भारतातले हे ज्यू लोक 300 वर्षं इस्रायलला जाण्याची वाट का पाहत आहेत?

इस्रायल
    • Author, शंकर वडिशेट्टी
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आंध्रप्रदेशातही दिसून येत आहे.

गुंटूर जिल्ह्यातील कोठारेट्टीपलम इथे जवळपास 40 कुटुंब आपण ज्यू असल्याचा दावा करतात. ते स्वतःला बेने एफ्राइमचे वंशज म्हणवतात. ते इस्रायलमधून येऊन इथे स्थायिक झाल्याचं सांगितलं जातं.

ते बेने जेकब सिनेगॉग येथील ज्यू प्रथा परंपरा पाळतात. सोबतच ज्यू सण साजरे करतात जातात आणि फक्त हिब्रू भाषा बोलतात.

बीबीसीशी बोलताना ज्यूंचे प्रतिनिधी जेकोबी झडोक यांनी सांगितलं की, त्यांची कुटुंबं इथे शेकडो वर्षांपासून राहत असल्याचं त्यांना त्यांच्या पूर्वजांनी सांगितलं आहे.

ते सांगतात, "आमचे पूर्वज सुमारे 300 वर्षांपूर्वी इस्रायलमधून विविध ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यानंतर ते तेलंगणा आणि नंतर अमरावतीत आले."

"अमरावती संग्रहालयात आजही आमच्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू जतन केल्या आहेत. पण आम्हाला इस्रायली म्हणून मान्यता नाही. तेलुगू भाषिक राज्यांत राहणाऱ्या मधिका लोकांची जीवनपद्धती आमच्या जीवनपद्धती सारखीच आहे त्यामुळे ते आम्हाला हेच प्रमाणपत्र देतात."

जेकोबी झडोक एलआयसी एजंट म्हणून काम करतात. ते साध्या तेलुगूमध्ये बोलतात. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की ते हिब्रू वाचू, लिहू आणि बोलू शकतात.

कोठारेट्टीपलम मध्ये राहणाऱ्या 40 कुटुंबातील सर्व 250 लोक हिब्रू बोलतात, असंही त्यांनी सांगितलं. जेकोबी झडोक यांचं नाव देवा प्रसादही आहे. हे नाव ते त्यांचं अधिकृत नाव म्हणून वापरतात.

'इस्रायलला जायचं आहे'

इस्रायल

कोठारेट्टीपलम मधील बहुतेक रहिवासी हे ज्यू परंपरा पाळणाऱ्या कुटुंबातील आहेत. ते शेतमजूर आणि बांधकाम कामगार म्हणून काम करतात.

त्या कुटुंबातील दोन-तीन सदस्य शिकून नोकरी करत आहेत. ज्यू वांशिक नावाव्यतिरिक्त, त्या सर्वांना दूसरी नावंही आहेत.

जेकोबी झडोक सांगतात, "आम्हा सर्वांना लवकरच इस्रायलला बोलावलं जाईल."

"आम्ही इस्रायलमधील स्थलांतरित गटांमध्ये अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहोत. देशाच्या विविध भागातील ज्यूंना इस्रायलमध्ये परत बोलावलं जात आहे. 'बेने एफ्राइम' या इस्त्रायलच्या इतर जमातींपैकी एक असलेल्या आम्हाला लवकरच तिथे नेलं जाईल."

"तोरामध्ये लिहिलंय की, सर्व इस्रायली सदस्यांनी इस्रायलला परत जावं. त्यानुसार जगभरात स्थायिक झालेल्या ज्यू लोकांची त्यांच्या मायदेशी परतण्याची तयारी सुरू आहे. मणिपूरमधील 3,000 ज्यू इस्रायलमध्ये गेले आहेत."

याकोबी हे बेने याकोब सिनेगॉगचे प्रमुख देखील आहेत. कोठारेट्टीपलम येथे 30 वर्षांपूर्वी त्याची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्यासोबत ज्यू समुदायाचं प्रतिनिधित्व करणारा सात जणांचा गट आहे.

इस्रायल
फोटो कॅप्शन, हे ज्यू लोक 200 वर्षांपूर्वी गुंटूरला आल्याचा दावा करतात.

ज्यू भारताच्या वेगवेगळ्या भागात राहतात. अधिकृत माहितीनुसार मुंबई, कोची, मणिपूर, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही ज्यू आहेत. पण आंध्रप्रदेशातील ज्यूंचं अस्तित्व समोर आलं 2004 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर.

हे ज्यू लोक म्हणतात की, इतर लोक त्यांना मगदेन म्हणतात. मगदेन म्हणजे शिक्षक. हे लोक सांगतात की, पोलिसांनी राजमुंद्री येथे एका टोळीला ठार मारण्याचा कट रचल्याबद्दल यांच्यातील काही लोकांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या 8 जणांच्या चौकशीत हे सर्व उघड झालं.

तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस वेगवेगळ्या कारणांमुळे इथे येऊन त्यांची माहिती गोळा करतात.

ज्यू लोक शनिवार हा विश्रांतीचा दिवस म्हणून पाळतात. त्याला शब्बत म्हणतात. सर्वांमध्ये वयस्क असलेले इट्स काक म्हणतात की ते हिब्रू परंपरेचं पालन करणारे विवाह लावतात.

त्यांनी सांगितलं की त्यांच्या कॅलेंडरनुसार सध्या 5781 हे वर्ष सुरू आहे. प्रत्येक वर्ष तिशिरी (सप्टेंबर) मध्ये सुरू होतं.

ज्यू म्हणून मान्यता देण्याची विनंती

इस्रायल
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते सांगतात की, त्यांनी सरकारला ज्यू म्हणून मान्यता देण्याची विनंती केली आहे. त्यांना अनुसूचित जातीचं सदस्य मानलं जातं, परंतु त्यांचा काही उपयोग झाला नाही.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलला गेले होते, तेव्हा आम्हाला आशा होती की आमची अडचण दूर होईल. मणिपूर आणि म्हैसूरचे लोक तिथे गेले. पण आम्ही अजून तिथपर्यंत पोहोचू शकलेलो नाही."

मदन्या मेहसुआ हा तरुण सांगतो की, "परतीच्या कायद्यानुसार आमची इस्रायलमध्ये व्यवस्था केली जाईल. पण त्याआधी आम्हाला ज्यू ही आमची ओळख परत मिळवून अल्पसंख्याक दर्जा दिला पाहिजे. आम्हाला आशा आहे की हे होईल."

मेहसुआ याला प्रवीण कुमार या नावाने देखील ओळखलं जातं.

काही वर्षांपूर्वी, इस्रायल मधील रब्बी नावाचे ज्यू धर्मगुरू कोठारेट्टीपलम येथे आले होते. त्यांनी तेथील स्थानिक रहिवाशांचे तपशील गोळा केले.

त्यांना ज्यू म्हणून मान्यता मिळाल्यास त्यांना इस्रायलचे सहकार्य मिळेल असं सांगितलं.

आठवडाभरापूर्वी, इस्रायलचे ज्यू शिष्टमंडळ एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे याकोबी यांनी सांगितलं.

इस्रायलचे शिष्टमंडळही आता मुंबईत परतले आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यास शिष्टमंडळ इस्रायलला भेट देण्याचा प्रयत्न करेल.

अलीकडील घटनांमुळे आमचा समाज खूप व्यथित झाल्याचं ते सांगतात. आम्ही इस्रायलच्या प्रतिनिधींच्या सतत संपर्कात आहोत.

इस्रायलमधील सध्याची परिस्थिती लवकर निवळावी यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत.

अनुवांशिक चाचणी

इस्रायल
फोटो कॅप्शन, ज्यू लोकांची वस्ती

राबादमधील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) ने कोठारेट्टीपलम येथील ज्यू असल्याचा दावा करणाऱ्या कुटुंबांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली आहे.

2014 मध्ये त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली होती, असं जिल्हा महसूल अधिकारी बी. रामचंद्र राव यांनी सांगितलं.

"त्यांच्या दिसण्यावरून ते भारतीयांपेक्षा वेगळे आहेत हे निश्चित झालं आहे. मात्र यामुळे त्यांचा इस्रायलशी संबंध आहे हे स्पष्ट होत नाही."

सारा या महिलेने सांगितलं की, त्यांच्या खाण्याच्या सवयींपासून त्यांच्या वैवाहिक जीवनापर्यंत सर्व काही ज्यू प्रथा परंपरेप्रमाणे केलं जातं, त्यामुळे त्यांना ज्यू ही ओळख मिळायला हवी.

ही महिला सांगते, "आम्ही कोषेर मांस खातो. बाहेरच्या कार्यक्रमात सहभागी होतानाही आम्ही प्रार्थनेनंतरच मांस खातो, अन्यथा आम्ही ते खात नाही. आठवड्यातील सातवा दिवस हाळी म्हणून पाळला जातो.'

या दिवशीही आम्ही प्रार्थनाही करतो. मुलं 13 वर्षांची होण्याआधी त्यांची सुंता केली जाते.

सारा बीबीसीशी बोलताना सांगतात की, त्यांना आशा आहे की, भारत सरकार त्यांना ज्यू म्हणून मान्यता देईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)