टोकियो ऑलिम्पिकची डायरी : जपानमधलं जेवण कसं आहे?

फोटो स्रोत, Janhavee Moole/BBC
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
तू तिथे काय खातेस? हा प्रश्न मला टोकियोत पोहोचल्यावर पहिल्या दिवसापासून रोज एकदा तरी कुणी ना कुणी विचारतंच. यात खाण्याविषयी उत्सुकतेएवढीच जेवणाची काही अडचण तर होत नाही ना, असा काळजीचा सूरही असतो.
खाण्यावरचं माझं प्रेम अनेकांना माहिती आहे. त्यामुळेच मी खाण्याविषयी काही लिहिलं कसं नाही, याचं आश्चर्यही काहींना वाटलं.
खरं सांगायचं, तर अस्सल जपानी पदार्थांवर ताव मारण्यासाठी मी इथे येण्याआधीपासून उत्सुक होते. पण क्वारंटाईन आणि ऑलिंपिक बबलच्या कडक नियमांमुळे बाहेर जाऊन फारसं काही खाता आलेलं नाही. तरीही टोकियोच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेले काही पदार्थ चाखायला मिळाले आहेत.
आमचं काम संपेपर्यंत अनेकदा उशीर होतो, तोवर कर्फ्यूमुळे इथली रेस्टॉरंट्स बंद झालेली असतात. त्यामुळे मी जवळपास दररोजच जेवणासाठी प्रेस सेंटरमधल्या कॅफेंवर आणि कोनबिनी स्टोर्सवर अवलंबून आहे. कोनबिनीमध्ये मिळणाऱ्या पदार्थांविषयी मी आधीही सविस्तर लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Janhavee Moole/BBC
तर, या कोनबिनीमध्ये मिळणारी सलाड, सँडविचेस, इन्स्टंट रामेन माझ्यासाठी मोठा आधार बनली आहेत. त्याविषयी माझी अजिबात तक्रार नाही, कारण खरंच साधे वाटणारे हे पदार्थही अगदी रुचकर असतात. पण मी फक्त हेच खाऊन जगते आहे, असंही नाही.
टोकियोची खास ओळख असलेले अनेक पदार्थ आतापर्यंत चाखून पाहिले आहेत.
टोकियोत आल्या आल्या तिसऱ्या दिवशीच सुशी आणि सशिमी खाण्याचा योग आला. थँक्स टू डिलिव्हरी सर्व्हिस.

फोटो स्रोत, Marek Polaszewski/BBC
सुशी हा जपानची ओळख बनलेला खाद्यप्रकार आहे. सुशीचं वर्णन शब्दांत करणं मला कठीण जातंय, कारण सुशी खाणं हा अनुभव असतो.
अगदी अरसिकपणे सांगायचं, तर सुशी म्हणजे व्हिनेगर घालून बनवलेला भात आणि माश्यांचे कच्चे तुकडे. नोरी (समुद्री शेवाळ), सोया सॉस, दाईकोन (एक प्रकारचा मुळा), मुरलेलं आलं आणि वासाबीसोबत या दोन्हीचा संगम होतो, तेव्हा एक वेगळी चव निर्माण होते. अर्थात या चवीची सवय व्हावी लागते.
माश्यांचे सुबकपणे तुकडे करणं हेही सोपं नसतं. कसलेले शेफच हे काम करतात. या सगळ्यामुळे सुशीभोवती एक गूढ वलय निर्माण झाल्यासारखं वाटतं.

फोटो स्रोत, Janhavee Moole/BBC
मी इथे येण्याआधीही सुशी खाल्ली असल्यानं त्रास झाला नाही, उलट काहीतरी छान खाल्ल्याचा अनुभव आला. पण अनेकांना सुशी आवडत नाही.
कामातून वेळ मिळेल तेव्हा प्रत्यक्ष रेस्टॉरंटमध्ये जाऊन सुशी खायचा बेतही ठरवते आहे.
नोरीमाकी किंवा माकी मात्र बऱ्याचदा खाल्ली आहे. हे एक प्रकारचे रोल्स असतात, ज्यात सुशी किंवा वेगवेगळ्या भाज्यांभोवती भात आणि नोरी गुंडाळलेली असते.
सुशीइतकीच मिसो सूप ही जपानची ओळख आहे. मिसो म्हणजे आंबवलेल्या सोयाबीनची पेस्ट. यात तांदूळ, बार्लीसारखी धान्य किंवा समुद्री शेवाळ वगैरेही घातलेलं असू शकतं. पावसाळी हवेत मिसो सूप हे तर एखाद्या कंफर्ट फूडसारखं वाटतं.

फोटो स्रोत, Lourdes Heradia/BBC
याकितोरी हाही मला अतिशय आवडणारा प्रकार आणि कोनबिनीमध्येही तो उपलब्ध असतो. याकितोरी म्हणजे एकप्रकारचं ग्रिल्ड चिकन. जपानमधलं हे एक प्रसिद्ध स्ट्रीटफूड आहे.
कारागे आणि टेंपुरा म्हणजे आपल्याकडची भजीच... भाज्या, सीफूड, चिकन पिठात घोळून कारागे केले जातात. तर टेंपुरा हे थोड्या वेगळ्या पद्धतीनं, भिजवलेल्या पिठात घोळून केले जातात.

फोटो स्रोत, Janhavee Moole/BBC
ओनीगिरी (समुद्री शेवाळाच्या वेश्टनात बांधलेला त्रिकोणी किंवा अंडाकृती आकाराचा शिजवलेला भात), काहीशा जाडसर असलेल्या उडान नूडल्स आणि बकव्हिट म्हणजे कुटू या धान्यापासून केलेल्या सोबा नूडल्स आणि ग्योशा (डंपलिंग) हेही माझे आवडते पदार्थ आहेत.
अर्थातच साकेची चवही घेऊन पाहिली आहेच. जपानमधलं हे प्रसिद्ध पेय म्हणजे एकप्रकारची वाईन आहे. हे वाईन किंवा दारूचं समर्थन नाही- पण इथल्या संस्कृतीत साकेला महत्त्वाचं स्थान आहे.
एका पदार्थाविषयी मात्र बरंच ऐकलं होतं, पण अजून खायचा धीर झालेला नाही. उनागी अर्थात जपानी ईल मासा. का ते विचारू नका. बाकी उनागी म्हटल्यावर तुम्हालाही फ्रेंड्स टीव्ही सीरीयलमधला रॉस आठवला का?
जपानच्या आणि टोकियोच्या खाद्यसंस्कृतीतल्या एका पदार्थाविषयी खूप उत्सुकता होती आणि त्यावर वेगळी बातमीही करते आहे. त्यामुळे इथे आत्ता त्याविषयी लिहित नाही. (सिक्रेट..) लिहिन तेव्हा मात्र जरूर वाचा..
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








