इस्रायल-हमास संघर्षातून हिजबुल्लाह संघटनेला नेमकं काय मिळवायचं आहे?

हिजबुल्लाह समर्थक त्यांचे नेते हसन नसरल्लाह यांचं भाषण ऐकताना (3 नोव्हेंबर 2024 रोजी बैरूत, लेबनॉनमधला फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाह समर्थक त्यांचे नेते हसन नसरल्लाह यांचं भाषण ऐकताना (3 नोव्हेंबर 2024 रोजी बैरूत, लेबनॉनमधला फोटो)
    • Author, ‘द इन्क्वायरी’ पॉडकास्ट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

गेले काही महिने हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या संघटनेचं नाव वारंवार चर्चेत येत आहे.

लेबनॉनमध्ये प्रामुख्यानं दक्षिण भागात प्रभाव असलेली ही एक राजकीय आणि निमलष्करी संघटना आहे.

पण इस्रायल, पाश्चिमात्य देश आणि गल्फ कोऑपरेशन कौंसिलनं हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

अलीकडेच, 27 जुलै 2024 रोजी इस्रायलच्या ताब्यातील गोलान हाईट्स परिसरात एका फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला झाला आणि त्यात 12 लहान मुलं आणि तरूण मारले गेले.

तेव्हा इराणच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या हिजबुल्लाहनं ही रॉकेट डागली असल्याची शक्यता वर्तवली गेली, पण हिजबुल्लाहनं तो आरोप नाकारला.

खरं तर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनं गाझामध्ये युद्ध छेडलं, तेव्हापासून हिजबुल्लाहनंही इस्रायल आणि लेबनॉन सीमेवरच्या हालचाली वाढवल्या आहेत.

पण वारंवार प्रश्न विचारला जातो आहे, की अखेर हिजबुल्लाहला काय मिळवायचं आहे?

त्यांना गाझामधल्या पॅलेस्टिनींना समर्थन दाखवायचं आहे की इस्रायली लष्कर गाझामध्ये गुंतलं आहे, या परिस्थितीचा त्यांना फायदा उठवायचा आहे?

ग्राफिक्स
ग्राफिक्स

हिजबुल्लाहचा जन्म

1970 च्या दशकाच्या अखेरच्या वर्षांमध्ये ‘हिजबुल्लाह’ ही संघटना लष्करी ताकद म्हणून उदयास येऊ लागली.

त्या काळात पीएलओ म्हणजेच पॅलेस्टियन लिबरेशन ऑर्गनाइझेशनच्या दहशतवाद्यांनी लेबनॉनच्या दक्षिण भागातून इस्रायलच्या उत्तर भागात रॉकेट हल्ले सुरू केले होते.

1978 साली इस्रायलच्या एका बसवर झालेल्या हल्ल्यात 38 इस्रायली मारले गेले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्यानं लेबनॉनच्या हद्दीत प्रवेश केला.

 2006 सालच्या युद्धादरम्यान इस्रायलकडून तोफगोळ्यांचा मारा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2006 सालच्या युद्धादरम्यान इस्रायलकडून तोफगोळ्यांचा मारा
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या कारवाईविषयी ऑरेली डहेर अधिक माहिती देतात. ऑरेली युनिव्हर्सिटी पॅरिस डॉफिनमध्ये राज्यशास्त्राच्या असोसिएट प्रोफेसर आहेत.

ऑरेली सांगतात, “तीन महिने चाललेल्या त्या लष्करी कारवाईचा उद्देश होता, दक्षिण लेबनॉनमधून पॅलेस्टिनी आंदोलकांना मागे ढकलून एक बफर झोन तयार करायचा, म्हणजे त्यांनी डागलेली रॉकेट्स इस्रायलपर्यंत पोहोचणार नाहीत.”

इस्रायलच्या त्या लष्करी कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंचे बरेच लोक मारले गेले आणि लेबनॉनचे हजारो लोक विस्थापित झाले. पण सीमेपलीकडून होणारे हल्ले थांबले नाहीत.

मग 1982 साली पुन्हा एकदा इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये घुसून कारवाई केली. यावेळी इस्रायलनं बरीच आतपर्यंत मुसंडी मारली आणि ते अगदी राजधानी बैरूतपर्यंत पोहोचले.

पण या मोहिमेत वीस हजार जण मारले गेले, ज्यातले बहुतांश जण सामान्य नागरिक होते. इथेच मध्यपूर्वेच्या कहाणीनं एक नवं वळण घेतलं, असं ऑरेली यांना वाटतं.

“इस्रायली हल्ल्यामुळे दक्षिण लेबनानमध्ये बहुसंख्य असलेल्या शिया मुस्लीमांना सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे काही धार्मिक नेत्यांनी आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी शिया ‘मिलिशिया ग्रुप’ म्हणजे सशस्त्र संघटना तयार करण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण लेबनॉनमधला प्रदेश इस्रायलच्या कब्जातून सोडवल्यावर तिथे फडकणारे हिजबुल्लाहचे ध्वज (सन 2000 मधला फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण लेबनॉनमधला प्रदेश इस्रायलच्या कब्जातून सोडवल्यावर तिथे फडकणारे हिजबुल्लाहचे ध्वज (सन 2000 मधला फोटो)

या सशस्त्र गटाचं नाव होतं इस्लामिक रेझिस्टन्स ऑफ लेबनॉन. पुढे जाऊन याच गटाच नाव हिजबुल्लाह असं करण्यात आलं.

ऑरेली डहेर सांगतात की, इस्रायलला लेबनॉनमधून हाकलून लावायचं हे एकच उद्दीष्ट या गटासमोर होतं. त्यांना लेनबॉनमध्ये इस्लामिक शासन स्थापन करायचं नव्हतं.

या मिलिशियाला पैसा कसा पुरवायचा? तर त्यांना इराणची मदत मिळाली.

इराणमध्ये तेव्हा इस्लामिक क्रांती घडत होती. हिजबुल्लाहची एकूण उद्दिष्ट्यं ईराणच्या नव्या राज्यकर्त्यांच्या उद्दीष्ट्यांशीही मिळती जुळती होती.

ऑरेली सांगतात, “इराण तेव्हा लेबनॉनला मदत म्हणून आपले सैनिक तिथे पाठवण्याच्या विचारात नव्हता. पण हिजबुल्लाहला लष्करी ट्रेनिंग, हत्यारं आणि पैसे देण्यासाठी ते तयार झाले.”

आता लेबनॉनमधे लोकांना भरती करून घेण्यासाठी आणि तिथे आपली विश्वासार्हता निर्माण करण्यासठी हिजबुल्लाहला एका व्यासपीठाची गरज होती.

BBC

1992 मध्ये हिजबुल्लाहचा राजकीय गट लेबनॉनच्या सरकारमध्ये सहभागी झाला.

त्यामुळे हिजबुल्लाहच्या लष्करी कारवायांना थोडी वैधता मिळाली, असं ऑरेली डहेर सांगतात.

“लेबनॉनच्या राजकीय पक्षांकडून हिजबुल्लाहची एकच अपेक्षा होती, त्यांनी हिजबुल्लाच्या कारवायांमध्ये कुठला अडथळा आणू नये. त्या बदल्यात ते लेबनॉनवर हवं तसं राज्य करू शकतात, त्यात हिजबुल्लाह लक्ष घालणार नाही.

“त्यामुळेच ‘हिजबुल्लाह’ हा एक राजकीय पक्ष नसून दबाव गट किंवा लॉबीसारखी संघटना आहे. लेबनॉन सरकार कधीच हिजबुल्लाहच्या कारवायांवर उघडपणे काही बोलत नाही, पण त्याआडून त्यांनी या कारवाया वैध ठरवल्या आहेत.”

बैरूतमधली लेबनॉनच्या संसदेची इमारत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बैरूतमधली लेबनॉनच्या संसदेची इमारत

लेबनॉन सरकारचं म्हणणं आहे की, लेबनॉनच्या लोकांना इस्रायलविरोधात सर्वप्रकारे विरोध करण्याचा अधिकार आहे.

एक प्रकारे लेबनॉन सरकारनं अधिकृतरित्या हिजबुल्लाहच्या कारवायांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे.

इस्रायल आणि हुजबुल्लाहचे संबंध

चॅटहॅम हाऊसमध्ये पश्चिम आशियाविषयक असोसिएट फेलो असलेल्या लीना खतीब सांगतात की, हिजबुल्लाह एक मिलिशिया किंवा निमलष्करी गट आहे ज्याची स्थापना लेबनॉनवर इस्रायली कब्जा संपुष्टात आणण्यासाठी करण्यात आली होती.

तेव्हापासूनच इस्रायल आणि हिजबुल्लाहमधला संघर्ष आणि वैर निर्माण झालं. तेव्हापासूनच इस्रायल आणि हिजबुल्लाहमधला संघर्ष आणि वैर निर्माण झालं.

पण 2000 पर्यंत लेबनॉनमध्ये पॅलेस्टिनी बंडखोरांची संख्या घटली होती. तसंच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्रायलनंही लेबनॉनमधून आपलं सैन्य माघारी बोलावलं. त्यानंतरही हे वैर कायम का राहिलं?

हिजबुल्लाहचे सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाहचे सैनिक

लीना सांगतात की, “इस्रायली सैन्य माघारी परतलं, याकडे हिजबुल्लाह आपला विजय म्हणून पाहात होता.

“इस्रायली सैन्यानं लेबनॉनच्या जवळपास सर्वच भागांतून माघार घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडे इस्रायलविरोधात कोणती कारवाई करण्याचं कारण उरलं नाही. त्यामुळेच 2000 पासून 2006 पर्यंत हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये कुठला मोठा संघर्ष पेटला नाही. पण यादरम्यन दोघांच्या विचारांत काही बदल झाला नव्हता आणि दोघांमधलं अंतर कायम होतं.”

सहा वर्ष कायम राहिलेली शांती पुन्हा एकदा भंग झाली. निमित्त होतं सीरिया-लेबनॉन सीमेवरील शीबा फार्म्स या जमिनीच्या तुकड्यावरून वादाचं.

शीबा फार्म्स गोलान हाईट्सचा भाग आहे, आणि हा परिसर 1981 पासून इस्रायलनं कब्जात घेतला आहे.

BBC
फोटो कॅप्शन, लेबनॉन-इस्रायल सीमा तसंच लेबनॉन आणि गोलन हाईट्समधल्या सीमेजवळ इस्रायल आणि हिजबुल्लाहमधल्या तणावाचा परिणाम जाणवतो आहे.

लीना सांगतात, “2006 साली हिजबुल्लाहनं इस्रायली हद्दीत घुसून दोन इस्रायली सैनिकांचं अपहरण केलं. त्यानंतर हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं जे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरू राहिलं. यात लेबनॉनचं खूप नुकसान झालं. एका करारासोबत ही लढाई संपली. या कराराअंतर्गत हिजबुल्लाह आणि इस्रायलनं ते एकमेकांवर मोठा हल्ला करणार नाही असं ठरवलं.”

याकडे एक नवी सुरुवात म्हणून पाहिलं जात होतं.या करारानुसार दक्षिण लेबनॉनमध्ये एक बफर झोन ठरवण्यात आला, जिथे सशस्त्र सैनिक तैनात नसतील.

त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शीबा फार्म्सवरून तणाव कायम राहिला पण कुठली मोठी लढाई पेटली नाही.

लीना खतीब सांगतात की, शीबा फार्म्सवरून वादाच्या पार्श्वभूमीवर हिजबुल्लाहनं आपले सैनिक तर या भागात ठेवले पण इस्रायलवर हल्ला केला नाही.

इस्रायलही हिजबुल्लाकडून त्यांना जाणवणाऱ्या धोक्याकडे कानाडोळा करत राहिला.

इस्रायल लेबनॉन सीमाभागातले इस्रायली सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायल लेबनॉन सीमाभागातले इस्रायली सैनिक

पण या कहाणीनं 2023 साली एक नवं वळण घेतलं.

गाझावर नियंत्रण असलेल्या कट्टरवादी पॅलेस्टिनी गटानं म्हणजे हमासनं इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला.

इस्रायलच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली मारले गेले 240 हून अधिक जणांचं अपहरण करण्यात आलं.

प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं गाझा पट्टीत लष्करी कारवाई सुरू केली. हमास संचालित गाझाच्या पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ऑगस्ट 2024 पर्यंत या युद्धात जवळपास 40 हजार जण मारले गेले आहेत.

हे युद्ध अजूनही थांबलेलं नाही, पण दरम्यान लेबनॉनमधून हिजबुल्लाहनं इस्रायलवकर रॉकेट्स डागणं सुरू केलं.

याचा सरळ अर्थ असा काढला गेला की, हिजबुल्लाह गाझा-इस्रायल संघर्षात थेट हस्तक्षेप करत आहे आणि इस्रायलविषयी हमास आणि हिजबुल्लाहचं उद्दीष्ट्य एकच बनलं आहे.

BBC

लीना खतीब सांगतात, “हिज़बुल्लाह तेच करेल जे पॅलेस्टिनी करतील. जर पॅलेस्टिनी इस्रायलसोबत शांतीकरारासाठी तयार झाले तर हिजबुल्लाहलाही तेच करावं लागेल.”

पण मग प्रश्न पडतो की या दोन गटांमध्ये काय आणि कसे संबंध आहेत?

हमास आणि हिजबुल्लाह

डॉक्टर बशीर सादी स्कॉटलंडच्या स्टर्लिंग यूनिवर्सिटीमध्ये राज्यशास्त्र आणि धर्म या विषयाचे व्याख्याता आहेत.

ते सांगतात, “हमास सुन्नी संघटना आहे आणि हिजबुल्लाह शिया संघटना आहे. पण इस्रायलविषयी दोघांचं मत बरंच सारखं आहे. दोघंही इस्रायलविरोधात संघर्षासाठी प्रेरीत झाले आहेत.

“इतकंच नाही, तर हमासनं हिजबुल्लाहचा सहकारी देश इराणकडून आर्थिक मदत मिळवली आहे, तसंच ते हिजबुल्लाहकडून लष्करी मदतही घेत आहेत.”

BBC

हमासला भूमिगत बोगदे तयार करण्यात हिजबुल्लाहनं मदत केली, असंही सांगितलं जातं.

डॉ. बशीर त्याविषयी सांगतात, “भूमिगत बोगद्यांची कल्पना या दोन संघटनांच्या संगनमतानंच प्रत्यक्षात आली असण्याची शक्यता आहे. या दोन्ही संघटनांचं नेतृत्त्व आणि त्यातल्या कट्टरपंथींमध्ये नेमकं सहकार्य कसं केलं जातं हे सांगता येणं कठीण आहे, कारण या भुयारांमध्ये जे काही होतं, ते गुप्त राहतं.

“हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याविषयी कदाचित हिजबुल्लाहला आधीच माहिती नसण्याचीही शक्यता आहे. पण त्यांना एवढं नक्की समजलं असेल की अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी हमास सज्ज झाला आहे.”

मग हमास आणि हिजबुल्लाह यांच्यात विचारधारा आणि माहितीचं आदानप्रदान कुठल्या दिशेनं जाऊ शकतं?

हिजबुल्लाहनं दागलेलं मानवरहीत ड्रोन इस्रायली रॉकेटनं भेदलं, तेव्हाचं दृश्य (25 ऑगस्ट 2024)

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाहनं दागलेलं मानवरहीत ड्रोन इस्रायली रॉकेटनं भेदलं, तेव्हाचं दृश्य (25 ऑगस्ट 2024)

डॉ. बशीर यांना वाटतं, “हिजबुल्लाह आणि हमासचं लष्करी उद्दिष्ट्य एकच आहे. दोघांनाही इस्रायलची लष्करी क्षमता आणि सुरक्षा व्यवस्था कमकुवत करायची आहे म्हणजे भविष्यात इस्रायलसोबत करार करताना त्यांना आपल्या अटी-शर्ती आणि हिताच्या गोष्टी लागू करता येतील.”

पण हमास आणि हिजबुल्लाहमधल्या सहकार्यावर मर्यादाही आहेत, याकडेही ते लक्ष वेधून घेतात.

“इस्रायलविरोधात जर हमासनं युद्ध सुरु केलं तर हिजबुल्लाह त्यांना मदत करण्यासाठी इस्रायलवर रॉकेट आणि मिसाईल हल्ले करेलच असं नाही.

“आपल्या कारवाईचा लेबनॉनवर काय परिणाम होईल याचाही हिजबुल्लाहला विचार करावा लागेल. तसंच हे त्यांच्या सामरिक हिताचं आहे की नाही, हे पाहावं लागेल.

“पॅलेस्टाईनला मुक्त करणं हे सध्या त्यांचं ध्येय नाही. तर त्यांना लेबनॉनची सीमा मजबूत करायची आहे आणि आपलं राजकीय हित साधायचं आहे.”

हिजबुल्लाहची सरकारवर पकड

मेहरान कामरावा कतारमध्ये जॉर्जटाऊन विद्यापीठात प्रशासनविषयक प्राध्यापक आहेत.

त्यांच्या मते, हिजबुल्लाहनं त्यांचे नेता हसन नसरल्लाहच्या मार्गदर्शनाखाली लेबनॉन आणि आसपासच्या प्रदेशात आलेल्या राजनैतिक बदलांसोबत स्वतःला बदलत नेलं आहे आणि हा गट एक मोठी लष्करी ताकद बनला आहे.

हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह

मेहरान सांगतात, “तसं पाहिलं तर हिजबुल्लाह एकमेव अरब लष्करी संघटना आहे, ज्यांना इस्रायलवर हल्ला करण्यात अपेक्षित यश मिळालं आहे.

“हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह सरळसरळ इस्रायलला धमकी देतात. त्यांचे ड्रोन्स इस्रायली हद्दीत पोहोचू शकतात. काही अंशी इस्रायली सैन्याचे कमांडरही नसरल्ला यांच्या ताकदीला दाद देतात.”

मग आता नजिकच्या काळात हिजबुल्लाहची उद्दीष्ट्यं काय आहेत?

मेहरान कामरावा यांच्या मते, “हिज़बुल्लाह एकाच वेळी अनेक उद्दिष्ट्यं साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात मोठं लक्ष्य आहे लेबनॉन आणि विशेषतः शियाबहुल दक्षिण लेबनॉन आहे.

दक्षिण लेबनॉनच्या एका गावामध्ये हिजबुल्लाहविरोधात इस्रालच्या हल्ल्यानंतर उठलेले धुराचे लोट (6 सप्टेंबर 2024)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण लेबनॉनच्या एका गावामध्ये हिजबुल्लाहविरोधात इस्रालच्या हल्ल्यानंतर उठलेले धुराचे लोट (6 सप्टेंबर 2024)

“सध्या लेबनॉनमध्ये केंद्र सरकार कमकुवत आहे, त्यामुळे हिजबुल्लाह स्वतःला इस्रायली आक्रमणाविरोधातली सुरक्षेची पहिली भिंत म्हणून पाहातं.

“सोबतच ते इस्रायलला इराणवर मोठा हल्ला करण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भीमिका बजावतात. हिजबुल्ल्हाचं अस्तित्व आहे म्हणूनच इस्रायल इराणवर सांभाळूनच हल्ला करतंय.”

BBC

ऑगस्टमध्ये हिजबुल्लाहनं अगदी प्रोफेशनल पद्धतीनं तयार केलेले व्हिडियो रिलीज केले, ज्यात त्यांची माणसं भूमिगत मार्गानं भारी ट्रक्समधून मिसाईल्स नेताना दिसतात.

यातून हिजबुल्लाहला त्यांच्या शक्तिशाली हत्यारं आणि गुप्तहेर क्षमतेचं प्रदर्शन करायचं होतं. याआधी किमान दोनदा हिजबुल्लाचे ड्रोन्स इसराइली हद्दीत घुसून त्यांच्या लष्करी तळांचे फोटो काढण्यात यशस्वी ठरले आहेत.

हिजबुल्लाहकडे ताकदवान सैन्य आहे, पण त्यांना सर्वात मोठा पाठिंबा कुणाकडून हवा असेल तर ते आहेत लेबनॉनचे सामान्य नागरीक.

इस्रायलनं केलेल्या प्रतिहल्ल्यांत आपली घरं नष्ट झाल्याचं लेबनॉनचे नागरिक सांगतात

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इस्रायलनं केलेल्या प्रतिहल्ल्यांत आपली घरं नष्ट झाल्याचं लेबनॉनचे नागरिक सांगतात

लेबनीज नागरिकांना काय वाटतं हे हिजबुल्लाहसाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यावर ही संघटना गांभीर्यानं विचार करते

तसंच इराण, सीरिया आणि हूती लोकांसारख्या शेजाऱ्यांशीही त्यांनी मजबूत संबंध प्रस्थापित केले आहे.

पण या सहकाऱ्यांच्या छोट्या गटाबाहेर ते सध्या तरी ते एकटे पडल्यासारखे वाटतात. मग या सहकाऱ्यांशिवाय बाकीचे देश हिजबुल्लाहकडे कसं पाहतात?

मेहरान सांगतात, “इतर देशांच्या दृष्टीनं हिजबुल्लाह ही एक अशी सरकारबाहेरची ताकद आहे जिची पाळमुळं सरकारच्या आतमध्ये खोलवर पसरली आहेत. ते इराकमधील मिलिशिया आणि यमनच्या हुती बंडखोरांना प्रेरणा देत आहेत.

“इजिप्त, जॉर्डन आणि सौदी अरेबियासारख्या देशांना कल्पना आहे की सध्या तरी त्यांच्यासाठी धोका नाही, पण या संघटनेसारखी स्वायत्त, राजकीय प्रभाव आणि सैनिकी क्षमता असलेली संघटना भविष्यात त्यांच्यासठीही तापदायक ठरू शकते.”

दक्षिण लेबनॉनमध्ये रॉकेट हल्ल्यानंतरचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण लेबनॉनमध्ये रॉकेट हल्ल्यानंतरचं दृश्य

मग हिजबुल्लाहला नेमकं काय हवं आहे?

तर हिजबुल्लाहचं पहिलं ध्येय आहे इस्रायलला लेबनॉनमधून बाहेर करायचं. 2006 च्या करारानंतर दोन्ही बाजूंनी बऱ्याच प्रमाणात शांतता कायम राखली होती.

पण 2023 साली गाझामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर हिजबुल्लाहनं पुन्हा इस्रायलविरोधात संघर्ष सुरू केला आहे आणि हमासला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे.

यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण इस्रायलविरोधात पॅलेस्टिनींना समर्थन देण्याची हिजबुल्लाहची ही पहिली वेळ नाही.

पण हिजबुल्लाह प्रामुख्यानं इराणच्या प्रभावाखाली काम करतं. त्यामुळे हिजबुल्लाहला काय हवं आहे, हे इराणला काय हवं आहे यावरही अवलंबून आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)