टोकियो ऑलिम्पिक: सिंधूचं ऐतिहासिक पदक आणि चैतन्याची लाट - ऑलिम्पिक डायरी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, टोकियोहून
काही दिवस असे असतात, जेव्हा खूप उशिरापर्यंत काम केल्यानं तुम्ही थकून जाता. पण मग एखादा क्षण असा येतो, की सगळा थकवा दूर पळून जातो. इतकंच नाही, तर तुम्हाला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते.
आजचा दिवस, खरंतर आजची संध्याकाळ अशीच होती. मी टोकियोला आल्यापासून इथे वेगवेगळ्या देशांतल्या क्रीडा पत्रकारांना भेटते आहे. त्यांच्याशी बोलताना दोन नावं सातत्यानं समोर यायची. दीपिका कुमारी आणि पी. व्ही. सिंधू.
दीपिकाचं आव्हान याही ऑलिंपिकमध्ये लवकर संपुष्टात आलं, पण सिंधूनं मात्र अजिबात निराशा केली नाही. उपांत्य फेरीतला पराभव पचवून, पुन्हा सगळं लक्ष खेळावर एकत्रित करणं सोपं नसतं. सिंधूनं ते साधलं. सोपं वाटत असलं तरी यश इतक्या सहजतेनं मिळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कदाचित म्हणूनच तिच्या सामन्यादरम्यान भारतीय पत्रकारही फॅनच्या भूमिकेत शिरले आणि प्रेक्षकांविना रिकाम्या वाटणाऱ्या स्टेडियममध्येही सिंधूच्या नावाचा जयघोष झाला.
सिंधूच्या विजयानं एका-एका पदकासाठी वाट पाहावी लागणाऱ्या देशाला सुखाचा क्षण दिला आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण आता भारतानं या खेळात तीन पदकं मिळवली आहेत.
पण या सगळ्यापलीकडे, भारतीय महिला खेळाडू काय करू शकतात हे या विजयानं दाखवून दिलं आहे. असे क्षण दुर्मिळ असतात, पण आता ते सातत्यानं दिसू लागले आहेत. सर्वोच्च स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भारतीय महिला भरीव यश मिळवतात आणि सिंधू त्यात आघाडीवर आहे.
सिंधूचा निश्चय, तिची ताकद, तिला असलेली विजयाची भूक आणि तिची इच्छाशक्ती.. हे सगळे गुण रविवारच्या सामन्यात दिसून आले आणि त्यामुळे देशभरातली अनेक मुलींना नवी प्रेरणा मिळाली असेल यात मला शंका वाटत नाही. माझे सहकारी अरविंद छाबडा यांनी सामन्यानंतर सिंधूशी संवादही साधला.
सिंधूनं सांगितलं की उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवानंतर ती दुःखी होती आणि आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणं तिला कठीण जात होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण प्रशिक्षक पार्क ते सांग यांनी तिला आठवण करून दिली - तिसरं येणं आणि चौथं येणं यात खूप मोठा फरक आहे. ऑलिम्पिकमध्ये चौथं स्थान आणि पदक यातलं हे अंतर सिंधूनं आता दोनदा पार केलं आहे. लवलिना बोर्गोहेन बॉक्सिंग सेमी फायनलमध्ये हे अंतर पार करण्याच्या इराद्यानंच उतरेल.
पुढच्या सहा दिवसांत अथलेटिक्स, हॉकी आणि कुस्ती.. बरंच काही बाकी आहे. जाता जाता, आज ऑलिम्पिक स्टेडियममध्येही एक अविस्मरणीय गोष्ट घडली. इथे सध्या अथलेटिक्सच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यात पुरुषांच्या उंच उडीच्या स्पर्धेत इटलीचा गियानमार्को तांबेरी आणि कतारचा मुताझ एस्ला बार्शिम या दोघांनी 2.37 मीटर उंच उडी मारली आणि पहिलं स्थान मिळवलं.
दोघांनी 2.39 मीटर उंच उडी मारून ऑलिंपिक विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाचे तीन-तीन प्रयत्न अपयशी ठरले. पंचांनी त्यांना आणखी एक जंप-ऑफ-म्हणजे टायब्रेकरसाठी उंच उडी मारण्याची आणखी एक संधी देऊ केली. पण दोघांनी खिलाडूपणे सुवर्णपदक वाटून घेता येईल का अशी विचारणा केली.
पंचांनी दुजोरा दिला आणि 1912 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदक विभागून दिलं गेलं. त्यानंतर गियानमार्को आणि बार्शिम या दोघांनी केलेलं सेलिब्रेशन म्हणजे या ऑलिम्पिकचा सर्वोत्तम क्षण ठरावा. खेळाच्या मैदानात वैर नसतं, तर स्पर्धा असते आणि सामना संपल्यावर ती चढाओढही संपते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








