स्वच्छ भारत अभियान: स्वच्छतेबाबत आपण जपानकडून काय शिकू शकतो?

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी सकाळी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर कचरा वेचतानाचा एक व्हीडिओ टाकला. "30 मिनीट" अनवाणी पायांनी चौपाटीवर प्लास्टिक आणि बाटल्या उचलून त्यांनी "आपली सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ आणि कचरामुक्त" ठेवण्याचा संदेश दिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आपल्या पहिल्या कार्यकाळातच पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहीम सर्वांत आधी हाती घेतली होती. देशात याबाबत बऱ्याच प्रमाणावर जागरूकता वाढत आहे, मात्र अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
याबाबत मात्र आपण जपानकडून काही धडा नक्कीच घेऊ शकतात.
जपानला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता. उगवत्या सूर्याचा देश असं वर्णन होणाऱ्या जपानमध्ये सगळीकडे एवढा टापटीपपणा आणि नीटनेटकापणा कसा जपला जातो?

बरं स्वच्छ दिसतंय, पण जागोजागी कचराकुंड्या किंवा साफसफाई करणारी माणसंही दिसत नाहीत. मग या स्वच्छतेचं रहस्य काय?
शाळेच्या वर्गात दप्तर गुंडाळून मुलं बसलेली असतात. सात तास 50 मिनिटांच्या शाळेनंतर घरी जाण्यासाठी सगळी मुलं आतूर असतात. दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकाबद्दल शिक्षक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात. शिक्षक शेवटी सांगतात, "आता आजच्या साफसफाई वेळापत्रकाबद्दल!"
पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतली मुलं वर्ग साफ करतील. तिसरा आणि चौथा वर्ग जिने आणि व्हरांड्यांची साफसफाई करतील तर पाचव्या रांगेतली मुलं प्रसाधनगृहाची स्वच्छता करतील.
पाचव्या रांगेतली मुलं अनिच्छा प्रकट करतात. परंतु लगेचच सगळे कामाला लागतात. वर्गाच्या कपाटातले मॉपर, पुसायचे कपडे, बादल्या असं सगळं बाहेर निघतं. हे चित्र एखाद्या शाळेपुरतं मर्यादित नाही.
जपानमधल्या सगळ्या शाळांमध्ये मुलांना साफसफाईचं हेच वेळापत्रक फॉलो करावं लागतं.

फोटो स्रोत, Ian Dagnall/Alamy
जपानला पहिल्यांदाच भेट देणाऱ्या पर्यटकांना जाणवते ती इथली स्वच्छता. मात्र त्यांना जागोजागी कचऱ्याचे डब्बे दिसत नाहीत किंवा सतत कचरा घेऊन जाणारे सफाई कामगार दिसत नाहीत. मग तरीही जपानमध्ये एवढी स्वच्छता कशी आढळते?
याचं सोपं उत्तर म्हणजे जपानचे नागरिक असं आहे. कारण ते स्वत: परिसर स्वच्छ ठेवतात. प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा शाळेच्या 12 वर्षात स्वच्छता हा शालेय वेळापत्रकाचा अविभाज्य भाग होता, असं टोकियामधील हिरोशिमा प्रीफेक्च्युरल सरकारी कार्यालयातील माइको अवाने यांनी सांगितलं. "आमच्या घरीही आईवडील स्वच्छतेचे संस्कार करतात. आपलं घर, परिसर खराब करणं-ठेवणं वाईट मानलं जातं," असं त्यांनी सांगितलं.
सामाजिक बांधिलकीची जाणीव शाळेतूनच दिली जात असल्यामुळे मुलांच्या मनावर स्वच्छतेचा संस्काक बिंबतो. आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा हे त्यांना आवश्यक वाटू लागतं. खराब केलेले शाळेचे वर्ग किंवा परिसर कोणाला आवडेल?
"मला काही वेळेस शाळा स्वच्छ करायला आवडायचं नाही," असं फ्रीलान्स ट्रान्सलेटर म्हणून काम करणाऱ्या चिका हयाशी यांनी सांगितलं. "पण मी ते काम करायचे कारण स्वच्छता पाळणं शाळेच्या दिनक्रमाचा भाग होता. विद्यार्थ्यांना शाळा स्वच्छ करायला लागत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे, हे मुलांच्या मनावर ठसवलं जातं."
शाळेत आल्यानंतर मुलं त्यांचे शूज लॉकर्समध्ये ठेवतात आणि स्वच्छता सेवक होऊन जातात. घरीही, बाहेर वापरायचे शूज दारातच काढले जातात. घरी काम करायला येणारी माणसंही शूज बाहेर काढून कामाला सुरुवात करतात. शाळेत जाणारी मुलं जशी मोठी होतात, तसं त्यांची स्वत:चा परिसर या व्याख्येचा परीघ मोठा होत जातो. घर, शाळा यांच्याबरोबरीने चौक, गल्ली हेही साफ ठेवणं आपलं काम आहे हे त्यांच्या मनात आणि मेंदूत फिट होतं.

फोटो स्रोत, Chris Willson/Alamy
जपानच्या अतिस्वच्छतेची काही उदाहरणं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सात मिनिटांत अख्खी ट्रेन साफ करणाऱ्या मंडळींचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
जपानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे चाहतेही स्वच्छताप्रेमी आहेत. 2014 मध्ये ब्राझीलमध्ये तर गेल्या वर्षी रशियात झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये जपानच्या चाहत्यांनी मॅच संपल्यानंतर स्टेडियम साफसूफ करत अनोखा मापदंड प्रस्थापित केला होता.
मॅच झाल्यानंतर जपानचे चाहते थांबायचे आणि गटागटाने संपूर्ण स्टेडियममध्ये पसरलेला कचरा गोळा करून, त्याची विल्हेवाट लावल्यानंतरच घरी परतायचे. जपानचा संघही ड्रेसिंग रूम आदर्श अशा स्थितीत करूनच मैदान सोडायचा. जपानच्या संघाने अन्य संघासमोर काय आदर्श ठेवला आहे, अशा शब्दांत फिफाच्या समन्वयक प्रिसिला जॅनसेन्स यांनी जपानचं कौतुक केलं होतं.
"लोक आमच्याबद्दल काय विचार करतात, त्यांच्या मनात आमची काय प्रतिमा आहे याचा आम्ही अतिशय काटेकोरपणे विचार करतो. स्वत:ची जागा, परिसर साफ करण्याएवढंही यांचं शिक्षण झालेलं नाही किंवा संस्कार झालेले नाहीत, असा आमच्याविषयी कोणी विचार करायला नको," असं अवाने यांनी सांगितलं.
जपानच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्येही स्वच्छतेची अनुभूती येते. फुजी रॉक फेस्टिव्हल हा जपानचा सगळ्यात मोठा आणि जुना सोहळा. या फेस्टिव्हलमध्ये जपानी माणसं कचऱ्याची पिशवी डस्टबिन दिसेपर्यंत हातात घेऊन उभी असतात. ध्रूमपान करणाऱ्या माणसांना पोर्टेबल अॅशट्रे आणा, अशी सूचना केली जाते. आजूबाजूच्या माणसांना त्रास होईल अशा ठिकाणी ध्रूमपान करू नका, अशी सूचना दिलेली असते. फेस्टिव्हलच्या वेबसाईटवर यासंदर्भात नियमावली देण्यात आली आहे.
1969मध्ये वुडस्टॉक फेस्टिव्हलमध्ये जिमी हेन्ड्रिंक्स यांनी मोजक्या लोकांसमोर मात्र कचऱ्याच्या ढिगात परफॉर्म केलं होतं.

फोटो स्रोत, Angeles Marin Cabello
दैनंदिन जीवनातही काटेकोर स्वच्छतेची असंख्य उदाहरणं आढळतात. उदाहरणार्थ, सकाळी आठ वाजता ऑफिसमधली मंडळी तसंच दुकानात काम करणारी माणसं आसपासचा परिसर साफ करतात. मुलं 'कम्युनिटी क्लीन' प्रकल्पाच्या निमित्ताने शाळेजवळच असलेला कचरा उचलून साफसफाई करतात. शेजारीपाजारी राहणारी माणसंही स्वच्छता मोहिमेत काम करताना दिसतात. स्वच्छ करण्यासाठी बाहेर एवढा कचरा नसतो कारण माणसं कचरा घरी घेऊन जातात.
ATMमधून बाहेर येणाऱ्या नोटा कडक इस्त्री केलेल्या कपड्यांसारख्या कोऱ्या करकरीत असतात. नोटा हाताळल्यामुळे खराब होतात. म्हणूनच जपानमध्ये नोटा हातात दिल्या जात नाहीत. दुकानांमध्ये, हॉटेलात, टॅक्सीवाला-सगळीकडे पैसे देण्याघेण्यासाठी छोटा ट्रे ठेवलेला आढळेल. समोरचा माणूस पैसे ठेवल्यावर तो ट्रे उचलतो.
न दिसणारे जीवजंतू आणि धूळ हे जपानी माणसांसाठी काळजीचं कारण आहे. कुणालाही ताप येतो किंवा थंडी वाजू लागते तेव्हा ती माणसं सर्जिकल मास्क घालतात जेणेकरून बाकी कोणाला इन्फेक्शन होऊ नये. दुसऱ्याचा विचार केल्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता कमी होते. कामाचे तास-दिवस कमी होण्याचं आणि वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च कमी होतो.
जपानी माणसं एवढी स्वच्छताप्रिय कधी झाली?
जपानचं स्वच्छता वेड नवं फॅड नाही. जपानमध्ये पाय ठेवणारा पहिला ब्रिटिश माणूस मॅरिनर विल अॅडम्स. त्याने 1600मध्ये जपानला भेट दिली. त्यांनी स्वत:चं चरित्र सॅमुराई विल्यम मध्ये त्यांनी जपानमधल्या स्वच्छतेचं वर्णन केलं आहे. इंग्लंडमध्ये घाणीचं साम्राज्य असताना जपानमध्ये सांडपाण्याची शिस्तबद्ध यंत्रणा तसंच सुगंधित द्रव्याने आंघोळीसाठी व्यवस्था होती. वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा यामुळे जपानी माणसांना युरोपियन माणसांविषयी विचित्र वाटत होतं.

फोटो स्रोत, Angeles Marin Cabello
जपानमधलं वातावरणही स्वच्छता पाळण्यासाठी अनुकूल ठरलं. जपानमध्ये उष्ण आणि दमट वातावरण आहे. अन्न लवकर खराब होतं. जीवजंतू वाढीस लागतात. कीडेकिटक जमू लागतात. त्यामुळे स्वच्छता म्हणजे उत्तम आरोग्य असं समीकरण झालं.
पण हे स्वच्छतेचं संस्कार खोलवर झाले आहेत. बौद्ध विचारप्रणालीत स्वच्छता हा मूलभूत मुद्दा आहे. चीन आणि कोरियामधून सहाव्या आणि आठव्या शतकात जपानमध्ये स्वच्छताविषयक जागृतीचा मुद्दा दिला गेला.
बौद्ध विचारधारेचा भाग असलेली झेन विचारधारा चीनमधून 12 आणि 13व्या शतकात जपानमध्ये आली. दैनंदिन स्वच्छता, स्वयंपाक या गोष्टींना अध्यात्मिक अनुभव म्हटलं जातं. या गोष्टी ध्यानधारणेइतक्या महत्वाच्या मानल्या जातात.
'झेन विचारधारेनुसार, जेवण तयार करणं, परिसराची स्वच्छता करणं हे सगळं बौद्ध विचारांचे पाईक असल्याचं लक्षण मानलं जातं. शारीरिक आणि मानसिक अस्वच्छता दूर करणं दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग मानला जातो', असं फुकुयामामधील शिनशोजी मंदिराचे इरिको कुवागाकी यांनी सांगितलं.
ओकाकुरा काकुरो यांच्या द बुक ऑफ टी पुस्तकात चहाची महती आणि झेन विचारधारा यांच्याबद्दल विस्तृतपणे लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Angeles Marin Cabello
ज्या ठिकाणी चहाचा सोहळा होतो तो परिसर अतिशय स्वच्छ असायला हवा. खोलीच्या कोपऱ्यातही धुळीचा कण दिसायला नको. तसं काही आढळलं तर मग यजमान चहा सोहळ्यासाठी योग्य नाहीत असा निष्कर्ष काढला जातो.
ओकाकुरा यांनी हे सगळं 1906मध्येच लिहून ठेवलं आहे पण हे आजही लागू आहे आणि खरंही आहे. हिरोशिमामधल्या शुकेईन गार्डन्समधल्या सैफुकान टी हाऊस येथे होणाऱ्या टी सेरेमनीपूर्वी टी मास्टरांचा सहाय्यक समोरचा मंच ब्राऊन पेपरने पुसून काढतो. धुळीचा टिपूसही दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
मग बौद्ध विचारधारेचं पालन करणारे सगळे देश जपानसारखे स्वच्छ का नाहीत? बौद्ध विचारधारेच्या आगमनापूर्वी जपानमध्ये स्वत:ची अशी शिंटो नावाची विचारधारा अस्तित्वात होती. शिंटोचा अर्थ देवाचे विविध प्रकार. जपानची ओळख शिंटोमध्ये दडली आहे असं म्हणतात. स्वच्छता हा शिंटो विचारधारेचा पाया होता.
पाश्चिमात्य देशांमध्ये स्वच्छता ही देवाप्रमाणे आहे अशी शिकवण दिली जाते. शिंटोनुसार स्वच्छता हाच देव मानला जातो. बौद्ध विचारांमध्ये स्वच्छतेला असलेलं महत्व जपानी माणसांच्या जगण्यात शिंटोच्या रुपात आधीपासूनच होतं.
शिंटोमध्ये केगर नावाची संकल्पना असते. स्वच्छतेच्या विरुद्ध असा त्याचा सर्वसाधारण अर्थ होतो. केगरच्या उदाहरणांमध्ये मृत्यूपासून आजारापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. केगरचा अंमल होऊ नये यासाठी सातत्याने स्वच्छता मोहीम, परिसर शुद्ध करण्याची मोहीम हाती घ्यायला हवी.
एखाद्या व्यक्तीला केगरची लागण झाली तर त्याचा संपूर्ण समाजाला फटका बसू शकतो असं हिरोशिमा कांदा श्राईनमधील सहाय्यक शिंटो धर्मगुरू नोराइकी इकेडा यांनी समजावून सांगितलं. म्हणूनच स्वच्छतेचं पालन करणं आवश्यक आहे. त्याने वैयक्तिक शुद्धता जपली जाते. समाजावर ओढवणारी संकटं टाळली जाऊ शकतात. म्हणूनच जपानला स्वच्छ देश असं म्हटलं जातं.
दुसऱ्यांचा विचार विशेषत: संसर्गजन्य रोगांच्या दृष्टीने योग्यच आहे. यापलीकडे जाऊन स्वत:चा कचरा स्वत: उचलणं या पातळीवर विचार केला जातो. आपण निर्माण केलेला कचरा आपणच साफ करायला हवा. आपण आळशी राहून दुसरा कोणीतरी कचरा उचलेला असा विचार आम्ही जपानी माणसं करू शकत नाही असं अवाने म्हणतात.

फोटो स्रोत, Angeles Marin Cabello
स्वच्छतेच्या शुद्धीकरणाची उदाहरणं दैनंदिन आयुष्यात सहजतेने पाहायला मिळतात. शिंटो धर्मस्थळी जाण्यापूर्वी भाविक हात स्वच्छ धुतात. खळखळून चूळ भरतात. अनेक जपानी माणसं गाडी घेतल्यानंतर तिच्या शुद्धीकरणासाठी शिंटो धर्मस्थळी घेऊन जातात. धर्मगुरू ओनुसा नावाच्या फडक्याने गाडीला पुसून काढतात. त्यानंतर गाडीची दारं, बॉनेट, आतला भाग स्वच्छ केला जातो. धर्मगुरू ओनुसा भाविकांभोवतीही फिरवतात. नवी इमारत ज्या ठिकाणी उभारली जाणार आहे त्या जागेवरही ओनुसा फिरवला जातो.
तुम्ही जपानमध्ये राहू लागाल तर तुम्हीही स्वच्छता संस्कृतीचे पाईक व्हाल. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी नाक शिंकरणार नाहीत. दुकानं आणि ऑफिसेसमध्ये हँड सॅनिटायझर दिलं जातं. घरात जमा होणारा कचऱ्याचं 10 विविध पद्धतीने पुनर्वापर करता येईल अशा पद्धतीने शिकवल्या जातात.
विल अडम्स यांनी 1600मध्ये मांडलेल्या गोष्टींमुळे जगण्याचा दर्जा उंचावला आहे असं तुमच्या लक्षात येईल.
जेव्हा तुम्ही तुमच्या देशात परताल तेव्हा गलिच्छपणे वावरणाऱ्या, चारचौघात शिंकरून जंतूचा प्रार्दुभाव पसरणारी माणसं तुम्हाला खटकू लागतील. खराब चपलांसह घरात शिरताना तुम्हाला लाज वाटेल. जपानमध्ये असं काही शक्यच नाही.
पण जगाला अजूनही आशा आहे. पोकेमॉन, सुशी आणि कॅमेरा फोन्स यांचं जगाला वेड लागलंच की.
काही देशांच्या गुणवैशिष्ट्यांची मीमांसा करणारी 'Why we are What we are' ही बीबीसी ट्रॅव्हलची मालिका आहे. त्यातलाच हा एक भाग.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








