हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत मोठं युद्ध भडकणार? इराण बदला घेणार?

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांना ठार केल्याचा दावा केला होता. मात्र, हिजबुल्लाह संघटनेकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नव्हता.
आता या घटनेच्या काही तासांनी हिजबुल्लाहने माहिती दिलीय की, हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे.
हिजबुल्लाहनं हसन नसरल्लाह यांना 'शहीद' म्हटलं. शिवाय, इस्रायलविरोधातील लढाई सुरूच राहील, असंही म्हटलंय.
हिजबुल्लाहने म्हटले आहे की ते इस्रायलविरुद्धचा त्यांचा लढा सुरूच ठेवणार आहेत. यानंतर 'गाझा, पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध' असल्याची प्रतिज्ञा देखील हिजबुल्लाहने केली आहे.
यापूर्वी आयडीएफच्या एक्स (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवरून माहिती देताना म्हटलं होतं की, "हसन नसरल्लाह आता जगभरात त्याची दहशत पसरवू शकणार नाही."
नसरल्लाह यांच्या मृत्यूवर काय प्रतिक्रिया आल्या?
इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांना ठार केल्याचा दावा केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट केली आहे.
इराण गेल्या अनेक वर्षांपासून हिजबुल्लाहला लष्करी आणि आर्थिक मदत करत आला असून हिजबुल्लाह हा इराण समर्थित गट असल्याचंही म्हटलं जातं.
मात्र, आयातुल्ला अली खामेनी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हिजबुल्लाहबाबत लिहिताना हसन नसराल्लाह यांचा उल्लेख केलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आयातुल्ला अली खामेनी लिहीलंय, “एकीकडे लेबनॉनमध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने पुन्हा एकदा अतिरेकी झिओनिस्टांच्या रानटी प्रवृत्तींचा पर्दाफाश केला आहे, तर दुसरीकडे या हल्ल्यांनी इस्त्रायली नेत्यांची धोरणं किती संकुचित आणि बालिश असल्याचेही सिद्ध केले आहे.”
आयातुल्ला अली खामेनी यांनी सर्व मुस्लिमांना लेबनॉन आणि हिजबुल्लाहच्या बाजूनं उभं राहून, दडपशाही करणाऱ्यांविरोधात लढण्यासाठी समर्थन देण्याचं आवाहनही केलं.
आयातुल्ला अली खामेनी पुढे म्हणाले, “इस्रायली गुन्हेगारांना हे कळायला हवं की, लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेचे कोणतेही नुकसान करण्यासाठी ते खूप लहान आहेत.”
खामेनी म्हणाले, “जेव्हा दडपशाही करणाऱ्यांचे सैन्य बैरुतकडे जात होते, तेव्हा हिजबुल्लाहने त्यांना रोखले होते. तो काळ लेबनॉनचे लोक अजूनही विसरलेले नाहीत. यावेळीही दडपशाही करणाऱ्या आणि जुलमी शत्रूला त्यांच्या कारवाईचा पश्चाताप होईल,” असंही आयातुल्ला अली खामेनी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, इस्रायली संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी एक टेलिव्हिजन संदेश जारी केला, ज्यात ते असं म्हणाले की, "आमचे युद्ध लेबनॉनच्या लोकांशी नाही तर हिजबुल्लासोबत आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूबाबत काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूबाबत एक निवेदन जारी केलं आहे
मागच्या चार दशकांपासून अनेक अमेरिकन नागरिकांच्या हत्येसाठी हसन नसरल्लाह आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारी हिजबुल्लाह ही संघटना जबाबदार होती. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हसन नसरल्लाहचा मृत्यू झाल्यामुळे हजारो अमेरिकन, लेबनीज आणि इस्रायली पीडितांना न्याय मिळाला आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने केलेल्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवरच इस्रायलने नसरल्लाहवर हा हल्ला केल्याचं दिसतं. हमासने हल्ला केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नसरल्लाह यांनी हमाससोबत हातमिळवणी करण्याचा आणि इस्रायलविरोधात 'नॉर्दर्न फ्रंट' उघडण्याचा भयंकर निर्णय घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका हिजबुल्लाह, हमास, हुथी आणि इतर कोणत्याही इराणी-समर्थित दहशतवादी गटांविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचे पूर्ण समर्थन करते. कालच, मी माझ्या संरक्षण सचिवांना मध्य-पूर्व प्रदेशातील अमेरिकन लष्करी दलांची सामरिक स्थिती आणखीन मजबूत करण्यास सांगितलं आहे. जेणेकरून युद्ध रोखण्यात आणि आक्रमक प्रतिकार मोडून काढण्यात मदत होईल.
सरतेशेवटी, गाझा आणि लेबनॉन या दोन्ही देशांतील सुरू असलेल्या संघर्षांना राजनैतिक मार्गाने कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गाझामध्ये, आम्ही युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने समर्थित केलेल्या कराराचा पाठपुरावा करत आहोत. लेबनॉनमध्ये, आम्ही एका करारावर वाटाघाटी करत आहोत ज्यामुळे इस्रायल आणि दक्षिण लेबनॉनमधील लोकांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे परत जात येईल.
मध्यपूर्वेतील एका मोठ्या युद्धाची ही सुरुवात आहे का?
बीबीसीचे सुरक्षा वार्ताहर फ्रँक गार्डनर यांचं विश्लेषण :
सध्यातरी असे वाटत नसले तरी मागच्या 24 तासांमध्ये घडलेल्या घटनांनी, युद्धाच्या शक्यतेत नाटकीय बदल झाले आहेत. यामुळेच 12 देशांच्या समूहाने युद्धाची शक्यता कमी करण्यासाठी आणि मध्यपूर्वेतील देशांना युद्धापासून रोखण्यासाठी लेबनॉनमध्ये 21 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला होता.
युध्दविरामाचा प्रस्ताव मांडणाऱ्या या देशांमध्ये इस्रायलच्या मित्र राष्ट्रांचा देखील समावेश आहे.
मात्र इस्रायलचा निर्णय अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. इस्रायलनेहिजबुल्लाहला गुडघे टेकायला भाग पाडले आणि आता ते कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलणार आहेत असं दिसतंय.

फोटो स्रोत, Reuters
आता अशा परिस्थितीत इराण काय करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इराणसाठी त्यांची प्रमुख सहयोगी संघटना असलेल्या हिजबुल्लाहचा पाडाव होणे ही धोक्याची घंटा असू शकते.
मागच्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांमध्ये विविध क्षेपणास्त्रं, लॉन्चर आणि ही शस्त्रास्त्रं हाताळणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
असं असलं तरी इतर बराच शस्त्रसाठा आणि यंत्रणा अजूनही अबाधित आहेत. यामध्ये इस्रायलच्या तेल अवीव आणि इतर काही शहरांपर्यंत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्यांच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा (गायडेड मिसाईल्स) समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हिजबुल्लाह आणि इराण दोघांनाही माहीत आहे की जर त्यांनी या क्षेपणास्त्रांनी इस्रायली शहरांवर हल्ला केला तर त्याचे दोन परिणाम होतील: इस्रायल इराणविरुद्ध बदला घेईल आणि या संघर्षात अमेरिका देखील सहभागी होऊ शकते - ज्यांच्या युद्धनौका समुद्रकिनाऱ्यावर उभ्या आहेत.
इराक, सीरिया आणि येमेनमधील इराण समर्थित सशस्त्र गट देखील या संपूर्ण संघर्षात सामील होण्याची शक्यता आहे.
ही स्फोटक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुत्सद्दी पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, इस्रायलच्या नागरिकांसाठी धोका बनलेल्या हिजबुल्लाह संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्यावर इस्रायल ठाम असल्याचं सध्या तरी दिसत आहेत.
'हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूकडे इस्रायलमध्ये मोठा विजय म्हणून पाहिलं जाईल'
बीबीसीचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बॉवेन यांचं विश्लेषण :
"इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला इस्रायलमध्ये मोठा विजय म्हणून पाहिलं जाईल.
"30 वर्षांपासून अधिक काळ नसरल्लाह हिजबुल्लाहच्या केंद्रस्थानी होते. इराणमधील त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं नसरल्लाह यांनी हिजबुल्लाहचं रुपांतर एका लष्करी शक्तीत केलं होतं. त्याचा परिणाम म्हणून दोन दशकांपासून दक्षिण लेबनॉनमध्ये बळकावलेला भूप्रदेश इस्रायलला 2000 मध्ये सोडावा लागला होता.
"2006 मध्ये नसरल्लाह यांनी हिजबुल्लाहचं नेतृत्व करताना इस्रायलला रोखलं होतं. या युद्धात कोणाचाच विजय झाला नव्हता.
"मागील काही वर्षांमध्ये नसरल्लाह हे व्यक्ती म्हणून इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू होते. गेल्या वर्षी इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला याह्या सिनवार हाच इस्रायलचा शत्रू म्हणून नसरल्लाह यांच्या जवळपास पोहोचला होता.

फोटो स्रोत, Getty Images
"अमेरिका आणि आपल्या इतर पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांच्या इच्छेविरुद्ध इस्रायलनं हिजबुल्लाहवर हल्ले सुरू केले होते. त्याआधी जवळपास वर्षभर इस्रायल-लेबनॉन सीमेवर इस्रायली सैन्य आणि हिजबुल्लाहमध्ये संघर्ष सुरू होता.
"2006 मध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यातील युद्ध थांबलं होतं. तेव्हापासून इस्रायली सैन्य हिजबुल्लाहविरोधातील युद्धाची तयारी करत होतं. मागील काही आठवड्यांपासून इस्रायलनं तीच योजना अंमलात आणण्यास सुरूवात केली होती.
"इस्रायलनं लेबनॉनमधील त्यांच्या शत्रूचं म्हणजे हिजबुल्लाहचं मोठं नुकसान केलं आहे. हिजबुल्लाहच्या प्रमुखाला ठार करून इस्रायलनं त्यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे.
"आता या गोष्टीला इराण आणि हिजबुल्लाह कसं उत्तर देणार हा प्रश्न आहे. कदाचित त्यांना आता असं वाटत असेल की जर त्यांनी इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं नाही तर त्यांचा व्यूहरचनात्मक पराभव होईल.
"इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे मध्यपूर्वेत अनिश्चितता आणि धोका निर्माण होईल. म्हणूनच अमेरिका आणि इस्रायलच्या पाश्चिमात्य मित्रदेशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी युद्धविराम स्वीकारावा यासाठी प्रयत्न केले होते. जेणेकरून राजनयिक चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी संधी निर्माण व्हावी. मात्र आता त्या गोष्टीला खूप उशीर झाला आहे."
हसन नसरल्लाह कोण होते?
हसन नसरल्लाह हे लेबनॉनमधील हिजबुल्लाह या शिया इस्लामी सशस्त्र गटाचे प्रमुख नेते होते. मध्यपूर्व देशामध्ये नसरल्लाह हे लोकप्रिय आणि प्रभावी नेते मानले जात.
इस्रायलकडून मारले जाण्याच्या भीतीमुळे नसरल्लाह हे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी आले नव्हते.
नसरल्लाह यांनी हिजबुल्लाह या संघटनेला एक सशस्त्र आणि राजकीय गटामध्ये परिवर्तीत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे इराणशीही जवळचे संबंध होते. हिजबुल्लाहमध्येही त्यांना मानाचं स्थान होतं.
नसरल्लाह यांच्या नेतृत्वामधील हिजबुल्लाहने इराक, येमेन आणि त्याबरोबरच पॅलेस्टाईनमधील हमाससारख्या सशस्त्र गटातील सैनिकांना प्रशिक्षण देण्यास मदत केली होती. या बदल्यात इराणकडून मिसाईल्स आणि रॉकेट्स प्राप्त करुन हिजबुल्लाहने त्यांचा वापर इस्रायलच्या विरोधात केला आहे.
हसन नसरल्लाह यांचा संपूर्ण प्रवास तुम्हाला इथे वाचता येईल : हसन नसरल्लाह : इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेले हिजबुल्लाहचे हे नेते कोण होते?

फोटो स्रोत, Reuters
हिजबुल्लाह संघटना काय आहे?
हिजबुल्लाह हा एक शिया मुस्लिम राजकीय पक्ष आणि लेबनॉनमधील निमलष्करी संघटना आहे, जिला इराणचा पाठिंबा आहे. आणि इराण हा या भागामधला प्रभावशाली शिया देश आहे.
हिजबुल्लाह या नावाचा अर्थ होतो - ‘अल्लाहचा पक्ष’
1980 च्या दशकाच्या सुरुवातीला लेबनॉनवर इस्रायलच्या ताब्यादरम्यान इराणच्या आर्थिक आणि लष्करी पाठिंब्यानं हिजबुल्लाहचा उदय झाला.
दक्षिण लेबनॉनमधील पारंपारिकरित्या कमकुवत असलेल्या शिया समुदायाचं संरक्षण करणारी शक्ती म्हणून ही संघटना उदयाला आली.
हसन नसरुल्लाह हे 1992 पासून या संघटनेचे प्रमुख आहेत. आणि ही संघटना 1992 पासूनच्या प्रत्येक राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेत आली असून आता त्यांना लेबनॉनमध्ये राजकीय महत्त्वही आहे. आपल्याकडे एक लाख योद्धे असल्याचा दावा नसरुल्लाह यांनी केला होता.
हिजबुल्लाहचं अस्तित्त्व आणि महत्त्व कसं वाढलं?
हिजबुल्लाहने आजवर लेबनॉनमधल्या इस्त्रायली आणि अमेरिकन लष्कराच्या तळांवर अनेकदा हल्ले घडवून आणले आहेत. इस्रायलने लेबनॉनमधून 2000 साली माघार घेतली त्यावेळी त्यांना हुसकवण्याचं श्रेय हिजबुल्लाहने घेतलं होतं. तेव्हापासूनच हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमध्ये हजारो सैनिक आणि प्रचंड शस्त्रात्रं बाळगली आहेत. या वादग्रस्त सीमाभागांतल्या इस्रायलच्या अस्तित्त्वाला ते विरोध करत आले आहेत.
पाश्चिमात्य देशांसोबतच इस्रायल, आखाती देश आणि अरब देशांनी त्यांना दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलंय.

फोटो स्रोत, Getty Images
2011 मध्ये जेव्हा सीरियात गृहयुद्ध सुरू झालं तेव्हा सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद होते. यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या हिजबुल्लाहनं आपल्या हजारो योद्ध्यांना बशर अल-असद यांच्या बाजूनं लढण्यासाठी पाठवलं.बंडखोरांनी ताब्यात घेतलेलं क्षेत्र, विशेषकरुन डोंगराळ लेबनीज सीमेजवळील क्षेत्र परत मिळविण्यासाठी हे निर्णायक ठरलं.
हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरुल्लाह यांचे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्याशी जवळचे संबंध आहेत. ते दर आठवड्याला टीव्हीवरून भाषण देतात, हिजबुल्लाह संघटनेतल्या नेत्यांसाठी ते अत्यंत आदरणीय आहेत, पण गेल्या अनेक वर्षांमध्ये ते सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. कारण त्यांच्या जिवाला इस्रायलकडून धोका असल्याचं त्यांच्या संघटनेला वाटतं.
इस्रायलकडून बैरूत परिसरात हल्ले
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की, शुक्रवारी (28 सप्टेंबर) झालेल्या या हल्ल्यामध्ये कमीतकमी सहा लोकांचा मृत्यू झाला असून 91 लोक जखमी झाले आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी न्यूयॉर्कमध्ये नुकतंच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये (General Assembly) भाषण केलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन युद्धविरामाचे आवाहन सातत्याने केले जात असूनही त्यांनी या भाषणादरम्यान हिजबुल्लाहवर आपण हल्ले करत राहू, असाच दृढनिश्चय व्यक्त केला होता. त्यांच्या या भाषणानंतर हे हवाई हल्ले झाले आहेत.
शुक्रवारी (28 सप्टेंबर) त्यांच्या कार्यालयाने सांगितलं की, त्यांनी न्यूयॉर्कच्या आपल्या नियोजित दौऱ्याचे दिवस कमी केले असून ते पुन्हा इस्रायलला परतत आहे.
इस्रायलकडून बैरुत परिसरात अविरत हल्ले सुरू होण्यापूर्वी आयडीएफने तिथल्या रहिवाश्यांना ताबडतोब स्थलांतरीत होण्याची सूचना दिली होती.
याआधी इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका, युरोपियन युनियन (EU) आणि सहयोगी देशांनी तात्काळ प्रभावाने 21 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला आहे.
इस्त्रायली सैन्य जमिनीच्या मार्गाने लेबनॉनमध्ये घुसून हल्ला करू शकते.

इस्रायलच्या लष्कर प्रमुखांनी सैनिकांना सांगितलं आहे की, लेबनॉनवर हवाई हल्ले केल्यास, शत्रूच्या प्रदेशात जाण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.
लेफ्टनंट जनरल हजरी हालेवी म्हणाले की, "तुम्ही लढाऊ विमानांचा आवाज ऐकला असेल. आम्ही दिवसभर हल्ले करत असतो. या हल्ल्यांचा हेतू एकच आहे की लेबनॉनमध्ये जाण्याचा रस्ता मोकळा करणे आणि हिजबुल्लाहला लक्ष्य करणे."
11 सहयोगी देशांनी या समस्येवर तोडगा काढण्याची आणि गाझामध्ये युद्धविराम करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.
अमेरिका, युरोपियन युनियन आणि सहयोगी देशांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, या देशांमधील (इस्रायल, लेबनॉन, पॅलेस्टाईन) शत्रुत्व आता असह्य झाले आहे.
त्यामुळे संपूर्ण प्रदेशात युद्ध वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे लेबनॉन किंवा इस्रायल या दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या हिताचे नाही.

युद्धविरामाचा हा प्रस्ताव इस्रायली लष्कर प्रमुखाच्या घोषणेनंतर ठेवण्यात आला आहे, त्यात त्यांनी म्हटले होते की हवाई हल्ल्यानंतर इस्रायल आता लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर जमिनीवर हल्ले करण्याच्या तयारीत आहे.
इस्रायल गेल्या तीन दिवसांपासून लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले करत आहे. हिजबुल्लाहनेही प्रत्युत्तर दिले आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 500 लोक मारले गेले आहेत.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मृतांमध्ये 35 लहान मुलं आणि 58 महिलांचाही समावेश आहे. गेल्या 20 वर्षांच्या संघर्षातील हा अत्यंत प्राणघातक दिवस ठरला.
इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, इस्रायलनं हिजबुल्लाहच्या 1300 ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत.
या हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील हजारो कुटुंबांना त्यांच्या घरांमधून पळावे लागले आहे.
इस्रायलने 23 सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले होते.
इस्रायलने लेबनॉनमधील लोकांना सुरक्षित राहण्यासाठी हिजबुल्लाहच्या ठिकाणांपासून दूर जाण्यास सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने 23 सप्टेंबरला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून (23 सप्टेंबर) दक्षिण लेबनॉनमधील शहरे आणि गावांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.
लेबनॉनच्या पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरनेही एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांसह 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी याआधी सांगितलं होतं की, इस्रायली लष्कराकडून लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि अचूक हल्ले केले जाणार आहेत.
हगारी यांनी लेबनॉनच्या नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी हिजबुल्लाच्या ठिकाणांजवळ न जाण्याची सूचना दिलेली होती.
इस्रायल संरक्षण दलाच्या (IDF) म्हणण्यानुसार, हिजबुल्लाहने अलीकडेच इस्रायलवर 150 रॉकेट डागले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने आपली कारवाई आणखी तीव्र केली आहे.


इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्याशी चर्चा केली आहे.
गॅलंट यांनी अमेरिकेच्या संरक्षण सचिवांना हिजबुल्लाहचा धोका आणि त्याविरोधात इस्रायलच्या कारवाईची माहिती दिली आहे.
इस्रायलवर डझनभर रॉकेट डागल्याची हिजबुल्लाहची माहिती
इस्रायली हल्ल्यांनंतर, हिजबुल्लाहने आता दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायलच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या गोदामांवर डझनभर क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे.
इस्रायली संरक्षण दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, लेबनॉनमधून किमान 35 रॉकेट डागण्यात आले असून त्यामुळे विविध प्रकारचे नुकसान झाले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आयडीएफचे म्हणणे आहे की, हिजबुल्लाहकडून डागण्यात आलेले अनेक रॉकेट त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले आहेत.
दरम्यान, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दक्षिण लेबनॉनमधील रुग्णालयांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नसलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचं आवाहन केलं आहे.
लेबनॉनमध्ये, इस्त्रायली हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांच्या उपचारासाठी ही तयारी केली जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












