इस्रायल-हमास संघर्ष : ...म्हणून गाझामधली इस्रायलची शेवटची चाल अत्यंत कठीण असेल

गाझा पट्टीजवळ इस्रायलच्या 'मर्कावा' रणगाड्यावरील सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाझा पट्टीजवळ इस्रायलच्या 'मर्कावा' रणगाड्यावरील सैनिक
    • Author, पॉल किर्बी
    • Role, बीबीसी युरोप प्रतिनिधी
  • इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की त्यांनी गाझा पट्टीवर छोट्या प्रमाणात हल्ले सुरू केले आहेत.
  • लष्कराच्या प्रवक्त्यानुसार, "दहशतवादी आणि शस्त्रे नष्ट करणे आणि ओलिसांची सुटका करणे" हा त्यांचा उद्देश आहे.
  • इस्रायलने गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना वादी गाझाच्या उत्तरेकडील संपूर्ण परिसर रिकामा करून दक्षिणेकडे जाण्याचा इशारा दिला आहे. 11 लाख लोकांना याचा फटका बसणार आहे.
  • एवढ्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे 'अत्यंत गंभीर मानवीय संकट' उद्भवू शकतं, असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेलेत. त्यानंतर इस्रायलने सुरू केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत आतापर्यंत 2 हजार पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

इस्रायली नेत्यांनी इशारा दिला आहे की ते हमासला पृथ्वीच्या नकाशावरून कायमचं नष्ट करतील आणि गाझा पुन्हा कधीही पूर्वीसारखा राहणार नाही.

हमासने शनिवारी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात 1,300 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू म्हणाले की, "आम्ही हमासच्या प्रत्येक सदस्याला ठार करू."

यासाठी इस्रायलने हमासविरोधात ‘स्वॉर्ड्स ऑफ आयर्न’ नावाची मोहीम सुरू केली आहे. याआधी गाझामध्ये अशी लष्करी कारवाई कधीच झाली नव्हती.

पण ‘स्वॉर्ड्स ऑफ आयर्न’ मोहीम कितपत व्यावहारिक आहे? दाट लोकवस्तीच्या गाझामध्ये ही कारवाई करणे इस्रायली सैन्यासाठी किती आव्हानात्मक असू शकते? आणि इस्रायली कमांडर त्यांचं उद्दिष्ट साध्य करू शकतील का?

गाझा पट्टीतील ग्राउंड ऑपरेशन्स म्हणजे प्रत्येक घराचा शोध घेणे आणि शहरातील अरुंद गल्ल्या आणि रस्त्यांवर उतरून लढाई करणे, यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला असलेला धोका कैक पटींनी वाढू शकतो.

आत्तापर्यंत इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले असून त्यात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून चार लाखांहून अधिक लोकांना घर सोडून पलायन करावं लागलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध : भारत नेमका कुणाचा मित्र आहे? सोपी गोष्ट

शनिवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या सैनिकांनी पळवून नेलेल्या 150 ओलिसांची सुटका करणे ही लष्कराची आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांना गाझामध्ये कुठे ठेवण्यात आलंय, याची कोणतीही माहिती लष्कराकडे नाहीए.

इस्रायल संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ हरेझी हालेवी यांनी हमासला नेस्तनाभूत करण्याचं वचन आणि गाझामधील त्यांच्या राजकीय प्रमुखाला कडवं आव्हान दिलंय.

मात्र इस्रायलच्या या कारवाईनंतर गेल्या 16 वर्षांपासून हमासच्या राजवटीचा साक्षीदार असलेल्या गाझाचं चित्र कायमचे बदलून जाईल, असं मानलं जातंय.

इस्रायली लष्कर रेडिओशी संबंधित लष्करी विश्लेषक अमीर बार शालोम म्हणतात, "मला वाटत नाही की इस्रायल हमासच्या सर्व सदस्यांना संपवू शकेल, कारण त्यामागील विचारसरणी कट्टरपंथी इस्लामने प्रेरित आहे.

पण ते या संघटनेला नक्कीच इतकं कमकुवत करू शकतात, की अशाप्रकारची कोणतीही मोहिम राबवण्याची त्यांची क्षमता नष्ट होऊन जाईल."

हे उद्दिष्ट अधिक वास्तववादी वाटतं. आत्तापर्यंत इस्रायलने हमासशी चार युद्धं केली आहेत आणि प्रत्येक वेळी हमासला पूर्णपणे रोखण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिकस यांनी म्हटलंय की या युद्धाच्या अखेरीस हमासकडे "इस्रायली नागरिकांना धोका निर्माण करण्यासाठी" पुरेसं लष्करी सामर्थ्य उरणार नाही.

गाझा पट्टीजवळ हमास कट्टरवाद्यांनी या ठिकाणांहून घुसखोरी करण्यात आली.
फोटो कॅप्शन, गाझा पट्टीजवळ हमास कट्टरवाद्यांनी या ठिकाणांहून घुसखोरी केली.

जमिनीवरील कारवाईचा धोका

गाझामध्ये इस्रायलच्या ‘स्वॉर्ड्स ऑफ आयर्न’ या मोहिमेचे यश अनेक गोष्टींवर अवलंबून असेल.

हमासला याची कल्पना आहे की इस्रायल हल्ला करू शकतो. हे लक्षात घेता त्यांची लष्करी शाखा इज्जेदिन अल-कासमने तयारी केली असावी.

हमासने ठिकठिकाणी स्फोटके पेरली असतील आणि कुठे लढायचे हेही ठरवलं असेल. इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी ते गाझामधील त्यांच्या भूमिगत भुयारांच्या नेटवर्कचा पुरेपूर वापर करतील.

2014 मध्ये गाझा शहराच्या उत्तरेकडील भागात इस्रायली सैन्य आणि हमासच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्या काळात हमासच्या सैनिकांशी झालेल्या लढाईत इस्रायलच्या लष्कराला रणगाडाविरोधी माईन्स, स्नायपर्स आणि सैनिकांच्या जीवितहानीसह मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं होतं. या संघर्षात शेकडो नागरिक मारले गेलेले.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, SAID KHATIB/AFP

हेच एक मोठे कारण आहे की इस्रायलने गाझाच्या उत्तरेकडील भागात राहणाऱ्या 1.1 दशलक्ष पॅलेस्टिनी नागरिकांना 24 तासांच्या आत परिसर रिकामा करण्यास सांगितलं आणि जमिनीवर हल्ला सुरू करण्यापूर्वी दक्षिणेकडे जायला सांगितलंय.

हे युद्ध अनेक महिने सुरू राहू शकतं, असा इशारा इस्रायलने दिला आहे. यासाठी त्यांनी 3 लाख 60 हजार राखीव सैनिकांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

पण प्रश्न असा आहे की, दरम्यानच्या काळात माघार घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढला तर इस्रायल आपली मोहीम किती काळ चालू ठेवू शकेल.

निर्वासितांच्या प्रकरणांशी निगडित संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे की गाझा ‘नरकाची विहीर’ बनतेय. इथे मृतांची संख्या झपाट्याने वाढतेय. येथील पाणी, वीज आणि पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित करण्यात आलाय. आता इस्रायलने गाझामधील जवळपास निम्म्या लोकसंख्येला हा परिसर रिकामा करण्यास सांगितलंय.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

सुरक्षा आणि गुप्तचर घटनांचे वार्तांकन करणारे प्रसिद्ध इस्रायली पत्रकार योसी मेलमन म्हणतात, "इस्रायली सैन्य आणि सरकार असं गृहीत धरून आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाचा, किमान पाश्चात्य देशांचा पाठिंबा आहे. सध्या त्यांचे तत्त्व हे आहे की' चला एकत्र येऊ या कारण आपल्या हातात खूप वेळ आहे."

तरी याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे की जर लोक उपासमारीने मरत असल्याचं चित्र समोर आलं तर इस्रायलच्या मित्र राष्ट्रांना देखील परिस्थिती लक्षात घेऊन हस्तक्षेप करावा लागेल.

ओलिसांची सुटका करण्याचं अवघड काम

इस्रायलवर शनिवारी झालेल्या हल्ल्यात हमासच्या सैनिकांनी ज्या 150 लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यात केवळ इस्रायली नागरिक नसून त्याध्ये परदेशी नागरिकांची मोठी संख्या आहे, शिवाय दुहेरी नागरिकत्व मिळालेलेही अनेकजण आहेत.

अशा परिस्थितीत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन अशा अनेक देशांच्या सरकारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओलिसांना सुखरूप बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशात राहणार्‍या फ्रेंच-इस्त्रायली कुटुंबांना धीर देत म्हटलंय की, "फ्रान्स नेहमी आपल्या नागरिकांची मदत करण्यास तत्पर असतो."

हमासच्या सैनिकांनी ओलिसांना ताब्यात ठेवण्याचा किती परिणाम इस्रायलच्या या संपूर्ण मोहिमेवर होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासोबतच इस्रायलमध्ये अंतर्गतही सरकारवर याविषयी मोठा दबाव आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, TEF SAFADI/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमीर बार शालोम यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना 1972 म्युनिक ऑलिम्पिक खेळादरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीशी केली आहे.

1972 मध्ये पॅलेस्टिनी बंदूकधार्‍यांनी 11 इस्रायली खेळाडूंना पकडून त्यांची हत्या केली होती.

"सरकारने त्यावेळी हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना ठार मारण्याची मोहीम सुरू केलेली. यावेळीही सरकारला असंच काहीतरी करावं लागेल, त्यांना इस्रायली नागरिकांच्या अपहरणासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सैनिकांचा शोध घ्यावा लागेल," असं त्यांचं म्हणणं आहे.

इस्रायलचे प्रतिष्ठित कमांडो युनिट सायेरेत मतकालच्या सैनिकांसाठी गाझामधील वेगवेगळ्या ठिकाणी ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडवणं अत्यंत कठीण असू शकतं.

हमासने आधीच धमकी दिली आहे की इस्रायलने हल्ला केला तर ते ओलीसांना ठार करण्यास सुरुवात करतील.

हमासच्या ताब्यातून गिलाद शालित नावाच्या सैनिकाची सुटका करण्यासाठी 2011 मध्ये इस्रायलने एक हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केलेली. हमासच्या सैनिकांनी गिलादला पाच वर्षं ओलीस ठेवलं होतं.

मात्र असं पाऊल उचलण्यापूर्वी इस्रायलला पुन्हा एकदा नीट विचार करावा लागेल. ज्यांना इस्रायलने 2011 मध्ये सोडलं होतं त्यापैकी एक याह्या सिनवार देखील होते. सिनवार हे आता हमासचे राजकीय प्रमुख बनले आहेत.

आसपासच्या इतर देशांचंही या युद्धावर लक्ष

इस्रायलच्या जमिनीवरील मोहिमेचं यश हे त्यांचे शेजारी देश काय प्रतिक्रिया देतात यावर देखील अवलंबून असेल.

विशेषतः इजिप्तमधून त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इजिप्तची उत्तर सीमा गाझाच्या दक्षिणेला लागून आहे. रफाह सीमा ओलांडून गाझामधील लोकांना मदत करण्यासाठी इजिप्त त्यांच्यावर दबाव आणू शकतो.

इस्रायलच्या इन्स्टिटय़ूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीजचे ओफिर विंटर म्हणतात, "इस्रायलची लष्करी मोहीम जसजशी पुढे जाईल आणि गाझामधील मृतांची संख्या वाढेल, तसतसा इजिप्तवरचा दबावही वाढेल. त्यांच्यासमोर हा प्रश्न उभा राहू शकतो की ते युद्धाकडे पाठ फिरवू इच्छिणाऱ्या पॅलेस्टिनींची नाराजी ओढवून घ्यायची का?"

पण हे प्रकरण केवळ इजिप्तपुरते मर्यादित राहील, असं नाही.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

इजिप्तला आपल्या सीमा उघडाव्या लागतील. त्यांच्या बाजूनेही इस्रायलवर लष्करी कारवाईसाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

लेबनॉनला लागून असलेल्या इस्रायलच्या उत्तर सीमेवरही सर्वांच्या नजरा असतील.

लेबनॉनमध्ये अस्तित्वात असलेला इस्लामिक कट्टरतावादी गट हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्य यांच्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत, तरीही आजपर्यंत हे क्षेत्र इस्रायलसाठी नवीन युद्धक्षेत्र बनलेलं नाही.

इ्स्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, REUTERS/IBRAHEEM ABU MUSTAFA

ओफिर विंटर यांचे म्हणणं आहे की, "हिजबुल्लाहचा मुख्य पाठीराखा इराणने यापूर्वीच इस्रायलविरुद्ध ‘नवीन आघाडी’ सुरू करण्याची धमकी दिली आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, सध्याच्या तणावाचा कोणीही फायदा घेऊ नये, तेव्हा त्यांचा इशारा इराण आणि हिजबुल्लाकडे होता."

जो बायडेन म्हणाले होते की, "कोणताही देश, कोणतीही संस्था आणि कोणतीही व्यक्ती या परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार करत असेल, तर त्यांच्यासाठी माझा एकच शब्द आहे - असं करू नका."

आपल्या या संदेशाचं गांभीर्य सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात पाठवलेय.

गाझाबाबत इस्रायलची शेवटची चाल काय असेल?

या लष्करी मोहिमेने इस्रायलने हमासला पूर्णपणे कमकुवत केलं तरी गाझामध्ये त्याची जागा कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होतो.

2005 मध्ये इस्रायलने आपले सैन्य बाहेर काढलं आणि हजारो इस्रायली गाझा पट्टीत स्थायिक झाले. त्यांना पुन्हा एकदा या क्षेत्रात स्थायिक होऊन स्वत:ला कब्जा करणारा देश म्हणून मिरवायला आवडणार नाही.

ओफिर विंटर यांचा असा विश्वास आहे की 2007 मध्ये हसामने सत्तेतून बाहेर काढलेले पॅलेस्टिनी अथॉरिटी (पीए) पुन्हा एकदा गाझा पट्टीत परत येऊ शकतं.

पॅलेस्टिनी अथॉरिटी ही बंडखोर संघटना नाहीए आणि सध्या वेस्ट बँक क्षेत्रावर राज्य करते. त्यांचं असं म्हणणं आहे की इजिप्त अशा जबाबदार शेजाऱ्यांचं स्वागत करेल.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायली हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझातील पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करणं हे एक मोठं आव्हान असेल.

हमासच्या हल्ल्यापूर्वीच इस्रायल सरकारने गाझामधून इस्रायलला जाणाऱ्या ‘पर्यायी वापराच्या वस्तूं’वर कडक निर्बंध घातलेले. या अशा गोष्टी आहेत ज्याचा वापर लष्कर आणि नागरिक दोघेही करू शकतात. इस्रायल अशा गोष्टींवर आणखी कडक निर्बंध लादू शकतं.

इस्रायलची इच्छा आहे की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी निवासी क्षेत्र इस्रायल-गाझा सीमेवर बांधलेल्या कुंपणापासून ठराविक अंतरावर असावीत. इस्रायलमध्ये यापूर्वीही अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

इस्रायलची सुरक्षा एजन्सी शिन बेटचे माजी प्रमुख योराम कोहेन यांना असं वाटतं की, विद्यमान बफर झोन कमीतकमी दोन किलोमीटर (1.25 मैल) च्या "शूट ऑन साइट" क्षेत्रात बदलण्यात यावेत.

इस्रायलच्या हमासविरुद्धच्या मैदानी मोहिमेचा निकाल काहीही लागला, तरी त्याद्वारे त्यांना आपलं मूळ उद्दिष्ट साध्य करायचं आहे. भविष्यात त्यांच्यावर असा हल्ला पुन्हा होऊ नये, अशी त्याची इच्छा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)