न केलेल्या गुन्ह्यासाठी मिळाली 56 वर्षांची शिक्षा, 88 व्या वर्षी निर्दोष सुटका

फोटो स्रोत, Reuters
- Author, गेविन बटलर, शायमा खलिल
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, सिंगापूर आणि टोक्यो
जपानमधल्या कोर्टाने 88 वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. इवाओ हाकामाडा 56 वर्षं तुरुंगात होते. त्यांना खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली होती.
1968 साली त्यांना शिक्षा सुनावली गेली. आपला बॉस, त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
हा खटला नव्याने चालवण्याची त्यांची मागणी अलीकडेच मान्य केली गेली होती. कारण त्यांच्याविरोधातला पुरावा हा तेव्हाच्या तपास यंत्रणांनीच पेरलेला असू शकतो ही शक्यता न्यायालयाने मान्य केली.
पण इतकी दशकं तुरुंगात राहिल्यामुळे हाकामाडांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला. जेव्हा त्यांची मुक्तता केली गेली त्या सुनावणीला ते उपस्थित राहू शकले नाही.
ही केस जपानमध्ये प्रसिद्ध आहे. शिझुकामधल्या कोर्टात सुनावणी पाहता यावी यासाठी 500 लोक रांगेत उभे होते.
कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागताच कोर्टाबाहेर बॅनर घेऊन उभं असलेल्या त्यांच्या समर्थकांनी 'बंजाई' म्हणत जल्लोष केला. जपानी भाषेत बंजाई शब्दाचा अर्थ 'हुर्रे' असा होतो.

फोटो स्रोत, Getty Images
हाकामाडा यांच्या सुटकेनंतर प्रतिक्रिया देताना हाकामाडा यांच्या 91 वर्षीय बहीण हिडेको म्हणाल्या, "माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मी गेल्या दशकभरापासून लढत होते. अखेर आज 'नॉट गिल्टी' हे शब्द कानावर पडले आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले."
तो एक सुखद क्षण होता, माझ्या भावाची निर्दोष मुक्तता झाली, असं त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.


हाकामाडा व्यावसायिक बॉक्सर होते. 1966 साली एका प्रोसेसिंग प्लांटमध्ये 4 मृतदेह सापडले. या चौघांचा खून करून, त्यांच्या घराला आग लावल्याचा आरोप यांच्यावर ठेवला गेला.
पोलिसांनी दिवसाला 12 तासांपर्यंत मारहाण करून आपल्याकडून जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतल्याचं ते म्हणाले. 1968 साली त्यांना शिक्षा ठोठावली गेली.
2014 साली जेव्हा त्यांचा खटला नव्याने चालवण्याला परवानगी दिली गेली तेव्हा त्यांना आपल्या बहिणीच्या कस्टडीत दिलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे पुरावा म्हणून सादर केले आणि ते हाकामाडांचे असल्याचा दावा केला होता. पण कोर्टाने 2014 साली हे मान्य केलं की हा पुरावा पोलिसांनीच प्लांट केलेला असू शकतो.
आज त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











