टोकियो ऑलिंपिकची डायरी - पायी चालणाऱ्यांना प्राधान्य देणारं शिबुया स्क्रँबल

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
टोकियोच्या शिबुया परिसरात गेल्यावर खऱ्या अर्थानं टोकियो अनुभवायला मिळतंय.. रस्त्यावरची गर्दी, ट्रॅफिक, या एरवी कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी शहराला जिवंत करत असतात नाही का?
म्हणजे एरवी आमचा बहुतांश प्रवास हॉटेलपासून एखाद्या स्टेडियममध्ये, किंवा प्रेस सेंटरपाशी किंवा आम्ही लाईव्ह करतो, त्या जागेपर्यंत असाच मर्यादित आहे.
आज आमचे रिपोर्ट रेकॉर्ड करण्यासाठी शिबुयामधल्या एका इमारतीच्या रूफटॉपवर, शिबुया स्काय इथे गेले होते. उंचावर गोठवणाऱ्या वाऱ्यात 229.71 उंचीवर उभं राहून बोलताना भारी वाटत होतं. कारण भारताची कामगिरीच तशी झाली आहे ना.
टोकियो शहरातले सध्याचे सगळे महत्त्वाचे लँडमार्क्स इथून दिसत होते - टोकियो टॉवर, टोकियो स्कायट्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑलिंपिक स्टेडियम.

फोटो स्रोत, Getty Images
मुळात शिबुया ही टोकियोमधल्या सर्वात हॅपनिंग जागांपैकी एक आहे. तिथलं शिबुया स्क्रँबल जगभरात प्रसिद्ध आहे. स्क्रँबल म्हणजे अशी जागा जिथे सगळ्या बाजूंनी येणारी वाहनं सिग्नलनुसार एकाचवेळी पादचाऱ्यांसाठी थांबतात.
पायी चालणाऱ्या लोकांना प्राधान्य देण्याची ही पद्धत आहे. आणि जपानमध्ये खरोखर पायी चालणाऱ्या लोकांचा विचार केला जातो. म्हणूनच तर इथे अनेक ठिकाणी अशी स्क्रॅम्बल क्रॉसिंग दिसून येतात.

फोटो स्रोत, Getty Images
शिबुया स्क्रँबल इथे एकाच वेळी हजार-दोन हजार लोक सर्व दिशांनी रस्ता क्रॉस करतात. हे दृश्य पाहणं, हाही एक अनुभवच आहे.
शिबुया क्रॉसिंग नेमकं कुठे आहे, तर शिबुया स्टेशनच्या हाचिको एक्झिटबाहेरची ही जागा.

फोटो स्रोत, Getty Images
हा हाचिको म्हणजे एक जपानी अकिता प्रजातीचा कुत्रा होता, जो आपल्या मालकाची प्रोफेसर उएनो यांची वाट पाहात शिबुया स्टेशनबाहेर येऊन थांबायचा. मालकाच्या मृत्यूनंतरही नऊ वर्ष तो रोज हे करत होता.
हाचिकोची आठवण म्हणून इथे त्याचा पुतळाही उभारण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Janhavi Moole/BBC
काहीजण शिबुया क्रॉसिंगला जगातलं सर्वात व्यस्त स्क्रँबल क्रॉसिंगही म्हणतात. कोव्हिडमुळे सध्या आणिबाणी असल्यानं गर्दी कमी आहे. पण टोकियोतल्या बाकीच्या जागांच्या तुलनेत इथे बरीच वर्दळ आहे.
बऱ्याच दिवसांनी अशी गर्दी पाहून मला का हायसं वाटलं, कुणास ठाऊक. अर्थात जवळपास सगळे मास्क लावून आहेत आणि एकमेकांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करतायत.
आम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे पोहोचलो, तेव्हा सूर्य अस्ताला झुकत होता. वाढत्या अंधारात शिबुया चौकातल्या वेगवेगळ्या इमारतींचे दिवे आणि आणि मोठ्ठाल्या टीव्ही स्क्रीन्सचा झगमगाट जाणवू लागला.
चौकातली दुकानं, रेस्टॉरंट्स, मधूनच ऐकू येणारं संगीत, लगबगीनं सगळ्या दिशांनी जाणारी माणसं - शहर जीवंत असल्याचं पाहून किती बरं वाटतं ना?

फोटो स्रोत, Janhavi Moole/BBC
उगाचच शिबुया स्क्रँबलला टोकियोचं प्रतीक म्हणून मानलं जात नाही. अनेक सिनेमांमध्ये या शिबुया चौकाचं किंवा चौकातलं दृष्य दिसून येतं.
न्यूयॉर्कमधला टाईम्स स्क्वेअर सारखंच या चौकाचं स्थान आहे अनेकांसाठी. पण मला इथे टाइम्स स्क्वेअर पेक्षाही मुंबईतल्या दादर स्टेशनबाहेरच्या गर्दीचीच आठवण झाली. (स्वाभाविक आहे, नाही का?)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








