हिजबुल्लाह इस्रायलशी युद्ध करू शकेल, इतकी ताकदवान संघटना आहे का?

शेख हसन नसरुल्लाह

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शेख हसन नसरुल्लाह

इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांना ठार केल्याचा दावा केला होता. मात्र, हिजबुल्लाह संघटनेकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नव्हता.

आता या घटनेच्या काही तासांनी हिजबुल्लाहने माहिती दिलीय की, हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे.

हिजबुल्लाहनं हसन नसरल्लाह यांना 'शहीद' म्हटलं. शिवाय, इस्रायलविरोधातील लढाई सुरूच राहील, असंही म्हटलंय.

गेल्या वर्षी म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला हिजबुल्लाहने पॅलेस्टाईनमधील 'हमास'ची साथ देत इस्रायलमधील अनेक भागांवर गोळीबार केला होता.

त्यानंतर हिजबुल्लाहने उत्तर इस्रायल आणि गोलान हाईट्स या ठिकाणांवर रॉकेट हल्ले केले. त्यांनी बुलेटप्रुफ गाड्यांवर अँटी टँक क्षेपणास्त्रंही डागले आणि काही लष्करी तळांवर ड्रोन हल्लेही केले.

इस्रायल डिफेंस फोर्स (IDF) ने या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना लेबननमध्ये हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई आणि तोफहल्ले केले.

संयुक्त राष्ट्रांच्या मते, या हल्ल्यांमुळे 90 हजार लोकांना त्यांचं घर सोडावं लागलं. इस्रायली हल्ल्यांमध्ये अंदाजे 100 नागरिक आणि 366 हिजबुल्लाहच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचवेळी इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, हिजबुल्लाहच्या हल्ल्यामुळे 60 हजार नागरिकांना त्यांचं घर सोडावं लागलं, तसंच 10 नागरिकांसह 33 लोकांचा मृत्यू झाला.

अशा प्रकारच्या चकमकी आजपर्यंत झाल्या असतानाही, इस्रायल आणि हिजबुल्लाह एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारण्यास कचरत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मात्र, एखादी तरी घातक घटना घडली, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

हिजबुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

हिजबुल्लाह हा एक शिया इस्लामिक राजकीय पक्ष आणि लेबनॉनमधील निमलष्करी संघटना आहे, ज्याला इराणचा पाठिंबा आहे.

हसन नसरुल्लाह हे 1992 पासून याचं नेतृत्व करत आहेत. या नावाचा अर्थ ‘अल्लाहचा पक्ष’ आहे. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला लेबनॉनवर इस्रायलच्या ताब्यादरम्यान इराणच्या आर्थिक आणि लष्करी पाठिंब्यानं हिजबुल्लाहचा उदय झाला.

दक्षिण लेबनॉनमधील पारंपारिकरित्या कमकुवत असलेल्या शिया समुदायाचं संरक्षण करणारी शक्ती म्हणून ही संघटना उदयाला आली.

शेख हसन नसरुल्लाह

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शेख हसन नसरुल्लाह

2000 मध्ये इस्रायलनं माघार घेतल्यानंतर हिजबुल्लाहनं इस्लामिक रेजिस्टेंस या लष्करी गटाला बळकट करणं सुरू ठेवलं.

रेझिस्टन्स ब्लॉक पार्टीवरच्या निष्ठेमुळे हा गट हळूहळू लेबनॉनच्या राजकीय व्यवस्थेत इतका महत्त्वाचा बनला की त्यानं या देशाच्या मंत्रिमंडळात नकाराधिकार (व्हेटो पॉवर) देखील मिळवला.

हिजबुल्लाहवर अनेक वर्षांपासून बॉम्बस्फोट तसंच इस्रायल आणि अमेरिकन तळांवर लक्ष्य करणारे कट रचल्याचा आरोप आहे.

पाश्चात्य देश, इस्रायल, अरब आखाती देश आणि अरब लीग हिजबुल्लाहला 'दहशतवादी' संघटना मानतात.

हिजबुल्लाहचं महत्त्व वाढलं कसं?

2011 मध्ये जेव्हा सीरियात गृहयुद्ध सुरू झालं तेव्हा सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद होते. यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या हिजबुल्लाहनं आपल्या हजारो अतिरेक्यांना बशर अल-असद यांच्या बाजूनं लढण्यासाठी पाठवलं.

बंडखोरांनी ताब्यात घेतलेले क्षेत्र विशेषकरुन डोंगराळ लेबनीज सीमेजवळील क्षेत्रं परत मिळविण्यासाठी हे निर्णायक ठरलं.

इस्रायल अनेकदा सीरियामधील इराण आणि हिजबुल्लाह संघटनेशी संबंधित तळांवर वारंवार हल्ले करतो, पण क्वचितच हल्ले केल्याचं स्वीकारतो.

पण, सीरियातील हिजबुल्लाह च्या भूमिकेवरून लेबनॉनमधील काही गटांमध्ये तणाव वाढला.

हिजबुल्लाहनं सीरियाच्या शिया राष्ट्राध्यक्षांना दिलेला पाठिंबा आणि इराणशी मजबूत संबंध यामुळे इराणचा मुख्य प्रादेशिक प्रतिस्पर्धी असलेल्या सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील अरब आखाती देशांसोबत शत्रुत्व आणखी वाढलं.

हिजबुल्लाह

फोटो स्रोत, EPA

7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासच्या अचानक हल्ल्यानंतर हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात गोळीबार झाला होता. हमासच्या हल्ल्यात 1400 इस्रायली मरण पावले.

जेव्हा इस्रायलनं गाझावर प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आणि हजारो लोक मारले गेले, तेव्हा हिजबुल्लाहनं म्हटलं की ते इस्रायल विरुद्धच्या युद्धात योगदान देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

लष्करी, सुरक्षा आणि राजकीय क्षेत्रातील हिजबुल्लाहच्या प्रभावाच्या बळावर तसंच ते देत असलेल्या सामाजिक सेवेच्या बळावर, त्यांनी ‘एका राष्ट्रात वेगळं राष्ट्र’ म्हणून आपली प्रतिमा तयार केली आहे.

हिजबुल्लाहवर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांकडूनही जोरदार टीका केली जाते. काही मार्गांनी, या संघटनेची क्षमता लेबनीज सैन्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे आणि त्याची झलक 2006च्या इस्रायलविरुद्धच्या युद्धातही पाहायला मिळाली.

काही लेबनीज हिजबुल्लाहला त्यांच्या देशाच्या स्थिरतेसाठी धोका मानतात, पण शिया समुदायामध्ये ही संघटना खूप लोकप्रिय आहे.

इस्रायल विरोध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिजबुल्लाहचा उदय केव्हा झाला याची अचूक तारीख सांगणं कठीण आहे. पण 1982 मध्ये पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये घुसखोरी केल्यानंतर हिजबुल्लाच्या आधीची एक संघटना उदयास आली होती.

त्यावेळी कट्टरवादी हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या शिया नेत्यांनी 'अमाल' चळवळीपासून स्वत:ला वेगळं केलं होतं.

या नेत्यांनी 'इस्लामिक अमाल' ही नवी संघटना स्थापन केली. या संघटनेला इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून बरीच लष्करी आणि संघटनात्मक मदत मिळाली.

ही संघटना सर्वात प्रभावी आणि सर्वात मोठी 'शिया मिलिशिया' म्हणून उदयास आली आणि नंतर ती हिजबुल्लाह बनली.

या संघटनेनं इस्रायली आर्मी आणि त्याचे मित्र साऊथ लेबनॉन आर्मी तसेच लेबनॉनमध्ये असलेल्या परदेशी सैन्यावर हल्ले सुरू केले.

असं मानलं जाते की 1983 मध्ये अमेरिकेचा दूतावास आणि यूएस मरीन बॅरेक्सवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता.

या हल्ल्यांमध्ये एकूण 258 अमेरिकन आणि 58 फ्रेंच नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर, पाश्चात्य देशांच्या शांती सेनेनं लेबनॉनमधून माघार घेतली.

1985 मध्ये, हिजबुल्लाहनं 'खुलं पत्र' प्रकाशित करून त्याच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली. या पत्रात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे इस्लामच्या तत्त्वांचे शत्रू असल्याचं वर्णन करून इस्रायलला नष्ट करण्याचं आवाहन केलं.

इस्रायल मुस्लिमांच्या भूमीवर कब्जा करत असल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

हिजबुल्लाहनं असं आवाहन केलं की,"इस्लामिक प्रणाली लोकांच्या मुक्त आणि प्रत्यक्ष सहभागातून स्वीकारली जावी, बळजबरीनं नाही."

1989 च्या ताएफ करारामुळे लेबनॉनमधील गृहयुद्ध संपुष्टात आलं. त्यानंतर देशातील सर्व गटांना शस्त्रं ठेवण्यास सांगण्यात आलं. हिजबुल्लाहनं

याला नकार दिला आणि आपल्या लष्करी विंगला ‘इस्लामिक रेझिस्टन्स’ म्हणू लागला. त्यांचा असा तर्क होता की, इस्रायलच्या ताब्यातून जमीन मुक्त करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

सीरियन सैन्यानं 1990 च्या दशकात लेबनॉनमध्ये शांतता प्रस्थापित केली, परंतु हिजबुल्लाहनं देशाच्या दक्षिणेत गनिमी युद्ध सुरू ठेवलं. यानंतर संघटनेनं देशाच्या राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

1992 ला लेबनॉनमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत हिजबुल्लाहनं प्रथमच भाग घेतला.

2000 मध्ये जेव्हा इस्रायली सैन्यानं शेवटी लेबनॉन सोडलं तेव्हा हिजबुल्लाहनं त्यांना पळवून लावण्याचं श्रेय घेण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा या गटानं शस्त्रं ठेवण्याच्या दबावाकडे दुर्लक्ष केले आणि दक्षिण लेबनॉनमध्ये लष्करी उपस्थिती कायम ठेवली.

त्यांचा तर्क असा होता की शेबा फार्म्स आणि इतर विवादित भागात इस्रायलची सेना आहे, त्यामुळे ते आपली शस्त्र ठेवू शकत नाहीत.

2006 मध्ये हिजबुल्लानं इस्रायली सीमेवर हल्ला करून आठ इस्रायली सैनिकांना ठार केलं होतं. यानंतर दोघांचं अपहरणही करण्यात आलं. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं लेबनॉनवर वेगानं हल्ले सुरू केले होते.

इस्त्रायली लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या स्थानांवर जोरदार बॉम्बहल्ला केला.

याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहनं इस्रायलवर 4,000 रॉकेटचा मारा केला. 34 दिवस चाललेल्या या युद्धात लेबनॉनमध्ये 1,125 लोक मरण पावले, त्यापैकी बहुतांश नागरिक होते. 119 इस्रायली सैनिक आणि त्यांचे 45 नागरिकही मारले गेले.

या युद्धानंतरही हिजबुल्लाह मजबूत राहिली आणि त्यांची हिंमत पूर्वीपेक्षा वाढली. आता हिजबुल्लाहकडे पूर्वीपेक्षा अनेक नवीन लढवय्ये आणि अधिक लष्करी उपकरणं आहेत.

पण आता दक्षिण लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांचं शांतीरक्षक दल तैनात आहे.

लेबनॉनमधील शक्तिशाली संघटना

2008 मध्ये पाश्चात्य समर्थित लेबनॉनच्या सरकारनं हिजबुल्लाहचं खाजगी टेलिकम्युनिकेशन नेटवर्क बंद केलं. तसंच बेरूत विमानतळाच्या प्रमुखाला या गटाशी संबंध असल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाहनं बेरूत शहराचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आणि प्रतिस्पर्धी सुन्नी गटाच्या विरोधात युद्ध सुरू केलं.

या गृहयुद्धात 81 जणांचा जीव गेला. हे थांबवण्यासाठी सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि हिजबुल्लाहसोबत सत्ता वाटपाचा करार करावा लागला.

या करारानंतर हिजबुल्लाह आणि त्याच्या सहयोगींना मंत्रिमंडळाच्या निर्णयांमध्ये नकाराधिकार मिळाला.

2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत या गटानं 10 संसदीय जागा जिंकल्या आणि लेबनॉनच्या युनिटी सरकारमध्ये सहभागी झाले.

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचे नेते हसन

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचे नेते हसन

त्याच वर्षाच्या शेवटी हिजबुल्लाहचे सरचिटणीस शेख हसन नसरल्लाह यांनी एक नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला. या गटाची राजकीय दृष्टी जाहीरनाम्यात नमूद करण्यात आली होती.

यामध्ये 1985 मध्ये ज्या इस्लामिक रिपब्लिकची घोषणा करण्यात आली होती ते जाहीरनाम्यातून काढून टाकण्यात आलं. पण इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध कठोर भूमिका कायम ठेवण्यात आली. 2011 मध्ये हिजबुल्लाह आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी लेबनॉनचं सौदी समर्थित साद हरिरी यांचं सरकार पाडलं.

खरं तर साद हरिरी यांचे वडील रफिक हरिरी यांची 2005 मध्ये हत्या झाली होती आणि यासाठी हिजबुल्लाच्या चार लोकांना आरोपी करण्यात आलं होतं, त्यानंतर या गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

डिसेंबर 2020 मध्ये हिजबुल्लाह सदस्य सलीम अय्याश याला रफिक हरिरी यांच्या हत्येसाठी संयुक्त राष्ट्र समर्थित ट्रिब्यूनलने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

त्यानंतरच्या काळात लेबनॉनमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारांमध्ये हिजबुल्लाह आणि त्यांचे सहयोगी सामील होत असतात आणि त्यांचा सरकारमध्ये मोठा प्रभाव आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)