इस्रायल-हमास संघर्ष : तुमच्या मनातील 8 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

फोटो स्रोत, Reuters
पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट 'हमास'ने इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला सुरू केला आहे, त्यांच्या सैनिकांनी गाझा पट्टीजवळील समुदायांमध्ये प्रवेश करून रहिवाशांना ठार मारले आणि ओलीस ठेवले.
हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्हाला तिथली लोकं, संबंधित ठिकाणं आणि मूलभूत संदर्भ माहित असणं आवश्यक आहे.
1) हमास म्हणजे काय?
हमास हा पॅलेस्टिनी इस्लामी कट्टरतावादी गट आहे जो गाझा पट्टीवर राज्य करतो. हमासने इस्रायलच्या विध्वंसाची शपथ घेतली आहे आणि 2007 साली गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून इस्रायलशी अनेक युद्धे केली आहेत.
युद्धांदरम्यान त्यांनी गोळीबार केला किंवा इतर गटांना इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा करण्याची परवानगी दिली आणि अनेक प्राणघातक हल्ले केले आहेत.
इस्रायलनेही हमासवर वारंवार हवाई हल्ले केले आहेत आणि सुरक्षिततेचे कारण देऊन इजिप्तच्या मदतीने गाझा पट्टीवर 2007 पासून नाकेबंदी केली आहे.
हमास संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात त्यांची एक लष्करी शाखा आहे, इस्रायल, अमेरिका, युरोपियन युनियन आणि इंग्लंड तसेच इतर देशांनी त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
हमासला इराणचा पाठिंबा आहे, जो त्यांना निधी पुरवतो आणि शस्त्रे आणि प्रशिक्षण देतो.
2) गाझा पट्टी म्हणजे काय?
गाझापट्टीचा प्रदेश 41 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद असून भूमध्य समुद्र, इस्रायल आणि इजिप्तने वेढलेली आहे.
सुमारे 2.3 दशलक्ष लोकांची घरं इथे आहेत आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता या प्रदेशात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
3) गाझा पट्टीतील जीवन कसे आहे?
इस्रायल हा गाझा आणि त्याच्या किनार्यावरील हवाई क्षेत्रावर नियंत्रण ठेवतो आणि त्याच्या सीमा ओलांडून कोणाला आणि कोणत्या वस्तूंना आत आणि बाहेर जाण्यास परवानगी आहे याला प्रतिबंधित करतो.
त्याचप्रमाणे, इजिप्त गाझाशी सलग्न सीमेवरून कोण आत-बाहेर जातंय, यावर नियंत्रण ठेवतो.
संयुक्त राष्ट्रसंघ (यूएन) च्या म्हणण्यानुसार गाझाची सुमारे 80% लोकसंख्या आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे आणि सुमारे दहा लाख लोक दैनंदिन अन्न मदतीवर अवलंबून आहेत.
4) इस्रायल आणि हमास का भांडत आहेत?
इस्रायल आणि हमास यांच्यात सतत तणाव असतो, मात्र शनिवारी अतिरेक्यांनी केलेला हल्ला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झाला. हमासने इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा केला तर डझनभर सैनिकांनी सीमेचे उल्लंघन केले आणि इस्रायली समुदायांवर आक्रमण केले, डझनभर नागरिक मारले आणि इतरांना कैद केले.
गाझामधील अतिरेकी ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे सांगत इस्रायलने तात्काळ हवाई हल्ले सुरू केले.

फोटो स्रोत, REUTERS/IBRAHEEM ABU MUSTAFA
5) हा हल्ला किती अभूतपूर्व आहे?
आमचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बोवेन यांनी लिहिल्याप्रमाणे, हमासने गाझामधून सुरू केलेले हे सर्वात महत्त्वाकांक्षी ऑपरेशन आहे आणि इस्त्रायलने अलिकडच्या काळात सीमारेषेपलिकडून अनुभवलेला हा सर्वात भीषण हल्ला आहे.
अतिरेक्यांनी अनेक ठिकाणी गाझाला इस्रायलपासून वेगळे करणाऱ्या तारा कापून टाकल्या.
1973 साली इजिप्त आणि सीरियाने केलेल्या आकस्मिक हल्ल्यानंतर सुरू झालेल्या मध्य पूर्व युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या दुस-या दिवशी हा अभूतपूर्व हल्ला झाला आहे. हमासच्या नेतृत्वासाठी त्या तारखेचे महत्त्व कधीच कमी होणार नाही.
6) हे इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे का?
होय, आमचे सुरक्षा वार्ताहर फ्रँक गार्डनर म्हणतात. शिन बेट, इस्रायली देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा, मोसाद, तिची बाह्य गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दलांची सर्व मालमत्ता यांच्या एकत्रित प्रयत्नांनामधून हे घडलंय. ते म्हणतात, हे आश्चर्यकारक आहे आणि असं काही घडेल याची कुणालाही कल्पना नसणे किंवा त्यांना असा कोणताही इशारा मिळाला असेल तर त्यावर कारवाई करण्यात ते अपयशी ठरले आहेत.
इस्रायलकडे मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या आणि चांगल्या आर्थिक रसदीववर पोसलेल्या गुप्तचर सेवा आहेत, ज्यात पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमध्ये तसेच लेबनॉन, सीरिया आणि इतरत्र ठिकाणची माहिती देणारे गुप्तहेर आहेत.

फोटो स्रोत, REUTERS/IBRAHEEM ABU MUSTAFA
गाझा आणि इस्रायलमधील तणावग्रस्त सीमेवरील कुंपणावर कॅमेरे, ग्राउंड-मोशन सेन्सर आणि सैन्याची नियमित गस्त असते.
या हल्ल्यात ज्या प्रकारची घुसखोरी झाली आहे ती रोखण्यासाठी काटेरी तारांचे कुंपण हे "स्मार्ट बॅरियर" ठरले असते असे मानले जात आहे. तरीही हमासच्या अतिरेक्यांनी त्यातून मार्ग काढला, तारांना छिद्रे पाडली किंवा समुद्रातून आणि पॅराग्लायडरद्वारे इस्रायलमध्ये प्रवेश केला.
7) पॅलेस्टाईन म्हणजे काय आणि या घटनांचा त्याच्याशी काय संबंध आहे?
पॅलेस्टिनी प्रदेश म्हणून ओळखले जाणारे वेस्ट बँक आणि गाझा, तसेच पूर्व जेरुसलेम आणि इस्रायल हे सर्व रोमन काळापासून पॅलेस्टाईन म्हणून ओळखल्या जाणार्या भूमीचा भाग बनले आहेत.
बायबलमध्ये देखील ही ज्यू राज्यांचे भूमी होती आणि यहुदी त्याच्याकडे प्राचीन जन्मभूमी म्हणून पाहतात.
इस्रायलची 1948 मध्ये राज्य म्हणून धोषणा करण्यात आली, तरीही ज्या लोकांना इस्रायलचे अस्तित्व मान्य नाही त्यांच्याद्वारे या भूमीला पॅलेस्टाईन म्हणून संबोधले जाते. पॅलेस्टिनी लोक पॅलेस्टाईन हे नाव वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेमसाठी एकत्रित संज्ञा म्हणून वापरतात.
8) पुढे काय होऊ शकते?
हमासचा कमांडर मोहम्मद डेफ याने पॅलेस्टिनी आणि इतर अरबांना "[इस्रायली] कब्जा नष्ट करण्यासाठी" दहशतवाद्यांच्या कारवाईत सामील होण्याचे आवाहन केले आहे.
वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेम आणि इतर प्रदेशातील लोक त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील की नाही हा आता एक मोठा प्रश्न आहे, असं आमचे जेरुसलेमचे वार्ताहर योलांडे नेल म्हणतात.
याबाबत कोणतीही शंका नाही की इस्त्रायलला अनेक आघाड्यांवर युद्धाला सामोरं जाण्याची क्षमता ठेवावी लागेल. सर्वात वाईट परिस्थिती तेव्हा उद्भवेल जेव्हा शक्तिशाली लेबनीज दहशतवादी गट 'हिजबुल्लाह' यामध्ये समिल होईल.
इस्रायली सैन्याने मोठ्या प्रमाणावर सैन्य वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गाझावर होणारे तीव्र हवाई हल्ले हे जमिनीवरील एका मोठ्या कारवाईची तयारी करत असल्याचे संकेत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








