हमास : इस्रायलचा नायनाट करण्याचा चंग बांधलेल्या संघटनेबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
हमास ही पॅलेस्टाईनच्या कट्टरवादी संघटनांपैकी सर्वांत मोठी संघटना आहे.
इस्लामिक रेजिस्टंस मूव्हमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या आद्याक्षरांना जोडून 'हमास' हे नाव ठेवण्यात आलं आहे.
1987 साली वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या कब्जाचा विरोध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनने पहिला विद्रोह केला. तिथूनच हमासची सुरुवात झाली.
इस्रायलला धुळीस मिळवण्यास कटीबद्ध असल्याचं या संघटनेच्या चार्टरमध्ये लिहिलं आहे.
हमासची सुरुवात झाली त्यावेळी या संघटनेची दोन उद्दिष्टं होती. पहिलं उद्दिष्टं म्हणजे इस्रायलविरोधात शस्त्र हाती घेणं. त्यांच्या इज्जदीन अल-कसाम ब्रिगेडवर ही जबाबदारी होती. याशिवाय या संघटनेचं दुसरं उद्दिष्टं समाजकल्याणाची कामं करणं हे होतं.
मात्र, 2005 नंतर इस्रायलने गाझातून आपलं सैन्य आणि वस्त्या मागे घेतल्या. तेव्हापासून हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायला सुरुवात केली.
2006 साली हमासने पॅलेस्टाईनच्या अंतर्गत येणाऱ्या भागातून निवडणुकीत विजय मिळवला आणि पुढल्याच वर्षी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या 'फतह' या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथली सत्ता काबिज केली.

तेव्हापासून गाझाच्या या कट्टरवाद्यांनी इस्रायलसोबत तीन युद्ध केली आहेत. हमासला एकट पाडून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा, यासाठी इस्रायलने इजिप्तच्या सहकार्याने गाझापट्टीची नाकाबंदी केली आहे.
हमास किंवा किमान त्यांच्या सैन्य गटाला इस्रायलसह अमेरिका, युरोपीय महासंघ, ब्रिटन आणि इतर अनेक राष्ट्र एक अतिरेकी संघटना मानतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
आत्मघातकी बॉम्बहल्ले
पहिल्या विद्रोहानंतर प्रमुख पॅलेस्टाईन गट म्हणून हमासचा उदय झाला. या संघटनेने 1990 साली इस्रायल आणि बहुतांश पॅलेस्टाईनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅलेस्टाईन मुक्ती संघटना (PLO) यांच्यात ओस्लोत झालेल्या शांतता चर्चेचा विरोध केला.
इस्रायलने अनेक मोहिमा आखल्या. तर पॅलेस्टाईन प्राधिकरण या पॅलेस्टाईनच्या प्रमुख शासकीय संस्थेनेही कारवाया केल्या. मात्र, तरीही हमासने आत्मघातकी बॉम्बहल्ले करत सुरू असलेली शांतता चर्चा रोखण्याची आपली क्षमता असल्याचं सिद्ध केलं.

फोटो स्रोत, AFP
हमासचे बॉम्ब निर्माते याहिया अय्याश यांची डिसेंबर 1995 मध्ये हत्या करण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून 1996 सालच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हमासने अनेक आत्मघातकी बॉम्बहल्ले केले ज्यात 60 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला.
इस्रायलने ओस्लो करार तोडण्याचं मुख्य कारण हे आत्मघातकी बॉम्बहल्ले होतं आणि त्याच वर्षी या कराराचे कट्टर विरोधक असलेले बेंजामिन नेत्यानाहू सत्तारुढ झाले.
ओस्लो करारानंतर आणि खासकरून 2000 साली अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांची कॅम्प डेव्हिड शिखर परिषद अयशस्वी ठरल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन प्राधिकरणावर हल्ल्यांना पाठिंबा देण्याचा आरोप करत कारवाई सुरू केली त्यावेळी दुसरा विद्रोह झाला आणि हमासची शक्ती वाढत गेली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
त्यावेळी हमासने क्लिनिक आणि शाळा सुरू केल्या. इथे फतह गटाच्या हाती कमान असणाऱ्या भ्रष्ट आणि अक्षम पॅलेस्टाईन प्राधिकरणाकडून फसवणूक होत असल्याची भावना तयार झालेल्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांना मदत केली जायची.
दुसऱ्या विद्रोहाच्या सुरुवातीच्या काळात हमासच्या आत्मघातकी हल्ल्यांची अनेक राष्ट्रांनी प्रशंसा केली. हे हल्ले म्हणजे त्यांना झालेलं नुकसान आणि वेस्ट बँकच्या ज्या जागेला पॅलेस्टाईन आपली भूमी मानतो त्या भूमीवर इस्रायलने वसवलेल्या वस्तीचा सूड उगारण्यासाठी उचललेलं पाऊल आहे, असं त्यांना वाटलं.
2004 सालच्या मार्च आणि एप्रिल महिन्यात हमासचे आध्यात्मिक नेते शेख अहमद यासीन आणि त्यांचे उत्तराधिकारी अब्दुल अजीज अल-रनतिसी यांचा इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला.
त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात फतह गटाचे नेते यासर अराफात यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पॅलेस्टाईन प्राधिकरणाची कमान हमासच्या रॉकेट हल्ल्यांनी नुकसान होतंय, असा समज असणारे महमूद अब्बास यांच्या हाती आली.

फोटो स्रोत, AFP
पुढे 2006 साली झालेल्या पॅलेस्टाईनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हमासने दणदणीत विजय मिळवला. यानंतर हमास आणि फतेह यांच्यात एका कटु संघर्षाला सुरुवात झाली.
पॅलेस्टाईनने इस्रायलसोबत केलेल्या मागच्या सर्व करारांवर स्वाक्षरी करायला, इस्रायलला मान्यता देण्याला आणि हिंसाचार थांबवण्याला हमासने थेट नकार दिला.
हमासचं 1998 चं चार्टर
हमासच्या चार्टरमध्ये ऐतिहासिक पॅलेस्टाईनचा उल्लेख आहे. यात आजचा इस्रायलही येतो आणि या सर्व भूभागाला इस्लामिक म्हटलेलं आहे. तसंच ज्यू देशासोबत कुठल्याही प्रकारचा स्थायी शांतता करार करणार नसल्याचंही म्हटलं आहे.
यात ज्यूवर वारंवार हल्ले करत हमास ज्यूविरोधी मोहीम असल्याचंही म्हटलेलं आहे.
2017 साली हमासने एक नवं धोरण जारी केली. यात त्यांची भूमिका पूर्वीपेक्षा थोडी नरमाईची वाटते. तसंच भाषेतही जरा संयम दिसतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
नव्या धोरणात इस्रायलला मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र, यात 1967 च्या आधी जी स्थिती होती त्याच प्रकारच्या गाझा पट्टी, वेस्ट बँक आणि जेरूसलेममध्ये हंगामी पॅलेस्टाईन देशाच्या स्थापनेला औपचारिकरित्या स्वीकार करण्यात आलं आहे.
यात हमासचा लढा ज्यूंविरोधात नाही तर 'कब्जा करणाऱ्या ज्यू आक्रमणकर्त्यांविरोधात' असल्यावरही भर देण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यावर प्रतिक्रिया देताना, हमास "केवळ जगाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न" करत असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे.
निर्बंध
याचा परिणाम असा झाला की इस्रायल आणि त्यांच्या पाश्चिमात्य सहकाऱ्यांनी हमासच्या नव्या सरकारवर कठोर आर्थिक आणि राजकीय निर्बंध लादले.
2007 साली हमासने फतहच्या बाजूने असणाऱ्या सैन्याला गाझातून बाहेर काढलं त्यावेळी इस्रायलने त्या परिसरात पक्की नाकाबंदी बसवली. त्यानंतर पॅलेस्टाईनचे रॉकेट हल्ले आणि इस्रायलचे हवाई हल्ले सुरू झाले.

फोटो स्रोत, Getty Images
गाझावरून होणाऱ्या हल्ल्यासाठी इस्रायल हमासला जबाबदार मानतो आणि त्यांनी तिथे तीन वेळा सैन्य कारवाईदेखील केली. त्यानंतर सीमेवर युद्धही झालं.
2008 सालच्या डिसेंबर महिन्यात इस्रायलच्या सैन्याने रॉकेट हल्ले थोपवण्यासाठी ऑपरेशन 'कास्ट लीड' राबवलं. 22 दिवस चाललेल्या त्या संघर्षात 1300 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक आणि 12 इस्रायली नागरिक मारले गेले.
2012 सालच्या नोव्हेंबर महिन्यात इस्रायलने पुन्हा एकदा ऑपरेशन 'पिलर' राबवलं. एका हवाई हल्ल्याने या ऑपरेशनची सुरुवात झाली. या हल्ल्यात कसाम ब्रिगेडचे कमांडर अहमद जबारी यांना लक्ष्य करण्यात आलं. 8 दिवस चाललेल्या लढ्यात 170 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. यात बहुतांश सामान्य पॅलेस्टाईन नागरिक होते. तर 7 इस्रायली नागरिकांचाही मृत्यू झाला.
या दोन्ही लढायांनंतर हमासची ताकद कमी झाली. मात्र, पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.
2014 सालच्या जून महिन्याच्या मध्यात इस्रायलने हत्या करण्यात आलेल्या तीन इस्रायली तरुणांच्या खुनाचा तपास करताना वेस्ट बँकमध्ये हमासच्या अनेक सदस्यांना अटक केली आणि यानंतर पुन्हा एकदा गाझापट्टीतून जोरदार रॉकेट हल्ल्यांना सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
जुलै महिन्यात हमासने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदा इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्याचं मान्य केलंय.
दुसऱ्याच दिवशी इस्रायलच्या सैन्याने ऑपरेशन 'प्रोटेक्टिव्ह एज' सुरू केलं. 50 दिवस चाललेल्या या युद्धात कमीत कमी 2251 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले. यात 1462 सामान्य नागरिक होते.
इस्रायलच्या 67 जवान आणि 6 नागरिकांचा मृत्यू झाला.
2014 पासून दोन्ही बाजूंनी सातत्याने हिंसक चकमकी झडत आहेत. मात्र, इजिप्त, कतार आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धविराम होऊन कधी युद्धाची वेळ ओढावली नाही.

फोटो स्रोत, EPA
नाकाबंदीमुळे दबाव असूनही हमासने गाझामध्ये स्वतःची सत्ता कायम ठेवली आहे. इतकंच नाही तर आपलं रॉकेट भंडार अधिकाधिक समृद्ध कसं होईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
फतहसोबत समेट घडवण्याचे प्रयत्नही फोल ठरले आहेत.
या सर्व परिस्थितीत गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाईन नागरिकांची अवस्था अधिकाधिक बिकट होत चालली आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. वीज, पाणी आणि औषधांचाही तुटवडा आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








