इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यांचा इराणशी किती संबंध? इराण थेट युद्धात उडी घेणार?

इराण

फोटो स्रोत, AFP

    • Author, पॉल ॲडम्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

शनिवारपासून पॅलेस्टिनी कट्टरवादी गट हमास आणि इस्रायल यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे.

या संघर्षात इस्रायलचा कट्टर शत्रू इराणची भूमिका होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.

अमेरिकन न्यूजपेपर वॉल स्ट्रीट जर्नलने हमास आणि लेबनीज संघटना हिजबुल्लाच्या काही अज्ञात सदस्यांचा हवाला देत लिहिले आहे की, इराणने आठवड्याभरापूर्वीच या कारवाईला ग्रीन सिग्नल दिला होता.

पण अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे की, या हल्ल्यातील इराणच्या भूमिकेशी संबंधित आरोपांना दुजोरा देणारी माहिती अमेरिकी सरकारकडे सध्या उपलब्ध नाही.

असं असूनही या प्रकरणामागे दडलेले सत्य अत्यंत महत्त्वाचं आहे.

या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचं समोर आल्यास या द्विपक्षीय संघर्षाचं प्रादेशिक संघर्षात रूपांतर होऊ शकतं.

अशा परिस्थितीत, एकीकडे इराणच्या नेत्यांनी या हल्ल्याचे कौतुक केलं आहे. तर पण इराणने आपली कोणतीही भूमिका असल्याचं नाकारलं आहे.

इराणवर होणारे आरोप (इस्रायल - हमास संघर्षाचे) हे राजकीय हेतूने होत आहेत. इतर देशांच्या निर्णय प्रक्रियेत इराण कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी अद्याप पाहिला नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

हमास आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून संबंध आहेत, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं आहे.

इराण अनेक वर्षांपासून पॅलेस्टिनी संघटना हमासचा मुख्य फायनान्सर आहे.

इराण या संघटनेला केवळ आर्थिक मदतच करत नाही तर मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि रॉकेटही देत ​​आहे.

अशा परिस्थितीत इराणमधून गाझा पट्टीत ज्या मार्गाने माल पोहोचतो तो मार्ग रोखण्यासाठी इस्रायल गेली अनेक वर्षं प्रयत्न करत आहे.

यामध्ये सुदान, येमेनमधील लाल समुद्रातील जहाजं आणि सिनाई द्वीपकल्पात कार्यरत असलेल्या बेदोइन तस्करांचा समावेश आहे.

गाझा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, गाझा

इस्रायलचा कट्टर शत्रू म्हणून ज्यू राष्ट्राला हानी पोहोचवणे इराणच्या हिताचे आहे, असं इस्रायली गुप्तचर विभाग मोसादचे माजी वरिष्ठ अधिकारी हेम टोमेर यांनी म्हटलं आहे.

ते म्हणतात, “मी म्हणेन की यात इराणचा हात आहे असं समजणं फारसं वावगं ठरणार नाही. इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर इराणने अशी चाल खेळली असावी.”

इराणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पण टोमेर म्हणाले की, शनिवारी जो हल्ला झाला त्याचे आदेश इराणने दिले होते हे मान्य करणं कठीण आहे.

ते म्हणतात की, "हमासला इराणकडून शस्त्रास्त्र मिळतात हे खरं आहे. सोबतच हमासला सीरियात प्रशिक्षण देण्याचं कामही इराण करतंय. एवढंच काय तर, हमासच्या लढवय्यांना इराणमध्येही प्रशिक्षण दिलं जातं."

ते सांगतात की, अलीकडच्या काही महिन्यांत इस्रायलने हमासच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला आहे.

गाझा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, गाझा

टोमेर म्हणाले की, "आम्ही हमासच्या लष्करी शाखेचे प्रमुख, सालेह अल-अरूरी आणि हमासच्या इतर अधिकाऱ्यांना इराण आणि लेबनॉनला जाताना पाहिले आहे. या लोकांनी तिथे बैठका घेतल्या आहेत. यातल्या काही लोकांनी अयातुल्ला खोमेनी यांचीही भेट घेतल्याचे पुरावे इस्रायलकडे आहेत.”

पण हे 'जवळचे संबंध'सुद्धा हल्ल्यावर उत्तर देऊ शकत नाहीयेत.

टोमेर म्हणतात, "हमासची नजर इस्रायलमधील राजकीय संघर्षावर होती. इराणने हमासला शस्त्रास्त्रं आणि उपकरणं देऊन बरीच मदत केली आहे. पण माझ्या मते, शनिवारच्या हल्ल्याचा 75 टक्के निर्णय हमासने घेतला होता."

हमासच्या हल्ल्याची योजना

तेल अवीव विद्यापीठातील इराण तज्ज्ञ राज जिम्मत या मुद्द्यावर सहमत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "ही पॅलेस्टाईनची कथा आहे."

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, इराणने गेल्या आठवड्यात बैरूतमध्ये झालेल्या बैठकीत या हल्ल्यांना ग्रीन सिग्नल दिला होता. हमास आणि हिजबुलच्या सूत्रांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे अधिकारी ऑगस्ट महिन्यापासून हमाससोबत काम करत आहेत. आणि शनिवारी जमीन, हवा आणि पाण्यातून झालेला हल्ला याच सहकार्याचा परिणाम आहे.

ही मोहीम किती सुनियोजित होती याचा अंदाज हमासने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओवरून येतो. आजवर हमासने गाझा पट्टीमध्ये केलेल्या घुसखोरीच्या तुलनेत शनिवारचा हल्ला हा अतिशय सुनियोजित होता.

नकाशा

रॉकेट, ड्रोन, वाहने आणि हँग-ग्लाइडर्सच्या वापरावरून लक्षात येतं की, मोहिमेची योजना बनवणाऱ्यांनी युक्रेन युद्धादरम्यान वापरल्या गेलेल्या हायब्रीड युद्ध तंत्रांचा सखोल अभ्यास केला होता.

पण हल्ल्याचा निर्णय हमासने घेतल्याचं राज यांचं मत आहे. आणि त्यांनी हा निर्णय घेताना त्यांचं हित आणि पॅलेस्टाईनचं वास्तव लक्षात घेतलं आहे.

ते म्हणतात की, "हमासला इराणची मदत मिळाली होती का? अर्थातच ती मिळाली. या हल्ल्यातून इराणचं हित साध्य झालं का? तर होय, पूर्णपणे. हमासला मोहिमेसाठी इराणची परवानगी घ्यावी लागली का? तर अजिबात नाही."

बहुप्रतिक्षित मोहिम

हेम टोमेर यांच्यामते, हमास आपली विशेष पथकं खूप दिवसांपासून तयार करत होती.

"पण ही मोहीम हमासच्या आवाक्याबाहेरची होती" असंही ते सांगतात.

आता इस्रायलचे अधिकारी देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एकच गोष्ट शोधत आहेत ती म्हणजे, पुढे काय होईल आणि भविष्यात इराणचा सहभाग अधिक दिसून येईल का?"

लेबनॉनमधील इराणचा सहयोगी असलेल्या हिजबुलने इस्त्रायलच्या ताब्यातल्या गोलान हाइट्सवर हल्ला केला आहे.

राज म्हणतात, "हमासच्या कारवायांमुळे मध्य पूर्वेतील समीकरणं बदलली आहेत. आता पडद्याआडून मदत करण्याऐवजी इराण भविष्यात थेट सहभागी होऊ शकतो. कारण इस्रायलने हमासविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे त्या संघटनेचं अस्तित्व धोक्यात आलं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)