जेव्हा जपानमध्ये भारतीय माणसाला 'नग्न होऊन आंघोळ कर' असं सांगण्यात आलं...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अरविंद छाबडा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, टोकियोहून
"मी ऐकलं होतं की जपानी माणसांना आंघोळ करायला आवडतं. गरम पाण्याने आंघोळ करण्याची त्यांची पद्धत जगजाहीर आहे. मात्र याचा संबंध विश्वासाशी असेल असं मला वाटतं नव्हतं".
चार दशकांपूर्वी भारतातून जपानला स्थायिक झालेल्या प्रवीण गांधी यांनी सांगितलं की, "मी इथे आलो तेव्हा एका लहानशा खोलीत काही मुलांबरोबर राहत असे. आम्ही सार्वजनिक न्हाणीघरात आंघोळीसाठी जात असू. कारण आमच्या खोलीत न्हाणीघराची व्यवस्था नव्हती. आमच्यासारखी अनेक माणसं तिथे आंघोळीला जात असत".
'नग्न होऊन आंघोळ कर'
प्रवीण सांगतात की, मला धक्का बसला जेव्हा मला नग्न होऊन आंघोळ कर असं सांगण्यात आलं. माझ्यासाठी हे सोपं नव्हतं. लहानपणी ट्यूबवेल तसंच तलावात आंघोळ करताना आम्ही असे असू.
प्रवीण गांधी 1974 मध्ये अंबालाहून टोकियोला गेले. तिथे त्यांनी ट्रॅव्हल कंपनी सुरू केली.
प्रवीण सांगतात, "माझ्यासाठी हा विचित्र अनुभव होता. मला अशा पद्धतीने आंघोळ करता येत नसे. ते मला पाहुणा समजत असत. पूर्णत: नग्न होऊन आंघोळ करण्यासाठी मला सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी बदलल्या. मी त्यांच्यातला एक होऊन गेलो".

टोकियोत स्थायिक झालेले आणखी एक भारतीय सतनाम सिंह सन्नी सांगतात, "तुम्हाला माहिती आहेच की आपण भारतीय लाजतो. जपानच्या लोकांसमोर सगळे कपडे काढताना खूप विचित्र वाटत असे".
सतनाम सिंह सन्नी 1973 मध्ये अमृतसरहून जपानला पोहोचले. तिथे त्यांनी भारतीय हॉटेल सुरू केलं. अलीकडेच त्यांनी ही हॉटेलं विकलीही.
जपानची लोकसंख्या 12.6 कोटी आहे आणि यामध्ये भारतीय आहेत 38,000. आकडेवारी पाहिली तर ही संख्या मोठी नाही.
यामुळेच इमिग्रेशन प्रक्रिया सोपी नसल्याचं जपानमधले भारतीय सांगतात. मात्र आता जपानमध्ये भारतीयांची संख्या वाढू लागली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण जपानमध्ये येत आहेत.
जपानी लोकांचं सहकार्य
जपानची राजधानी टोकियोमध्ये स्थायिक झालेल्या अनेकांशी मी बोललो. जपानमध्ये स्थायिक होण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं त्यांना वाटतं.
जपानमध्ये स्थायिक होताना आलेल्या अडचणींबद्दलही त्यांनी सांगितलं. जपानी लोकांचं आपुलकीचं आणि सहकार्याचं वागणं हे स्थायिक होण्यामागचं प्रमुख कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उज्ज्वल सिंह साहनी 54 वर्षांपूर्वी दिल्लीहून जपानला आले. अन्य जागतिक भाषांप्रमाणे जपानच्या शब्दकोशात शिव्या नसल्याचं त्यांनी सांगितलं.
हैदराबादहून जपानमध्ये आलेल्या वीपी रुपाणी सांगतात, "जपानचा समाज शांतताप्रिय आहे. गुन्हेगारी दर अतिशय कमी आहे. रात्री दोन वाजताही महिला एकटीने जा ये करत असल्याचं तुम्ही पाहू शकता".

सतनाम सिंह सन्नी सांगतात, "जपानी माणसं मदतीला सदैव तत्पर असतात. रात्री दोन वाजता तुम्हाला काही मदत लागली तर 18 वर्षांची तरुणी तुम्हाला मदत करू शकते. जपानची माणसांचं देशावर प्रचंड प्रेम आहे. ते देशासाठी काहीही करू शकतात".
'हॉटेलचा स्टाफ टिप घेत नाही'
सतनाम सिंह एक आठवण सांगतात, "2011 साली आलेल्या विनाशकारी त्सुनामीत हजारो माणसं मारली गेली. मालमत्तेचंही खूप नुकसान झालं. त्यावेळी जपानमधली माणसं कमी वेतनात काम करायला तयार होती. जपानची नव्याने उभारणी करायची आहे, आपल्याला हे करायलाच हवं असा त्यांचा दृष्टिकोन होता".
जपानच्या माणसांबद्दल ते आणखी एक रंजक गोष्ट सांगतात. "इथल्या हॉटेलमधली माणसं पाहुण्यांकडून टिप घेत नाहीत. हे आमचं कामच आहे असं नम्रपणे सांगतात. आम्हाला टिप नको असं सांगतात".
जपानी भाषा शिकावी लागली असं इथे स्थायिक झालेले सगळे भारतीय सांगतात.

उज्जवल सिंह साहनी सांगतात, "आम्ही इथे आलो आणि त्यांच्याशी बोललोच नाही तर कसं होणार? त्यांचं भावविश्व समजून घेतल्याशिवाय आम्ही काम कसे करणार. जपानी भाषा शिकून घेतल्याशिवाय इथे काम करता येणार नाही हे आम्हाला समजून चुकलं".
जपानी भाषा शिकणं किती कठीण होतं असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, त्यासाठी सहा महिने लागले.
हरदीप सिंह बँकेत काम करतात. त्यांना टोकियोत येऊन चारच वर्ष झाली आहेत. इथे राहणं खूप खर्चिक आहे आणि भाषेचाही मुद्दा आहे असं ते सांगतात.
तुम्हाला जपानी भाषा चांगल्याप्रकारे यायला हवी असं ते सांगतात नाहीतर अडचण येऊ शकते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








