इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : गृहयुद्धाची शक्यता, मध्यस्थीसाठी अमेरिकी दूत तेल अविवमध्ये दाखल

गाझापट्टीमध्ये सुरू असणारा संघर्ष आता वेस्ट बँकपर्यंत पोहोचला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाझापट्टीमध्ये सुरू असणारा संघर्ष आता वेस्ट बँकपर्यंत पोहोचला आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष कमी व्हावा, यासाठी अमेरिकेचे राजदूत तेल अविवमध्ये दाखल झालेत.

अमेरिकी राजदूत हॅडी आम्रा हे इस्रायल, पॅलेस्टाईन आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून युद्धबंदीसाठी प्रयत्न करतील. शनिवारी सकाळीही इस्रायलने हवाई हल्ले केले तर उत्तरादाखल पॅलेस्टाईनच्या लोकांनी रॉकेट हल्ले केले.

इस्रायलने शनिवारी पहाटे गाझाच्या पश्चिमेकडे असलेल्या शरणार्थी शिबिरावर केलेल्या हवाई हल्ल्यात कमीत कमी 7 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं आणि यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

गाझातील अतिरेक्यांनीही रॉकेट हल्ला करत इस्रायलच्या बीरशेबा शहराला लक्ष्य करून इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं. शुक्रवारी हा संघर्ष वेस्ट बँकपर्यंत पोहोचला. ज्यात कमीत कमी 10 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जखमी झालेत.

रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. या बैठकीआधी अमेरिकेचे राजदूत हॅडी आम्रा तेल अविवमध्ये दाखल झालेत. "शाश्वत शांततेसाठी काम करण्याची गरज दृढ करणे", हा हॅडी यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचं इस्रायलमधल्या अमेरिकी दूतावासाने म्हटलं आहे.

मात्र, इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही युद्धबंदीसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळालेला नाही. इस्रायलने गाझामध्ये हमासवर सुरू केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पश्चिम आशिया हा विषय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या अजेंड्यावर आला आहे. त्यामुळे बायडन प्रशासनाची संपूर्ण टीम तयार नसतानाही त्यांना या मुद्द्यावरून डिप्लोमॅटिक आघाडीवर तातडीने काम करावं लागतंय. बायडन प्रशासनाने अजून इस्रायलच्या राजदूतांचीही नेमणूक केलेली नाही.

हॅडी आम्रा हे मध्यम-स्तरावरचे दूत आहेत आणि अमेरिकेच्या पूर्व प्रशासनात विशेष राजदूतांना जो दर्जा असायचा तो त्यांना नाही, अशी माहिती बीबीसीच्या बारबरा प्लेट अशर यांनी दिली आहे.

इस्रायलमध्ये गृहयुद्धाची शक्यता

इस्लायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता गाझापट्टीनंतर पॅलेस्टाईनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकेच्या बहुतांश भागात पसरला आहे.

वेस्ट बँकच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या हिंसाचारात कमीत कमी 10 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जखमी झाले आहेत.

इस्रायलचं सैन्य अश्रूधुराचे गोळे आणि रबर बुलेट्सचा वापर करत आहे. तर पॅलेस्टाईनने अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब फेकलेत.

व्हीडिओ कॅप्शन, इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधला संघर्ष आणखी पेटला... 70 हून अधिक ठार

वेस्ट बँकच्या अनेक भागात गंभीर संघर्ष झडत असल्याचं वृत्त सातत्याने हाती येत आहे. गेल्या अनेक वर्षांत या भागात झालेला हा 'सर्वात भयंकर हिंसाचार' असल्याचं म्हटलं जात आहे.

पूर्व जेरुसलेममध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेली अनेक आठवडे सुरू असलेला तणाव वाढत गेला आणि सोमवारी संघर्ष सुरू झाला. मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र असणाऱ्या या भागात धगधगणाऱ्या वैराने अखेर संघर्ष पेटला. गाझापट्टीवर सत्ता असणाऱ्या हमास या कट्टरतावादी संघटनेने इस्रायलला मागे जाण्याचा इशारा देत रॉकेट हल्ले सुरू केले. उत्तरादाखल इस्रायलनेही हवाई हल्ले सुरू केले.

Image shows protests in the West Bank on Friday

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी आंदोलक तरुणांमध्ये चकमकी होत आहेत.

संघर्ष पेटल्यापासून गाझामध्ये कमीतकमी 126 तर इस्रायलमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाने शांततेचं आवाहन करूनही गेल्या पाच रात्रीपासून दोन्ही बाजूने हल्ले सुरू आहेत.

गेल्या आठवड्यातील घटनांमुळे प्रोत्साहित झालेले पॅलेस्टाईनचे तरुण आणि इस्रायली सैनिकांमध्ये चकमकी सुरू असल्याचं बीबीसीच्या अरब अफेअर्सचे संपादक सेबॅस्टिअन अशर यांचं म्हणणं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, इस्त्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष : ज्यू आणि अरबांमधील वादाचं मूळ काय आहे? । सोपी गोष्ट 337

दरम्यान इस्रायलला लागून असलेल्या जॉर्डन आणि लेबेनॉन सीमेवरही शुक्रवारी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली. लेबेनॉनच्या सरकारी मीडियातील वृत्तानुसार इस्रायलच्या सैन्याद्वारे डागलेल्या गोळीने निदर्शनात सहभागी असलेल्या लेबेनॉनच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल गाझा

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून गाझामध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचं आणि हमासच्या लोकांकडून कथितरित्या वापर होत असलेल्या 'द मेट्रो' या बोगद्यालाही उडवल्याचं इस्रायलच्या सैन्याने मान्य केलं आहे. मात्र, आपला एकही जवान गाझापट्टीत दाखल झालेला नाही, असं इस्रायलचं म्हणणं आहे. गुरुवारची संध्याकाळ ते शुक्रवारच्या सकाळपर्यंत गाझापट्टीत रॉकेट गनने झाडण्यात येणारे 220 क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचंही इस्रायलचं म्हणणं आहे.

दक्षिण इस्रायलमध्ये अशदोदजवळ झालेल्या बॉम्बहल्ल्यात घरी परतणाऱ्या 87 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला तर अशकेलॉन, बीरशेबा आणि यावने या भागांनाही लक्ष्य करण्यात आलं.

संघर्ष सुरू झाल्यापासून अनेक सामान्य नागरिक मारले गेल्याचं आणि यात 31 मुलांचाही समावेश असल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे. तर गाझा पट्टीत राहणारे 950 नागरिक जखमी झालेत.

व्हीडिओ कॅप्शन, इस्रायल, पॅलेस्टीन, गाझा पट्ट्यात सुरू असलेल्या संघर्षात भरडली जातायत कुटुंबं

मात्र, गाझापट्टीत ठार झालेल्यांपैकी बहुतांश जण हे अतिरेकी होते आणि यातले बरेच जण गाझातूनच डागण्यात आलेले रॉकेट मिसफायर झाल्याने मारले गेल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

संघर्ष सुरू झाल्यानंतर सोमवारपासून गाझापट्टीतून जवळपास 10 हजार पॅलेस्टाईन नागरिक घर सोडून गेल्याचं शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आलं आहे.

बीबीसीचे पश्चिम आशिया संपादक जेरेमी बॉवेन यांचं विश्लेषण

'विजय आपलाच झाला, हे दोन्ही बाजूंना आपापल्या नागरिकांना पटवून देता यायला हवं'

हमासने 2007 साली गाझापट्टीचा ताबा मिळवला. तेव्हापासून हमास आणि इस्रायल यांच्यात जो संघर्ष सुरू आहे त्याच एक विशिष्ट पॅटर्न दिसतो.

परदेशी मध्यस्थांच्या प्रयत्नांतून यापूर्वी अनेकदा युद्धबंदी झाली आहे. अमेरिका, इजिप्त, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशही आज तेच करू पाहत आहेत. मात्र, हे करण्यासाठी दोन्ही बाजूंना आपापल्या लोकांना विजय आपलाच झाला हे पटवून देता यायला हवं.

गाझापट्टीमध्ये सुरू असणारा संघर्ष आता वेस्ट बँकपर्यंत पोहोचला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

केवळ गाझापट्टीच नाही तर इस्रायलने जेरुसलेमसह काबिज केलेल्या वेस्ट बँकमध्येही पॅलेस्टाईन नागरिकांच्या हक्कांचे खरे रक्षणकर्ते आम्हीच आहोत, हे हमासला दाखवायचं असेल.

तर दुसरीकडे इस्रायलला आपण हमासचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलं आहे, हे आपल्या नागरिकांना हे पटवून द्यायचं असेल. इस्रायलच्या बाजूने एक वाकप्रचार सतत वापरला जातो - 'restore deterrence'. म्हणजे 'भीती घालून पुढील कारवाई रोखणे'. म्हणजेच शत्रुंना हे दाखवून द्या की इस्रायलवर हल्ले केल्याने केवळ वेदना आणि दुःख भोगावं लागेल.

आजच्या एकंदर परिस्थितीत दोन्ही बाजूंना शोकाकुल कुटुंबं आणि मानसिक आघात झालेल्या मुलांच्या सांत्वनासाठीचे शब्द शोधण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

हिंसाचार कशामुळे पेटला?

गेल्या अनेक दिवसांपासून पूर्व जेरुसलेममधल्या पवित्र गडाच्या कुंपणाजवळ इस्रायल आणि पॅलेस्टाईन पोलिसांमध्ये चकमकी झडत होत्या. यातूनच सैन्य कारवाई सुरू झाली.

ज्यू आणि पॅलेस्टाईन मुस्लीम दोघेही ही जागा पवित्र मानतात आणि या जागेवर आपला हक्क सांगतात. पॅलेस्टाईनचे नागरिक या जागेला हराम अल-शरीफ (पवित्र स्थळ) म्हणतात. तर ज्यूंसाठी हे टेम्पल माउंट आहे.

व्हीडिओ कॅप्शन, जेरुसलेम हिंसाचार - इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये का होतोय पुन्हा संघर्ष? । सोपी गोष्ट 366

इस्रायलने या पवित्र ठिकाणाहून आपले पोलीस हटवावे आणि शेजारील शेख जारा या अरब बहुल शहरात जिथे वाढत्या ज्यू वस्तीमुळे पॅलेस्टाईन नागरिकांना बाहेर पडाव लागतंय, तिथूनही इस्रायलने पोलीस माघारी घ्यावे, अशी हमासची मागणी आहे. मात्र, हमासने दिलेला अल्टिमेटम अमान्य झाल्यावर हमासने रॉकेट हल्ले सुरू केले.

एप्रिलच्या मध्यापासून जेव्हा रमझानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली तेव्हापासूनच इस्रायली पोलिसांबरोबर चकमकी झडायला लागल्या. यामुळे पूर्व जेरुसलेममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तणाव वाढला होता आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष

1967 साली पश्चिम आशियात झालेल्या युद्धात इस्रायलने पूर्व जेरुसलेम काबिज केलं होतं. इस्रायली नागरिक तो दिवस 'जेरुसलेम दिन' म्हणून साजरा करतात. इस्रायल साजरा करत असलेल्या या वार्षिक उत्सवामुळेही तणाव अधिक वाढला.

दोन्ही बाजूंसाठी धार्मिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या या शहराचं भविष्य इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेली अनेक दशकं सुरू असलेल्या संघर्षाच्या मध्यभागी आहे.

इस्रायले 1980 साली पूर्व जेरुसलेमवर आपला ताबा सांगितला आणि या संपूर्ण शहराला इस्रायलची राजधानी मानलं. मात्र, इतर अनेक राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली नाही.

दुसरीकडे पॅलेस्टाईनचे नागरिक जेरुसलेमच्या पूर्वेकडच्या निम्म्या भागावर स्वतःची राजधानी म्हणून दावा करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)