लेबनॉनमधील स्फोटांमुळे हिजबुल्लाह इस्त्रायलला शरण जाईल, की आणखी आक्रमक होईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेरेमी बोवेन
- Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज
1948 सालच्या युद्धानंतर इस्त्रायल देश म्हणून अस्तित्वात आला.
तेव्हापासून आतापर्यंत इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये कायम संघर्ष सुरू असून मागील एक वर्ष सर्वाधिक प्राणघातक ठरलं आहे.
7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्त्रायलवर पहिला हल्ला केला होता. तेव्हापासून सुरू झालेला संघर्ष सध्या घातक वळणावर येऊन ठेपला आहे.
हिज्बुल्लाहच्या कम्युनिकेशन नेटवर्कवर हल्ला केल्यानं इस्त्रायलचा सामरिक पातळीवर विजय झाला आहे. एखाद्या गूढ चित्रपटाप्रमाणे हा हल्ला होता.
मात्र, या हल्ल्यामुळे इस्त्रायललासुद्धा गंभीर स्वरुपाची हानी पोहोचू शकते. कारण लेबनॉनच्या शक्तिशाली सैन्याची राजकीय पातळीवर नाचक्की झाली असली, तरी ते इस्त्रायलला शरण जाणार नाहीत, हे निश्चित आहे.


हल्ल्यानंतर हिजबुल्लाह शांत बसेल का?
इस्त्रायलनं केलेल्या या हल्ल्यामुळं हिजबुल्लाहला जबर धक्का बसला असला तरी ते पूर्णपणे खचलेले नाहीत.
शिवाय या हल्ल्यामुलं इस्त्रायलच्या उत्तर सीमेवर अडकलेल्या 60 हजार नागरिकांच्या परतीचा मार्ग खुला होण्याऐवजी अधिक बिकट झाला आहे. हे सर्व लोक युद्ध सुरू झाल्यापासून देशात परतलेले नाहीत.
इस्त्रायलने या युद्धात आतापर्यंत कायम वेगळ्या प्रकारची आणि धोकादायक शस्त्रे वापरलेली असून त्यांचीच शस्त्रं प्रभावीही ठरली आहेत.
वॉकी टॉकीमध्ये झालेल्या स्फोटांपूर्वी आय मिडल इस्ट न्यूजलेटर अल मॉनिटरच्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की, इस्त्रायलला ही शस्त्रं जेवढ्या प्रभावीपणे वापरण्याची अपेक्षा होती, तेवढं लक्ष्य ते साध्य करू शकले नाहीत.
या रिपोर्टनुसार ज्यावेळी हिजबुल्लाहासोबत थेट युद्ध होईल तेव्हाच ही योजना राबविण्याचे नियोजन होते. अर्थात काही प्रमाणात ते यशस्वीही झाले.

फोटो स्रोत, EPA
पेजरमध्ये झालेल्या स्फोटांनंतर 18 सप्टेंबरच्या सायंकाळी लेबनानमध्ये वॉकी-टॉकीत स्फोट झाले. या स्फोटांमध्ये 25 हून अधिक मृत्यू झाले असून 500 हून अधिक जण जखमी झाले. आकडा वाढण्याची शक्यताही आहे.
पेजर हल्ला हा सर्वात मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे. इस्त्रायलनं आक्रमक पवित्रा घेत दक्षिण लेबनॉनमध्ये शिरण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचं अल मॉनिटरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मात्र, हिजबुल्लाहला या योजनेचा सुगावा लागल्याने हा हल्ला नियोजित वेळेआधीच करण्यात आल्याचेही हा रिपोर्ट सांगतो.
इस्त्रायलने या हल्ल्यांद्वारे ते हिजबुल्लाहच्या कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये शिरून त्यांना झुकवू शकतात हे दाखवून दिले आहे. मात्र, आता या भागातील युद्ध थांबण्याऐवजी आणखी धोकादायक वळणावर पोहोचले आहे.
मध्य -पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती
मध्य-पूर्वेत होणारा संघर्ष कमी करणे हे सद्यस्थितीत केवळ गाझापट्टीवर अवलंबून आहे.
गाझापट्टीत शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय लेबनॉनमधील संघर्ष, लाल समुद्रातील हल्ले किंवा इराकमधील तणावाची परिस्थिती निवळणार नाही.
लेबनानमधील अमेरिकेचे राजदूत अमॉस होचसटिन काही महिन्यांपासून हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लेबनॉन, हिजबुल्लाह आणि इस्त्राइलसोबत चर्चा करत आहेत.
राजकीय मुत्सद्देगिरीच्या आधारे हा संघर्ष थांबवून मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मात्र, इस्त्रायलनं या हल्ल्याच्या योजनेबद्दल अमेरिकेलाही कल्पना दिलेली नव्हती, असंही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळं अमेरिकेच्या प्रयत्नांनाही किती मदत मिळेल याबाबत शंका आहे.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच गाझापट्टीत शांतता निर्माण होईल अशी भविष्यवाणी केली होती. मात्र, आता परिस्थिती पुन्हा चिघळली असून शांतता प्रस्थापित करणं कठिण होऊन बसलं आहे.

फोटो स्रोत, REUTERS
एकीकडे याह्या तर दुसरीकडे नेतन्याहू
या युद्धजन्य परिस्थितीत एकीकडे हमासचे सर्वोच्च नेते याह्या सिनवार आहेत. ते गाझापट्टीतून इस्त्रालायला कायमचे हद्दपार करू इच्छितात. तसंच त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्त्रायली नागरिकांना मुक्त करण्याच्या मोबदल्यात इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाइनच्या कैद्यांना मुक्त करण्याची मागणीही ते करत आहेत.
दुसरीकडे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हमासचा बिमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत.
युद्ध जेवढे ताणले जाईल तेवढा नेतन्याहू यांनाच फायदा होईल असं इस्त्रायलमध्ये राजकीय वातावरण आहे. त्यामुळं हमासच्या ताब्यात असलेल्या इस्त्रायली नागरिकांना सोडवण्याचा दबाव असूनही पंतप्रधान त्याकडं साफ दूर्लक्ष करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
इस्त्रायलच्या युती सरकारमधील घटकपक्षांनीही हमाससोबत वाटाघाटी केल्यास सत्तेतून बाहेर पडून सरकार पाडण्याचा इशारा दिला असल्यानं पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडं दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, इस्त्रायल आणि त्यांचे मित्र देश पारंपरिक शत्रू असलेल्या लेबनानचे लष्करी संघटन हिजबुल्लाहला युद्धात ओढण्यात काहीच गैर नसून ते बचावासाठी योग्यच आहे या भूमिकेशी सहमत आहेत.
युद्धाचा धोका
इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे लेबनॉन आणि संपूर्ण प्रदेशात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. कारण या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमीही झाले आहेत.
एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्फोट बाजारात घडला असून अन्य एका स्फोटात एका लहान मुलीलाही जीव गमवावा लागल्याचं दिसून आलं.
हिजबुल्लाह या हल्ल्यातून सावरत असून हळूहळू पुन्हा एकत्र येत आहे. संपर्क साधण्यासाठी ते आता पेजरऐवजी दुसरा पर्याय अवलंबतील.
लेबनान हा आकारमानाने लहान देश असल्याने सहजतेने संदेश एकीकडून दुसरीकडे पाठवले जाऊ शकतात.
या पेजरच्या स्फोटात इराणचे राजदूतही जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाह आणि इराण या हल्ल्यामुळे नक्कीच चवताळले असतील. दुर्दैवाने परिस्थिती अशीच राहिल्यास हा प्रदेश युद्धभूमित रुपांतरीत शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











