टोकियो ऑलिम्पिक: जेव्हा गोपीचंद यांनी पी. व्ही. सिंधूकडून हॉटेलमध्येच मध्यरात्री सराव करून घेतला

पी.व्ही.सिंधू, पी. गोपीचंद

फोटो स्रोत, VCG

फोटो कॅप्शन, पी.व्ही.सिंधू
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

रिओ ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

पहिल्याच मॅचमध्ये पी. व्ही. सिंधूने इस्रायलच्या सेनिया पोलकारपोवाचा सहज पराभव केल्यामुळे तिच्याकडून आशा उंचावल्या आहेत.

ऑलिम्पिक मेडल जिंकणं हा खेळाडूचा ध्यास असतो. आणि मेडलने तुम्हाला हुलकावणी दिली तर तुमच्या शिष्याकडून तुम्ही मेडलची अपेक्षा करता. त्यातून कोच पी. गोपीचंद यांना सरावाची एक भन्नाट कल्पना कशी सुचली त्याची कहाणी..

जगात साधारण किती महिला व्यावसायिक बॅडमिंटनपटू आहेत माहीत आहे? सहाशेच्या वर.. ऑलिम्पिक या दर चार वर्षांनी येणाऱ्या स्पर्धेत यातले आघाडीचे 20 ते 25 खेळाडूच खेळणार असतात.

यातून तुम्हाला ऑलिम्पिक प्रवेशासाठी असलेली स्पर्धा समजू शकेल. आधीच हजारो खेळाडूंमधून फक्त 20-30 खेळाडू ही स्पर्धा खेळणार. आणि त्यातून चार जणांना मेडल मिळणार. एकदा मेडल हुकलं तर दुसरी संधी आणखी चार वर्षांनी...

ऑलिम्पिक मेडलची स्पर्धा ही अशी जीवघेणी आहे. म्हणूनच या मेडलसाठी खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नांच्या कहाण्या विलक्षण आहेत. अशीच एक कहाणी आहे पी व्ही सिंधूच्या 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सिल्व्हर मेडलची.

तिच्याबरोबरच ही कथा आहे तिचे कोच पुलेला गोपीचंद यांनी तिच्यावर घेतलेल्या मेहनतीची. आज बघूया तो किस्सा जेव्हा सेमी फायनल मॅचपूर्वी गोपीचंद यांनी सिंधूकडून मध्यरात्री हॉटेल रुममध्येच सराव करून घेतला होता. असं त्यांनी का केलं?

रिओ ऑलिम्पिकची पार्श्वभूमी

ऑलिम्पिकच्या तयारीसाठी कोच पुलेला गोपीचंद यांनी सिंधूकडून तिचा मोबाईल फोन कसा काढून घेतला होता. आणि तिने ऑलिम्पिक तयारीच्या काळात कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या करायच्या नाहीत हे कागदावर लिहून घेऊन त्यावर सिंधूची सही कशी घेतली होती हे एव्हाना सगळ्यांना माहीत आहे.

गोपीचंद यांनी सिंधूबरोबर न थकता सराव करता यावा यासाठी स्वत:चं वजनही सात किलोंनी कमी केलं होतं.

थोडीशी पार्श्वभूमी सांगते. गोपीचंद यांची आणखी एक शिष्या सायना नेहवाल तेव्हा त्यांच्यापासून वेगळी होऊन बंगळुरूला प्रकाश पदुकोण अकॅडमीत सराव करत होती.

इथं हैदराबादमध्ये गोपीचंद सिंधूकडून ऑलिम्पिकची तयारी करून घेत होते. दोघींमध्ये कितीही नाही म्हटलं तरी ऑलिम्पिकसाठी निकराची लढाई होती.

सिंधूपेक्षा सायना अनुभवी आणि रँकिंगमध्येही सरस होती. तिची तयारीही जोरदार सुरू होती. दुसरीकडे गोपीचंद सिंधूकडून प्रत्येक शॉट घोटवून घेत होते.

पी.व्ही.सिंधू, पी. गोपीचंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी.व्ही.सिंधू

ऐन स्पर्धेदरम्यान सायना दुखापतीमुळे कमनशिबी ठरली. तिचा गुडघा दुखावला. आणि ती दुसऱ्या राऊंडमध्ये बाहेर पडली.

पण, सिंधूची घोडदौड सुरू राहिली. बॅडमिंटन आणि सरावाशी निगडित प्रत्येक गोष्टीचं बारकाईने नियोजन करून दोघं पुढे जात होते. आणि या प्रवासात आली सेमी फायनलची ती मॅच.

हॉटेल रुम बॅडमिंटन कोर्टमध्ये बदलली

तो दिवस होता 18 ऑगस्ट. दुसऱ्या दिवशी सिंधू आपली सेमी फायनलची मॅच जपानच्या नोझोमी ओकुहारा विरुद्ध खेळणार होती.

सिंधूकडून फारशा अपेक्षा नसताना ती सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय पटलावर नवीन असल्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंना तिचा खेळ नवीन होता. त्याचा फायदाही तिला मिळाला.

पण, आता ती अशा वळणावर होती जिथे पुढची एक मॅच ठरवणार होती सिंधूला मेडल मिळणार की नाही. की ब्राँझ मेडलसाठी आणखी एक मॅच खेळावी लागणार.

नेमके हेच विचार तिचे कोच गोपीचंद यांच्या मनात रात्रभर येत होते. पहिल्या तीन मॅच योजनेबरहुकुम पार पडल्या. पण, आता जर सिंधू हरली तर सगळं शून्यावर येईल.

कदाचित रिकाम्या हाताने घरी परतावं लागेल आणि हाच विचार गोपीचंद यांना सहन होत नव्हता. त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. आधी उठून त्यांनी त्यांनी खोलीतच येरझारा घातल्या.

पी.व्ही.सिंधू, पी. गोपीचंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी.व्ही.सिंधू

नंतर मध्यरात्री नोझोमी ओकुहारा हिच्या मॅचेसच्या टेप्स बघायला सुरुवात केली. ती कशी खेळते, तिला हरवण्यासाठी सिंधूने काय केलं पाहिजे याच्या कल्पना डोक्यात सुरू झाल्या. आणि दोन तासांत डोक्यात योजना तयार झाली. हे करताना 2-3 तास गेले होते. पहाटे साडेतीन वाजता त्यांनी सिंधूलाही उठवलं.

सिंधू उंच आहे. ती स्मॅशचा शॉट आरामात खेळेल. पण, तो शॉट ओकुहाराने परतवला तर सिंधूला नेटजवळ टॅपचा शॉट खेळता आला पाहिजे हे गोपीचंद यांनी हेरलं होतं.

मग किलोमीटर लांब असलेल्या प्रॅक्टिस कोर्टपर्यंत जाण्यासाठी वेळ कशाला वाया घालवायचा. दोघांनी हॉटेल रुममध्ये टॉवेल मधोमध बांधून नेट तयार केलं. आणि टॅपच्या शॉटचा जवळ जवळ 3000 वेळा सराव केला. हॉटेल रुम बॅडमिंटन कोर्टमध्ये बदलली.

त्या रात्रीच्या अनुभवाविषयी नंतर बोलताना पुलेला गोपीचंद म्हणाले,

"ऑलिम्पिक मेडल हे ॲथलीटचं ध्येय असतं. मी 2000मध्ये प्रयत्न करूनही मेडलपासून दूर राहिलो. आता माझ्या शिष्यांवर ती वेळ आलेली मला नको होती. त्यासाठी कुठलीही गोष्ट नशिबावर सोडायला मी तयार नव्हतो. प्रयत्नांत कुठलीही कसूर मला मान्य नव्हती.

"कोर्ट पर्यंत जाण्याचा वेळही मला वाचवायचा होता. ऐन मॅचच्या वेळी सिंधूचं मनोबल उंचावण्यासाठी मी तिला कोर्टबाहेर जमलेली गर्दी दाखवली. ते तुला बघायला आलेत. त्यांना जिंकून दाखव असं तिला म्हटलं. त्याचाही उपयोग झाला," गोपीचंद सांगतात.

सिंधूचं ऐतिहासिक सिल्व्हर मेडल

हे सगळं सुरू असताना सिंधूच्या मनात काय होतं? पहाटे तीन वाजता उठायची तिलाही सवय होती. सरावाच्या नवनवीन कल्पना राबवण्याची गोपीचंद यांची सवयही तिला नवीन नव्हती. आणि अर्जुनाप्रमाणे कोचला नाही म्हणण्याचा तिने विचारही केला नव्हता.

पी.व्ही.सिंधू, पी. गोपीचंद

फोटो स्रोत, facebook

ती रात्र तिलाही आठवते. "गोपीसरांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं, ते रात्रभर झोपले नाही आहेत. तशा मी ही काही रात्री मॅचच्या उत्कंठेमुळे न झोपता काढल्या होत्या. त्यांनी सरावासाठी तयार व्हायला सांगितलं. मी तयार झाले. बाकी सगळे विचार डोक्यातून आपोआप बाजूला झाले.

"रुममध्येच आम्ही काही काळ सराव केला. प्रत्यक्ष मॅच मी दोन गेममध्ये जिंकले, तेव्हा मागे वळून गोपीसरांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मी समजायचं ते समजले," सिंधू सांगते.

सिंधूने ती मॅच 21-19, 21-10 अशी जिंकली. पुढे फायनलमध्ये मात्र तीन गेमच्या अटीतटीच्या मॅचमध्ये कॅरोलिना मरिनकडून तिचा पराभव झाला. पण, सिल्व्हर मेडल तिच्या नावावर लागलंच.

रिओ ऑलिम्पिक ची तयारी आणि प्रत्यक्ष ऑलिम्पिक या दरम्यान गोपीचंद, सिंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत यावर एक स्वतंत्र पुस्तक निघू शकेल. त्यांचं जगणं बॅडमिंटन भोवती होतं.

ऑलिम्पिक आणि पुढची मॅच याशिवाय इतर कुठलाही विचार सिंधूच्या मनात येऊ नये म्हणून त्यांनी क्रीडानगरीत स्वतंत्र फ्लॅट घेतला होता.

तिथे सगळे बॅडमिंटन खेळाडू आणि सहकारी एकत्र राहत होते. जेणेकरून चर्चा फक्त बॅडमिंटनचीच होईल. आणि सिंधू, दुसरा भारतीय खेळाडू श्रीकांत यांच्या कानावर फक्त बॅडमिंटनच पडेल.

खोलीतच सराव करणं, मोकळ्या वेळेत भिंतीवर शटल मारत ते परतवण्याचा सराव करणं असे अभिनव प्रकार या मोहिमेत होते. विचार भरकटू नयेत म्हणून आर रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगची सीडी साथीला होती.

बॅडमिंटनमध्ये एरवी प्रचलित नसलेले काही शॉट गोपीचंद यांनी सिंधूसाठी पुनरुज्जीवित केलं. टेनिसमध्ये बॅकहँड किंवा फोरहँड क्रॉसकोर्ट हा एक देखणा शॉट आहे.

बॅकहँड क्रॉसकोर्टचा सराव गोपीसरांनी सिंधूकडून सातत्याने करून घेतला. प्रतिस्पर्ध्याने परतवलेला फटका नेटजवळ सिंधूने परतवावा हा त्यांचा हेतू.

सरावादरम्यान लीलया हा शॉट खेळणारी सिंधू मॅचमध्ये मात्र चुकत होती. नेटजवळचा तिचा खेळ काहीसा कमकुवत आहे. पण, ऑलिम्पिकमध्ये मिशेल ली विरुद्ध खेळताना दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा बॅकहँड क्रॉसकोर्ट अगदी अचूक बसला. सिंधूने खूश होऊन गोपीसरांकडे पाहिलं.

त्या शॉटनंतर दोघांचीही खात्री पटली की, सिंधूसाठी हा ऑलिम्पिक प्रवास मोठा आणि यशदायी असणार आहे.

पुढे 2019मध्ये सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली. आताही टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधू मेडलसाठी दावेदार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)