Tokyo Olympics: उत्साही महापौरांनी चावलं थेट गोल्ड मेडल आणि...

Tokyo Olympics: उत्साही महापौरांनी चावलं थेट गोल्ड मेडल आणि...

फोटो स्रोत, KYOTO/REUTERS

फोटो कॅप्शन, नागोया शहराचे महापौर तकेशी कावामुरा यांनी हे सुवर्णपदक कचकावून चावलं आणि पुढे सगळा गोंधळ सुरू झाला.

एका महापौरांनी आपल्याच शहरातल्या एका खेळाडूचं सुवर्ण पदक चावलं आणि एका नव्या वादाला 'तोंड' फुटलं.

महापौरांनी सुवर्णपदक चावून झाल्यावर सोशल मीडियावर झालेल्या 'चर्वितचर्वणानंतर' त्या खेळाडूला नवं सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सगळं ज्या जपानमध्ये ऑलिम्पिक नुकतंच पार पडलंय त्याच देशात झालंय. नागोया शहराचे महापौर तकेशी कावामुरा यांनी हे सुवर्णपदक कचकावून चावलं आणि पुढे सगळा गोंधळ सुरू झाला.

सॉफ्टबॉल अथलिट मियू गोटो हिचं ते सुवर्णपदक होतं.

सुवर्णपदक असं चावून महापौरांनी कोव्हिड-19 संदर्भातील नियम तोडले आहेत आणि या कृतीतून पदकाप्रती त्यांना आदर नसल्याचं दिसतं अशी टीका सुरू झाली.

ही सगळी ओरड सुरू झाल्यावर महापौरांनी माफी मागितली असून पदक बदलण्यासाठी येणारा खर्च देऊ केला. त्यानंतर आता ऑलिम्पिकच्या अधिकाऱ्यांनी तिला नवं चांगलं न चावलेलं पदक देण्याचा निर्णय घेतला आहे.

जपानने सॉफ्टबॉलमध्ये अमेरिकेला पराभूत करुन पदक मिळवलं होतं. संपूर्ण जपानमध्ये यामुळे आनंदाची लाट आलेली होती. मात्र महापौरांनी ते पदक चावून टीकेची त्सुनामी ओढवून घेतली.

यामुळे हे कृत्य त्या खेळाडूप्रती अनारोग्यकारक आणि असभ्य असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

जपानचा तलवारबाजीत रजतपदक मिळवणारा युकी ओता ने ट्वीटरवर या महापौरांवर कडक शाब्दिक 'वार' केले आहेत.

तो लिहितो, "अॅथलिट्सच्या प्रती आदरभावना नाही हे यातून दिसतच. पदक समारंभाच्यावेळेस कोव्हिड नियमांमुळे खेळाडू स्वतः पदक उचलत असत हे माहिती असूनही त्यांनी ते पदक चावलं. माफ करा, पण हे समजण्यापलीकडे आहे."

हे सगळं सुरू असताना जपानमधल्या नेटकऱ्यांनी 'जर्म मेडल' म्हणजे जंतूचं पदक असा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला.

गोतोच्या सॉफ्टबॉल संघाची मालकी ज्यांच्याकडे आहे अशा टोयोटा कंपनीनेही या कृत्याचा निषेध केला आहे. हे कृत्य 'अयोग्य' आणि 'खेदजनक' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

72 वर्षांच्या या महापौरांनी चहूबाजूंनी टीका झाल्यावर माफी मागितली आहे. ते म्हणाले, "मी नागोयाचा महापौरपदाचं भान विसरलो, मी अत्यंत अयोग्य वर्तन केलं," असं म्हणून त्यांनी पदकबदलीचा खर्चही देण्याचं सांगितलं.

टोकियो 2020 ऑलिम्पिकच्या आयोजकांनी एक पत्रक आज गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलं आहे.

यामध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आणि गोतो यांच्यामधील चर्चेनंतर नवं सुवर्णपदक देण्याचं स्पष्ट केलं असून त्याचा खर्च कमिटी देईल असं लिहिलं आहे.

पदक चावणं हे क्रीडास्पर्धांमध्ये नवं नाही, पण ते पदक जिंकणारेच करतात. पण टोकियो 2020 ऑलिम्पिकच्या आयोजकांनी या महापौरांच्या पदक चावण्याच्या प्रकरणानंतर गंमतीशीर ट्वीट केलं आहे.

त्यात ते म्हणतात, "#Tokyo2020 ची पदके खाण्यायोग्य नाहीत हे आम्ही अधिकृतरीत्या जाहीर करत आहोत," गोतो किंवा कावामुरा यांची प्रतिक्रिया अजून समजलेली नाही.

असं हे सगळं प्रकरण घडलं आहे. आता जुन्या चावलेल्या पदकाचं काय करणार हे मात्र अजून समजलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)