हसन नसरल्लाह : इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेले हिजबुल्लाहचे हे नेते कोण?

हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, JAMARAN

फोटो कॅप्शन, हसन नसरल्लाह
    • Author, कीवान हुसैनी
    • Role, बीबीसी

हिजबुल्लाहचे प्रमुख नेते हसन नसरल्लाह यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हिजबुल्लाहनेही या घटनेला दुजोरा दिला आहे.

हिजबुल्लाहनं हसन नसरल्लाह यांना 'शहीद' म्हटलं. शिवाय, इस्रायलविरोधातील लढाई सुरूच राहील, असंही म्हटलंय.

हसन नसरल्लाह हिजबुल्लाह या सशस्त्र संघटनेसाठी इतके महत्त्वाचे का होते? इस्रायलने त्यांना मारण्याचा प्रयत्न का केला? त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता?

या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

हसन नसरल्लाह यांचं बालपण आणि तारुण्य

हसन नसरल्लाह यांच्या जन्मानंतर काही वर्षांतच लेबनॉनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं.

हसन नसरल्लाह यांचा जन्म लेबनॉनच्या बैरुतमधील एका गरीब पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं एक छोटंसं दुकान होतं. त्यांना आठ भावंडं होती आणि त्यामध्ये ते सर्वांत मोठे होते.

गृहयुद्ध सुरू झालं, तेव्हा ते पाच वर्षांचे होते. हे एक अतिशय विध्वसंक युद्ध होतं. जवळजवळ पंधरा वर्षं हे युद्ध सुरू होतं. या दरम्यान लेबनॉनचे नागरिक धर्म आणि वंशाच्या मुद्द्यावर एकमेकांशी लढले.

या दरम्यान ख्रिश्चन आणि सुन्नी सैनिकांना परदेशातून मदत मिळत असल्याचाही आरोप झाला.

हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, FARS

या युद्धाच्या सुरुवातीला हसन नसरल्लाह यांच्या वडिलांनी बैरुत सोडण्याचा आणि लेबनॉनच्या दक्षिणेला असलेल्या आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे शिया लोक बहुसंख्येने राहत होते.

हसन नसरल्लाह पंधरा वर्षांचे असतानाच त्या काळात सर्वांत महत्त्वपूर्ण असलेल्या लेबनीज शिया राजकीय लष्करी समुदायाचे सदस्य झाले. त्याचं नाव 'अमल मूव्हमेंट' असं होतं. हा एक अतिशय प्रभावशाली आणि सक्रिय गट होता. या गटाचा पाया इराणच्या मूसा सदर यांनी घातला होता.

त्याच दरम्यान नसरल्लाह यांनी धार्मिक शिक्षण घ्यायलाही सुरुवात केली होती. त्यांच्या एका शिक्षकांनी त्यांना सल्ला दिला की त्यांनी शेख व्हावं आणि नजफ या शहरात जावं. त्यांनी हा सल्ला ऐकला आणि ते सोळाव्या वर्षी इराकमधील नजफ या शहरात गेले.

लेबनॉनमध्ये पुनरागमन आणि सशस्त्र संघर्ष

नसरल्लाह जेव्हा इराकमध्ये होते, तेव्हा इराक हा अतिशय अस्थिर असा देश होता. तिथे दोन दशकांपर्यंत सातत्याने क्रांती, रक्तरंजीत बंडखोरी आणि राजकीय हत्यांच्या मालिका सुरू होत्या. त्याच दरम्यान तत्कालीन उपराष्ट्रपती सद्दाम हुसैन यांचं वर्चस्व वाढू लागलं होतं.

नसरल्लाह तिथे गेल्यावर दोन वर्षांनी बाथ पक्ष आणि सद्दाम हुसैन यांनी सर्व लेबनीज शिया विद्यार्थ्यांना मदरशाच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नसरल्लाह यांना तिथे फक्त दोन वर्षं शिकता आलं. मात्र नजफला असताना त्यांच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. नजफमध्ये त्यांची भेट अब्बास मुसवी नावाच्या उच्चशिक्षित व्यक्तीशी झाली.

हिजबुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

मुसवी हे एकेकाळी मूसा सदर यांचे शिष्य म्हणून ओळखले जायचे. इराणचे क्रांतिकारी नेते आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या राजकीय दृष्टिकोनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते नसरल्लाह यांच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठे होते. अल्पकाळातच ते अतिशय कठोर शिक्षक आणि प्रभावशाली नेते म्हणून उदयाला आले.

लेबनॉनमध्ये परत आल्यावर हे दोघंही तिथल्या स्थानिक गृहयुद्धात सामील झाले. मात्र, यावेळी ते अब्बास मुसवी यांच्या मूळ गावी गेले. तिथे बहुतांश स्थानिक लोक शिया पंथाचे होते.

याच काळात नसरल्लाह अमल आंदोलनाचे सदस्य झाले आणि मूसवी यांच्या मदरशात शिक्षणही घेऊ लागले.

इराणी क्रांती आणि हिजबुल्लाहची स्थापना

हसन नसरल्लाह लेबनॉनला परत आल्यानंतर इराणमध्ये क्रांती झाली. या क्रांतीनंतर रुहुल्लाह खोमेनी यांनी सत्तेवर ताबा मिळवला. या घटनेनंतर लेबनॉनमधील शिया समुदायाचे इराणशी असलेले संबंध पूर्णपणे बदलले. इराणमध्ये घडणाऱ्या घटनांचा शिया लोकांच्या राजकारणावर आणि सशस्त्र संघर्षावर मोठा प्रभाव पडू लागला.

नसरल्लाह यांनी तेहरानमध्ये त्यावेळच्या इराणच्या नेत्यांची भेट घेतली आणि खोमेनी यांनी नसरल्लाह यांना आपला प्रतिनिधी म्हणून नेमलं.

त्यानंतर नसरल्लाह यांचे इराणचे दौरे वाढले आणि इराण सरकारमधील निर्णायक आणि शक्तिशाली सत्ताकेंद्रांशी असलेले त्यांचे संबंध अधिक दृढ होऊ लागले.

इराणने लेबनॉनमधील शिया लोकांशी असलेल्या संबंधांना खूप महत्त्व दिलं. मध्य पूर्व भागात इस्रायलमुळे सुरु असलेलं पॅलेस्टिनींचं आंदोलन हे सुद्धा इराणच्या परराष्ट्र धोरणांमध्ये अगदी प्राधान्यक्रमावर होतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दरम्यान गृहयुद्धाने व्यापलेलं लेबनॉन हे पॅलेस्टिनी सैनिकांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र झालं होतं. स्वाभाविकच बैरुतशिवाय दक्षिण लेबनॉनमध्येही त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

लेबनॉनमध्ये अस्थिरता वाढतच होती. अशा परिस्थितीत इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला आणि या देशाच्या महत्त्वपूर्ण केंद्रांवर तातडीने ताबा मिळवला. पॅलेस्टिनी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी लेबनॉनवर हल्ला केल्याचं स्पष्टीकरण इस्रायलने दिलं होतं.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये पासदारान-ए-इन्किलाब-ए-इस्लामी (इस्लामी क्रांतीचे रक्षक) च्या लष्करी कमांडोंनी इराणशी निगडीत लष्करी गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे हिजबुल्लाहचं आंदोलन होतं. त्यात हसन नसरल्लाह आणि अब्बास मुसवी यांच्यासारखे लोक सहभागी होते. अमल आंदोलनातील काही सदस्यांबरोबर ते या नवीन गटात सामील झाले.

या गटाने लवकरच लेबनॉनमध्ये अमेरिकन सैन्याच्या विरोधात सशस्त्र कारवाई करून राजकीय क्षेत्रात आपलं नाव कमावलं.

हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जेव्हा हसन नसरल्लाह हिजबुल्लाहमध्ये सामील झाले तेव्हा त्यांचं वय केवळ 22 वर्षं होतं आणि त्यांना नवखं समजलं जात होतं.

हसन नसरल्लाह यांचे इराणशी असलेले संबंध अधिकाधिक गहिरे बनत चालले होते. त्यांनी आपलं धार्मिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी इराणच्या कुम शहरात जाण्याचा निर्णय घेतला.

नसरल्लाह यांनी दोन वर्षांपर्यंत तिथे शिक्षण घेतलं आणि या काळात फारसी भाषा शिकण्याबरोबरच इराणी समुदायातील अनेक मित्र जोडले.

लेबनॉनमध्ये परत आल्यावर त्यांच्यात आणि अब्बास मूसवी यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी मूसवी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष हाफिज असद यांचे समर्थक होते. मात्र, नसरल्लाह यांनी सांगितलं की हिजबुल्लाहने अमेरिका आणि इस्रायलवर जास्त लक्ष केंद्रित करावं. त्यानंतर हिजबुल्लाहमध्ये नसरल्लाह यांचे समर्थक खूप कमी झाले. त्यानंतर त्यांना इराणमध्ये हिजबुल्लाहचा प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आलं. ते पुन्हा एकदा इराणला आले आणि हिजबुल्लाहपासून दूर झाले.

हिजबुल्लाहवरील इराणचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे असं त्यावेळी वाटत होतं. हा तणाव इतका वाढला की हिजबुल्लाहच्या सेक्रेटरी जनरलला हटवून त्यांच्या जागी सीरियाला पाठिंबा देणारे अब्बास मूसवी यांना या संघटनेचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं. सेक्रेटरी जनरल तुफैली यांची हकालपट्टी केल्यावर नसरल्लाह परत आले आणि व्यावहारिक पातळीवर हिजबुल्लाहचे उपप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली.

हिजबुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

नसरल्लाह यांच्याकडे हिजबुल्लाहचं नेतृत्व

अब्बास मूसवी यांची हिजबुल्लाहच्या सेक्रेटरी जनरल पदी नियुक्ती झाल्यावर एका वर्षांच्या आतच इस्रायलच्या गुप्तहेरांनी त्यांची हत्या केली आणि त्याच वर्षी म्हणजे 1992 मध्ये संघटनेचं नेतृत्व नसरल्लाह यांच्या हातात गेलं.

त्यावेळी ते 32 वर्षांचे होते. त्यावेळी लेबनॉनचं गृहयुद्ध संपून फक्त एक वर्ष झालं होतं. नसरल्लाह यांनी हिजबुल्लाहच्या राजकीय शाखेला देखील लष्करी शाखेबरोबर पुढे आणण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर हिजबुल्लाहला लेबनॉनच्या संसदेत आठ जागांवर विजय मिळवण्यात यश आलं.

हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हसन नसरल्लाह

ताइफ करारानुसार लेबनॉनमधील गृहयुद्ध संपुष्टात आलं. हिजबुल्लाहला आपल्याकडे शस्त्र ठेवण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर ताबा मिळवला होता आणि हिजबुल्लाहबरोबर त्यांचं सशस्त्र आंदोलन सुरू होतं.

लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाला इराणकडून आर्थिक मदत मिळत होती आणि त्यामुळे नसरल्लाहने देशात शाळा, रुग्णालयं, आणि आसरा घेण्यासाठी विविध केंद्रांचं एक मोठं जाळं उभारलं. या कल्याणकारी कामामुळे लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहला आपली राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आणखी बळ मिळालं.

इस्रायलचा काढता पाय आणि नसरल्लाह यांची वाढलेली लोकप्रियता

हसन नसरल्लाह यांची लोकप्रियता आता चांगलीच वाढू लागली होती.

इस्रायलने 2000 साली लेबनॉनमधून पूर्णपणे निघून जाण्याची घोषणा केली. तसंच, दक्षिण भागावर असलेला आपला ताबा सोडण्याचीही घोषणा केली. हिजबुल्लाहने हा एक मोठा विजय असल्याचं मानलं आणि या विजयाचं श्रेय त्यांनी नसरल्लाह यांना दिलं.

एखाद्या अरब देशाच्या भूमीवर कोणताही शांतता करार न करता असं एकतर्फी पद्धतीने सोडून जाण्याची इस्रायलची पहिलीच वेळ होती. अनेक अरब नागरिकांच्या मते हा एक खूप मोठा विजय होता.

मात्र, तेव्हापासून लेबनॉनकडे असणारी हत्यारे लेबनॉनच्या स्थैर्य आणि सुरक्षेत मोठा अडथळा झाली आहे. इस्रायल लेबनॉनमधून निघून गेल्यामुळे हिजबुल्लाह गटाचा सशस्त्र राहण्याचा म्हणजेच शस्त्र बाळगण्याचा कायदेशीर अधिकार संपुष्टात आला होता. इतर देशातील लोकांनी या गटाला नि:शस्त्र होण्यास सांगितलं. मात्र नसरल्लाह यांनी ते कधीही ऐकलं नाही.

हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

2002 मध्ये नसरल्लाह यांनी इस्रायलशी चर्चा करताना कैद्यांच्या सुटकेचा करार केला. त्यात 400 पेक्षा अधिक पॅलेस्टिनी, लेबनीज आणि इतर अरब देशांच्या कैद्यांची सुटका करुन घेण्यात आली.

त्यावेळी नसरल्लाह अधिक शक्तिशाली आणि प्रभावी दिसत होते. लेबनॉनच्या राजकारणात त्यांच्या विरोधकांना त्यांच्याशी सामना करणं आणि त्यांची ताकद कमी करणं दिवसेंदिवस कठीण आणि अतिशय आव्हानात्मक होऊन बसलं होतं.

हरीरीची हत्या आणि सीरियात पुनरागमन

1983 मध्ये लेबनॉनचे तत्कालीन पंतप्रधान रफीक हरीरी यांच्या हत्येनंतर जनमानसाचं मत बदललं.

रफीक हरीरी यांना सौदी अरेबियाशी चांगले संबंध असलेल्या नेत्यांमध्ये गणलं जायचं. त्यांनी हिजबुल्लाहला रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला.

हरीरी यांच्या हत्येनंतर सीरिया आणि हिजबुल्लाह यांच्याविरुद्ध लोक संतापले. या दोघांवर हरीरी यांच्या हत्येत सामील असण्याचा आरोप केला गेला. बैरुतमध्ये प्रचंड आंदोलन झाल्यावर सीरियाने लेबनॉनमधून आपलं सैन्य काढण्याचा निर्णय घेतला.

त्यावर्षी निवडणुका झाल्या तेव्हा हिजबुल्लाहच्या मतांमध्ये वाढ झालीच. पण त्यांना दोन मंत्रालयंसुद्धा मिळाली. तेव्हा नसरल्लाह यांनी हिजबुल्लाहला लेबनॉनचा राष्ट्रवादी गट म्हणून लोकांसमोर आणलं. आपण कुणासमोरही झुकत नाही, असं दाखवण्यात ते यशस्वी झाले.

हसन नसरल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

2005 मध्ये उन्हाळ्यात हिजबुल्लाहचे सैनिक इस्रायलमध्ये दाखल झाले. त्यांनी एका सैनिकाला मारलं तर दोन सैनिकांना बंदी बनवलं. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने एक जोरदार हल्ला केला. हा हल्ला 33-34 दिवस सुरू होता आणि त्यात सुमारे 1200 लेबनीज नागरिक ठार झाले.

या युद्धानंतर नसरल्लाह यांची लोकप्रियता आणखी वाढली आणि इस्रायलविरुद्ध लढणारा अरब देशातील शेवटचा व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली.

वाढती ताकद

हिजबुल्लाहच्या ताकदीत वाढ झाल्यामुळे विरोधी गट विशेषत: लेबनॉनच्या राजकीय नेत्यांनी हिजबुल्लाहच्या विरोधातल्या कारवाईला वेग दिला.

2007 मध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर हिजबुल्लाहच्या ताब्यात असलेली टेलिकम्युनिकेशन व्यवस्था रद्द करण्यचा निर्णय घेतला. हा विभाग फक्त सरकारच्या ताब्यात राहील अशी व्यवस्था करण्यात आली.

हा निर्णय नसरल्लाह यांनी अजिबात स्वीकारला नाही. इतकंच नाही तर थोड्याच काळात त्यांच्या सशस्त्र गटाने संपूर्ण नियंत्रण मिळवलं.

नसरल्लाह यांच्या या कृतीवर पाश्चिमात्य देशांनी प्रचंड टीका केली. मात्र, राजकीय चर्चा झाल्यानंतर ते लेबनॉननच्या मंत्रिमंडळात आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयांमध्ये नकाराधिकार वापरण्याची सोय करून घेतली.

2008 मध्ये लेबनॉनच्या संसदेत हिजबुल्लाहच्या जागा कमी झाल्या तरी नसरल्लाह त्यांचा नकाराधिकार कायम ठेवण्यात यशस्वी ठरले.

त्याचवर्षी कॅबिनेटने हिजबुल्लाह यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून नसरल्लाह यांची ताकद कोणीही कमी करू शकलं नाही

त्यांना विरोध करणाऱ्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला काय, सौदी अरेबियाचे राजकुमार प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी हस्तक्षेप केला काय, त्यांना कोणीही मागे सारू शकलं नाही. त्याउलट इतकी वर्षं इराणच्या मदतीने सीरियाचं गृहयुद्ध आणि लेबनॉनमध्ये आर्थिक संकट अशा ऐतिहासिक संकटांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले.

लेबनॉनमध्ये ते एक राजकीय आणि लष्करी नेतेच नाही तर त्यांचा संघर्ष अनेक दशकांचा आहे. त्याचा वापर ते आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवण्यासाठी आणि प्रोपगंडा तयार करण्यासाठी करत होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)