्यात, ती मिळवण्यात इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेला यश आलं होतं."
"याशिवाय यात इमेजेसचेही सखोल विश्लेषण करण्यात आलं आहे. मग ते उपग्रहाद्वारे घेण्यात आलेले फोटो असो किंवा लपूनछपून घेतलेले फोटो."
"यामध्ये मानवी गुप्तहेरांचा वापर करूनही गोपनीय माहिती मिळवली गेली असेल, हे खात्रीलायकपणे म्हटलं जाऊ शकतं."
मॅथ्यू सेविल म्हणतात की, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हिजबुल्लाह संघटनेतील इस्रायलच्या गुप्तहेरांच्या प्रत्यक्ष वास्तव्याचा आणि तिथून केलेल्या हेरगिरीचाही यात समावेश आहे.
2006 मध्ये झालेल्या इस्रायल-हिजबुल्लाह युद्धानंतर नसरल्लाह यांनी उघडपणे वावरणं किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं होतं.
नसरल्लाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, नसरल्लाह खूपच सतर्क असायचे. त्यांच्या प्रत्येक हालचाली अतिशय गोपनीय पद्धतीनं व्हायच्या. इतकंच काय तर नसरल्लाह अगदी ठराविक लोकांनाच भेटत असत.
इतर आंतरराष्ट्रीय बातम्या -
- ‘आम्हाला पळून जायचंय,’ इस्रायलच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये भीतीचं वातावरण
- मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना काय करते? आजवर मोसादने कोणत्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत?
- न केलेल्या गुन्ह्यासाठी मिळाली 56 वर्षांची शिक्षा, 88 व्या वर्षी निर्दोष सुटका
- पाकिस्तानमधील ISI ही संस्था नेमकं काय काम करते, त्यांच्यावर टीका का होत आहे?
इस्रायलनं कसे टाकले बॉम्ब
शनिवारी (28 सप्टेंबर) इस्रायली सैन्याच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला सांगितलं होतं की, त्यांना हसन नसरल्लाह यांच्या लोकेशनबद्दल कित्येक महिन्यांपासून माहिती होती.
इस्रायलमधील अनेक वृत्तांनुसार, नसरल्लाह यांच्यावर हल्ला करण्याचा निर्णय तत्काळ आणि अमेरिकेला सुगावा न लागू देता घेण्यात आला होता. यात अडथळा निर्माण होऊ नये आणि विलंब होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 17 सप्टेंबरला पेजरमध्ये स्फोट झाल्यापासूनच हिजबुल्लाहचे नेते खूप सतर्क झाले होते. कारण इस्रायलला त्यांना मारायचं असल्याची बाब उघड होती.
इतकंच काय अगदी हिजबुल्लाहच्या कमांडर्सच्या अंत्ययांत्रांनाही त्यांचे वरिष्ठ नेते उपस्थित नसायचे. त्याऐवजी काही दिवसांनी त्यांची आधीच रेकॉर्ड केलेली भाषण चालवली गेली होती.
इस्रायलनं म्हटलं आहे की, दक्षिण बैरूत मधील एका निवासी इमारतीच्या तळघरात हिजबुल्लाहनं त्यांचं मुख्यालय तयार केलं होतं. नसरल्लाह तिथे उपस्थित असताना त्यांनी त्या इमारतीवर बॉम्बहल्ला केला.
इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की, गेल्या आठवड्यात नसरल्लाह यांच्यासह हिजबुल्लाहचे नऊ वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत.
स्वीडिश डिफेन्स युनिव्हर्सिटीचे हिजबुल्लाहवरील तज्ज्ञ असलेले मॅग्नस रेन्सटॉर्प यांनी रॉयटर्सला सांगितलं की, हा हिजबुल्लाहला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर त्यांच्या गुप्तहेर संस्थेचं मोठं अपयश आहे.
मॅग्नस म्हणतात की, "नसरल्लाह तिथे बैठक घेत होते हे इस्रायलला माहिती होतं. ते हिजबुल्लाहच्या इतर कमांडरबरोबर पुढील योजना तयार करत होते. त्याचवेळेस इस्रायलनं त्यांच्यावर हल्ला केला."
शनिवारी (28 सप्टेंबर) इस्रायली सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नादव शोशानी यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की, इस्रायली सैन्याला नसरल्लाह आणि हिजबुल्लाहचे इतर नेते एकत्र जमणार असल्याची 'रिअल टाइम' माहिती होती.
मात्र त्यांच्याकडे ही माहिती कशी पोहोचली हे त्यांनी सांगितलं नाही. इस्रायलवर हल्ल्याची योजना तयार करण्यासाठीच हिजबुल्लाहच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती, हे मात्र त्यांनी सांगितलं.
इस्रायलच्या हात्जेरिम हवाई तळावरील अधिकारी ब्रिगेडियर जनरल अमिचाई लेविन यांनी नसरल्लाह यांच्यावरील हल्ल्याबाबत पत्रकारांना सांगितलं की, काही सेंकदांमध्येच अनेक डझन बॉम्ब टाकण्यात आले होते.
ते म्हणाले, "हे खूपच गुंतागुंतीचं आणि कठीण ऑपरेशन होतं. या हल्ल्याची योजना बऱ्याच दिवसांपासून तयार करण्यात आली होती."

फोटो स्रोत, Getty Images
रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर ऑफ मिलिटरी सर्व्हिसेस असणारे मॅथ्यू सेविल म्हणाले, "इस्रायलला नसरल्लाह यांच्या लोकेशनची माहिती मिळाल्यावर त्यांच्या हवाईदलानं एफ-15 लढाऊ विमानांद्वारे कथितरित्या बंकर्स उदध्वस्त करणारे 80 बॉम्ब टाकले."
"दक्षिण बैरूत आणि दाहिया मध्ये जमिनीखाली असणाऱ्या तळघरांवर अचूक बॉम्बहल्ला करण्यात आला. याच तळघरात नसरल्लाह आणि हिजबुल्लाहच्या वरिष्ठ कमांडरची बैठक सुरू होती."
"या सर्व गोष्टींमधून हे स्पष्ट होतं की, इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणेनं हिजबुल्लाहच्या संरक्षण यंत्रणेला भेदण्यात यश मिळवलं आणि तिथून ते सर्व गोपनीय माहिती मिळवत होते."
"लवकरच दुसरी एखादी व्यक्ती नसरल्लाह यांची जागा घेईल. ज्या व्यक्तीची धार्मिक प्रतिमा नसरल्लाह यांच्याप्रमाणे असेल अशा व्यक्तीकडे हिजबुल्लाहचं नेतृत्व दिलं जाईल.
"मात्र, त्या नव्या नेत्याला स्वत:चे अनुयायी बनवण्यासाठी, संघटनेवर पकड मिळवण्यासाठी आणि संघटनेला मजबुतीनं उभं करण्यास अनेक वर्षे लागतील."
"सध्या इस्रायल विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीत हे सर्व करण्यासाठी हिजबुल्लाहच्या नव्या नेतृत्वाला जास्त वेळ मिळणार नाही."
"त्यामुळे इस्रायलसमोर पुन्हा ताकदीनं कसं उभं राहायचं हे हिजबुल्लाहसमोरचं आतापर्यंतचं सर्वांत मोठं आव्हान असणार आहे," असं सेविल म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











