अल अक्सा : इस्रायल आणि पॅलेस्टाईन समर्थकांमधला जेरुसलेमचा वाद नेमका आहे तरी काय?

फोटो स्रोत, Getty Images
इस्लामी कट्टरवादी गट 'हमास'ने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला आहे.
शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामी कट्टरतावादी गटाने दावा केला आहे.
या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.
या हल्ल्यात इस्रायलमधील 22 जणांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.
नेमका हा वाद काय आहे? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे?
इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या समर्थकांमधला वाद तसा नवा नाही. पण सध्या तो पुन्हा भडकला आहे कारण, सोमवारी इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयात ईस्ट जेरुसलेमसंदर्भातल्या खटल्यावर सुनावणी होणार आहे. इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढलं जाण्याचाी भीती वाटते आहे.
इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे. पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.
अल अक्सा मशीद हे जेरुसलेमच्या ओल्ड सिटी भागातील धर्मस्थळ असून, ही जागा इस्लामसाठी पवित्र आहेच, पण इस्रायलच्या ज्यू लोकांसाठीही ते पवित्र स्थळ आहे. टेंपल माऊंट म्हणून ही जागा ओळखली जाते.
शुक्रवारी (7 मे 2021) या अल-अक्सा मशीद परिसरात हजारो लोक रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी नमाजसाठी जमले होते, तेव्हा हिंसाचार उसळला ज्यात 163 पॅलेस्टिनी आणि सहा इस्रायली पोलिस अधिकारी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिन्ही धर्मांसाठी हे शहर एवढं महत्त्वाचं का आहे, याचा आढावा घेतला आहे बीबीसीच्या एरिका चेर्नोफस्की यांनी.
जेरुसलेम म्हटलं की ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिन्ही धर्मांच्या अनुयायांच्या मनात अनेक गोष्टी येतात. अनेक शतकांपासून सुरू असलेल्या वादाचीही त्याला जोड असते.

जेरुसलेमला हिब्रू भाषेत येरुशलायीम तर अरेबिक भाषेत अल-कड्स म्हणतात. हे जगातल्या सगळ्यांत जुन्या शहरांपैकी एक आहे.
या शहरावर अनेक आक्रमणं झाली, ते उद्धवस्त करण्यात आलं, पुन्हा उभं राहिलं. इतिहासाच्या पानांमध्ये या शहराच्या भूतकाळाचे अनेक पदर सापडतील.
वेगवेगळ्या धर्मांच्या अनुयायांमध्ये असलेले वाद, त्यातून निर्माण होणारा संघर्ष यावरच सगळ्यांचं लक्ष असतं. पण या शहराच्या पावित्र्याविषयी कोणाचंच दुमत नाही.
जुन्या शहराच्या मध्यवर्ती, छोट्या गल्ल्या आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश असलेले चार भाग आहेत. हे चार भाग म्हणजेच, ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू आणि अर्मेनियन यांची पवित्र ठिकाणं.
या चारही भागांना इतर शहरापासून वेगळं करणारी किल्लेवजा तटबंदी सुद्धा आहे.

फोटो स्रोत, Google
प्रत्येक भाग हा त्या त्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो. अर्मेनियमन ख्रिस्ती धर्माचाच एक भाग असल्यानं ख्रिस्ती धर्माकडे दोन विभाग आहेत. अर्मेनियन या धर्माचं हे जगातलं सगळ्यात जुनं केंद्र आहे.
सेंट जेम्स चर्चच्या अंतर्गत येणाऱ्या या पंथानं त्यांचं वेगळेपण कायम ठेवलं आहे.
चर्च
ख्रिस्ती भागात अवघ्या ख्रिश्चनांच्या जिव्हाळ्याचं सेप्लकर चर्च आहे. येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर नेणं, त्यांचा मृत्यू आणि पुनरुत्थान या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी ही जागा आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/GALI TIBBON
बहुतांश ख्रिस्ती परंपरांनुसार, येशूंना इथंच गोल्गोथावर किंवा कॅलव्हरी या टेकडीवर वधस्तंभावर बांधण्यात आलं. येशूचं थडगं सेप्लकर चर्चमध्येच आहे. हेच त्याच्या पुनरुत्थानाचंही ठिकाणं मानलं जातं.
या चर्चचं व्यवस्थापन वेगवेगळ्या ख्रिस्ती संप्रदायांच्या प्रतिनिधींमार्फत केलं जातं. त्यात ग्रीक आर्थोडॉक्स पीठ, रोमन कॅथॉलिक चर्च आणि अर्मेनियन पीठाचे फ्रान्सिस्कॅन फ्रायर्स यांचा समावेश आहेच. शिवाय, इथियोपीयन्स, कॉप्टीक्स आणि सीरियन आर्थोडॉक्स चर्च यांचेही प्रतिनिधी त्यात आहेत.
जगभरातील कोट्यवधी ख्रिश्चनांसाठी हे मुख्य धर्मस्थळ आहे. प्रार्थनेतून शांती आणि मोक्ष मिळवण्यासाठी ते या पवित्र स्थळाला भेटी देतात.
मशीद
चारही पवित्र ठिकाणांपैकी मुस्लीमबहुल परिसर सर्वात मोठा आहे. मुस्लिमांमध्ये 'अल-हरम-अल-शरीफ' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र परिसरात एका पठारावर दगडी घुमट आणि अल-अक्सा मशीद आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/AHMAD GHARABLI
इस्लाममध्ये तिसरं सर्वांत पवित्र ठिकाण असलेल्या या स्थळांचा प्रशासनिक कारभार 'वक्फ' या इस्लामिक ट्रस्टद्वारे बघितला जातो.
मुस्लिमांच्या मते, मोहम्मद पैगंबर एका रात्रीत प्रवास करून मक्काहून इथं आले होते. या प्रवासात सर्व पंथांच्या भक्तांबरोबर त्यांनी प्रार्थना केली होती.
याठिकाणी दगडी घुमटामध्ये पायाचा दगड आहे जिथून पैंगबर मोहम्मद यांनी स्वर्गात प्रस्थान ठेवलं असं मानलं जातं.
वर्षभर या पवित्र ठिकाणी जगभरातून मुस्लीमधर्मीय येत असतात. पण रमजान महिन्याच्या दर शुक्रवारी लाखो मुस्लीम नमाज पठणासाठी इथं एकत्र येतात.
भिंत
ज्यू धर्मियांचं स्थळ हे कोटल किंवा पश्चिमी भिंत म्हणून ओळखलं जातं. कधीकाळी तिथं उभ्या असलेल्या पवित्र मंदिराच्या भिंतीचे ते अवशेष आहेत. मंदिराच्या आत ज्यूंसाठीचं अत्यंत पवित्र असं स्थळ होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ज्यू असं मानतात की, हे स्थळ म्हणजे पायाचा तो दगड आहे जिथून जगाची निर्मिती झाली होती. जिथं अब्राहम यांनी मुलगा इसाकचा त्याग करण्याची तयारी केली होती.
अनेक ज्यू धर्मीय असं मानतात की, दगडी घुमट हे त्यांचं पवित्र स्थळ आहे.
सध्या पश्चिमी भिंत ही पवित्र स्थळाच्या जवळची एकमेव अशी जागा असल्याचं मानलं जातं.
या पश्चिमी भिंतीचे व्यवस्थापन रब्बी यांच्याद्वारे केलं जातं. दरवर्षी लाखो पर्यटक या स्थळाला भेट देतात.
जगभरातील ज्यू धर्मिय प्रार्थनेसाठी या वारसास्थळाला भेट देतात. सुटीच्या काळात इथं प्रचंड गर्दी होते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








