पॅलिस्टिनी नेते यासर अराफत कोण होते? जे इंदिरा गांधींना कायम ‘माय सिस्टर’ म्हणून हाक मारायचे

फोटो स्रोत, PHOTO DIVISION
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
(पॅलिस्टिनी नेते यासर अराफत यांचा आज (10 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
प्रसिद्ध इस्रायली वकील जोएल सिंगर सांगतात की त्यांनी यासर अराफत यांच्यापेक्षा चांगला वाटाघाटी करणारा व्यक्ती कधी पाहिलेला नाही.
ते हॉलिवूड चित्रपटातील जुगाऱ्यासारखे होते, जे खराब पत्ते असूनही लोकांना पटवून द्यायचे की शेवटी तेच जिंकतील.
चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलीय आणि आता फक्त तडजोड करायची बाकी आहे, असं सर्वांना वाटू लागल्यावर अराफत अचानक आपल्या मागण्या वाढवायचे.
दुसऱ्या दिवशी एखाद्या करारावर स्वाक्षरी करायची असेल तर आदल्या दिवशी अराफत स्वत:साठी जास्तीत जास्त सवलती मिळवण्याचा प्रयत्न करायचे.
संयुक्त राष्ट्रांत भाषण
अराफत यांच्या आयुष्यात 13 नोव्हेंबर 1974ा दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.
पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख यासर अराफत यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या संपूर्ण सत्रात भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राचं नेतृत्व न केलेल्या व्यक्तीला हा सन्मान मिळणार होता.

फोटो स्रोत, Getty Images
अराफत यांचे त्यावेळचे निकटवर्ती असलेले आणि नंतर पॅलेस्टिनी प्रशासनाचे पहिले परराष्ट्र मंत्री झालेले नबील शाथ यांना आजही तो दिवस आठवतो.
नबिल सांगतात, "अराफत यांनी पहिल्यांदाच अशी गोष्ट कबूल केली होती, जी त्यांनी यापूर्वी कधीही कबूल केली नव्हती. त्यांनी दाढी पूर्णपणे काढून टाकली होती आणि नवीन सूट घातलेला. त्यांचा खाकी सूट अतिशय काळजीपूर्वकपणे इस्त्री केला गेला होता आणि ते अतिशय देखणे दिसत होते."
ऑलिव्हची फांदी
त्या दिवशी न्यूयॉर्क विमानतळावरून अराफत हेलिकॉप्टरने थेट संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहोचले.
त्याचवेळी गाड्यांचा ताफा तिथून 'वॉल्डॉर्फ अस्टोरिया' हॉटेलच्या दिशेने निघाला होता, जेणेकरून अराफत यांच्या विरोधकांना ते कारने त्यांच्या हॉटेलमध्ये जात असल्याचे भासवता येईल.
अराफत यांनी त्या दिवशी दोन संस्मरणीय वाक्यांनी भाषण संपवलं. ते म्हणाले, "मी इथे ऑलिव्हची फांदी आणि स्वातंत्र्यसैनिकांची बंदूक घेऊन आलो आहे. ही ऑलिव्हची फांदी माझ्या हातून पडू देऊ नका."

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या दिवशी ते भाषण जगातील प्रत्येक वृत्तपत्राची हेडलाईन होतं आणि त्या भाषणाच्या नऊ दिवसांच्या आत संयुक्त राष्ट्रांनी आपला ठराव क्रमांक 3237 संमत करून पीएलओला संयुक्त राष्ट्रांत निरीक्षकाचा दर्जा दिला.
स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल अतिशय जागरूक
अराफत दाढी नाही करायचे. त्यांचा चेहरा असा दिसायचा जसं की यांना ताबडतोब आंघोळीची गरज आहे.
अराफत यांचे चरित्रकार अॅलन हार्ट लिहितात, "अराफत यांची उंची फार कमी होती. सुमारे 5 फूट 4 इंच किंवा कदाचित त्याहूनही कमी. ते कुठेही असले किंवा काहीही करत असले, तरी ते कधीही एका जागी शांतपणे बसू शकत नसत."

फोटो स्रोत, Getty Images
अराफत यांचे मुख्य राजकीय सल्लागार हानी हसन म्हणायचे की, "बसण्यापूर्वी अराफत तो प्रत्येक कोपरा तपासायचे जिथून त्यांच्यावर गोळी झाडली जाऊ शकते.
आम्ही गप्पांमध्ये मग्न असताना अराफत अचानक आम्हाला थांबवायचे आणि स्वत:ची बसायची जागा बदलायचे. आम्ही त्यांना याचे कारण कधीच विचारले नाही.
त्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याबाबतही इतकी गुप्तता पाळली जायची, की त्यांच्या जवळच्या लोकांनाही ते कुठे जातायत हे माहित नसायचं."
"फेब्रुवारी 1973 मध्ये, इस्रायलने लिबियाचं एक प्रवासी विमान पाडलं होतं ज्यामध्ये विमानातील सर्व 100 प्रवासी ठार झालेले.
माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, परंतु मला नंतर कधीतरी कळल्यावर याचं आश्चर्य वाटणार नाही, की इस्रायलने ते विमान हेच गृहित धरून खाली पाडलं असावं की त्यात मी किंवा माझे इतर सहकारी प्रवास करत असतील."
उशीरा लग्न
भारताचे माजी डिप्लोमॅट आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस चिन्मय घरेखान यांना अनेकवेळा अराफत यांना भेटण्याची संधी मिळाली होती.
घरेखान म्हणतात, "मी अराफत यांना अनेकदा भेटलो, असं म्हणता येईल कारण मी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने गाझामध्ये तैनात होतो. त्यांना हवं तेव्हा ते खूप 'चार्मिंग' होऊ शकले असते.
त्यांची दाढी लहान होती आणि ते नेहमी लष्करी पोषाख परिधान करायचे. ते अतिशय एका सामान्य व्यक्तीसारखे होते. अजिबात क्लिष्ट नव्हते, परंतु पॅलेस्टिनी चळवळ किंवा इस्रायलशी संबंधांचा प्रश्न आला, की त्याला ते अतिशय गांभीर्याने घ्यायचे आणि त्यांच्याकडे संशयाने पाहायचे."
घरेखान म्हणतात की त्यांनी खूप उशिरा लग्न केलं. पूर्वी ते म्हणायचे की त्यांनी पॅलेस्टाईनशी लग्न केलं आहे. नंतर त्यांनी सुहाशी लग्न केलं. सुहा ख्रिश्चन तर अराफत सुन्नी मुस्लिम होते.

फोटो स्रोत, CHINMAYA GAREKHAN
सुहा यांचं अराफत यांच्यावर खूप प्रेम होतं, असं म्हटलं जातं. त्यांना एक मुलगी देखील होती जी आता मोठी झाली असेल. ते गाझामध्ये दोन मजल्यांच्या एका अतिशय साध्या आणि छोट्या घरात राहायचे.
अराफत पहिल्या मजल्यावर राहायचे आणि त्यांची पत्नी मुलीसह तळमजल्यावर राहायची.
अराफत यांचा लष्करी पोशाख
अराफात नेहमी लष्करी कपड्यांमध्ये दिसायचे. ब्रिटीश लष्करी अधिकार्यांच्या बुटांसारखे त्यांचे बूटही नेहमी चमकत असत.
यासर अराफत यांचं चरित्र लिहिणारे बॅरी रुबिन आणि ज्युडिथ कोल्प रुबिन म्हणतात, "अराफत यांनी सूट आणि टाय घातला नाही कारण तो पाश्चात्य पोशाख होता आणि इतर महागड्या कपड्यांमुळे उधळपट्टीचा संदेश जाई ज्याचा संदर्भ थेट भ्रष्टाचाराशी जोडला जायचा.
त्यांची दाढी पाहून कुणीही सांगू शकले असते की ते एक गरीब पॅलेस्टिनी शेतकरी होते. त्यांच्या पेहरावामुळे ते रणांगणावरील एका सैनिकासारखे भासत ज्यांना वैयक्तिक थाटासाठी अजिबात वेळ नव्हता."

फोटो स्रोत, Getty Images
खोमेनी, हाफिज असद, सद्दाम हुसेन आणि ओसामा बिन लादेन हे सर्वजण दिसायला देखणे होते, ज्यांची हॉलीवूडच्या रहस्यमय चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून निवड केली जाऊ शकली असती, ज्यांना संपूर्ण जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असते.
अराफत त्यांच्या कपड्यांमधून आणि वागणुकीतून ते त्यांच्याशी कुठेही मेळ खाताना दिसले नाहीत आणि त्यामुळेच इतरांचा असा गैरसमज व्हायचा की त्यांचा सहज पराभव केला जाऊ शकतो.
रात्री 12 वाजता सर्वात जास्त सतर्क
अराफत दोन शिफ्टमध्ये झोपायचे. पहाटे चार ते सात आणि संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान. त्यामुळेच मध्यरात्री अराफत आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असायचे.
घरेखान म्हणतात, "जेव्हा केव्हा त्यांच्या भेटीची वेळ मागितली जायची किंवा भेटीसाठी विचारले जायचे, तेव्हा ते कधीही नकार द्यायचे नाही आणि नेहमी रात्री 11-12 वाजता भेटायचे आणि रात्रीच्या वेळीच ते सर्वात जास्त सतर्क असायचे."
कमरेला पिस्तूल
अराफत नेहमी कमरेला पिस्तुल लटकवून फिरत असत. संयुक्त राष्ट्रांत ते पहिल्यांदा भाषण देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सभागृहात कोणतंही शस्त्र घेऊन जाण्यास मनाई असल्याचं सांगितलं गेलं.
तेव्हा अशी तडजोड करण्यात आली की ते खाकी वर्दीवर पिस्तूल ठेवण्याचं पाकिट लावतील पण त्यात पिस्तूल नसेल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरींना अनेकवेळा अराफत यांना भेटण्याची संधी मिळाली.
येचुरी आठवण सांगतात की, "फिडेल कॅस्ट्रोप्रमाणेच अराफतलाही आलिंगन देऊन मिठी मारण्याची सवय होती. एकदा कैरोमध्ये त्यांनी मला मिठी मारली तेव्हा मला त्यांच्या कमरेला बांधलेली पिस्तूल बाहेर काढण्याची चांगली संधी मिळाली होती. मी त्यांना म्हणालो की तुम्ही सावध का नाही राहत. कुणीही तुमची पिस्तूल सहज काढू शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
त्यावर ते म्हणाले, "मी तुम्हाला एक गुपित सांगतो, की पिस्तुलमध्ये एकही गोळी नाहीए. मी त्यांना विचारलं की मग तूम्ही पिस्तूल का ठेवता? यावर अराफत म्हणाले की, माझ्याकडे पिस्तूल असल्याने ज्या अनेक लोकांना माझ्यावर गोळी झाडायची असते, ते तसं करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात."
मधप्रेमी
प्रसिद्ध पत्रकार श्याम भाटिया यांना अनेकवेळा यासर अराफात यांना भेटण्याची संधी मिळाली. एकदा एका मुलाखतीदरम्यान ते भाटियांवर संतापले होते.
श्याम भाटिया सांगतात, "त्यावेळी अराफातची मुलाखत घेणं खूप अवघड होतं. माझी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मैत्री झालेली.
त्यांनी मला सांगितलं की, तुम्हाला अराफात यांची मुलाखत घ्यायची असेल, तर त्यांच्यासाठी मधाची बाटली आणा. एकदा मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी ट्युनिसला गेलो होतो. 20-25 मिनिटांनी मी त्यांना विचारलं, 'मी तुमच्या पत्नीची मुलाखत घेऊ शकतो का?"

फोटो स्रोत, Getty Images
"हे ऐकून अराफत संतापले. ते म्हणाले - माझ्या बायकोबद्दल बोलण्याची तुझी हिम्मत कशी झाली. ताबडतोब खोलीच्या बाहेर निघून जा.
खोलीतून बाहेर पडताना मी घाबरून म्हणालो, मी तुमच्यासाठी मधाची बाटली आणली आहे. जी बाहेर टेबलावर ठेवली आहे. हॉटेलमध्ये आल्यानंतर मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करणार इतक्यात मला जोरात दार ठोठावण्याचा आवाज ऐकू आला."
अराफात यांच्यासोबत जेवण
भाटिया सांगतात, "अराफत यांचे दोन अंगरक्षक बाहेर उभे होते. त्यांनी मला गाडीत बसवलं आणि अराफत यांच्या त्याच घरी पुन्हा घेऊन गेले, जिथून त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं होतं.
दरवाजा उघडला तेव्हा अराफत एका अतिशय सुंदर स्त्रीसोबत उभे होते. ते म्हणाले - ही माझी पत्नी सुहा. मी म्हणालो, तुम्ही तर माझ्यावर रागावला होतात. ते म्हणाले - तो राग खोटा होता. तुम्ही थांबा आणि आमच्यासोबत जेवण करा आणि मधासाठी खूप खूप आभार."
"अराफत आणि त्यांच्या पत्नीने खूप प्रेमळपणे मला भात, हमस, मटण स्ट्यू, सॅलड आणि दोन भाज्या दिल्या आणि मी त्यांच्यासोबत दोन तास घालवले."
बाळाला सांभाळण्याची जबाबदारी पत्रकारावर
पुढे श्याम भाटिया आणि अराफत दाम्पत्याची जवळीक इतकी वाढली की एकदा अराफत यांच्या पत्नीने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
श्याम सांगतात, "एकदा मी जेरुसलेमहून गाझाला अराफतची मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो. त्यांची पत्नी सुहाने मला विचारले की तुम्ही थोडावेळ माझ्या मुलीची काळजी घेऊ शकता का? आमची आया आज आलेली नाही आणि आम्हाला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी लगेच बाहेर जायचंय."

फोटो स्रोत, Getty Images
श्याम पुढे सांगतात, "मी त्यांना विचारले की मी तिची काळजी कशी घेऊ. सुहा म्हणाल्या की तुम्हालाही मुलं आहेत. तुम्हाला मुलांची काळजी कशी घ्यायची हे चांगलं माहिती आहे.
तिला ढकलगाडीत बसवा आणि समुद्रकिनाऱ्याावर फिरायला घेऊन जा. कल्पना करा - मी सूट आणि टाय घालून, समुद्राच्या वाऱ्यााने टाय हवेत उडतेय आणि मी अराफत यांच्या मुलीला ढकलगाडीतून फिरवतोय आणि सहा सशस्त्र पॅलेस्टिनी सैनिक माझ्या मागे चालतायत.
दीड तासानंतर अराफत आणि त्यांची पत्नी परत आली. त्यांनी माझे आभार मानले आणि त्यांनी मला एक दीर्घ मुलाखत दिली."
इंदिरा गांधींशी जवळीक
यासर अराफत आपला हवाई प्रवास अत्यंत गुप्त ठेवायचे आणि यजमान देशाला आपण तिथे येणार असल्याची आगाऊ माहिती दिली जायची नाही. ते अनेकदा भारतात यायचे. इंदिरा गांधींना ते बहीण मानत.
चिन्मय घरेखान सांगतात, "अराफत जेव्हा केव्हा भारतात यायचे तेव्हा आम्हाला आधी कळवायचे नाहीत. त्यांच्या येण्याच्या वेळेआधी एक-दोन तास शिल्लक असायचे, तेव्हाच ते येत असल्याची बातमी मिळायची.
असं असूनही इंदिरा गांधी नेहमी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जायच्या. इंदिरा गांधींना ते नेहमी 'माझी बहीण' म्हणून हाक मारायचे."
अराफत यांचे औदार्य
एकेकाळी भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिलेल्या रोमेश भंडारी यांना यासर अराफत यांना अनेकवेळा भेटण्याची संधी मिळाली.
त्यांनी मला सांगितले होते की, "एकदा मी ट्युनिसमध्ये अराफत यांच्याशी बोलत होतो, तेव्हा मला बातमी मिळाली की माझा मुलगा गंभीररित्या आजारी आहे. मी संभाषण संपवलं आणि लगेच भारतात परतलो."

फोटो स्रोत, Getty Images
"जेव्हा अराफत यांना नंतर याविषयी कळलं की माझा मुलगा मरण पावलाय, तेव्हा त्यांनी ताबडतोब भारतातील त्यांच्या राजदूताला पाठवले, जे चर्चेसाठी ट्युनिसला आले होते. त्यांना विमानतळावरून थेट माझ्या घरी जाण्याची सूचना देण्यात आलेली आणि त्यांच्या वतीने शोक व्यक्त करण्यास सांगण्यात आलं होतं."
अराफत यांचा दुर्मुखलेला स्वभाव
1983 साली जेव्हा भारतामध्ये अलिप्त राष्ट्रांची शिखर परिषद पार पडली तेव्हा त्यांच्याआधी जॉर्डनच्या राजाला भाषण करण्याची संधी दिल्याने ते नाराज झाले. भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग हे त्या परिषदेचे सरचिटणीस होते.
नटवर सिंग म्हणतात, "त्या परिषदेत सकाळच्या सत्रात फिडेल कॅस्ट्रो अध्यक्ष होते. त्यानंतर इंदिरा गांधींना अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. सकाळच्या सत्रानंतर माझे डेप्युटी सत्ती लांबा धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले की, मोठी अडचण निर्माण झालीय.
यासर अराफत खूप नाराज आहेत आणि ताबडतोब स्वत:च्या विमानाने माघारी जायचं म्हणतायत. मी इंदिराजींना फोन केला आणि त्यांना ताबडतोब विज्ञान भवनात यायला आणि फिडेल कॅस्ट्रो यांनादेखील सोबत घेऊन यायला सांगितले."

फोटो स्रोत, Getty Images
"कॅस्ट्रो साहेब आले आणि त्यांनी यासर अराफत यांना फोन करून बोलवून घेतलं. त्यांनी अराफत यांना विचारलं की, तुम्ही इंदिरा गांधींना मित्र मानता की नाही.
अराफत म्हणाले, 'मित्र नाही... ती माझी मोठी बहीण आहे.' यावर कॅस्ट्रो कडक शब्दात म्हणाले, 'मग लहान भावासारखे वागा आणि परिषदेत सहभागी व्हा."
अराफत यांनी हे मान्य केले आणि संध्याकाळच्या सत्रात सहभागी होण्यासाठी आले.
अराफत यांना राजीव यांचा निवडणूक प्रचार करायचा होता
राजीव गांधी यांच्याशीही त्यांची जवळीक होती. असे म्हणतात की एकदा त्यांनी राजीव गांधी यांच्यासाठी भारतात निवडणूक प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केलेली.
चिन्मय घरेखान म्हणतात की "राजीव गांधी हे इंदिरा गांधींपेक्षा जास्त भावनिक व्यक्ती होते. इंदिरा वास्तववादी होत्या आणि त्यांचा अनुभव जास्त होता.
राजीव गांधी जेव्हा केव्हा अराफत यांना भेटायचे तेव्हा ते त्यांना घट्ट मिठी मारायचे. अराफत यांनी स्वतः मला सांगितले होते की त्यांनी "राजीव यांच्यासाठी निवडणूक प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला असं वाटतं राजीव गांधी या इच्छेबद्दल त्यांच्यावर अजिबात नाराज नव्हते."

फोटो स्रोत, PHOTO DIVISION
"अराफत यांनी त्यांचा प्रचार केला नाही आणि हे योग्य वाटत नाही की एखाद्या परदेशी व्यक्तीने भारतात येऊन निवडणुकीत प्रचार करावा. पण तरीही त्यांनी त्यांच्या समर्थकांना संदेश दिला असता की त्यांना राजीव गांधींना विजयी झालेलं पाहायचंय, तर राजीव गांधींना खूप आनंद झाला असता."
बेनझीर भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन
राजीव गांधींप्रमाणेच यासर अराफत बेनझीर भुट्टो यांच्याही खूप जवळचे होते. एकदा दोघांमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला.
बेनझीर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आपले चीफ ऑफ प्रोटोकॉल अर्शद सामी खान यांना सांगितलं की, मी कोणत्याही पुरुष नेत्याशी हस्तांदोलन करत नाही, हे लक्षात ठेवा. दरम्यान, अराफत कराचीत पोहोचले आणि बेनझीर त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेल्या.
अर्शद सामी खान त्यांच्या 'थ्री प्रेसिडेंट्स अँड एन अॅड' या आत्मचरित्रात लिहितात, 'विमानाच्या आत जाऊन परदेशातून आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं ही चीफ ऑफ प्रोटोकॉलची जबाबदारी आहे.
मी अराफत यांच्या विमानाच्या पायऱ्या चढत होतो तेव्हा बेनझीर यांनी मला हाक मारली आणि माझ्या कानात कुजबुजल्या, 'अराफतला आठवण करून द्यायला विसरू नका की मी पुरुषांशी हस्तांदोलन करत नाही.'
अराफात यांना भेटताच मी त्यांना म्हणालो, 'महामहिम, बेनझीर भुट्टो तुमचे स्वागत करण्यासाठी खाली उभ्या आहेत. फक्त तुम्हाला याची आठवण करून द्यायची होती की त्या पुरुषांशी हस्तांदोलन करत नाहीत.' अराफत म्हणाले, 'हो, होय, होय... मला याबाबत अनेकदा सांगण्यात आलंय. तरीही, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.'

फोटो स्रोत, Getty Images
अर्शद सामी पुढे लिहितात, 'अराफत खाली येताच, मी पाहिलं की त्यांनी बेनझीर यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केलाय.
बेनझीर यांनी डोळे वटारून माझ्याकडे पाहिलं आणि त्यांनी संकोचून हात पुढे केला. आम्ही तिथून चालत निघाल्यावर, अराफत यांना कळू नये यासाठी त्या माझ्याशी उर्दूमध्ये कुजबुजल्या, 'तुम्ही त्यांना सांगितलं नाही का, मी पुरुषांसोबत हस्तांदोलन करत नाही.'
मी उत्तर देण्यापूर्वी, अराफत एक खोडकर स्मितहास्य करत म्हणाले, 'नशिब मी तुमचे चुंबन घेतले नाही. हा एक अरबी शिष्टाचार आहे की जो कुणी माझे स्वागत करण्यासाठी येतो, मी एकदा नव्हे तर दोनदा, दोन्ही गालांवर चुंबन घेतो.' आम्ही तिघेही हसलो आणि सलामी स्टेजच्या दिशेने निघालो.'
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








