सौरभ चौधरी: 'आताशी तर सुरुवात आहे, अजून अख्खं आयुष्य बाकी आहे'

सौरभ चौधरी, नेमबाजी, मेरठ, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेमबाज सौरभ चौधरी

भारताचा नेमबाज सौरभ चौधरीला टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिल्या दिवशी सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सौरभ खरं तर पात्रता फेरीत पहिला आला होता. त्यानं 600 पैकी 586 गुणांची कमाई केली. पण अंतिम फेरीत पदकापर्यंत पोहोचण्यात सौरभला अपयश आलं. त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

पण ज्या असाका शूटिंग रेंजमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय, तिथे आलेल्या अनेक नेमबाज आणि प्रशिक्षकांनी सौरभचं कौतुक केलं आहे. अवघ्या 19 वर्षांच्या वयात सौरभनं आपला दबदबा निर्माण केला आहे. इथे त्याच्या नावाची चर्चाही होताना दिसली.

पहिल्या दिवशी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी सौरभकडे त्यावर खल करण्यासाठी वेळ नाही. कारण त्याच्याकडे पदक जिंकण्यासाठी अजून एक संधी बाकी आहे. 27 जुलैला सौरभ आणि मनू भाकर मिश्र नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात खेळायला उतरतील.

आम्ही त्याला या कामगिरीविषयी काय वाटतंय, असं विचारलं. सौरभ म्हणाला, "आताशी तर सुरुवात आहे, अजून अख्खं आयुष्य बाकी आहे."

सौरभ एरवी त्याच्या एकाग्रतेसाठी आणि सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जातो. पात्रता फेरीत या दोन्ही गोष्टी दिसून आल्या. पण अंतिम फेरीत अडखळत झालेल्या सुरुवातीचा त्याला फटका बसला. सौरभनंही आपण ऱ्हिदममध्ये येऊ शकलो नाही, हे मान्य केलंय.

तो सांगतो, "मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या, पण त्याकडे दुर्लक्ष केलं. फायनलमध्ये मी पूर्ण प्रयत्न केले."

लहान वयात भरारी

सौरभ चौधरीने लहान वयात घेतलेली भरारी थक्क करणारी आहे.

दहावीनंतर मुलामुलींना कॉलेजचे वेध लागतात. मित्रमैत्रिणी, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्य हे सगळं खुणावू लागतं. उत्तर प्रदेशातल्या मेरठमधल्या कलिना गावातल्या सौरभ चौधरीने वयाच्या पंधराव्या वर्षी नेमबाजीसारखा अवघड खेळ शिकायला घेतला. तो शिकण्यासाठी सायकलवरून 15-16 किलोमीटरचा प्रवास केला.

19व्या वर्षी सौरभ टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत खेळतो आहे.

सौरभ चौधरी:

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौरभ चौधरी

नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा, नेमबाजी विश्वचषक, युवा ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धा अशा सगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणारा तो एकमेव भारतीय नेमबाज आहे.

19व्या वर्षी सौरभच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 14 सुवर्ण आणि 6 रौप्यपदकं आहेत. मिश्र प्रकारात सौरभ मनू भाकेरच्या साथीने खेळतो. सौरभ-मनूची जोडी पदकाची दावेदार आहे.

सौरभचे बाबा शेती करतात. त्यांच्या घरी दूरदूरपर्यंत कोणाचाही नेमबाजीशी काहीही संबंध नाही.

भारताच्या कोणत्या खेळाडूंच्या स्पर्धा कधी आहेत? पाहाण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

16व्या वर्षी सौरभने एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. हे पदक पटकावणारा सगळ्यात लहान वयाचा भारतीय खेळाडू ठरला होता.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेत सौरभने सुवर्णपदक जिंकलं होतं.

मेरठपासून 53 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बागपतजवळच्या बेनोलीतल्या अमित शेरॉन अकादमीत सौरभने नेमबाजीची धुळाक्षरं गिरवली. सौरभ वडिलांना शेतीच्या कामातही मदत करतो.

रोजचा प्रवास कमी करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रशिक्षक अमित यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभने घरीच नेमबाजी रेंज तयार केली. गुरांसाठी असलेला गोठ्यातली जागा उपयोगात आणण्याचा त्याने निर्णय घेतला. गुरांसाठी असलेला पेंढा थोडा दूर ठेवण्यात आला. 15 मीटर जागेत घरच्या घरी नेमबाजी सुरू झाली. दररोज सहा तास सौरभचा सराव चालतो.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे टोकियोतून

सौरभला नेमबाजी करताना पाहून मला आज का कोण जाणे, रायफल नेमबाज अभिनव बिंद्राची आठवण झाली. सिडनी ऑलिंपिकमध्ये बिंद्रा पात्रता फेरीत बाद झाला होता आणि अथेन्समध्ये त्याला विक्रम मोडूनही पात्रता फेरीचं आव्हान पार करता आलं नाही. बिंद्रासारखाच सौरभही अगदी लहान वयात गुणवत्तेनं भरलेला आणि करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाहणारा नेमबाज आहे.

त्या वयात अशा दबावाचा सामना करणं सोपं नसतं. त्यामुळे मी सौरभकडून चांगली अपेक्षा करत होते, पण तो अंतिम फेरीत पोहोचेल असं मात्र वाटत नव्हतं.

पण पात्रता फेरी सुरू झाली आणि तो अगदी शांतपणे नेम साधत होता. त्याच्या शेजारी पाकिस्तानचा जोसेफ गुलफाम नेमबाजी करत होता. चौथ्या फेरीत सौरभनं दहाही वेळा नेम साधत 100 चा स्कोर नोंदवला. तेव्हापासून वाटू लागलं, की सौरभ फायनलमध्ये जाऊ शकतो. शेवटच्या सीरीजमध्ये तीनवेळा त्यानं 9 ही गुणसंख्या नोंदवली आणि थोडावेळ तिथे असलेल्या भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण तोवर सौरभनं भक्कम आघाडी घेतली होती आणि शेवटी त्यानं पुन्हा 10 स्कोर नोंदवत पात्रता फेरी पूर्ण केली.

सौरभनं एकूण 600 पैकी 586 गुण मिळवले पण आता फायनलमध्ये हे काही कामाचं नाही. अंतिम फेरीत सगळ्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागते. तसंच दशमान पद्धतीनं म्हणजे 10.9 पर्यंत स्कोर मोजला जातो, त्यामुळे हे आव्हान सोपं नसणार आहे. "

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)