टोकियो ऑलिंपिकची डायरी : शूटिंग रेंज, पदकं आणि पराजय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
गेले दोन दिवस मी असाका शूटिंग रेंजवर घालवते आहे. भारतानं नेमबाजीत अजून पदक मिळवलेलं नाही, याचं दुःख आहेच, पण सर्वोच्च स्तरावरची नेमबाजी पाहायला मिळते आहे, याचा आनंदही वाटतो आहे.
ही रेंज टोकियो शहराच्या मध्यवर्ती भागापासून तशी दूर आहे. मला हॉटेलपासून इथे यायला तासभर वेळ लागतो. वाटेत एक बाग लागते.. बाग कसली, जंगलच आहे ते छोटंस. इथल्या सिमेंट काँक्रिटच्या जगात ती झाडं जरा दिलासा देतात.
शहर मागे पडत जातं, तशी इथे उंच इमारतींची जागा लहान बंगले आणि छोटी छोटी घरं घेताना दिसतात. हा सगळा उपनगराचा भाग आहे. त्यामुळं रुंद रस्ते, बागा, मैदानं आलीच.
इथेच जपानच्या ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्सेस या सुरक्षादलाचा कँप आहे, जिथे ऑलिंपिकची शूटिंग रेंज उभारण्यात आली आहे. मी काल सांगितलं तसं जपानमध्ये नेमबाजी फारशी लोकप्रिय नाही, त्यामुळे ही तात्पुरती रेंज उभारण्यात आली आहे.
तसंही नेमबाजी हा माझा अतिशय आवडता खेळ आहे. म्हणजे अगदी टेनिस आणि क्रिकेटपेक्षाही जास्त.

फोटो स्रोत, Getty Images
इथे शारिरीक आणि मानसिक क्षमतेची कसोटी लागते. तुम्ही म्हणाल एका जागी उभं राहून गोळी तर मारायची असते. पण तसं नसतं. असं एका जागी फार हालचाल न करता उभं राहणं सर्वात कठीण असतं. नुसतं काही मिनिटं स्थिर राहून तरी पाहा.
नेम साधण्यासाठी श्वासावरचं नियंत्रण, एकाग्रता अशा अनेक गोष्टींची गरज असते. ही एक प्रकारची ध्यानधारणाच आहे, बाकी ट्रिगर हे फक्त एक निमित्त.
बरं टेन मीटर एअर रायफल नेमबाजीत तर तुम्ही सर्वोत्तमात सर्वोत्तम असावं लागतं. म्हणजे एरवी टार्गेटच्या मधोमध तुमची गोळी लागली, तर दहा गुण मिळतात. पण इथे फक्त दहा नाही, तर 10.9 पर्यंत गुण मोजले जातात- म्हणजे त्या मध्याच्या किती मधोमध होतात हे पाहिलं जातं. अर्थात 'परफेक्शन'चं 'परफेक्शन' असंच म्हणूयात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधी काय केलं, किती यश मिळवलं, तुमचा लौकिक काय आहे, हे सगळं साफ निरर्थक ठरतं. त्या त्या वेळी त्या त्या क्षणी काय निर्णय घेता, यावर सगळं अवलंबून असतं.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा तर जय-पराजय यांच्यात केवळ एका शॉटचं अंतर असतं.
अभिनव बिंद्रानं 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं, ती मॅच पाहिली असेल तर तुमच्या हे लक्षात येईल. अखेरच्या निर्णायक क्षणी अभिनवनं तेव्हा 10.8 म्हणजे जवळपास परफेक्ट शॉट मारला होता.
अभिनवचं सुवर्णपदक निश्चित करणाऱ्या त्या शॉटचं वर्णन 'अ शॉट ॲट हिस्ट्री' असं केलं गेलं आणि हेच त्याच्या आत्मचरित्राचं नावही आहे.
मी जाहिरात करत नाहीये, पण हे पुस्तक प्रत्येक भारतीयानं वाचायला हवं, असं मला खरंच मनापासून वाटतं.
पण एक ऑलिंपियन पदकविजेता कसा घडतो, भारतात खेळाडूंसमोरच्या समस्या काय आहेत, सगळ्या सुविधा असतानाही काय अडचणी येऊ शकतात, मानसिक कणखरतेसाठी नेमबाज काय करतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळतील.
अशा एखाद्या शॉटवर पदक ठरणं, फायनलचं तिकिट मिळणं- न मिळणं अशा गोष्टी कशा अवलंबून असतात हे गेल्या दोन दिवसांत चारवेळा पुन्हा अनुभवलं आहे. खेळाडूंना भावनांवर ताबा मिळवण्यासाठी झगडताना पाहिलंय.
खेळाचं जग हे असं असतं. तुम्हाला उघडं पाडतं. कदाचित म्हणूनच मला हे जग एवढं आवडतं. शेवटी कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षाही प्रत्येकाच्या प्रवासाला आपण दाद द्यायला हवी, नाही का?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








