लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या स्फोटांतील मृतांचा आकडा 25 वर, तर 600 हून अधिक जखमी

लेबनॉनमध्ये पेजरनंतर आता वॉकी-टॉकींचे स्फोट; 20 मृत्युमुखी, तर 450 जखमी

फोटो स्रोत, Getty Images

लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये पेजर्समध्ये स्फोट होण्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा काही ठिकाणी स्फोट झाले आहेत. या कम्युनिकेशन डिव्हाईसेस मध्ये झालेल्या स्फोटांतील मृतांचा आकडा 25 वर पोहोचल्याचं, लेबनानचे आरोग्य मंत्री फिरास अबैद यांनी सांगितलं.

गुरवारी पत्रकार परिषदेत बोलताना फिरास यांनी याबाबत माहिती दिली.

लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या नॅशनल न्यूज एजन्सीने (एनएनए) सांगितंल की, अनेक 'डिव्हायसेस'मध्ये झालेल्या स्फोटांमुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटांत 12 मृत्यू झाले होते.

दक्षिण लेबनॉनमधील बेरुत शहराच्या दक्षिणेतील उपनगरांमधील घरांमध्ये जुन्या पेजर्समध्ये स्फोट झाल्याचे वृत्त एनएनएने दिलं आहे. मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसांत झालेल्या स्फोटांतील मृतांचा आकडा 37 वर पोहोचला आहे.

सध्या या स्फोटांमधील जखमींना बैरुत आणि बालबेकमधील हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलंय.

सेंट्रल बेकामधील अली अल-नाहरी गावामध्ये रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका डिव्हाईसमध्ये झालेल्या स्फोटामुळे दोन जण जखमी झाले असल्याची माहिती एनएनएने दिली आहे.

तर दुसऱ्या एका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बेकामधील जाएदेत मार्जेयूनच्या कब्रस्तानजवळील एका गाडीत असलेल्या पेजरमध्येही स्फोट झाला आहे.

लेबनॉन

फोटो स्रोत, Reuters

अंत्ययात्रेदरम्यान स्फोट

हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण बैरुतमधील चार लोकांच्या अंत्ययात्रेदरम्यानही एक स्फोट झाला आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहकडून ज्या कम्यूनिकेशन डिव्हाईसेसचा वापर केला जातो, त्यांच्यामध्येच हे स्फोट झालेले आहेत.

हिजबुल्लाने या रेडियो डिव्हाईसची खरेदी पाच महिन्याआंधी पेजर खरेदी करतेवेळीच केली होती, अशी माहितीही रॉयटर्सने दिली आहे.

लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटलं आहे की, दक्षिण बैरुतमधील घरांमध्ये काही जुन्या पेजर्समध्येही स्फोट झाला आहे.

या स्फोटांमध्ये सोहमार नावाच्या एका गावामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

या स्फोटांमधील जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बेका व्हॅलीमधील अली अल-नाहरी गावामध्ये डिव्हाईसमध्ये स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाल्याची माहिती सरकारी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने दिली आहे.

हिजबुल्लाहच्या शेकडो पेजरचा स्फोट

काल (18 सप्टेंबर) लेबनॉनमध्ये शेकडो पेजरच्या झालेल्या स्फोटांमुळे हिजबुल्लाह या सशस्त्र गटाचे काही सदस्य मृत्युमुखी पडले.

हिजबुल्लाहचे सदस्य 'पेजर' या साधनाचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करायचे. या स्फोटामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो जण जखमी झाले आहेत.

लेबनानमधील सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे स्फोट बेरूत आणि त्यालगतच्या भागामध्ये झाले आहेत.

लेबनॉन

फोटो स्रोत, Reuters

हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीनेही या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र, या स्फोटात किती आणि कोण कोण जखमी झाले आहेत, याची माहिती त्यांनी दिलेली नाही.

हिजबुल्लाहशी निगडीत लोकांनी 'रॉयटर्स'शी बोलताना म्हटलं की, ही गेल्या 11 महिन्यांतील सुरक्षेचा सर्वांत मोठा भंग करणारी घटना आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर जखमी लोकांचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहेत. अनेक जखमी लोक जमिनीवर कोसळल्याचे चित्रही त्यामध्ये दिसत आहे.

एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाच्या आता मोठा स्फोट झाल्याचंही दिसून आलंय.

11 महिन्यांआधी म्हणजेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासने इस्रायलवर हल्ला केला होता.

हमासच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल तेव्हापासूनच गाझामध्ये लष्करी कारवाई करताना दिसत आहे.

लेबनॉन

फोटो स्रोत, Reuters

हिजबुल्लाहने काय म्हटलं?

हिजबुल्लाहने म्हटलं की, ते या घटनेसंदर्भात तपास करत असून हे स्फोट कशामुळे झाले, या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

या घटनेसाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्राण घेणाऱ्या या घटनेसामागे इस्रायलचाच हात असल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे.

मात्र, अद्याप तरी या घटनेबाबत इस्रायलच्या सैन्याने काहीही भाष्य केलेलं नाही.

हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयानुसार, गाझातील युद्धामध्ये आतापर्यंत 41 हजार 220 जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत जवळपास 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कुठे झालेत हे स्फोट?

बीबीसी प्रतिनिधी पॉल ऍडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेजर्सचा स्फोट झाल्याच्या घटना लेबनॉनची राजधानी बेरुतपासून ते बेका व्हॅली आणि शेजारील देश असलेल्या सीरियामध्येही घडल्या आहेत.

यातील बरेचसे स्फोट लहान स्वरुपात असले तरी काही ठिकाणी झालेले स्फोट बरेच भीषण असल्याचं दिसून आलंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.